सॉफ्टवेअर अभियंत्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आयुष्यात आणला आशेचा नवा किरण

17th Mar 2016
 • +0
Share on
close
 • +0
Share on
close
Share on
close

एक शेतकरी ऑरगॅनिक मंड्या या दुकानात प्रवेश करतो आणि टोमॅटो आणि मिरच्या असलेली एक मोठी पिशवी तेथील टेबलावर ठेवतो. रोखपाल या सामानाचे वजन करतो. टॉमेटोचे वजन असते ४.५ किलो तर मिरच्या असतात १.२५ किलोच्या.... वजन झाल्यावर रोखपाल शेतकऱ्याला काही कोऱ्या नोटो देतो आणि शेतकरी हे पैसे खिशात ठेवून निघून जातो आणि ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते सहा मिनिटापेक्षाही कमी वेळात..... ना कुठला विलंब, ना वाटाघाटी, ना मध्यस्थ, ना निराशा...

पण अवघ्या वर्षभरापूर्वी मंड्या येथील परिस्थिती अशी मुळीच नव्हती. २०१५ च्या जुलै महिन्यात तेथील वीसहून जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. सतत ओलिताखाली असलेला आणि हिरवागार असा हा मंड्या जिल्हा बंगळुरुपासून अवघ्या शंभर किलोमीटर अंतरावर आहे... पण येथील शेतकरी मात्र सातत्याने कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. एका अहवालानुसार मंड्या येथील शेतकऱ्यांकडे बँकांचे गेल्या वर्षभरात (२०१४-१५) घेतलेले सुमारे बाराशे कोटी रुपयांचे देणे थकले आहे. सरकारी अनास्था, शेतमालाच्या घसरत्या किंमती, अतिरिक्त उत्पादन, शेतीविषयक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शनाचा अभाव, यांसारख्या अनेक बाबी या चिंताजनक परिस्थितीसाठी कारणीभूत आहेत.

image


पण या सर्व परिस्थितीने सदतीस वर्षीय मधुचंदन चिक्कादेविया मात्र चांगलेच अस्वस्थ झाले. स्वतः एक आयटी व्यावसायिक असलेले मधु हे खरं म्हणजे त्यावेळी कॅलिफोर्नियामध्ये आपले स्वप्नवत आयुष्य जगत होते. मधू यांचा जन्म मंड्याचा... एका शेतकरी कुंटुंबातील.... तर बंगळुरु कृषी विद्यापीठाच्या प्रशस्त अशा तीनशे एकरच्या परिसरात त्यांचे संपूर्ण बालपण गेले, त्या ठिकाणी त्यांचे वडील हे कुलगुरु म्हणून निवृत्त झाले होते. मधु हे पुढे जाऊन एक सॉफ्टवेअर अभियंता बनले आणि त्यांनी जगभरात काम केले. तसेच कंपन्यांना ऑटोमेटेड सॉफ्टवेअर टेस्टींग सोल्युशन्स पुरविणाऱ्या वेरिफाया कॉर्पोरेशनचे ते सहसंस्थापकही होते. असे असले तरी मनातून मात्र ते नेहमीच एक शेतकरी होते आणि हा शेतकरी काही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता...

अखेर ऑगस्ट, २०१४ मध्ये त्यांनी सर्व काही सोडले आणि ते मंड्याला परत आले. शेतकऱ्यांची भरभराट करण्यासाठी मदत करणे, हेच आता त्यांचे ध्येय होते. ते सांगतात, “ संपूर्ण जगात शेतकरी ही एकच अशी व्यक्ती असते जी होलसेल भावात विक्री करते पण खरेदी मात्र रीटेल किंमतीत करते.” आणि पुढे म्हणतात, “ शेतकरी त्यांच्या जमिनी सोडून, हलक्यासलक्या कामांच्या शोधात शहरांकडे स्थलांतर करत आहेत. त्यातच या कामांमध्ये कोणतेही स्थैर्य नसल्यामुळे त्यांना सतत जबरदस्तीने एका कामावरुन दुसऱ्या कामाकडे उड्या माराव्या लागतात, ज्यामुळे त्यांना अखंडीत आर्थिक लाभही नाकारला जातो. स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घेणेही त्यांच्यासाठी अशक्य बनते आणि अंतिमतः ते कर्जाच्या ओझ्याखाली अडकतात आणि शेवटी आत्महत्या करण्याचीच वेळ त्यांच्यावर येते. हे एक दुष्टचक्र आहे, पण असे एक दुष्टचक्र जे थांबवता येऊ शकते. ऑरगॅनिक मंड्याची स्थापनाच मुळी हे ध्येय साध्य करण्यासाठी झाली आहे – शेतकऱ्यांना संपन्न, आरोग्यदायी आयुष्य देण्यासाठी, जेणेकरुन कोणीही हा व्यवसाय सोडून जाणार नाही.

ऑरगॅनिक मंड्याची बीजेः

जेंव्हा मधू मंड्या येथे परतले, तेंव्हा जी पहिली गोष्ट त्यांना जाणवली ती म्हणजे, विखुरलेली जमीन.... असे अनेक शेतकरी होते, जे सेंद्रीय पद्धतीकडे वळले होते आणि देशी तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यांना चांगले उत्पन्न मिळत होते. तरी काही मोठ्या समस्या होत्याच – संघटीत बाजारपेठ आणि माहिती विनिमयाचा अभाव...

याविषयी तळमळ असणाऱ्या व्यक्तींना (मित्र आणि माजी सहकारी) एकत्र आणणे, हे मधू यांनी टाकलेले पहिले पाऊल होते. या मंडळींच्या मदतीने एक कोटी रुपये उभारण्यात आले आणि त्यांनी मंड्या ऑरगॅनिक फार्मर्स कॉऑपरेटीव्ह सोसायटीची रितसर नोंदणी केली आणि पहिल्याच टप्प्यात २४० सेंद्रीय शेतकऱ्यांना एकत्र आणले. सगळे सरकारी सोपस्कार पूर्ण करण्यासाठी आणि ऑरगॅनिक मंड्या हा ब्रॅन्ड – ज्या अंतर्गत शेतकरी त्यांची उत्पादने विकतील – स्थापित करण्यासाठी त्यांना आठ महिने लागले.

image


“ आम्ही अनेक कल्पनांवर विचार केला – बंगळुरुमध्ये सेंद्रीय दुकानांची एक साखळी सुरु करणे किंवा एक ई-कॉमर्स वेबसाईट सुरु करणे, रेस्टॉरंटस् बरोबर भागीदारी करणे आणि उत्पादनांची विक्री करणे. पण यापैकी कशातूनच शेतकऱ्यांना ग्राहकांबरोबर थेट संवाद साधता येऊ शकला नसता आणि माझ्यासाठी तर तेच प्राधान्य होते. जोपर्यंत शेतकऱ्याने केलेल्या कष्टाचे मोल ग्राहकाला जाणवत नाही किंवा ग्राहकाचे प्राधान्यक्रम शेतकऱ्याला समजत नाहीत, तोपर्यंत शेती कधीच प्रचलित होऊ शकत नाही,” ते सांगतात.

मधू यांनी बंगळुरु आणि मैसुरू यांना जोडणाऱ्या मंड्या महामार्गाचा उपयोग करुन घेण्याचा निर्णय घेतला. आपली उत्पादने विकत घेण्यासाठी प्रवासी येथे नक्कीच थांबतील, असा त्यांना विश्वास होता. त्यापुढे जाऊन लोकांचा उत्साह आणखी वाढविण्यासाठी म्हणून त्यांनी दुकानाच्या बाजूलाच एक सेंद्रीय रेस्टॉरंट सुरु केले. “ प्रवासी खाण्यासाठी म्हणून येथे थांबतील आणि शेवटी या दुकानातूनच आठवड्याचे सामान खरेदी करतील, असा या योजनेमागचा माझा विचार होता. पण साधारण महिन्याभरानंतर हा ट्रेंड उलटाच झाला. लोक पहिल्यांदा आमच्या दुकानात थांबू लागले आणि यातून आम्हाला निश्चितच खूप समाधान मिळाले,” ते सांगतात.

योग्य पद्धतींचा अंतर्भावः

ऑरगॅनिक मंड्याची सर्वात चांगली गोष्ट कुठली असेल, तर ती म्हणजे शेतकरी आणि ग्राहकांना एकमेकांना जोडण्याची मधू यांची कल्पना... त्यांच्या मते, “ एकीकडे किंमतीचा विचार करता, सेंद्रीय उत्पादनांकडे वळताना, ग्राहकांची थोडी दुविधा असते आणि दुसरीकडे अतिरिक्त रसायनांचा शरीराशी संपर्क आल्याने एका चोवीस वर्षीय शेतकऱ्याचा कर्करोगाने मृत्यू होतो. त्यामुळे सेंद्रीय उत्पादनांविषयी लोकांमध्ये जागरुती आणणे हे अत्यावश्यक असून, एका सामाईक माध्यमाची निर्मिती केल्याशिवाय हे शक्य होणार नाही.”

त्यातूनच कंपनीच्या ‘ऑरगॅनिक टुरिझम’ या उपक्रमाचा जन्म झाला, ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे –

१. स्वेट डोनेशन कॅम्पेन – हा अशा प्रकारचा पहिलाच स्वयंसेवी उपक्रम असून, यामध्ये पैशाच्या नाही तर घामाच्या स्वरुपात योगदान मागण्यात येते. मधू सांगतात, “ वेळेवर कामगार न मिळाल्यामुळे, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नापैकी वीस टक्के उत्पन्न गमवावे लागते. या उपक्रमांतर्गत, ज्या लोकांना शेतीची कामे करायला आवडतात किंवा हा अनुभव घेण्याची इच्छा असते, ते आठवड्याच्या शेवटी येथे येऊ शकतात आणि ऑरगॅनिक मंड्याच्या शेतांमध्ये दिवसभर काम करु शकतात. यासंदर्भातील एक उदाहरण देताना मधू सांगतात, “ साठीच्या घरातील एका शेतकऱ्याला दिवसभराच्या मजुरीवर तीन हजार रुपये खर्च करणे शक्य नव्हते, पण त्याच्या संपूर्ण शेतात प्रतिरोपण करणेही गरजेचे होते. आम्ही आमच्या फेसबुक पेजवर ही विनंती नोंदवली आणि आम्हाला २४ असे स्वयंसेवक मिळाले, ज्यांनी अर्ध्या दिवसातच हे काम पूर्ण केले.” गेल्या काही महिन्यात स्वेट डोनेशन कॅम्पेनला बंगळुरुमधून एक हजाराहून जास्त स्वयंसेवक मिळाले आहेत – ज्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते आयटी व्यावसायिक ते निवृत्त जोडप्यांपर्यंतचा समावेश आहे.

image


२. फार्म शेअर – हा आणखी एक आगळावेगळा उपक्रम असून, यामध्ये लोकांना अर्ध्या एकरापासून ते दोन एकरापर्यंतचे शेत तीन महिन्यांसाठी साधारणपणे ३५,००० रुपये भाड्याने घेता येते आणि ते स्वतःचे पीक लावू शकतात. यामध्ये या कुटुंबांना तीन महिन्यांच्या काळात आठ ते नऊ रात्री शेतात रहाण्याची परवानगी मिळते आणि शेती करण्याचीही.. त्यांच्या गैरहजेरीत ऑरगॅनिक मंड्याचे शेतकरी संपूर्ण जमिनीची काळजी घेतात. एकदा का पीक तयार झाले की ते ऑरगॅनिक मंड्यांना विकायचे की स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी ठेवायचे, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य या कुटुंबांना असते. यामुळे शेतकऱ्यांना सतत उत्पन्न मिळत रहाते आणि शहरातील नागरिकांची सेंद्रीय शेतीशी ओळख होते आणि ते याचा आनंदही घेऊ शकतात.

३. टीम@फार्म – या उपक्रमांतर्गत, कंपन्यांना त्यांच्या कामगारांना शेतीच्या कामांसाठी दिवसभर घेऊन येण्यासाठी, ग्रामीण खेळ जसे की कबड्डी, गिल्ली दंडा आणि लगोरी खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्याचबरोबर लोकांना संपूर्ण प्रक्रिया समजू शकेल या दृष्टीने सहली काढण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते आणि या सगळ्यासाठी प्रति दिवस तेराशे रुपये, एवढा वाजवी दर आकाराला जातो.

image


यशाच्या मार्गावरः

ऑरगॅनिक मंड्या पूर्णपणे कार्यरत होऊन फक्त सुमारे सहा महिने झाले आहेत आणि आताच ते यशाच्या मार्गावर आहे. त्यांच्याकडे आताच पाचशेहून अधिक नोंदणीकृत शेतकरी असून, त्यांच्या एकत्रित मालकीची जमीन सुमारे २०० एकर एवढी आहे आणि ते विक्रीसाठी सत्तरहून अधिक विविध प्रकारच्या मालाचे उत्पादन करत आहेत – तांदूळ, डाळी आणि कढधान्ये, खाद्यतेल, वैयक्तिक आरोग्य उत्पादने, पेये, मसाले, इत्यादी.. उत्पन्नाचा विचार करता, अवघ्या चार महिन्यांतच कंपनीचे उत्पन्न एक कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहचले आहे. तर दर महा बास्केटच्या किंमती या ९९९ रुपये, १४९९ रुपये आणि १९९९ रुपयांवर असून, त्यांना चांगली मागणी आहे. “ शेवटी आरोग्यदायी उत्पादने कोणाला नको आहेत आणि ती देखील अशी जी ऑनलाईन मागविता येतील आणि तुम्हाला घरपोच मिळतील,” मधू सांगतात.

पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, मधू यांना रिव्हर्स मायग्रेशन होताना दिसत आहे, अर्थात लोक पुन्हा एकदा शहरांमधून आपापल्या शेतांकडे परत येत आहेत. “ जेंव्हा कोणी शहरांमधून परत येऊन, पुन्हा शेतीला सुरुवात करतो, ते माझे सर्वात मोठे यश असते आणि आतापर्यंत सुमारे ५७ जण आपल्या शेताकडे परत आले आहेत. ग्रामीण, सेंद्रीय क्रांतीची ही तर फक्त सुरुवात आहे,” मधू सांगतात.

शाश्वत भविष्याचा मार्गः

कुठल्याही व्यवसायाच्या भरभराटीसाठी टिकाव धरुन रहाणे खूपच महत्वाचे असते, याची मधू यांना चांगलीच जाणीव आहे. पण याचा फायदा ग्राहक आणि शेतकरी या दोघांनाही व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची त्यांची इच्छा आहे. पुढील वर्षभरात, उत्पन्न वाढीसाठी दहा हजार कुटुंबांना जोडण्याचे काम ते करणार असून, त्यांना दरमहा सरासरी दोन ते तीन हजार रुपयांचा माल विकून त्यातून साधारणपणे ३० कोटी रुपये उत्पन्न मिळविण्याची त्यांची योजना आहे.

“ या मागची कल्पना अशी आहे की, या कुटुंबांची आमचे सदस्य म्हणून नोंदणी करुन घ्यायची, ज्यासाठी वार्षिक खर्च एक हजार रुपये असेल. याचा दुहेरी फायदा होईल – एक म्हणजे त्यांना संपूर्ण वर्षासाठी आमच्या सर्व उत्पादनांवर मोठी सवलत मिळेल आणि दुसरे, आम्ही त्यांची ओळख आरोग्यदायी खाद्य पद्धतींशी करुन देऊ,” ते सांगतात.

image


२०२० पर्यंत संपूर्ण मंड्या जिल्हा सेंद्रीय करण्याचे मधू यांचे स्वप्न आहे.

लेखक – श्वेता विट्टा

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन 

 • +0
Share on
close
 • +0
Share on
close
Share on
close
Report an issue
Authors

Related Tags

  Latest

  Updates from around the world

  Our Partner Events

  Hustle across India