‘लाल परी’ला जिवंत ठेवणारा ‘एमएसआरटीसी लव्हर्स ग्रुप’
‘एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास’ असे आज प्रत्येक एसटीवर बटबटीत अक्षरामध्ये लिहिलेले असले तर काही प्रवाशांना एसटीचा प्रवास अत्यंत कंटाळवाणा वाटतो. ‘लाल डब्बा’ अशी एकेकाळी एसटीचे वर्णन केले जात असे. पण आता या एसटीने तिच्या रंगात बदल करून केशरी रंगात समोर आली आहे. दर एक-एक वर्षांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या कुटूंबियांना गावी घेऊन जाणार्या बहूतेक कुटूंबियांच्या एसटीबाबत निराळ्या आठवणी असतात. लांब लांबचा पल्ला गाठून अनेक घाटा-घाटांवरील रस्ते तुडवून प्रवाश्यांना व बच्चे कंपनीना आपल्या मामाच्या गावी नेणारी ही एसटी... आजही आपल्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी ठरलेल्या या एसटीवर भरभरून प्रेम करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात आहे याची प्रचिती देणारे हे ‘एमएसआरटीसी लव्हर्स ग्रुप’ होय...
महाराष्ट्राच्या अगदी दुर्गमभागापर्यंत शेकडो मैल प्रवास करून गावागावामध्ये जाणार्या या एसटीबाबत प्रवाश्यांमध्ये आपुलकी निर्माण करण्यासाठी एमएसआरटीसी लव्हर्स ग्रुप पुढे सरसावला आहे. आज जगात येऊ घातलेल्या आधुनिकीकरणात वाहतूक व्यवस्थेचा चेहरा मोहरा जरी बदलला असला तरीही आजही या गावातून त्या गावात जाण्यासाठी छोट्याशा शेडखाली लाल डब्ब्याची वाट पाहणार्या प्रवाशांची संख्या जराही कमी झालेली नाही. इंडिया आणि भारत या दोन्ही गटातल्या प्रवाशांसाठी एसटी धावते आहे. याच एसटीचे अस्तित्व प्रवाशांच्या मनात कायम ठेवण्यासाठी एमएसआरटीसी लव्हर्स ग्रुपची स्थापना झाली. ठाण्यात राहणारा रोहित धेंडे हा गेली चार वर्षे पुण्यात संगणकीय उच्चशिक्षण घेत आहे. ठाणे-पुणे या दररोजच्या प्रवासामुळे त्याला एसटीमधील प्रवासाची आवड निर्माण झाली. तो नेहमी ठाणे-कोल्हापूर या गाडीने प्रवास करीत असत. एकच गाडी रोज सकाळी कोल्हापूरला जात असल्याचे पाहिल्यानंतर त्याने त्या गाडीला स्वखर्चाने रंगवून, सजवून, एसटीच्या वैशिष्ट्यांची, योजनांची माहिती प्रवाशांना देण्यास सुरवात केली. एसटी महामंडळाचे फॅन्स असलेल्या स्वप्नील पाटील (पनवेल-अलिबाग), रोहित धेंडे (ठाणे-पुणे), आदित्य राणे (बोरीवली), चैतन्य राईलकर (बोरीवली), सुमेध देशभ्रतार (नागपूर), सोहम नाईक (मुंबई), संकेत मोरे (मुंबई) या एसटीप्रेमींना क्लिकर या वेबसाईटवर त्यांनी काढलेल्या एसटी विश्वातील अनेक फोटोज शेअर करण्यास सुरवात केली. या ग्रूपमधील प्रत्येकाने एसटी महामंडळाच्या विविध गोष्टींना हात घालीत ते लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करण्यास सुरवात केली. काही जणांनी एसटीच्या नवीन जादा बसेसची माहिती गोळा करण्यास सुरवात केली, काही जणांनी एसटी महामंडळाची काही दुर्मिळ फोटो काढून ती फेसबूकवर शेअर करण्यास सुरवात केली. बघता बघता एसटी प्रेमींची संख्या वाढत गेली आणि त्यातून जन्माला आला एमएसआरटीसी लव्हर्स ग्रुप... एसटीकडून कोणत्याही प्रकारची मदत वा प्रवासाच्या भाड्याची सवलत न घेता त्यांनी आणि त्यांच्या एसटीप्रेमीं मित्रांनी हजारो किलोमीटरचा महाराष्ट्रभर प्रवास करून एसटीविषयीचा माहितीचा खजिना गोळा करण्यास सुरवात केली.
एस.टी. च्या सेवेचा सकारात्मक प्रचार होऊन तिची जनमाणसात प्रतिमा सुधारण्यासाठी आवश्यक उपक्रम राबविणे, एसटीतर्फे प्रवाशांसाठी सुरू केलेल्या नवीन योजना, नवीन बससेवा इत्यादी माहिती विविध माध्यमातून प्रवाशांपर्यंत पोहचविणे, गर्दीच्या हंगामात सुरू केलेले जादा बसेस, ग्रुप बुकिंग, आगाऊ आरक्षण आदी माहिती प्रवाशांना देणे, कर्मचार्यांच्या विषयी प्रवाशांच्या मनात आदर व आपुलकीची भावना वाढविणे असे अनेक उपक्रम एसटीकडून कोणत्याही अपेक्षा न करता पदरमोड करून लव्हर्स ग्रुप राबवित आहे.
त्यानंतर दरवर्षी जानेवारीच्या दुसर्या वा तिसर्या रविवारी महाराष्ट्रात कोठेही सोयीच्या ठिकाणी हे एसटीप्रेमी एकत्र भेटून ‘गेट टू गेदर’ साजरा करू लागले. यावेळी एसटीने केलेला प्रवास, प्रवासातील आपले आणि इतरांचे अनुभव, एसटीसाठी केलेल्या कामांची माहिती, संग्रहित केलेली एसटीची माहिती, स्वरचित कविता आदींची ते देवाण-घेवाण करू लागले. त्यातून ‘वाटाड्या’ या मुखपत्राचे प्रकाशन करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रभरातील एसटी प्रेमींचे हे ‘गेट टू गेदर’ गेली चार वर्षे साजरा होत आहे.
या ग्रूपने एसटीची जुनी तिकिटे, पासेस, रिझर्वेशन याबरोबरच जुन्या गाड्यांचे पत्र्याचे आणि कागदी हुबेहूब मॉडेल देखील त्यांनी संकलित केले आहेत. एसटीचा गेल्या ६७ वर्षांचा इतिहास प्रवाशांना कळावा म्हणून त्यावेळी छापून आलेल्या बातम्या, एसटीचे मासिक पास, जुन्या गाड्यांची छायाचित्रे देखील त्यांनी मिळवली आहेत. हे तरुण केवळ संकलनावरच थांबले नाही, तर त्यांनी महाराष्ट्रभर एसटी बसने प्रवास करून प्रवास वर्णने लिहिली. बस फेर्या कोणत्या मार्गावर वाढवाव्यात, कुठे कमी कराव्यात याबाबत तसेच नव्या तंत्रज्ञानाबाबत देखील प्रशासनाला ते सूचना करीत असतात.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात जाऊन अखंडपणे प्रवासी सेवा देणार्या एसटीच्या विश्वाची सफर घडविणार्या या ग्रुपने नुकतेच प्रजासत्ताकदिनी ‘एसटी विश्व’ हे आगळेवेगळे जाहीर प्रदर्शन प्रथमच खोपट येथील स्थानकात भरविले होते. यंदाच्या वर्षीचे गेट टू गेदर १७ जानेवारी रोजी अलिबाग या ठिकाणी झाले होते. त्यावेळी आपल्याकडे असलेली छायाचित्रे, संग्रहित माहितीचे प्रदर्शन लोकांसाठी खुले करण्याची संकल्पना रोहित धेंडे याला सुचली. ती सर्वांना पसंत पडल्यानंतर २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ठाण्यात प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाला परवानगी देणारे प्रादेशिक व्यवस्थापक राहुल तोरो यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन झाले. विविध एस.टी. आगारातील विशेष एसटी बसेसची छायाचित्रे, सर्व बसेस मॉडेल्स पेंटींग्ज, तंतोतंत कागदी मॉडेल्स, जुनी तिकिटे, आरक्षणे, पासेस, प्रवाशांच्या सोयीसाठी झालेल्या गाड्यांमधील बद्दल, एसटीच्या नवीन योजना, सवलती, नव्या मार्गावर सुरु झालेल्या बसेस, दिवाळी-गणपतीची सुट्टी, जत्रा-यात्रांसाठी सुटणार्या गाड्या आदींचा खजिना या प्रदर्शनात पाहायला मिळाला. हे प्रदर्शन माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच चांगले आहे, असे मत राहुल तोरो यांनी प्रदर्शन पाहून व्यक्त केले होते. या प्रदर्शनातील संग्रहित माहिती एसटी प्रेमींनी आपली आवड म्हणून जमविली आहे तर छंद म्हणून जोपासली आहे. या माहितीचा फायदा एसटीला व्हावा, एसटीला जास्तीतजास्त प्रवासी मिळावेत या उद्देशाने हे प्रदर्शन प्रथमच भरविण्यात आले होते. एक दिवसाच्या या प्रदर्शनाला नागरिक, प्रवासी, एसटीचे कर्मचारी, अधिकारी, माजी कर्मचारी आदींनी भेटून चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे हे प्रदर्शन अन्यत्रही भरविण्यात यावे, असे या एसटी प्रेमींना वाटू लागले आहे. या ग्रुपने आता सोशल मिडियाद्वारे ही जनजागृती करण्यास सुरवात केली असून ‘एमएसआरटीसी लव्हर्स ग्रुप’ नावाने फेसबूक पेजही तयार केले आहेत. यावर ते दररोज एसटी विश्वातील घडामोडी व योजना शेअर करीत असतात. भविष्यात ज्याप्रमाणे गावी जाण्यासाठी खाजगी बसेसने प्रवास करण्यासाठी नागरिकांची पसंती असते, त्याचप्रमाणे एसटीलाही तितकीच पसंती मिळविण्यासाठी आता हे तरूण एसटीचे ‘ब्रँड ऍम्बेसडर’ म्हणून काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत...ते ही कोणतेही मानधन न घेता. मग एसटी बसेसची रंगसंगती काय असावी, रचना कशी असावी, कोणत्या मार्गाने जादा बसेसची आवश्यकता आहे, प्रवाश्यांना आकर्षित करून घेणार्या सवलती अशा अनेक योजना आता हे तरूण तयार करीत आहेत. तसेच एसटी बसेसचा दर्जा वाढविण्यासाठी प्रवाश्यांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी यासाठी प्रत्येक डेपोमध्ये जाऊन प्रवाश्यांना प्रत्यक्ष स्वच्छता राखण्याबाबत आवाहन करणार आहेत. तसेच बसेस च्या आत जनजागृतीसाठी करण्यासाठीच्या विविध भन्नाट कल्पना तयार करण्यासाठी हे तरूण प्रयत्न करीत आहेत. ‘गाव तेथे एसटी’ असे ब्रीद वाक्य मिरविणार्या एसटी महामंडळाला जिवंत ठेवण्यासाठी धडपड करणार्या या तरूणांना मानाचा मुजरा!!!
छंदाला किंमत नाही...
घाटमाथ्याच्या वळणावरून जाणार्या ‘लाल परी’ ची अर्थात एसटी बसची तब्बल अडीच हजार मनमोहक छायाचित्रे, हजारो किलोमीटरचा प्रवास करून एसटीच्या २५० डेपोंना दिलेल्या प्रत्यक्ष भेटीगाठी, विशेष म्हणजे एसटीच्या चालक-वाहकांसोबत वाढदिवस साजरा करणे आदी बाबींमधून नेहमीच एसटींशी नाळ जोडणार्या अवलियाचे नाव आहे रोहित दादासाहेब धेंडे....मुंबईतील परळ, कुर्ला, मुंबई सेंट्रल तसेच ठाण्यातील खोपट मध्यवर्ती डेपोपासून गडचिरोलीमधील ‘अहेरी’ या महाराष्ट्रातील सर्वात दुर्गम भागापर्यंत डेपोंना रोहीतने स्वखर्चाने तब्बल सहा वेळा भेटी दिल्या आहेत. रोहीतला फोटोग्राफीचा पुर्वीपासूनच छंद होता. त्यातच एसटीप्रेमापोटी महाराष्ट्रभर भ्रमंती करताना त्याने प्रत्येक डेपोपासून बस थांबे, महामार्ग, आदिंवर एसटी बसेसची तब्बल २५०० फोटो ‘कॅमेराबंद’ केली आहेत. तसेच तो आपला वाढदिवस एसटी चालक-वाहकासोबत केक कापून एसटी डेपोतच साजरा करतो. घरापासून दूर असणार्या चालक-वाहकांना चादर आणि इतर जीवनावश्यक वस्तू वाढदिवसानिमित्त भेट देण्याचा रोहितचा प्रयत्न असतो. छंदाला कोणहीती किंमत नसते हे त्याने सिद्ध केले आहे.
आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या.
आता वाचा