आदिवासींचा ऑक्सिजन 'वटवृक्ष' : सॉफ्टवेअर इंजिनिअरने दाखवला 'विकास 'मार्ग
ओरिसाच्या आदिवासींसाठी वटवृक्ष या सामाजिक संस्थेनं बहुमोल कार्य केले आहे.या संस्थेनं आजवर ग्रामीण भागातल्या ३६८ कुटुंबांना मदत केलीय. या संस्थेचे संस्थापक विकास दास यांचा जन्म श्रीमंत परिवारात झाला. त्यांना लहानपणी आदिवासी मुलांमध्ये मिसळण्यास बंदी होती. त्या मुलांसोबत त्यांना खेळू दिले जात नसे, अगदी त्यांना या मुलांना स्पर्श करण्यास परवानगी नव्हती. ही गोष्ट विकास यांना प्रचंड खटकत असे. लहानपणी विकास मंदिरात गेले होते, त्यावेळी एक आदिवासी महिला मुलाला घेऊन मंदिरात प्रवेश करत होती. त्यावेळी अचानक एकानं या महिलेला शिव्या देण्यास सुरुवात केली. त्यानं महिलेला मंदिरात जाण्यापासून रोखलं, तिला तिथून पळवून लावलं. ती महिला आदिवासी होती, हेच या सर्व रागाचे आणि शिवीगाळीचे कारण होते. आजुबाजूच्या परिसरात घडणा-या या सर्व गोष्टींचा विकास यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यांना या सर्वाचं मनापासून वाईट वाटत असे. आदिवासी समाजासाठी काही तरी करण्याची त्यांना इच्छा होती.
विकासनं सॉफ्टेवेअर इंजिनिअरचं शिक्षण पूर्ण केलं, आणि ते आईएबमध्ये आयटी सल्लागार म्हणून काम करु लागले. विकास आपल्या कामाबाबत समाधानी होते, पण तरीही आदिवासींसाठी काही तरी करण्याची त्यांची इच्छा जागृत होती. २०१३ साली विकास यांनी नोकरी सोडली. आदिवासी आणि गरिबांसाठीच काम करण्याचा त्यांनी निश्चय केला. आदिवासी परिसरात विकास लहानाचे मोठे झाले होते. पण कौटुंबिक बंधनामुळे त्यांचा आदिवासींशी संपर्क आला नव्हता. आदिवासींच्या समस्या त्यांना जवळून माहिती नव्हत्या. त्यांना आदिवासीसाठी काम करायचं होतं, पण नेमकं काय काम करायचं ? हा प्रश्न त्यांना सतावत होता. आदिवासींच्या मूळ समस्या काय आहेत ? त्यांना कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ? ज्यामुळे त्यांच्या अडचणी कमी होतील हे समजून घेण्याचं विकास यांनी ठरवलं. त्यासाठी आदिवासींमध्ये मिसळण्यास त्यांनी सुरुवात केली. या सहवासातून त्यांना मूळ समस्यांची उकल होणार होती. विकास जवळपास दोन महिने आदिवासींच्या गावात राहिले,त्यांचं आयुष्य जवळून पाहिलं.त्यांच्या समस्या समजून घेतल्या. आदिवासींची एकच समस्या नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. आदिवासींचं आयुष्य अनेक समस्यांनी ग्रासलंय. त्यांना रोजगार नाही, स्वत:ची जमीन नाही, शिक्षण नाही, तसंच ही मंडळी कुपोषणग्रस्त आहेत तसंच अनेक आजारांची त्यांना लागण झालीय हे विकास यांना समजलं.ही लोकं जी शेती करतात त्यामधून नफा तर सोडा पोटभर अन्नही त्यांना मिळत नाही.त्याचप्रमाणे दलाल त्यांची लुबाडणूक करतात. सावकार पिळवणूक करतात. हे विकास यांना आपल्या अभ्यासात लक्षात आले. त्यामुळे आदिवासींना सामान्य गरजा भागवण्याइतका पैसा मिळावा यासाठी वटवृक्ष या संस्थेची स्थापना करण्याचा त्यांनी निश्चय केला.
आदिवासींकडे गुणवत्तेची कमतरता नव्हती. विकास यांनी यामुळे सुरुवातीला थोड्या पैशांनी योग्य पद्धतीनं आदिवासींसोबत काम करण्यास सुरुवात केली. लवकरच आदिवासींच्या उत्पन्नात तीन ते चार पट वाढ झाली. विकास यांच्या भागात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण मोठं होतं. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला शेतीवर लक्ष केंद्रीत केलं. पीक वाया गेल्यावर खाण्यासाठी काहीच नसल्यानं शेतकरी आत्महत्या करत होते. वटवृक्ष संस्थेनं कृषी शास्त्रज्ञांच्या मदतीनं शेतक-यांना आणखी एक पर्याय दिला. पीक कोणत्या कारणामुळे वाया गेलं तर शेतक-यांकडे आता दुसरा पर्याय मिळाला होता.
विकास यांनी महिलांच्या प्रगतीवर विशेष भर दिला. महिलांना हस्तकलेचं काम दिलं. त्याचबरोबर लोणची बनवणे, स्नॅक्स तयार करणे, फूलं, पानांपासून औषधं बनवणे ही काम त्यांना करायला दिली. त्यांच्या या उत्पन्नाची शहरी विभागात स्टॉलवर विक्री होत असे. त्यानंतर विकास यांच्या संस्थेनं सरकारी योजनांची माहिती आदिवासींना देण्यास सुरुवात केली. सरकारच्या अनेक चांगल्या योजनांची आदिवासींना माहिती नसते. या योजनांचा त्यांना फायदा मिळावा यासाठी आदिवासींना याविषयी जागृतीवर विकास यांनी भर दिला.
या सर्व कामाचा परिणाम लवकरच दिसू लागला. ज्या ग्रामीण भागात विकास यांनी काम सुरु केलं होतं, त्या भागातील आदिवासी हक्कांबाबत सजग झाले होते. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यास त्यांनी सुरुवात केली. तसंच त्यांनी मुलांनाही शाळेत पाठवण्यास सुरुवात केली होती, हा अत्यंत सकारात्मक बदल होता.
ग्रामीण भागातील कामांमधून मिळणारा १० टक्के नफा वटवृक्ष संस्थेच्या निधीमध्ये जमा होतो. या सा-याचं व्यवस्थापन गावातल्याच १२ महिला करतात. हा पैसा गावातील सामाजिक सुधारणा, शिक्षण आणि आरोग्यासाठी वापरला जातो. प्रत्येक गावातील प्रतिनिधी आपल्या समस्या संस्थेकडे मांडतात, वटवृक्ष या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करते.
ही सर्व विकास कामं करत असताना आदिवासींची संस्कृती आणि परंपरा जपल्या जातील याची विशेष खबरदारी वटवृक्ष संस्थेकडून घेतली जाते. विकास सांगतात,“चांगली नोकरी सोडून गावाकडे परतण्याचा विकास यांचा निर्णय त्यांचे मित्र तसंच घरच्या मंडळींना आवडला नव्हता. मला काही तरी मानसिक आजार झालाय, त्यामुळे चांगली नोकरी सोडून गरिबांसोबत गावामध्ये राहण्याचं मी ठरवलंय, अशी त्यांची समजूत होती. पण काही कालावधीनंतर त्यांचे हे मत बदलले. मी एक चांगल्या उद्देशानं विधायक काम करत आहे हे त्यांना पटलं.”
ग्रामीण भागाला समजण्यात विकास यांना सुरुवातीला अवघड गेलं, पण त्यांना अनेकांनी यामध्ये मदत केली. या लोकांनाच विकास आपला दुसरं कुटुंब समजतात. या सर्वांसाठी काहीही करण्याची त्यांची तयारी आहे. कोणतंही काम चांगला विचार आणि चांगला उद्देशानं सुरु केलं की त्यामध्ये सुरुवातीला पैसा नसला तरी अडत नाही. तुमचं काम वाढतं तसं आपोआप तुमच्याकडे पैसा येऊ लागतो, अशी विकास यांची समजूत आहे.