अतिभव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मेक इन इंडिया’ देशातील पहिले-वहिले प्रदर्शन सप्ताहभर मुंबईत चालणार, अर्थात ‘मेक इन महाराष्ट्र’!

अतिभव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मेक इन इंडिया’ देशातील पहिले-वहिले प्रदर्शन सप्ताहभर  मुंबईत चालणार, अर्थात ‘मेक इन महाराष्ट्र’!

Tuesday February 09, 2016,

3 min Read

जगातील सर्वच देशांना आर्थिक मंदीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, त्यामानाने भारताची स्थिती मजबूत आहे असा निर्वाळा जगातील सर्व तज्ज्ञांनी दिला आहे. अन्य देशांमधील परकीय थेट गुंतवणूक उणे पद्धतीने वाढत असताना भारतातील परकीय थेट गुंतवणूक अधिक ३८ टक्के दराने वाढत आहे असे प्रतिपादन भारताच्या वाणिज्य राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार ) निर्मला सीतारामन यांनी काढले. मुंबईत पुढील आठवड्यात भरणाऱ्या ‘मेक इन इंडिया वीक’ तेरा ते अठरा फेब्रुवारी पर्यंत, आठवडाभर चालणाऱ्या भव्य व्यापारी व औद्योगिक प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी सीतारामन यांनी व मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी खास पत्रकार परिषद प्रदर्शन स्थळी घेतली.


image


त्या म्हणाल्या की, भारताच्या क्षमता व येथील कारखानदारी, उद्योगाच्या क्षमता या प्रदर्शनामधून व्यक्त होतील. सव्वीस दालनात अत्याधुनिक व्यवस्थेसह होणाऱ्या या प्रदर्शनात देशातील ११ राज्य सरकारे आपापल्या राज्यातील गुंतवणुकीच्या संधीं भव्य प्रदर्शनात प्रदर्शित कऱणार आहेत. यात सहभागी होण्यासाठी साठहून अधिक देशांचे पंतप्रधान अथवा उच्चस्तरीय शिष्टमंडळे येणार आहेत तसेच एक हजाराहून अधिक परदेशी उद्योग प्रमुख, बडे उद्योजक उपस्थित राहणार आहेत. जर्मनीत भरणाऱ्या हानोव्हर औद्योगिक प्रदर्शनाच्या तोडीची व्यवस्था मुंबईत बीकेसी येथे उभी केली व तीही फक्त तीन महिन्यांच्या अवधीत याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यावेळी म्हणाले की, “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेषतः आत्महत्याग्रस्त विदर्भ मराठवाड्यातील कापूस उत्पादक क्षेत्रातील शेतकऱ्यांना अधिक भाव देण्याच्या दृष्टीने कापूस ते वस्त्र अशा उद्दिष्टाने वस्त्रोद्योगास चालना देणारे दहा टेक्स्टाईल पार्क सुरु करण्यात येत असून आणखी बारा टेक्सटाईल पार्कची संकल्पना आहे. धुळे नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रातील मागास जिल्ह्यांमध्ये तसेच पूर्ण मराठवाडा विदर्भ व कोकणातील दोन जिल्ह्यांत नवे उद्योग येण्यासाठी खास सवलती देण्यात येतील.”

यापुढे नव्या उ्दोजकांना राज्य शासनाच्या सवलती हव्या असतील तर फक्त याच जिल्ह्यांत उद्योग काढावे लागतील असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या शेजारी औद्योगिक संकुल सुरु करण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला असून अन्य राज्यांच्या आधी आपण औरंगाबाद नजीकच्या शेंद्रे बिडकिन उद्योग संकुलाची सुरुवात केली आहे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

‘मेक इन इंडिया’ संकल्पने संदर्भात पहिले भव्य प्रदर्शन भरवण्याची संधी दिल्या बद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी भारत सरकारचे आभार मानले. ते म्हणाले की या वेळी ‘मेक इन महाराष्ट्र’ व ‘मेक इन मुंबई’ याचा देखील प्रसार आपण करणार आहोत. तेथे होणाऱ्या ५५विविध चर्चा परिसंवाद तसेच उद्योजक व सरकारची थेट भेट या कार्यक्रमांमधून महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे करार मोठ्या प्रमाणात होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारचे उद्योग सचीव अग्रवाल, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच उद्योग सचीव अपूर्व चंद्रा, मुख्य सचीव स्वाधीन क्षत्रिय आदि उपस्थित होते. मुख्य सचिव क्षत्रिय यांनी मेक इन इंडिया प्रदर्शन व उपक्रमाची सविस्तर माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून दिली.

image


वांद्रे कुर्ला कॉंप्लेक्सच्या भव्य मैदनात सत्ताविस अतिभव्य दालने उभारण्यात आली असून तेथे अकरा राज्यांचे प्रदर्शन मांडण्यात येत आहेत. साठ देशांची शिष्टमंडळे प्रदर्शनात भाग घेतील. काही राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष वा पंतप्रधान तसेच अन्य राष्ट्रांची उच्चस्तरीय शिष्टमंडळे मुंबईत दाखल होत आहेत. भारत सरकारच्या उद्योग विभागाच्या पुढाकाराने हे प्रदर्शन भरवण्यात येत असून त्याची तयारी मुंबईत जोमदारपणाने सुरु आहे. मुख्य प्रदर्शनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शनिवार दि १३रोजी सकाळी वांद्रे-कुर्ला संकुलात होईल. त्या सायंकाळी उद्घाटनाचा भव्य सोहळा वरळीतील नॅशनल स्पोर्ट्स क्लबच्या पटांगणात होणार असून त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे पंतप्रधानांच्या सन्मानार्थ मेजवानी देणार आहेत. प्रदर्शनासाठी आलेल्या देशातील व परदेशातील आलेल्या मान्यवर पाहुण्यांना पंतप्रधानांसमवेत भोजनास निमंत्रित करण्यात आले असून हा कार्यक्रम टर्फ क्लब येथे होत आहे. रविवारी गिरगाव चौपाटी येथे महाराष्ट्राचे भव्य सांस्कृतिक दर्शन दाखवणारा भव्य कार्यक्रम होत आहे. सोमवारपासून बीकेसीत अनेक परिसंवाद व उद्योजकांसाठी चर्चासत्रे परिसंवादाचे कार्यक्रम होत आहेत. बीकेसीत अडीच लाख चौरस मीटर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पूर्ण वातानुकूलित २७दालांनांमध्ये प्रदर्शनाचा पसारा मांडण्यात येत असून यास जोडून मुंबईत सांस्कृतिक अनेक कार्यक्रम गेटवे व गिरगाव चौपाटी येथे आयोजित करण्यात येत आहेत. शिवाय अनेक म्युझिअममध्येही या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन कऱण्यात आले आहे.