संपादने
Marathi

भारतातील स्टार्टअप्सना रतन टाटा यांच्या गुंतवणुकीमुळे नवी झळाळी

Team YS Marathi
3rd Feb 2016
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

भारतात अशी खूप कमी क्षेत्र आहेत ज्यांच्यावर अद्याप टाटा ग्रुपने आपले नाव कोरले नाही. मग ते टेलिकॉम असो, सॉफ्टवेअर असो, फॅशन किंवा ग्रोसरीज, प्रत्येक क्षेत्रावर त्यांनी आपला ठसा उमटविलेला आहे. त्यामुळेच स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या यादीत टाटा सन्सच्या सन्माननीय सेवानिवृत्त अध्यक्षांचे नाव आल्यास काहीच आश्चर्य वाटायला नको. पण रतन नवल टाटा यांची बिझनेस करण्याची एक शैली आहे. त्यांनी गुंतणूक केलेल्या स्टार्टअप्सची यादी हेच दर्शवते. बेबी प्रोडक्ट्सचे ऑनलाईन विक्रेते असलेल्या ‘फर्स्ट क्राय’मध्ये त्यांनी नुकतीच केलेली (अघोषित रक्कमेची) गुंतवणूक ही त्यांनी दोन वर्षांपेक्षाही कमी कालावधीतील केलेली अशा प्रकारची पंचविसावी गुंतवणूक आहे.

image


अमेरिका आणि चीननंतर ई-कॉमर्सचा बोलबाला अनुभवणाऱ्या आपल्या देशात रतन टाटांसारख्या गुंतवणूकदाराने गेल्या १८ महिन्यात ई-कॉमर्स क्षेत्रातील आठ स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. किंबहुना ‘ओला’, ‘पेटीएम’ आणि ‘स्नॅपडील’ या भारताच्या आठ पैकी तीन युनिकॉर्न स्टार्टअप्सनाही या शक्तिशाली उद्योगपतीच्या गुंतवणूकीचा लाभ मिळाला आहे. त्यांनी सामाजिक कारणांसाठी कार्यरत असलेल्या ‘ऍम्पीअर’ आणि ‘स्वस्थ इण्डिया’ (दोन करोड रुपये) या स्टार्टअप्समध्येही गुंतवणूक केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे लॉजिस्टीक हे एक क्षेत्र आहे ज्यामध्ये त्यांनी अद्याप गुंतवणूक केलेली नाही.

तुम्हाला जरी यापूर्वी लक्षावधी रुपयांचा निधी प्राप्त झालेला असला तरी जेव्हा रतन टाटा तुमच्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करतात तेव्हा जग त्याची दखल घेते. नोव्हेंबर २०१५च्या ‘लाईव्हमिंट’च्या रिपोर्टनुसार आज पाच अब्ज डॉलरचा बिझनेस असलेल्या, कॅब समूहक ‘ओला’च्या शेअर्सची किंमत १५,८७ ,३९२ रुपयांवरुन २९,४४,८०५ रुपयांवर गेली आहे.

जरी अनेक ठिकाणी रतन टाटा यांची गुंतवणूक अघोषित रक्कमेची असली तरी त्यांना ऑन बोर्ड आणण्यात यशस्वी ठरलेले स्टार्टअप्स आर्थिक फायद्यापेक्षा त्यांच्या ऑन बोर्ड येण्यामुळेच जास्त उत्साहित आहेत. ‘ओला’मध्ये टाटा यांनी गुंतवणूक केल्यानंतर, ‘ओला’चे कार्यकारी अधिकारी भाविश अगरवाल म्हणाले की टाटा यांची गुंतवणूक म्हणजे आमच्यासाठी आमच्या वेळीच्या सर्वाधिक आदरणीय उद्योजकाकडून मिळालेली मान्यता होती आणि ही गुंतवणूक भारतातील वाहतूक क्षेत्राच्या भवितव्याबाबत ‘ओला’ची प्रतिबद्धता प्रतिबिंबित करते.

गुंतवणूकदार अनेकदा तरुण उद्योजकांना पाठिंबा देतात, त्यांना मार्गदर्शन करित असतात. अशामध्ये भारताचे उद्योग पुरुष त्यांच्या गुंतवणूकदारांच्या यादीत सामील झाल्याने या स्टार्टअप्सना देशातील सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक लाभला आहे. भाविशही सांगतात, “अब्जावधी भारतीयांसाठी वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या ‘ओला’च्या मिशनमध्ये रतन टाटा आमची मार्गदर्शक शक्ती आहेत.”

टाटांच्या गुतवणूकीने स्टार्टअप्सना लोकप्रियता मिळविण्यासाठी आणि आपली ओळख तयार करण्यासाठी उत्तेजन दिले आहे. किंबहुना आकडेवारीवर नजर टाकता टाटांच्या मिडास टचमुळे काही स्टार्टअप्सचे मूल्यांकन वाढले असल्याचे लक्षात येते. उदाहरणार्थ, वरील रिपोर्टनुसार रतन टाटांचे फंडींग राऊंड सुरु असताना आणि झाल्यानंतर ‘ब्ल्यू स्टोन’चे मूल्यांकन अनुक्रमे ३४.८६ टक्क्यांवरुन ५०.२९ टक्के झाले.

ऑगस्ट २०१५ मध्ये रतन टाटांनी ‘युवरस्टोरी’ वाचले आणि त्यांनी चेक लिहिला. अशाप्रकारे ते ‘कलारी कॅपिटल’, ‘क्वालकॉम वेंचर’ आणि ‘टी व्ही मोहनदास पै’ यांच्यासह ‘युवरस्टोरी’च्या गुंतवणूकदारांमध्ये सामील झाले. आतापर्यंत टाटा यांनी गुंतवणूक केलेली ‘युवरस्टोरी’ ही एकमेव मीडिया फर्म आहे. डिसेंबर २०१५ मध्ये अमेरिका स्थित प्रख्यात ना नफा संस्था असलेल्या ‘खान ऍकेडमी’ने ‘टाटा ट्रस्ट’बरोबर भागीदारी केली. नॅशनल काऊंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ऍण्ड ट्रेनिंगच्या पाठ्यपुस्तकांवर आधारित मजकूर भारतातील विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषेमध्ये ऑनलाईन उपलब्ध करुन देणे हा त्यामागचा उद्देश आहे. ‘आयडीजी वेंचर्स इण्डिया’, ‘कलारी कॅपिटल’ आणि ‘जंगल वेंचर्स’च्या सल्लागारांमध्येही रतन टाटा यांचा समावेश आहे. किंबहुना ‘कलारी कॅपिटल’ने निधी उपलब्ध करुन दिलेले ‘अर्बन लॅडर’, ‘ब्ल्यू स्टोन’ आणि ‘जंगल वेंचर’ने सहाय्य केलेल्या ‘क्रेऑन डाटा’ या स्टार्टअप्समध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. ऑनलाईन डील्सचे व्यासपीठ असलेल्या ‘लेट्स वेंचर’मध्ये ते सल्लागार आणि गुंतवणूकदार दोन्हीही आहेत.

२०१६ च्या पहिल्या तीन आठवड्यात रतन टाटा यांनी जाहीर केलेल्या चार गुंतवणूकींमुळे हे नवे वर्षही स्टार्टअप्ससाठी उत्साहवर्धक राहिल असेच दिसते.

image


ग्राफिक्स : गोकुळ के

(Disclaimer: रतन टाटा यांनी 'युवरस्टाेरी'मध्ये गुंतवणूक केलेली आहे.)

लेखक : अथिरा ए नायर

अनुवाद : अनुज्ञा निकम

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags