देशाच्या हवाई प्रदक्षिणेच्या माध्यमातून जवानांना मानवंदना
भारतीय शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांनी 'प्रदक्षिणा' ही साहसी हवाई मोहीम सुरु केली आहे. या मोहिमे अंतर्गत हे वैमानिक पॅरामोटर्स मधून भारताला प्रदक्षिणा घालणार आहेत. या मोहिमेतील वैमानिक पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मध्ये दाखल झाले. १० हजार किलोमीटरची भारत देशाची हवाई प्रदक्षिणा करण्याची ही साहसी मोहीम आहे. पॅरामोटर्सच्या माध्यमातून हवाई प्रदक्षिणा पूर्ण करणारी ही पहिली मोहीम ठरणार आहे. ही हवाई मोहीम नवीन विश्वविक्रम करणार असून त्याची नोंद गिनीज बुक मध्ये होणार आहे. भारतीय जवानांनी देशाच्या संरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव नागरिकांना करून द्यावी हा या मोहिमेचा उद्देश्य आहे.
झेक प्रजासत्ताकच्या आॅस्लो या वैमानिकाने पॅरामोटर्सच्या माध्यमातून या आधी हवाई सफर केली आहे. या हवाई सफरीची नोंद विश्वविक्रम म्हणून गिनीज बुक मध्ये झाली आहे. आॅस्लो याने ९१३२ किलोमीटरची हवाई सफर केली आहे. याप्रमाणे हवाई सफर करून विश्वविक्रम करावा आणि या माधमातून भारतीय शहीद जवानांना मानवंदना द्यावी या उद्देशाने भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर एम पी एस सोळंकी यांनी ही मोहीम आखली. या मोहीमेची अंमलबजावणी करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला.
सोळंकी हे पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असून त्यांनी काही वर्ष भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून काम केलं आहे. त्यांनी गेल्या वर्षीच ही मोहीम आखली. देशाच्या किनारपट्टीवरून देशाला हवाई प्रदक्षिणा घालण्याची ही मोहीम होती आणि तेही पॅरामोटर्सच्या माध्यमातून. या मोहिमेला भारतीय हवाई दलाची तसंच इतर आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर यामध्ये किती सदस्य सहभागी होणार आणि मोहिमेची अंमलबजावणी कशी करणार हे निश्चित करण्यात आलं. यासाठी १३ सदस्यांची निवड करण्यात आली यामध्ये सात वैमानिकांचा समावेश करण्यात आला. या सगळ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आणि १फेब्रुवारी २०१६ ला या प्रदक्षिणेला सुरवात करण्याचं निश्चित झालं.
प्रदक्षिणा मोहीम १ फेब्रुवारीला सुरु होणार होती, पण खराब हवामानामुळे ३ फेब्रुवारीला सोळंकी आणि त्यांचे एक सहकारी अशा दोघांनी पश्चिम बंगालच्या कालीकुंडा इथून उड्डाण केलं. भारताची पूर्व-पश्चिम किनारपट्टी कन्याकुमारी- दक्षिण किनारपट्टी, असा हवाई पल्ला गाठत प्रदक्षिणा टीम पुण्यात दाखल झाली. या प्रदक्षिणेचा पुण्यात पाच हजार किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला. यांनतर गुजरात, राजस्थान, पंजाब, हिमालयाचा पायथा, दिल्ली, उत्तरप्रदेश आणि बिहार या मार्गे कालीकुंडा ला या प्रदक्षिणेचा समारोप होणार आहे. साधारण २० मार्चच्या दरम्यान या हवाई मोहिमेचा समारोप होईल.
पॅरामोटर्स मधून हीहवाई मोहीम पूर्ण केली जात आहे. पॅरामोटर्सला इतर कोणत्याही सुविधा नसतात, फक्त कॉकपिट (वैमानिकाची केबिन) असते आणि मागे पंखा असतो. त्यामुळे हवामान बदलाचा पॅरामोटर्सच्या उड्डाणावर परिणाम होतो. त्यामुळे एका दिवसात २०० ते ४०० किलोमीटर इतकाच प्रवास करणं शक्य होतं असं विंग कमांडर महेंद्र प्रताप सिंग सोळंकी यांनी सांगितलं. तसंच दोनच पॅरामोटर्स असल्याने एकावेळी २ वैमानिक उड्डाण करतात.
प्रदक्षिणा मोहिमेत १३ जणांची टीम असून यामध्ये एक स्कोर्पिओ, एक रुग्णवाहिका आणि एक बस असा समावेश आहे. सात वैमानिकांपैकी एका वेळी २ वैमानिक उड्डाण करतात. सकाळी किंवा संध्याकाळी उड्डाण केले जाते. यामुळे उन्हाचा त्रास होत नाही. उड्डाण करण्यापूर्वी स्कोर्पिओ मधून एक टीम पुढे जाते आणि दुपारचा किंवा रात्रीचा मुक्काम कुठे करायचा हे ठरवते. त्यानुसार दोन वैमानिक उड्डाण करतात. शेतात किंवा नदीकिनारी असे ठिकाण निश्चित केले जाते. ज्याठिकाणी पाणी उपलब्ध होईल. हवामानानुसार एका दिवसात किती उड्डाण करायचे हे ठरवले जाते, असं सोळंकी यांनी सांगितलं.
हवामान खराब असेल तर एका दिवसात २० किलोमीटर इतकेच उड्डाण होते. कलाईकोन्डा इथून उड्डाण केल्यावर खराब हवामानामुळे २० मिनिटात पुन्हा जमिनीवर उतरावे लागले होते, असं सोळंकी यांनी सांगितलं. पॅरामोटर्सचे कॉकपिट हे बंद नसते त्यामुळे सुर्य प्रकाश आणि वारा यामुळे दमायला होतं, म्हणून आम्ही पाळीपाळीने उड्डाण करतो असं सोलंकी सांगतात. तसंच पॅरामोटर्स बिघडल्यास दुरुस्त करण्यासाठी आवश्यक ती सगळी साधनं बरोबर घेतली असून आम्हीच त्याची दुरुस्ती करतो असं सोळंकी सांगतात.
हवाई प्रदक्षिणाच्या टीम मध्ये विंग कमांडर महेंद्र प्रताप सोलंकी यांच्यासह कॅप्टन आर के सिंग, विंग कमांडर रमाकांत, स्कोडन लीडर अंकुर यादव, मदन रेड्डी, मोतीलाल यादव, विशाल ठाकूर, कुलदीप संग्न्वान, धरमवीर, राम मेहरा, इक़्बाल सिंग, एम के बिस्वास, पंकज कुमार, सुनील, आशिष बिश्त आणि सुंदर सिंग यांचा समावेश आहे.
भारतीय हवाई दलाची ही टीम भारत देशाची हवाई 'प्रदक्षिणा' ही अनोखी मोहीम पूर्ण करून नवा विश्वविक्रम नोंदवणार आहे. या मोहिमेमुळे देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांना मानवंदना तर दिली जाणारच आहे, शिवाय शहीद जवानांच्या स्मृतीही जपल्या जाणार आहेत.
आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. लाईक करा.
आता वाचा :