मराठी सिनेमातला नवा ट्रेंडसेटर - दिग्दर्शक आशिष वाघ
येत्या १९ फेब्रुवारीला मिस्टर अँड मिसेस सदाचारी हा मराठी सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. खूप कमी जणांना माहीती असेल की हा सिनेमा एका कन्नड सिनेमाचा रिमेक आहे. या कन्नड सिनेमाचे नाव आहे मिस्टर अँड मिसेस रामाचारी. २५ डिसेंबर २०१४ ला प्रदर्शित झालेला मिस्टर अँड मिसेस रामाचारी हा कन्नड सिनेमा तिथल्या थिएटर्समध्ये १०० हून जास्त दिवस चालला होता इतकंच नाही तर या सिनेमाने त्यावर्षीचे सर्वोत्कृष्ट कलाकार, सर्वोत्कृष्ट सिनेमा, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, गीतकार आणि अगदी सहाय्यक कलाकार विभागातले पुरस्कारही पटकावले होते.
मराठी सिनेमात नेहमीच कथा आणि संहितेला महत्व दिले गेलेय. मराठी सिनेमांमधले विषय घेऊन अनेकदा हिंदीत किंवा इतर भाषांमध्ये सिनेमे बनवले गेलेत पण पहिल्यांदाच अन्य भाषिक सिनेमाचा मराठीत अशाप्रकारे रिमेक केला गेलाय. आणि हा ट्रेंड सुरु करणाऱ्याचे नाव आहे आशिष वाघ.
मिस्टर अँड मिसेस सदाचारी या सिनेमाचा निर्माता आणि दिग्दर्शक असलेला आशिष मराठी सिनेसृष्टीत एक यशस्वी वितरक म्हणूनही ओळखला जातो, सिनेमा कंपनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा तो व्यवस्थापकीय संचालक आहे. आशिषचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा.
“मी काही वर्षांपुर्वी मिस्टर अँड मिसेस सदाचारी हा कन्नड सिनेमा पहिला, तेव्हापासून हा सिनेमा मनात आणि डोक्यात होता, त्यामुळे जेव्हा मराठी सिनेमा दिग्दर्शित करायचा विचार सुरु झाला तेव्हा सर्वात आधी हाच सिनेमा डोक्यात आला. दिग्दर्शक म्हणून मराठीत नवी कथा शोधण्यापेक्षा या सिनेमाचा रिमेक बनवून नवा प्रयोग करुन बघायला काय हरकत आहे. मग रितसर या सिनेमाचे हक्क आम्ही विकत घेतले आणि सुरु झाला मिस्टर अँड मिसेस सदाचारी सिनेमाचा प्रवास.”
आशिष सांगतो, “हा कन्नड सिनेमाचा रिमेक असला तरी त्यात प्रेक्षकांना मराठीपण जाणवेल हे महत्वाचे. माझ्या सिनेमाचा नायक हा शिवाजी महाराजांचा भक्त आहे, तो लहानपणापासून त्यांनाच आपलं दैवत मानतो, त्यांच्याशी संवाद साधतो. शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचं दैवत आहेत. मिस्टर अँड मिसेस सदाचारीमध्ये माझ्या नायकाच्या तोंडी तुम्हाला शिवरायांचे ऐतिहासिक संवादही ऐकायला मिळतात. ”
“कन्नड सिनेमा आणि मराठी सिनेमा याची तुलना शक्य नाही. कारण दोन्ही संस्कृती वेगळ्या, यातली निर्मितीमुल्य वेगळी आहेत इतकंच नाही तर प्रेक्षकवर्ग आणि त्यांचा सिनेमांना दिल्या जाणाऱ्या प्रतिसादाची पद्धतही वेगळी. बँगलोर किंवा तिथल्या नजीकच्या भागात तुम्ही गेलात तर तिकडच्या थिएटरमध्ये मध्यरात्रीही प्रेक्षक सिनेमा पहाताना दिसतात, त्यांच्या स्टार्सना ते पूजतात, मराठीत असे चित्र दिसत नाही आपण तर अजूनही योग्य शोज मिळावे म्हणून झटतोय.”
अभिनेता वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे ही जोडी मिस्टर अँड मिसेस सदाचारी सिनेमात प्रमुख भुमिकेत दिसणारे. आशिष सांगतो, “कन्नड सिनेमाच्या बजेटच्या तुलनेत मराठीतलं आमचं बजेट सुमार असलं तरी मराठीत हे बजेट कमी नाही. आम्ही मॉरिशस मध्ये या सिनेमाचा काही भाग आणि गाणं शुट केलंय. या सिनेमातली अॅक्शन तुम्ही पहाल तर त्यातही तुम्हाला नाविन्य दिसेल. मिस्टर अँड मिसेस सदाचारीचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदी तसेच अन्य भाषांमधल्या उत्तम तंत्रज्ञांची नावं या सिनेमाशी जोडली गेलीत.”
हा सिनेमा डिसेंबरला प्रदर्शित होणार होता त्यानंतर तो ८ जानेवारीवर गेला आणि आता हा सिनेमा शिवजयंतीला म्हणजे १९ फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. ज्याचे कारण देताना आशिष सांगतो की “शिवाजी महाराजांवर प्रेरित सिनेमा शिवजयंतीला प्रदर्शित होणं हे कधीही चांगलंच. शिवाय जानेवारीमध्ये एकापाठोपाठ एक बहुचर्चित मराठी सिनेमे प्रदर्शित होतायत या गर्दीत उतरणं म्हणजे एका चांगल्या कलाकृतीचे ठरवून नुकसान करण्यासारखे आहे.”
मिस्टर अँड मिसेस सदाचारी सिनेमामध्ये तुम्हाला शिवराज्याभिषेक सोहळ्यावर आधारित एक संपूर्ण गाणं ऐकायला आणि पहायला मिळतं. या सिनेमाचा फर्स्ट लूक आणि मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय. आता सिनेमा प्रमोशनचा महत्वाचा टप्पा जवळ येतोय. आशिषच्या म्हणण्यानूसार “फेब्रुवारीमध्ये मूळ कन्नड सिनेमाचा नायक यश याला घेऊन मिस्टर अँड मिसेस सदाचारीचे प्रमोशन केले जाईल. प्रेक्षकांना आणि माध्यमांना अशा पद्धतीने पहिल्यांदाच मराठी सिनेमाचं प्रमोशन घडताना पहायला मिळेल.”
प्रभावी कथा आणि सादरीकरण असेल तर प्रेक्षक सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर शोकांतिकाही पहातात आणि तिला भरभरुन प्रतिसाद देतात हे २०१६च्या सुरुवातीलाच नटसम्राटला मिळालेल्या बॉक्स ऑफिस यशावरुन सिद्ध झालं.
आता मिस्टर अँड मिसेस सदाचारीमुळे मराठी प्रेक्षक रिमेकला किती प्रतिसाद देतोय हे पहाणं उत्सुकतेचं ठरेल.