नटसम्राट सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर येणं ही स्वप्नपूर्ती..- दिग्दर्शक महेश मांजरेकर
२०१६ ची सुरुवात मराठी सिनेमासाठी अभिमानास्पद ठरली. नटसम्राट सारख्या एका अजरामर साहित्यकृतीवर आधारित सिनेमा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रदर्शित झाला. नाना पाटेकर यांनी साकारलेल्या नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकरांची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. तिकीट खिडकीवर यशस्वी ठरलेल्या नटसम्राट या सिनेमाला नुकतंच एक नव्या प्रसंगासोबत पुन्हा प्रदर्शित केलं गेलं. कालातीत अशा या साहित्यकृतीवर एक अख्खा सिनेमा बनवण्याचं स्वप्न पहिलं दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी.
१९८४ साली अफलातून या मराठी नाटकापासून महेशजींनी मनोरंजन क्षेत्रातील आपली कारकीर्द सुरु केली. त्यानंतर ध्यानीमनी, गिधाडे, ऑल दे बेस्ट सारख्या मराठी नाटकातनं त्यांची ही कारकीर्द अधिक समृद्ध होत गेली. आई, मातीच्या चुली, काकस्पर्श, कुटुंब, कोकणस्थ, लालबाग परळ सारख्या एकाहून एक सरस मराठी आणि वास्तव, कुरुक्षेत्र, जिस देस मै गंगा रहता है, हथियार, विरुद्ध, वाह लाईफ हो तो ऐसी सारख्या हिंदी सिनेमांचे दिग्दर्शन करणाऱ्या महेश मांजरेकर यांच्या नावावर अनेक हिट सिनेमांची नोंद आहे. यात मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, काकस्पर्श या सिनेमांनी त्यांना अनेक सन्मान मिळवून दिलेच शिवाय तिकीट खिडकीवरही विक्रमी कलेक्शन केले.
नटसम्राट हा सिनेमा मात्र महेशजींसाठी एक स्वप्नपूर्ती होती. सिनेमाचे शुट सुरु होण्यापूर्वी तब्बल दोन वर्ष सातत्याने त्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं या सिनेमावर काम सुरु होतं, नाट्यरुपी अशा या साहित्यकृतीवर सिनेमा बनवताना त्यात काही बदल करणे अनिवार्य होते. महेशजी सांगतात, “सिनेमा बनवण्याआधी मी हे नाटक अजिबात पाहिलं नव्हतं, पण मी पुस्तक वाचलं होतं. ते पुस्तक वाचताना मला जाणवलं की त्यात अप्पासाहेबांची मुलं ही काहीशा नकारात्मक पद्धतीने समोर येतात, मला मात्र त्या मुलांना नकारात्मक पद्धतीने मांडायचं नव्हतं. मला सर्वात आधी या सिनेमाची सुरुवात सुचली, एक जळलेलं थिएटर आणि थिएटरसोबतचा त्यांचा फ्लॅशबॅक. याशिवाय सिनेमात दिसणारा अप्पासाहेबांचा बालपणीचा मित्र असलेल्या रामची व्यक्तिरेखा ही अशीच अतिरिक्तपणे समाविष्ट केली गेली.”
“पटकथा आणि व्यक्तिरेखांची ही जुळवाजुळव होत असतानाच नटसम्राटच्या व्यक्तिरेखेसाठी खूप आधीपासून माझ्या डोक्यात एकच नाव होतं ते म्हणजे नाना पाटेकर. एका सिनेमाच्या प्रिमियरमध्ये मी नानांना भेटलो तेव्हा त्यांना तसं सांगितलंही होतं. ”
महेश मांजरेकर आणि नाना पाटेकर हे सिनेसृष्टीतली दोन मोठी नावं या सिनेमा निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आली. पण नानांसोबत महेशजींनी आणखी एका दिग्गज अभिनेत्यासोबत पहिल्यांदा काम केलं. हे अभिनेते होते विक्रम गोखले. महेशजी सांगतात, “ खरंतर मुळ नाटकामध्ये विक्रमजींनी साकारलेली राम ही व्यक्तिरेखा नाहीये, तर ती कथेच्या गरजेनुसार आम्ही सिनेमामध्ये समाविष्ट केलीये. विक्रमजींसोबत काम करतानाचा अनुभव सांगताना महेशजी एक कबुली देतात, सेटवर जेव्हा मी विक्रमजींना दिग्दर्शित करत होतो, तेव्हा खरंतर मी त्यांच्या अभिनयाने किंवा त्यांच्या कामाचा पद्धतीने थोडासा निराश झालो होतो, दोन शब्दांमध्ये त्यांचं थांबणं, मध्ये मध्ये संवाद विसरणं यामुळे खरंतर मला टेंशन आलं होतं पण आता जेव्हा मी संपूर्ण तयार सिनेमा पहातो तेव्हा रामच्या व्यक्तिरेखेला विक्रमजीं शिवाय दुसरं कोणी न्याय देऊच शकणार नाही असं माझं ठाम मत आहे. ”
नटसम्राट या सिनेमामुळे नाना पाटेकर निर्माते बनले आणि या निर्मितीमध्ये त्यांना साथ मिळाली ती विश्वास जोशी यांची, त्यांचीही हा सिनेमा पहिली निर्मिती. शुटिंगदरम्यानची आठवण सांगताना महेशजी म्हणतात, “सिनेमाची सुरुवात ज्या जळक्या ड्रामा थिएटरने होते, ते शुट करताना आम्ही प्रत्यक्ष थिएटरचा सेट उभा केला आणि तो जाळलाय, ते पहाणं खरंच खूप भावुक करणारं होतं, रंगमंचापासून आम्ही आमच्या कारकीर्दीला सुरुवात केलीये अशा या रंगमंचाला जाळणं हा आमच्यासाठी ही नाजुक क्षण होता पण त्याला पर्यायही नव्हता हे ही तेवढंच खरंय. ”
नटसम्राट सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एका लांबलचक फॅमिली हॉलीडेसाठी जाणार असे महेशजी या सिनेमाची जेव्हा पहिल्यांदा नाशिकमध्ये घोषणा झाली तेव्हा बोलले होते. आणि आता ते याच फॅमिली हॉलीडेची तयारी करतायत. नटसम्राट हिट झाला त्यानंतर त्यांचा अभिनय असलेला बंध नायलॉनचे हा सिनेमाही नुकताच प्रदर्शित झाला. आणि आता लवकरच महेशजी ऑस्ट्रेलियामध्ये साजऱ्या होणाऱ्या मिक्ता या वार्षिक मराठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनामध्ये व्यस्त होतील.