मरेपर्यंत रोज किमान एक रोप लावीन..रूचिन मेहरांचा निर्धार..
“आपण सगळेच जण आसपासच्या झाडांपासून मिळणा-या ऑक्सिजनमुळेच जिवंत आहोत. पण आपल्यासाठी जीवनदायी ठरणा-या या झाडांची लागवड, त्यांचं संवर्धन करण्याची मात्र आपल्यापैकी कुणाचीच इच्छा नसते. झाडांशिवाय मानवी जीवनाची आपण कल्पनाही करू शकणार नाही. आपलं अख्खं आयुष्यच या झाडांच्या अवतीभवती फिरत असतं. पण तरीही आपल्यापैकी बहुतेकजण या झाडांच्या संरक्षणाबद्दल संवेदनशील नसतो.” गाझियाबादमध्ये रहाणारे रूचिन मेहरा पोटतिडकीनं सांगतात.
रूचिन मेहरांनी इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनमधून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. आसपासच्या पर्यावरणाचं रक्षण व्हावं यासाठी त्यांनी एकट्यानं प्रयत्न चालवलाय. फेब्रुवारी २०१५पासून त्यांनी एक अनोखी चळवळ सुरु केलीये..एकट्याने. आणि त्यांची चळवळ आहे मरेपर्यंत दररोज एक तरी झाड लावण्याची ! ‘वन ट्री डेली टील डेथ’! आत्तापर्यंत आपल्या या चळवळीच्या माध्यमातून रूचिन यांनी ३०० रोपटी लावली आहेत आणि जगवलीही आहेत. रूचिन यांनी जेव्हा ही अनोखी पण क्रांतिकारी चळवळ सुरु केली, तेव्हा ते एकटेच होते. पण पर्यावरण रक्षणासाठीची त्यांची तळमळ पाहून आता इतरही अनेक स्थानिक लोकं त्यांच्या खांद्याला खांदा लावून या चळवळीत सहभागी झाले आहेत.
आपल्या या अनोख्या अभियानाविषयी सांगताना रूचिन म्हणतात, “सुरुवातीला मला दिल्ली-एनसीआर भागामध्ये होणा-या भयंकर प्रदूषणाची मोठी चिंता वाटत होती. मला असं वाटतं की जर आज आपल्या आसपासच्या वातावरणाची ही परिस्थिती आहे, तर मग आपल्या येणा-या पिढ्यांना श्वास घ्यायलाही हवा मिळणार नाही. आपल्याला श्वास घेण्यासाठी स्वच्छ हवेची गरज आहे, आणि स्वच्छ हवा पाहिजे असेल, तर झाडं लावण्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही.”ते पुढे सांगतात, “याशिवाय आपण जन्मल्यानंतर मृत्यूपर्यंत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात झाडांपासून मिळणा-या लाकडाचा वापर करत असतो. मग ते आपल्या घरी नेहमीच्या वापरातलं फर्निचर असो, किंवा मग इतर लाकडी वस्तू. या प्रत्येक वस्तूमध्ये झाडांपासून मिळणा-या लाकडाचाच वापर केला जातो. याशिवाय हिंदू धर्मानुसार एखाद्या व्यक्तीचं निधन झालं, तर तिच्या अंत्यसंस्कारांसाठीही लाकडाचीच आवश्यकता असते. आपण आपल्या आवश्यकतेनुसार झाडं तर कापत सुटलो आहोत, पण त्यांची पुन्हा लागवड करण्याकडे मात्र कुणीही ध्यान द्यायला तयार नाहीये.”
यासोबतच पक्षी आणि प्राण्यांवरही रूचिन यांचं प्रेम आहे. त्यांच्यामते गेल्या अनेक वर्षांपासून या भागामध्ये पक्ष्यांचा किलबिलाट जवळपास बंदच झालाय. ते म्हणतात, “पक्ष्यांना जिवंत रहाण्यासाठी झाडांची नितांत गरज असते. कारण जर झाडंच नसतील तर ते आपली घरटी कुठे बनवणार? आणि जर त्यांच्याकडे रहाण्यासाठी घरंच नसली, तर ते राहणार कुठे? याशिवाय माकडं, खारींसारखे छोटे प्राणी तर या भागातून जवळपास गायबच झालेत.” आपल्या याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी रूचिन यांनी वृक्षारोपण सुरु केलंय.
आपल्या ‘वन ट्री टील डेथ’ या अनोख्या मोहिमेविषयी सांगताना रूचिन म्हणतात, “येणा-या पिढ्यांना अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू नये म्हणूनच मी स्वत: एकट्यानं रोपटी लावायला सुरुवात केली. पण लोकांमध्ये याविषयीच्या असलेल्या अज्ञानामुळे मी लावलेली रोपटी खूप लवकर सुकून जात होती. त्यातून मार्ग काढण्यासाठी मी निश्चय केला की रोज एक रोपटं तर लावेनच, पण त्यांची काळजी घेण्यासाठी स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांनाही माझ्या या मोहिमेत सामील करून घेईन. हळूहळू लोकांना माझ्या बोलण्यावर विश्वास वाटू लागला आणि आता लोकं स्वत:हून माझ्यासोबत येत आहेत.”
रूचिन पुढे सांगतात की जेव्हा तुम्ही रोज एक रोपटं लावता, तेव्हा त्याला दररोज पाणी देणं आवश्यक असतं. आणि तितकंच कठीणही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रूचिन यांनी भरपूर प्रयत्न केले, पुस्तकं चाळली, इंटरनेटची मदत घेतली. आणि शेवटी त्यांना तो उपाय सापडला. ‘ड्रिप वॉटर इरिगेशन’ अर्थात ‘ठिबक सिंचन’. रूचिन सांगतात, “या प्रकारच्या ठिबक सिंचनासाठी आम्ही लोकांनी वापरून टाकून दिलेल्या कोल्ड ड्रिंकच्या(शीतपेय) बाटल्यांचा वापर करतो. आम्ही बाटल्यांचा मागचा रूंद भाग कापून टाकतो. मग पुढे झाकणाला एक बारीक छिद्र पाडतो आणि झाकणाकडचा भाग रोपट्यासोबत मातीमध्ये गाडून टाकतो. यामुळे बाटलीतून थेंब-थेंब पाणी रोपट्याला मिळतं आणि एकदा भरलं की रोपट्याची जवळपास आठवडाभराची गरज भागवली जाते. त्यामुळे थोडक्यात आठवड्यातून एकदाच पाणी द्यावं लागतं.”
रूचिन यांच्या या मोहिमेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागलाय. आता अनेक लोकं तर रुचिन यांना त्यांच्या भागामध्ये रोपटी लावण्यासाठी आमंत्रितही करू लागली आहेत. आपल्या या मोहिमेसाठी रूचिन यांना लागणारी रोपटी गाझियाबादमधल्या एका नर्सरीमधून(रोपवाटिका) मिळतात. रूचिन सांगतात की ते शाळा, बाग-बगिचे, रस्त्यांच्या मध्ये असणारे दुभाजक(डिवायडर) इत्यादींवर रोपांची लागवड करतात. याशिवाय ते अशा जागांचा शोध घेतात, जिथे रोपांची लागवड करणं सहज शक्य असेल. आपल्या आत्तापर्यंतच्या मोहिमेबद्दल सांगताना रूचिन यांच्या चेह-यावर वेगळंच समाधान आणि आनंद दिसतो. ते म्हणतात, “आम्ही आत्तापर्यंत वड, कडुलिंब, शीशम, आवळा, अर्जुन, सेमल, आंबा, पेरू अशी विविध प्रकारची ३०० रोपं लावली आहेत. आणि मला आशा आहे की जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी रोज किमान एक तरी रोप लावण्याच्या माझ्या या मोहिमेत यशस्वी होईन.” कित्येकदा तर रूचिन एकाच दिवसात एकाहून अधिक रोपटीही लावतात.
आपल्या या अनोख्या मोहिमेशिवाय रूचिन प्राण्यांसाठी काम करणा-या ‘पीपल फॉर अॅनिमल’ संस्थेमध्येही सक्रिय सहभाग घेतात. आत्तापर्यंत या संस्थेच्या अनेक कार्यक्रमांतर्गत त्यांनी तस्करांपासून तब्बल १ हजाराहून अधिक प्राण्यांची सुटका केली आहे. रूचिन आधी ‘एचसीएल’(हिंदुस्तान कंप्युटर्स लिमिटेड) इन्फोसिस्टीम आणि ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स’सारख्या प्रसिद्ध कंपन्यांमध्ये नोकरी करत होते. पण पर्यावरणाविषयीच्या अतीव जिव्हाळ्यामुळे ते फार काळ या कंपन्यांमध्ये काम करू शकले नाहीत. आणि लागलीच त्यांनी या कंपन्यांमधून काढता पाय घेत झाडांची आणि प्राण्यांची सेवा सुरु केली. अर्थार्जनासाठी रूचिन नववी ते बारावीपर्यंतच्या मुलांचे क्लास(शिकवणी) घेतात. आणि उरलेला वेळ आपल्या या मोहिमेसाठी देतात.
सर्वात शेवटी रूचिन सांगतात, “इतरांमध्ये आपल्या पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण व्हावी हाच या मोहिमेमागचा माझा उद्देश आहे. याशिवाय माझा हा सुद्धा प्रयत्न आहे की अधिकाधिक लोकांनी पुढे यावं आणि येणा-या पिढ्यांसाठी तरी अधिकाधिक रोपटी लावावीत.”
रुचिन यांच्याशी संपर्क करायचा असल्यास त्यांच्या फेसबुक पेजद्वारे करता येऊ शकेल.