' बीइंग अॅट फुल पोटेन्शियल'च्या माध्यमातून व्यवस्थापन कौशल्याचे धडे
भारत देश हा जगातील महासत्ता बनावा यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. मेक इन इंडिया हा त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. यासाठी देशात कार्यरत असणाऱ्या विविध उद्योग, संस्था, स्वयंसेवी संस्था, व्यक्ती आणि राजकीय नेते यांच्या कार्यक्षमतांचा पूर्णपणे उपयोग होणं आवश्यक आहे. या कार्यक्षमतांचा पूर्णपणे उपयोग झाला तरंच विकास साधता येतो. त्यामुळे आपल्या कार्यक्षमता ओळखून त्या योग्य ठिकाणी उपयोगात आणणं गरजेचं आहे असं मत लेखक आणि व्यवस्थापन गुरु सुजित रवीन्द्रन यांचं आहे.
सुजित सांगतात," मोठा उद्योग असो, राजकारण असो किंवा समाजकारण असो वा एखादा व्यवसाय असो यशस्वी करण्यासाठी आपल्या कार्यक्षमतांचा पूर्ण उपयोग होणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी संस्थेच्या कामकाजाच निश्चित धोरण असणं आवश्यक आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये झालेल्या पाहणीतून असा निष्कर्ष पुढे आला आहे की, जे यशस्वी उद्योग किंवा मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या कामामध्ये विविधता आहे, आणि या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतांचा परिपूर्ण उपयोग करता यावा यासाठी काही व्यवस्थापन तंत्रांचा किंवा व्यवस्थापन धोरणांचा अवलंब केला आहे."
भारताचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी किंवा मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया ही अभियाने यशस्वी होण्यासाठी अशा काही व्यवस्थापन तंत्रांची किंवा व्यवस्थापन मॉडेल्स अंमलात आणण्याची गरज आहे," असं सुजित सांगतात.
मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडियाच्या पार्श्वभूमीवर सुजित रविंद्रन आणि त्यांचे सहकारी मिळून २१ ते २४ फेब्रुवारी दरम्यान मुंबईत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये ' मानवी दृष्टीकोन आणि विविधता' या विषयावर परिषद आयोजित केली आहे. या परिषदेमध्ये भारतातील मोठ्या कंपन्याचे उच्चस्तरीय अधिकारी, स्वयं सेवी संस्थांचे प्रतिनिधी तसंच शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यामध्ये एकूणच देशाच्या विकासासाठी आवश्यक बाबींवर चर्चा होणार आहे. तसंच विकासासाठी आवश्यक उद्योगांचं व्यवस्थापन धोरण, कार्य पद्धती किंवा मॉडेल तयार केलं जाणार आहे. या मॉडेलचा उपयोग सगळ्यांनाच होईल मुख्यत्वे भारतीय उद्योगांना होणार आहे, असं सुजित याचं मत आहे.
सुजित मुळचे भारतातले, ते कॅनडात एका बड्या कंपनीत मोठ्या पदावर काम करत होते. सुजित याचं पहिल्यापासूनच व्यवस्थापन कौशल्य उत्तम होतं. आपल्या सहकाऱ्यांकडून उत्तम पद्धतीने काम कसं करून घ्यावं हे त्यांना माहित होतं. साधारण १५ वर्षांपूर्वी त्यांच्या या कौशल्याची जाणीव त्यांना झाली. त्यावेळी त्याने विचार केला की, आपल्याला अवगत असलेलं हे कौशल्य इतरांनी आत्मसात केलं तर याचा फायदा नक्कीच समाजाच्या आणि इतर उद्योगांच्या उन्नतीसाठी होईल.
हा विचार करून सुजित यांनी २००० साली आपल्या उच्च पदाच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि विविध संस्थांमध्ये जाऊन व्यवस्थापन कौशल्य यावर प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. सुजित यांच्या या प्रशिक्षण कार्यक्रमाला युरोप, अमेरिका आणि न्यूझीलंड मध्ये उत्तम प्रतिसाद मिळत होता. यानंतर सुजित आणि त्यांच्या काही समविचारी सहकाऱ्यांनी एकत्र येउन 'Being at full potential' ही संस्था सुरु केली. या संस्थेच्या माध्यमातून युरोप, अमेरिका, न्यूझीलंड या देशांत व्यवस्थापन प्रशिक्षण दिलं जातं. व्यवस्थापन कौशल्य यावर सुजित यांनी Mature Masculinity आणि The Being Leader ही पुस्तकं लिहिली असून त्यांचं काही परदेशी भाषांमध्ये भाषांतरही झालं आहे.
परदेशात यशस्वी झालेलं हे व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण मॉडेल भारतात का असू नये असा विचार सुजित यांच्या मनात आला आणि काही वर्षांपूर्वी ते भारतात परत आले. आता ते भारतीय कंपन्यांमध्ये व्यवस्थापन कौशल्याचे धडे देतात. भारतातही त्यांच्या व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
सुजित सांगतात की, " कोणत्याही उद्योगाच्या प्रगतीसाठी विविधता आणि सर्वसमावेशकता महत्वाची आहे. भारतामध्ये कोटा पद्धत आहे, म्हणजे सगळ्यांना समान संधी आणि सर्वसमावेशकता असावी या उद्देशाने ही पद्धत चांगली आहे. कारण यामुळे महिला आणि वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र काम करतात. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या लोकांची मानसिकता आणि कार्यपद्धती वेगळी असते याचा फायदा जसा होतो तसे तोटेही आहेत. म्हणजे एखाद्या संस्थेमध्ये उत्तर भारतीय, दाक्षिणात्य किंवा मराठी लोकं काम करत असतील तर ते त्यांच्या प्रांताच्या लोकांना प्राधान्य देतात. त्यामुळे एका मानसिकतेची लोकं एकत्र आल्यावर कामाची गती मंदावते, त्यामुळे अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांची ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे. तसंच कामात किंवा कार्यपद्धती मध्ये बदल होणं गरजेचं आहे. त्यानुसार कंपनीच्या कार्यपद्धतीचं किंवा कार्य शैलीचं योग्य धोरण तयार करणं महत्वाचं आहे".
हे धोरण आखताना संस्थेची एक शैली पुस्तिका असणं गरजेचं आहे. यामुळे कामाची शैली निर्धारित होईल. तसंच कामाच्या ठिकाणी सकारात्मक प्रतीकं किंवा सिम्बॉल असावेत. म्हणजे सकारात्मक वाक्य किंवा प्रमाणित वाक्य कामाच्या ठिकाणी असावीत, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करायला हुरूप येईल. तिसरं म्हणजे कामाच्या ठिकाणी काही विशिष्ट पद्धतींचा अवलंब करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ शाळांमध्ये सुरवातीला प्रार्थना म्हटली जाते, त्याप्रमाणे काही कंपन्या किंवा कार्यालयांमध्ये सकाळी कामाला सुरवात करण्याआधी सगळे एकत्र येउन एखादी सकारात्मक, बोधपर फिल्म बघतात त्यानंतर दोन मिनिटं मौन पाळून मग कामाला सुरुवात करतात. यामुळे कमाल उत्साहाने सुरवात होते. अशा काही पद्धतींचा अवलंब करणं गरजेचं आहे.
शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कामाच्या ठिकाणी काही कार्यक्रम किंवा समारंभ होणं आवश्यक आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा हुरूप वाढतो. या काही गोष्टी कार्यक्षमता विकासासाठी आवश्यक आहेत. या काही पद्धतींचा अवलंब केल्यास संस्थेची नक्कीच प्रगती होईल असा विश्वास सुजित व्यक्त करतात.
फक्त खाजगी कंपन्या नाही तर सरकारी कार्यालय, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था यांनीही अशा काही कार्यपद्धतीचा अवलंब करणं गरजेचं आहे. ज्यामुळे कार्यक्षमता विकास होण्यास मदत होईल आणि पर्यायाने संस्थेची आणि देशाचीही प्रगती साधता येईल.