रोबोटीक्समध्ये मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी दोन बहिणींचे प्रयत्न अदिती आणि दिप्ती यांची अभिनव कामगिरी
ʻरोबोटीक्स लर्निंग सोल्यूशन्सʼच्या मुख्य कार्य़कारी अधिकारी (चीफ ऑपरेटींग ऑफिसर) आणि मुख्य सूचना अधिकारी (चीफ इन्फॉरमेशन ऑफिसर) असलेल्या दोन बहिणी म्हणजे अदिती प्रसाद आणि दिप्ती राव सुचिंद्रन. सध्या या दोन्ही बहिणी रोबोटीक्सच्या माध्यमातून नव्या पिढीतील संशोधकांना प्रेरणा द्यायचे काम करत आहेत. सध्या त्या याचा वापर एका साधनाप्रमाणे करत असून, त्याच्या माध्यमातून त्या एक STEM कौशल्य निर्माण करणार आहेत. STEM म्हणजे Science (विज्ञान), Technology (तंत्रज्ञान), Engineering (अभियांत्रिकी) आणि Maths (गणित). या दोन्ही बहिणींना शिक्षण आणि तंत्रज्ञानाबद्दल उत्कट आवड असून, त्यांच्या बालपणातच त्यांची प्रेरणा दडलेली आहे. लहानवयातच त्यांचे वडिल अत्यंत मनोरंजक आणि आकर्षक पद्धतीने त्यांना वैज्ञानिक संकल्पना पटवून देत असत. उदाहरणार्थ - खेळण्यातील चेंडू जमिनीवर टाकून ते त्यांना गुरुत्वाकर्षणाबद्दल माहिती सांगत, ते त्यांना बागेत फिरायला घेऊन जात, फुलपाखरु दाखवत आणि त्याच्याबद्दल माहिती विचारत. ते त्यांच्यात एखाद्या गोष्टीबद्दल कुतुहलाचे बीज पेरत आणि त्याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी निरीक्षण करण्यास त्यांना प्रोत्साहन देत. त्यांचे बालपण एखादे लहान रोपटे लावणे, त्याची काळजी घेणे आणि त्याचे झाडात रुपांतर होऊन ते इतरांना फळे-फुले देईपर्य़ंत वाढवणे, यात व्यतित झाले. अदिती आणि दिप्ती यांच्या बालमनावरच कुतुहलाच्या माध्यमातून जे वैज्ञानिक संस्कार झाले, तिच प्रेरणा इतरांना देण्याचा त्या प्रय़त्न करत आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या या दोन्ही बहिणींना रोबोटीक्स हा विषय तरुणांच्या आय़ुष्यातील एक महत्वाचा घटक बनवायचा आहे. त्या सांगतात, ʻखेळण्यातील रोबोटसोबत खेळताना लहान मुलांच्या नजरेत एक विशिष्ट चमक दिसते. त्याच लहान मुलांना रोबोटीक्स संदर्भात अशा काही गोष्टी शिकवायच्या, ज्यामुळे त्यांचा अनुभव अविस्मरणीय ठरेल.ʼ आम्ही या दोन्ही बहिणींशी बातचीत करुन, अधिकतम तरुण मुलींना रोबोटीक्स आणि STEM शिक्षणपद्धतीच्या छताखाली एकत्र आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नाबद्दल जाणून घेतले.
आपल्या लहानपणाबद्दल बोलताना अदिती सांगतात की, ʻआंतरशालेय सांस्कृतिक स्पर्धांची मुख्य समन्वयक, शाळेच्या व्हॉलीबॉल संघाची कर्णधार तसेच कॉमर्स क्लबची अध्यक्ष अशी पदे शालेय जीवनातच भूषविल्यामुळे माझ्यातील नेतृत्वगुणाला वाव मिळाला होता. याचे सर्व श्रेय माझ्या वडिलांना जाते. मी लहान असताना माझे वडिल आम्हाला अनेक वैज्ञानिक सिद्धांत मनोरंजक आणि अभिनव पद्धतीने शिकवायचे. शिक्षणाप्रति त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनामुळेच मला माझ्या भोवतालचे जग समजू लागले होते. याशिवाय त्यांनी आम्हाला विश्लेषणात्मक विचार करण्यास शिकवले होते. उदाहरणार्थ - मला आजही तो रविवार आठवतो, ज्यादिवशी त्यांनी आणि मी टाईम मासिकातील एक लेख एकत्र वाचला होता. त्यानंतर आम्ही त्याच्या मूलभूत संकल्पनेवर, कल्पनेवर, जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली होती. तेव्हा माझ्यात इतिहासाबद्दल कुतुहल निर्माण झाले होते. विशेष करुन भारताचा इतिहास आणि संविधान. त्यामुळे मला कायदेविषयक अभ्यासासाठी पुण्यातील आयएलएस लॉ महाविद्यालयात जाण्यात रस निर्माण झाला. त्यानंतर मी सिंगापूरमधील ली कुआन यू स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी येथे प्रवेश घेतला. तेथे मी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षणाप्रती माझ्या उत्कट भावनेमुळे मी पदवीनंतर लगेचच ली कुआन यू स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीच्या शैक्षणिक कार्यकारी विभागात नोकरी करू लागले. सिंगापूरवरुन जेव्हा मी भारतात परतले, तेव्हा मी आयआयटी मद्रासच्या चायना स्टडी सेंटरद्वारे आयोजित करण्यात आलेल्या संशोधन आणि प्रकल्प व्यवस्थापनात काम करू लागले. त्यानंतर मी आमच्या रोबोटीक्स लर्निंग सोल्यूशन स्टार्टअपमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. सध्या मी तेथे मुख्य कार्य़कारी अधिकारी (चीफ ऑपरेटींग ऑफिसर) म्हणून कार्य़रत आहे. रोबोटीक्स एज्युकेशन प्रोग्राम, वार्षिक रोबोटीक्स स्पर्धा आणि इंडियन रोबोटीक्स लीगचे मी नेतृत्व करते.ʼ, असे अदिती सांगतात.
दिप्ती याबाबत बोलताना सांगतात की, ʻमाझ्यावर बालवयातच शिक्षणाचे महत्व आणि ज्ञान, या दोन गोष्टींचे संस्कार प्रामुख्याने करण्यात आले होते. याचे सर्व श्रेय अर्थात माझ्या पालकांना जाते. माझे वडिल हे विज्ञाननिष्ठ होते. मी जेव्हा पाच वर्षांची होते, तेव्हापासून मला लहानसहान गोष्टींमधून, घटनांमधून विज्ञान आणि गणित शिकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आईस स्केटींग या खेळामागील विज्ञान त्यांनी आम्हाला बर्फाचा खडा आणि धाग्याच्या सहाय्याने प्रात्यक्षिक करुन शिकवले होते. त्यांनी माझ्यात आणि माझ्या बहिणीत तंत्रज्ञानाविषयीची आवड निर्माण केली. त्यांनी आमच्या मनात कुतुहलाचे बीज पेरले आणि गोष्टी एकएक करुन कशा घडत जातात, याचे निरीक्षण करण्याची सवय लावली. जेव्हा मी १२ वर्षांची होते, तेव्हा जॉ हा चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या मनात शार्क माशाबद्दल कुतुहल निर्माण झाले होते. त्यानंतर मी शार्क माशाबद्दल माहिती गोळा करू लागले होते. त्यावेळी माझ्या या आवडीच्या विषयाचा प्रकल्प मला शाळेत सादर करण्यास सांगण्यात आले. अशाप्रकारे उच्च माध्यमिक शाळेत जीवशास्त्र विषय शिकण्याचा रस माझ्यात निर्माण झाला. Anna विद्यापीठातून इंडस्ट्रीयल बायोटेक्नॉलॉजी या विषयात मी माझे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. जेव्हा माझ्या वडिलांनी मला वी.एस.रामचंद्रन लिखित फॅण्टम इन द ब्रेन पुस्तक वाचण्यास दिले, तेव्हा मला न्युरोसायन्स या विषयात रुची निर्माण झाली. त्यानंतर मला नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स येथे न्युरोसायन्स विषयात ज्युनियर रिसर्च फेलोशीप मिळाली. तर चॅपेल हिल येथील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातून मी न्युरोफिजिओलॉजी विषयात पीएचडी मिळवली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी काही काळ या क्षेत्रात प्रशिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर मात्र माझ्या घरातल्यांसोबत रोबोटीक्स लर्निंग सोल्यूशनमध्ये काम करण्याचे ठरविले.ʼ शिक्षण क्षेत्रातील स्त्रियांच्या प्रमाणाबाबत बोलताना अदिती सांगतात की, वयाच्या चौथ्या वर्षापासून मुलामुलींमध्ये पक्षपात व्हायला सुरुवात होते. प्रामुख्याने त्या क्षेत्रात जेथे मुलांचे वर्चस्व असते. अशा क्षेत्रात प्रवेश घेण्यापासून मुली वंचित राहतात. STEMचे आव्हान पेलण्यास मुलीदेखील सक्षम आहेत, याबाबत संकोच बाळगणाऱ्या समाजामुळे अडचणीत अधिक भर पडते. अलौकिक कामगिरी करणाऱ्या स्त्रिया किंवा स्त्री मार्गदर्शक या क्षेत्रात अल्प असल्यामुळे मुलींना आदर्श ठेवण्यासारखी प्रेरणादायी व्यक्तिमत्व नाहीत. याशिवाय एक सर्वसामान्य बाब अशी निदर्शनास आली की, अनेक स्त्रिया STEM मध्ये कारकिर्द घडविण्यासाठी येतात. मात्र लवकरच त्या त्यातून माघार घेतात कारण पाळणाघर सारख्या सुविधा उपलब्ध नाहीत म्हणून. स्त्री-पुरुष समानता कशी राबवता येऊ शकते याबाबत बोलताना त्या सांगतात की, मुलांना लहानपणापासून म्हणजे दोन ते पाच वयोगटातदेखील योग्य शिक्षण देणे गरजेचे आहे. STEMच्या संकल्पना बालवयातच समजल्यास त्यांना मोठेपणी त्याचा फायदा होऊ शकतो. जेणेकरुन मुलींमधील आत्मविश्वास निर्माण करण्याचा आणि त्या कोणत्याही क्षेत्रात काम करण्यास सक्षम असल्याचा विश्वास त्यांच्यात निर्माण होऊ शकेल. या कौशल्यांचा विकास झाल्यानंतर तंत्रज्ञानाने भरलेल्या या जगात तुम्हाला नोकरी मिळणे सुलभ होऊ शकते. अधिकाधिक तरुण मुलींनी रिस्क घेणे, संधी शोधणे आणि आव्हानात्मक मार्गावर चालण्याची तयारी दर्शवणे, गरजेचे आहे. उच्च स्तरावरदेखील हे होणे गरजेचे असल्याचे त्या सांगतात.
रोबोटीक्स लर्निंग सोल्यूशन STEM शिक्षणपद्धतीत मुलींसाठी विशेष काय प्रय़त्न करते, असे विचारले असता अदिती सांगतात की, एक महिला म्हणून आणि एका प्रतिष्ठित रोबोटीक्स कंपनीची कर्मचारी म्हणून मी एवढेच सांगू इच्छिते की, अधिकाधिक मुलींना STEM संबंधित कारकिर्द घडविण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करायचे आहे. लहानपणीच त्यांच्यात त्याबाबत रस निर्माण करणे गरजेचे आहे, असे आम्हाला वाटते. आमच्या रोबोटीक्स प्रशिक्षण कार्यक्रमात आम्ही सहा वर्षावरील मुलामुलींना सहभागी करतो. अधिकाधिक मुलींना यात सहभागी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आमच्या एका विशेष उपक्रमात त्यांना रस निर्माण व्हावा तसेच त्यांना कुतुहल वाटावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. आमच्या इंडियन रोबोटीक्स लीग या स्पर्धेत मुलींच्या संघाकरिता विशेष पुरस्कार आहे. संगणक विज्ञान क्षेत्रात सध्या कमालीची वाढ होत आहे. भरपूर पगाराच्या नोकऱ्या या क्षेत्रात मिळत आहेत. तरुण वयात मुलांमध्ये विकसित करण्यासारखे अजून एक कौशल्य म्हणजे संगणक प्रोग्रामिंग. आकडेवारीवरुन हे निदर्शनास येते की, संगणक क्षेत्रातदेखील स्त्रियांचे प्रमाण अल्प आहे आणि आपल्याला हे चित्र बदलायचे आहे. एप्लिकेशन आधारित क्षेत्रात मुलींना अधिक रस असतो. तंत्रज्ञानाचा विकास हा जगासाठी अधिक महत्वाचा आहे. दक्षिण भारतातील अनेक K-12 शाळांमध्ये आम्ही रोबोटीक्स कार्यक्रम राबवितो. याशिवाय आम्ही अनेक कार्यशाळांचे आयोजन करतो. तसेच आम्ही इंडियन रोबोटीक्स लीग नावाची एक वार्षिक स्पर्धा आयोजित करतो. एक सामाजिक योगदान म्हणून आम्हाला असे वाटते की, भारतातील प्रत्येक मुलाला STEM शिक्षणपद्धतीच्या माध्यमातून सर्वोत्तम शिक्षणाचा अधिकार मिळायला हवा. त्यामुळे आम्ही तरुण मुलांना मोफत शिक्षण पुरवण्याचा प्रयत्न करतो. Indian Girls Code कार्य़क्रमाबद्दल बोलताना दिप्ती सांगतात की, Indian Girls Code ही आमची मोहिम तरुण मुलींना कोडींग शिकण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आहे. एप्लिकेशन संबंधित क्षेत्रात काम करण्यासाठी मुलींनादेखील रस असल्याचे आमच्या निदर्शनास आले. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मुली त्यांच्या दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करू शकतात. तसेच त्यांना अनेक प्रकारे रोजगाराचे मार्ग खुले होतील. आम्ही कोची येथील अन्नाई महिलाआश्रमात आता एक कार्य़क्रम सुरू केला आहे आणि त्याच्या विस्ताराचे प्रयत्न करत आहोत. मुलींना STEMमध्ये शिक्षणासाठी पाठवण्याकरिता तुम्ही त्यांच्या पालकांची कशी मनधरणी करता, याबाबत सांगताना अदिती बोलतात की, रोबोटीक्स हे पुरुषप्रधान क्षेत्र आहे, अशी प्रत्येक पालकांची मानसिकता आहे. STEM चे फायदे पालकांना पटवून देण्याचा आम्ही प्रय़त्न करत आहोत. रोबोटीक्स क्षेत्राकडे जर पालकच आकर्षित झाले, त्याचसोबत जर तरुण मुलींना त्याचे महत्व कळले, तर त्याचे चांगलेच परिणाम होतील. इंडियन रोबोटीक्स लीगमध्ये आम्ही नवी आणि आकर्षक आव्हाने टाकण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरुन अधिकाधिक मुली या क्षेत्राकडे आकर्षित होतील. या सर्वाच्या परिणामाबद्दल बोलताना अदिती सांगतात की, आम्ही एक जागतिक दर्जाचा अभ्यासक्रम शाळेत राबविण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्यामुळे अधिकाधिक मुली या क्षेत्राकडे आकर्षित होतील. आपल्या प्रेरणेबद्दल बोलताना त्या दोघीही सांगतात की, आजकालची मुले लहानवयातच अनेक गोष्टी प्रभावीपणे शिकत आहेत. उद्यासाठीचे स्वप्न पहा, जे तुम्हाला कायम प्रेरणा देत राहिल. लहान मुलाच्या आयुष्यात आपण केलेल्या लहान बदलामुळेदेखील आपल्याला मोठ्या प्रमाणात उर्जा मिळू शकते.
लेखक - तन्वी दुबे
अनुवाद - रंजिता परब