स्वतःच्या शोधात पनवेल ते कन्याकुमारी सायकल प्रवास
एकोणीस दिवसांत पनवेल ते कन्याकुमारी असा १८ हजार किलोमीटर अंतराचा टप्पा, तोही सायकल चालवून...ही थक्क करणारी कामगिरी पार पाडलीय प्रिसिलिया मदन या बावीस वर्षांच्या तरुणीनं. आपल्या कम्फर्ट झोनबाहेर पडून स्वतःचा शोध घेण्याच्या ध्यासापोटी प्रिसिलियानं २४ डिसेंबरला पायडल मारत हा अनोखा प्रवास सुरु केला. नवे प्रदेश, अनोळखी माणसं, त्यांची अपरिचित भाषा असा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू. पाच राज्याचा दौरा ११ जानेवारीला कन्याकुमारीपर्यंत येऊन संपला. प्रिसिलिया आणि तिची कॅनोन्डल सायकल अशी दोघींचीच टीम. रस्ता दाखवायला GPS आणि गुगल मॅप नाही की बरोबर रेस्क्यू टीम किंवा डॉक्टरही नाही. काटेकोर प्लॅनिंग, कुटुंबियांचा भक्कम पाठिंबा आणि वेलविशर्सच्या जोरावर प्रसिलियानं एवढी मोठी मजल गाठलीय. दररोज सात ते बारा तास सायकलिंग आणि रात्री स्थानिक लोकांकडे मुक्काम असा प्रिसिलियाचा डे प्लॅन असायचा.
प्रिसिलियाचे वडील धनंजय मदन हे हाडाचे ट्रेकर. महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक गड-किल्ल्याचे दगड त्यांना ओळखतील इतकं दुर्ग भ्रमंतीचं वेड. मी सहा महिन्यांची असल्यापासून बाबा मला ट्रेकिंगला न्यायचे. अनेक सायकलपटू मोहिमेला जाताना वाटेत आमच्या घरी विसाव्यासाठी थांबायचे. माझ्या घरी, दोस्त मंडळींमध्ये कायमच सायकलिंग, ट्रेकिंगच्याच गप्पा व्हायच्या. मी पनवेल ते कोणार्क आणि मनाली ते खारदुंगला सायकलिंग केलं होतं. हिमालयन माऊंटरिनिंगचे प्रशिक्षण घेतलं. आमच्याकडे आलेल्या इंग्लडच्या सायकलपटू रुबिनाशी गप्पा मारताना वाटलं, आपणही का करु नये सायकलिंग एकटीनं ? हा विचार मनात आला आणि तेव्हाच ही मोहीम हातात घ्यायचं ठरलं. अभ्यास केला. रुट ठरवला. MH 17 ...कारण हा हायवे चांगल्या रहदारीचा असतो. एकटीनं प्रवास करताना सुरक्षितता ही माझी प्रायोरीटी होती. सामान घेतलं आणि धरलं हॅन्डल आणि मारलं पायडल...प्रसिलिया हसत हसत सांगते. महाराष्ट्रात आणि गोव्यात आपलीचं भाषा आणि संस्कृती. प्रदेश ओळखीचे होते. हायवेवर सायकल चालवताना अनेक गाड्या जवळून जायच्या, गाडीतली तरुण मुलं माझ्याजवळून गाडी नेताना ओरडायची. पण मी या सगळ्याची तयारी ठेवली होती, त्यामुळे त्यांच्या या वागण्याचा त्रास झाला नाही. अनेकांना मी परदेशी सायकलपटू वाटायचे. भारतीय मुलगी एकटी सायकल चालवतेय. याचं आश्चर्य़ त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसायचं. मी ज्या कुटुंबात राहिले ती माणसं माझ्यासाठी पूर्णपणे नवी होती. अनेकांना वाटायचं की मी खूप श्रीमंत आहे. म्हणून मी असा थिल्लरपणा करतेय. काहींना वाटायचं की मी एकटीच आहे. त्यामुळे मला काही बरं वाईट झालं तर कोणाला काय फरक पडणारे...तर काहीजणांना वाटायचं की माझ्या आई-वडिलांना आणखीनं बरीचं मुलं आहेत. त्यामुळे मला काही झालं तर त्यांना विशेष फरक पडणार नाही. पण मी जेव्हा त्यांना मी माझ्या आई-वडिलांची एकूलती एक मुलगी आहे असं सांगायचे तेव्हा त्यांना कौतुक वाटायचं. अशा असंख्य प्रश्नांना उत्तर देतं माझा प्रवास सुरु होता. एक मुक्काम संपवून पुढच्या प्रवासाला निघताना निरोप घेताना ती फॅमिली पुढच्या मुक्कामासाठी नवीन माणसांचे पत्ते द्यायची. असे पत्ते जमत गेले आणि १८ दिवस प्रेमळ, काळजी घेणारी नवी १८ कुटुंब मला मिळाली. केरळमधल्या त्रिचूरमध्ये मी मुक्कामाला राहिलेल्या कुटुंबातील बाई त्रिचुरमधल्या श्रीकृष्ण कॉलेजच्या प्रोफेसर होत्या. त्यांच्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांशी बोलण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र आणि गोवा ही राज्य सोडली तर मला कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडूमध्ये प्रवास करताना संध्याकाळी सातनंतर रस्त्यावर मुली फारशा दिसल्या नाहीत.
हा प्रवास मी कोणत्याही अपेक्षा ठेवून केलेला नाही. प्रत्येकानं स्वतःचा शोध घेण्यासाठी कोणतीतरी मोहीम आखलीच पाहिजे. रिस्क घेत स्वतःला आजमावलं पाहिजे. एकटीनं सायकलिंग करणं ही माझ्यासाठी संधी होती. या प्रवासानं मला पेशंन्स शिकवले, टेक्नॉलॉजी कितीही पुढारली तरीही माणसांशी संवाद हा महत्वाचा आहे याचं भान मला या प्रवासानं दिलं. आत्मविश्वास वाढला. मी ११ जानेवारीला संध्याकाळी चार वाजता कन्याकुमारीला पोहोचले. समोर अथांग समुद्र...अरबी समुद्र, प्रशांत महासागर आणि बंगालचा उपसागर यांचा त्रिवेणी संगम... माझी मोहिम फत्ते झाली होती. त्या समुद्राकडे बघत मी माझा सक्सेस सेलिब्रेट केलं. फोन काही वेळ बंद केला. त्या समुद्राच्या साक्षीनं पुढची स्वप्न रंगवली. या संपूर्ण प्रवासात माझ्या शारिरीक क्षमतेवर माझा पूर्ण विश्वास होता. कस लागला तो मानसिक शक्तीचा. आपण जे ठरवलं ते मिळवलं याचा आनंद आणि समाधान काही वेगळचं आहे. आता परतीच्या प्रवासात पुढची मोहिम काय याचाच विचार मी करतेय.