ʻSoftlabs Groupʼच्या मिथिलेश बांदिवडेकर यांचा प्रेरणादायी प्रवास
दक्षिण मुंबईतील परळसारख्या कामगार विभागात एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेला एक मुलगा, वयाच्या सोळाव्या वर्षी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरू करण्याचे स्वप्न पाहतो आणि अथक परिश्रम करुन ते स्वप्न पूर्ण करतो. ही कोणत्या सिनेमाची पटकथा नसून, मिथिलेश बांदिवडेकर यांच्या आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास आहे. त्यांनी सुरू केलेल्या ʻSoftlabs Groupʼ(सॉफ्टलॅब्स ग्रुप) या कंपनीला आज १३ वर्षे पूर्ण झाली असून, सध्या या कंपनीची उलाढाल कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. ʻसॉफ्टलॅब्स ग्रुपʼ ही कंपनी मोठमोठ्या कंपनींना बिझनेस ऑटोमेशनकरिता लागणाऱ्या सॉफ्टवेअरची निर्मिती, डेव्हलपमेंट, मोबाईल एप्लिकेशन निर्मिती, संकेतस्थळ निर्मिती (व्यावसायिक संकेतस्थळे, सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन (गुगल रॅंकिंगला येणारी संकेतस्थळे)) ही कामे करतात.
कंपनीच्या संकल्पनेपासून ते सॉफ्टलॅब्स कंपनी सुरू कशी झाली, याबाबत बोलताना कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिथिलेश सांगतात की, ʻ१९९६ साली म्हणजेच दहावीत शिकत असताना मी माझी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरू करेन, असे स्वप्न पाहिले. त्याकाळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी सुगीचा काळ होता. लोकांमध्ये या क्षेत्राबाबत कमालीचे आकर्षण होते. त्यानुसार मी संगणक विज्ञान या शाखेतून पदवीपर्य़ंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी अनुभवाकरिता एक ते दीड वर्षे सॉफ्टवेयर कंपनीमध्ये नोकरीदेखील केली. त्या कंपनीत काम करताना मी बॉंम्बे डाईंग आणि मर्स्कसीलॅंड (Maersk Sealand) सारख्या नावाजलेल्या कंपनीच्या प्रोजक्ट्सवर काम केले. त्यानंतर २००३ साली मात्र ʻसॉफ्टलॅब्स ग्रुपʼ ही कंपनी सुरू केली. सुरुवातीला मी माझ्या काही मित्रांच्या साथीने घरातूनच कंपनी चालवण्याचा प्रयत्न केला. जुन्या कार्यालयातील वरिष्ठांच्या ओळखीने आम्हाला काही प्रोजेक्ट्स मिळत होते. इतरही अनेक लहान सहान प्रोजेक्ट्स मिळत होते. सहा महिने घरातून कंपनी चालवल्यानंतर अखेरीस मी काही मित्रांच्या मदतीने दादरसारख्या परिसरात स्वतःचे पहिले कार्यालय सुरू करण्याची हिंमत केली. तिथे एक-दीड वर्षे आम्ही काम केले. मात्र आमची कंपनी तोट्यात जात होती. त्यामुळे आम्हाला त्या परिसरात कार्यालय सुरू ठेवणे, आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक वाटू लागले. म्हणून आम्ही ते कार्यालय बंद केले. त्यानंतर काही काळ लालबाग, लोअर परळ सारख्या ठिकाणी लहान कार्यालये सुरू केली.ʼ सध्या त्यांनी दक्षिण मुंबईतील लोअर परळसारख्या परिसरात सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असे कार्यालय सुरू केले असून, तेथे १७ जणांची टीम कार्यरत आहे. ʻसॉफ्टलॅब्स ग्रुपʼ या कंपनीने आतापर्य़ंत अनेक फार्मासिट्युकल कंपनी, डायमंड कंपनी तसेच परदेशी कंपन्यांच्या सॉफ्टवेयर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्सवर काम केले आहे. या प्रवासादरम्यान त्यांनी ग्रेट ब्रिटनमधील काही कंपन्यांचेदेखील प्रोजेक्ट हाताळले आहेत. तसेच त्यांनी तिथे त्यांची एक शाखादेखील सुरू केली आहे. ५ नोव्हेंबरपासून त्यांनी ग्रेट ब्रिटनमधील शाखा सुरू केली असून, तेथील काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ती शाखा पूर्णपणे कार्यरत होईल, असा विश्वास मिथिलेश यांना वाटतो.
ʻसॉफ्टलॅब्स ग्रुपʼला आतापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. याबाबत मिथिलेश सांगतात की, ʻकंपनी सुरू केल्यानंतर काही काळ मला माझ्या मित्रांनी आणि कुटुंबियांनी सहकार्य केले. सुरुवातीचा काही काळ सॉफ्टलॅब्ससाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीचा होता. उत्पन्न कमी होत असल्याने कंपनी सुरू ठेवणे, हेदेखील आमच्यासाठी एक आव्हान होते. स्वतःची कंपनी सुरू करणे, हे माझे स्वप्न होते आणि मला काही केल्या ते पूर्ण करायचे होते. त्यामुळे मी माझ्या व्यवसायाच्या निर्णयावर ठाम राहिलो. त्या निर्णयात माझे कुटुंबीय आणि माझी पत्नी माझ्या पाठिशी उभे राहिले. त्यांच्यामुळेच मी त्या पडत्या काळातदेखील तग धरुन उभा राहू शकलो. त्यानंतर कंपनीत अनेक चढ-उतार आले आणि अखेरीस ʻसॉफ्टलॅब्स ग्रुपʼ कंपनी स्थिर झाली.ʼ आपल्याकडे ज्ञानी आणि हुशार लोकांचे प्रमाण जरी अधिक असले तरी, इतर देशांच्या तुलनेत भारतात मात्र सॉफ्टवेअरबाबत सर्वसामान्यांमध्ये अनास्था असल्याचे मिथिलेश सांगतात. याबाबत स्वतःच्या अनुभवाबद्दल बोलताना मिथिलेश सांगतात की, ʻमला आतापर्यंत असेही ग्राहक मिळाले आहेत, जे सांगतात की, एखाद्या संगणकाची किंमत जर हजारोंच्या घरात असेल तर आम्ही समजू शकतो. पण तुमची सॉफ्टवेअरची सीडी एवढी महाग का? तुम्ही तर फक्त दहा रुपयाची एक सीडी देणार, मग त्याची किंमत हजारोंच्या घरात का असते?ʼ त्यामुळे भारतीयांमध्ये सॉफ्टवेअरबद्दल आवड आणि सजगता निर्माण व्हायला हवी, असे मिथिलेश यांना वाटते.
ʻसॉफ्टलॅब्स ग्रूपʼने आतापर्य़ंत झांबिया, ऑस्ट्रेलिया, यू.के आणि यू.एस.मधील कंपन्यांच्या प्रोजेक्ट्सचे काम केले आहे. भारतीय उपखंडाव्यतिरिक्त जगातील सात खंडांपैकी पाच खंडांमध्ये ʻसॉफ्टलॅब्स ग्रुपʼचे कार्यालय असावे. तसेच भारतातील कार्यालयामध्ये किमान १०० कर्मचारी तरी कार्यरत असावेत, असे मिथिलेश यांचे ध्येय आहे. येणाऱ्या काळात ʻसॉफ्टलॅब्स ग्रूपʼही १०० कोटींची कंपनी व्हावी, असे त्यांचे स्वप्न आहे.मिथिलेश यांच्या ʻसॉफ्टलॅब्स ग्रुपʼ कंपनीची दखल ʻसिलिकॉन इंडियाʼ या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मासिकाने देखील घेतली आहे. भारत आणि अमेरिकेतील ʻटॉप २० मोस्ट प्रॉमिसिंग सॉफ्टवेयर डेव्हलपमेंट कंपनीज २०१५ʼच्या (Top 20 Most Promising Software Development Companies 2015) यादीत त्यांना स्थान देण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांना मिथिलेश सांगतात की, ʻमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात येणारे विद्यार्थी हे दोन प्रकारचे असतात. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे ध्येयवेडेपणा असणारे. अशा मुलांना या क्षेत्रात नक्कीच उज्ज्वल भविष्य आहे. त्यांनी फक्त थोडा संयम बाळगायला हवा, चांगल्या संधीचा शोध घ्यायला हवा. जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तेही शक्य आहे. फक्त आपल्याला त्या क्षेत्रातील सखोल ज्ञान हवे. सॉफ्टवेअरसारख्या व्यवसायात टिकून राहणे, हेच आव्हानात्मक असते. तुम्ही या व्यवसायात टिकलात, तर नक्कीच काहीतरी भव्यदिव्य करू शकता. तुम्ही व्यवस्थित विचार करुन निर्णय घ्या. दुसऱ्या पद्धतीचे विद्यार्थी म्हणजे करियरला गंभीरतेने न घेणारे. आधी शिक्षण पूर्ण करू, नोकरीचे काय ते नंतर पाहू, अशी त्यांची भूमिका असते. त्यामुळे ते फक्त पदवीपुरते शिक्षण घेतात. त्यांना ज्ञान असे काही मिळतच नाही. त्यामुळे त्यांच्या उज्ज्वल भविष्याची शक्यता अगदी नगण्य असते. आज यू.के.मधील विद्यार्थी पदवी घेण्यापूर्वीच संशोधन करुन प्रोजेक्ट्स बनवितात. त्यामुळे आपल्याकडील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ते करियरच्याबाबतीत अधिक गंभीर असल्याचे जाणवते.ʼ तुमचा विकास तुम्ही जेवढ्या जलदगतीने करणार तेवढ्याच जलदगतीने देशाचा विकास होणार आहे, असा सल्ला मिथिलेश या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना देतात.
मिथिलेश यांच्या ʻसॉफ्टलॅब्स ग्रुपʼने आतापर्यंत देशा विदेशातील अनेक सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्सवर काम केले आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील तारकर्ली या गावाकरिता सॉफ्टलॅब्सने टुरीझम पोर्टलची (www.tarkarlitourism.com) निर्मिती केली आहे. या पोर्टलला आतापर्यंत लाखो नेटिझन्सनी भेट दिली आहे. तारकर्ली येथील स्थानिकांना मदतगार ठरणाऱ्या या संकेतस्थळावर ३५ हॉटेल्स आणि रिसोर्टस नोंदणीकृत असून, अनेक देशी विदेशी पर्यटक या संकेतस्थळावरुन हॉटेलची बुकिंग करतात. या व्यावसायिकांना पर्यटकांशी संपर्क करणे अधिक सोपे व्हावे म्हणून ʻसॉफ्टलॅब्स ग्रुपʼ एका मोबाईल एॅप्लिकेशनची निर्मिती करत आहे. जेणेकरुन या व्यावसायिकांना मोबाईलवरच सर्व सोयी सुलभरित्या उपलब्ध होतील. सॉफ्टलॅब्स ग्रुपबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही आमच्या http://www.softlabsgroup.com/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकता, असे मिथिलेश सांगतात.