मृत्यूला चकवणारा लढवय्या
कॅप्टन कोहलींच्या संघर्षाची थरारक गोष्ट
‘मी हरीपूरचा आहे’, ८४ वर्षांचे कॅप्टन मोहनसिंह कोहली सांगतात. हरीपूर. वेगवेगळ्या फळांसाठी प्रसिद्ध असलेलं शहर. खैबर पख्तूनवाला परिसरातल्या हरीपूरमध्ये १९३१ साली कोहली यांचा जन्म झाला. त्यावेळी हे गाव वायव्य सरहद्द प्रांतामध्ये होतं. याच परिसरातून सिंधू नदी वाहते. हिमालय आणि काराकोरम पर्वतरांगांच्या परिसरात वसलेल्या या गावाचे काही नागरिक अलेक्झांडर सैन्याचे वंशज आहेत. इ.स.पूर्व ३२७ मध्ये अलेक्झांडर यांनी या प्रदेशावर स्वारी केली होती. त्यानंतर त्याच्या तुकडीतले काही सैनिक हरीपूरमध्येच राहिले. महाराजा रणजित सिंहांच्या सेवेत असलेले हरी सिंग नलवा यांनी १९ व्या शतकात आधुनिक हरीपूरची निर्मिती केली.
‘’ हरीपूरच्या उंच कडांवर माझ्या पूर्वजांचा मृत्यू झाला. त्यानंतर ती जागा आमच्या कुटुंबासाठी धार्मिक स्थळ बनली. साडेसात वर्षांचा असल्यापासून सिंधू नदीच्या उपनद्या पार करुन मी त्या उंच डोंगरावर जात असे. त्यानंतरची साडेनऊ वर्ष हा क्रम सुरुच होता.’’ अशी आठवण कॅप्टन कोहली सांगतात. ओसामा बिन लादेनचा २००४ मध्ये काही काळ हरीपूरमध्येच मुक्काम होता. त्यानंतर तो येथून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या अबोटाबादमध्ये स्थलांतरित झाला." हा सगळा पर्वतराजांनी वेढलेला प्रदेश आहे. अवघ्या १५ मिनिटात तुम्ही या पर्वतांच्या भुलभलैय्यामध्ये हरवून जाल. मी २००४ साली हरीपूरमध्येच होतो. पण मी ओसामाला कधीही भेटलो नाही ’’, असं त्यांनी स्मितहास्य करत सांगितले.
कॅप्टन कोहली हरीपूरमध्ये वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंतच राहिले. त्यानंतर देशाची फाळणी झाली. त्यावेळी पाकिस्तानमधली आपली घरं अनेकांनी सोडली. “ यापैकी काही जण आता आठवतही नाहीत, तर काही अगदी पुसट आठवतात. पण हरीपूरला मी विसरु शकत नाही. माझ्या आयुष्याची सारी उपलब्धी हरीपूरशी निगडीत आहे. त्यामुळे हरीपूरचं माझं घट्ट नातं आहे,” असे कोहली मान्य करतात.
अलेक्झांडरच्या अवशेषांपासून ते फाळणीच्या अवशेषांपर्यंत
१९४७ साली कॅप्टन कोहली १६ वर्षांचे होते. त्या वर्षी हरीपूरमध्ये दंगल झाली. मुस्लिम लीगची शक्ती वाढली होती. त्यामुळे पाकिस्तानच्या मागणीने चांगलाच जोर पकडला होता. " रोज अनेक जण मारली जात होती. आम्ही त्यावेळी विद्यार्थी होतो. आमच्या कुटुंबामध्ये भविष्यात काय करायचं याविषयी चलबिचल होती. तातडीनं इथून निघून जावं की माझं मॅट्रीक पूर्ण करावं याबद्दल एकमत होत नव्हते. ’’ कॅप्टन कोहलींनी मार्च महिन्यात मॅट्रीक पूर्ण केलं. त्यानंतरचे तीन महिने ते नोकरीच्या शोधात भारतामध्ये गेले. मी नोकरीसाठी जवळपास ५०० कारखाने फिरलो, पण यापैकी एकानंही माझी निवड केली नाही. त्यानंतर २ जून १९४७ या दिवशी जवाहरलाल नेहरु, मोहम्मद अली जीना आणि सरदार बलदेव सिंग या तिघांनी भारताच्या फाळणीची घोषणा केली. रेडिओवरची ती बातमी ऐकताच कॅप्टन कोहलींचे वडील सरदार सृजन सिंग कोहली यांनी हरीपूरला परत जाण्याचा निर्णय घेतला.
कॅप्टन कोहली पाकिस्तानामध्ये परतेपर्यंत त्यांचा दहावीचा निकाल जाहीर झाला होता. त्यांनी दहावीत ७५० पैकी ६०० मार्क्स मिळवत जिल्ह्यात पहिला नंबर मिळवला. लवकरच जन्माला येणा-या देशातले साहसी आणि बुद्धीवान तरुण म्हणून त्यांचं नाव घेतलं जाऊ लागलं. लाहोरच्या प्रतिष्ठित अशा सरकारी कॉलेजमध्ये ( हे कॉलेज आता लाहोर विद्यापीठ म्हणून ओळखले जाते) त्यांना प्रवेश मिळला. " पण हा आनंद आठवडाभरच टिकला. " अचानक इतर गावातल्या गावक-यांनी हरीपूरवर हल्ला केला. अलेक्झांडर द ग्रेट यांनी हजारो वर्षापूर्वी हरीपूरच्या गावक-यांना ठार मारुन इथल्या संस्कृतीची राख रांगोळी केली होती. त्यानंतर आता हरीपूरचे रहिवाशीच आपल्या गावक-यांचा जीव घेण्यास उतावीळ झाले होते. " आम्ही रात्रभर राहण्यासाठी आसरा शोधत होतो. संपूर्ण रात्रभर आमचा जगण्यासाठी संघर्ष सुरु होता. पोलीस स्टेशन गाठेपर्यंत आमची धावाधाव सुरु होती. जे लोकं सापडतील त्यांना जागेवर ठार मारलं जात होतं. त्यांची मृतदेह त्यांच्याच घराच्याबाहेर टांगण्यात येत होती. ’’
कॅप्टन कोहली आणि त्यांचे वडील एका निर्वासितांच्या कॅम्पमधून दुस-या निर्वासितांच्या शिबिरात भटकत होते. त्यानंतर पंजासाहिब या शिखांच्या धार्मिक स्थळी ते एक महिना राहिले. " पंजासाहिबमध्ये महिना घालवल्यानंतर त्यांनी भारतामध्ये जाण्यासाठी रेल्वे पकडली. उघड्या मालगाडीमधून आम्ही भारतामध्ये जाण्यासाठी निघालो होतो. आमची रेल्वे निर्वासितांनी खच्चून भरली होती. स्थानिक पोलिसांनी या रेल्वेवर हल्ला केला. रेल्वेत साधारण ३ हजार निर्वासित होते. त्यापैकी १ हजार जणांना या पोलिसांनी ठार मारलं. रेल्वेत या मृतदेहांचा खच पडला होता.’’ मृतदेहानं भरलेल्या आमच्या रेल्वेच्या बाजूला बलूच रेजिमेंटला घेऊन जाणारी रेल्वे येऊन थांबली. या रेल्वेतून पाकिस्तानी सैन्यात नुकतेच दाखल झालेले मोहम्मद अयूब खान उतरले.
फाळणीनंतर ११ वर्षांनी पाकिस्तानचे लष्करशहा बनलेल्या अयूब खान यांचा जन्म हरीपूरमधल्या सामान्य कुटुंबात झाला होता. ते कोहली कुटुंबियांचे शेजारी होते. त्यांना पाहतच ‘ खान आम्हाला वाचव ’, असं कॅप्टन कोहलींचे वडील सृजन सिंग ओरडले. त्यांच्या या हाकेला अयूब खान यांनी प्रतिसाद दिला. घाबरु नका कोहली; मी आलोय, असं सांगत त्यांनी निर्वासितांच्या या रेल्वेचा रस्ता सुरक्षित करुन दिला. पुढच्या आयुष्यात पाकिस्तानचा लष्करशहा बनलेल्या अयूब खान यांनी आम्हाला गुर्जनवालापर्यंत सुरक्षित पोहचवले, अशी आठवण कॅप्टन कोहली सांगतात. गुर्जनवालामध्येही आमच्या रेल्वेवर हल्ले झाले. वेगवेगळ्या प्राणघातक हल्ल्यांपासून बचाव करत ऑक्टोबर महिन्यात आम्ही दिल्लीमध्ये दाखल झालो. "आम्ही जीवघेण्या संकटातून वाचलो होतो. आता आम्हाला नव्या आयुष्याला सुरुवात करायची होती. आमच्या खिशात दमडीही शिल्लक नव्हती. फाटके कपडे आणि अनवाणी पाय घेऊन आम्हाला नवे आयुष्य उभे करायचे होते.’’
हिमालयाच्या सावलीतले आयुष्य
मी हरीपूरला सहावेळेस भेट दिली, असे कॅप्टन कोहली यांनी सांगितले. ‘’ शेवटच्या भेटीच्यावेळी मी अयूब खान यांच्या मुलाचा पाहुणा होतो. माझे आयुष्य वाचवणा-या त्या व्यक्तीच्या स्मारकाला मी भेट दिली.’’ असे कोहली यांनी स्पष्ट केले. प्रत्येक वेळी हरीपूरच्या रहिवाशांनी आमचे प्रेमाने स्वागत केले. या रहिवाशांची भारत-पाकिस्तान हे एकच देश असावेत अशी इच्छा होती; असं मला नेहमी वाटते, असे कॅप्टन कोहली सांगतात. राजकीय नेत्यांनीच या इच्छेला सुरुंग लावला.
हिमालय पर्वतानं वेढलेल्या आपल्या घराचा निरोप घेऊन कॅप्टन कोहलींना आता ५० वर्ष झाली. तरीही त्यांची सारी उपलब्धी हिमालयाशीच निगडीत आहे. कॅप्टन कोहलींनी नौदलामध्ये प्रवेश केला. त्यावेळी आपल्या गावाला ( होमटाऊन ) दोन वर्षातून एकदा जाण्याची परवानगी वरिष्ठ अधिकारी देत असतं. ‘’ जम्मू काश्मीरमधलं पहेलगाम हे माझं गाव असल्याचे मी जाहीर केले. मी त्या गावात १९५५ साली सर्वप्रथम गेलो. हिमालय माझ्या आयुष्यात परत आला होता. त्यानंतर मी अमरनाथ यात्रेला जायचा निर्णय घेतला. कोणतेही लोकरीचे कपडे सोबत न घेता मी अमरनाथ यात्रा पूर्ण केली. आता मी गिर्यारोहक बनलो होतो." अशी आठवण कॅप्टन कोहली सांगतात.
अनेक जीवघेण्या संधी
कॅप्टन कोहली यांनी १९५६ नंतर मागे वळून पाहिले नाही. त्यांनी १७ हजार २८६ फुट उंचीचे नंदा शिखर सर केले. बर्फाचा जीवघेणा वारा तसंच हिमालयातल्या जीर्ण भेगा या सारख्या अडथळ्यांवर मात करत त्यांनी हे शिखर पार केलं. वेड्या साहसाला इतिहास लेखनात किंमत नसते. युद्ध हे दुबळ्या जनरल्सच्या जीवावर लढले जात नाही. त्याचप्रमाणे गिर्यारोहण करताना मागे पडलेले गिर्यारोहक आठवणीत राहत नाहीत. अन्नपूर्णा ( तीन) हे शिखर कॅप्टन कोहली यांनी १९६३ मध्ये सर केले. त्यावेळी त्यांना आलेला अनुभव अविस्मरणीय होता. " आम्हाला स्थानिक लोकांनी लुबाडले. आमच्यापैकी दोघांना त्यांनी बंधक बनवलं होतं. त्यांच्या तावडीतून आमची कशीबशी सुटका झाली.’’ गिर्यारोहणातल्या वेगवेगळ्या अनुभवानंतर कॅप्टन कोहली जगातले सर्वोच्च असे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी सज्ज झाले.
१९६२ साली दोन वेळा त्यांचा माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. एकदा २०० मीटर तर एकदा अवघे १०० मीटर अंतर शिल्लक असताना त्यांना अपयश आले. यापैकी एका मोहिमेत आमचा इतर तुकड्यांशी संपर्क तुटला होता. तो अत्यंत भीतीदायक अनुभव होता, असे कॅप्टन कोहली सांगतात. तब्बल ५ दिवस आमचा कुणाशीच संपर्क नव्हता. या काळात आम्ही मेलो असंच इतर सर्वांनी गृहीत धरले होते. सर्व अडथळ्यांवर मात करत अखेर १९६५ साली माऊंट एव्हरेस्ट सर करण्यात कॅप्टन कोहली यांना यश आले.
हिमालयाच्या घरात रचला इतिहास
कॅप्टन कोहली यांनी १९६५ मध्ये एव्हरेस्ट सर केले आणि एका इतिहासाची नोंद झाली. एव्हरेस्ट शिखर सर करणारा भारत हा चौथा देश बनला. मागच्या पाच वर्षात एकाही भारतीयाला हे सर्वोच्च शिखर सर करता आले नव्हते. "आमच्या तुकडीत ८०० मजूर आणि ५० शेर्पा होते. या तुकडीतल्या नऊ जणांनी एकाच वेळी हे सर्वोच्च शिखर सर केले. हा देखील एक इतिहासच होता.’’ तब्बल २५ टन वजन खांद्यावर घेऊन कॅप्टन कोहली आणि त्यांच्या सहकार्यांनी हे शिखर सर केले. देशातल्या वेगवेगळ्या शहरांमधून हे सारे साहित्य खरेदी करण्यात आले होते. " सांघिक भावनेच्या जोरावरच आम्ही यशस्वी झालो. आमच्या टीममधल्या प्रत्येकाचा या यशात वाटा होता. भारत सरकारने आम्हाला अर्जुन पुरस्कार जाहीर केला होता. पण हा पुरस्कार आम्ही नाकारला. हा पुरस्कार सर्व टीमला द्या नाहीतर कुणालाच देऊ नका अशी आमची भूमिका होती."
त्या काळात एव्हरेस्ट शिखर सर करण्या-यांना मोठा मान होता. सर्वोच्च शिखरावर झेंडा फडकवण्यापर्यंत केलेल्या प्रवासावर अनेकांनी पुस्तके लिहली आहेत. विमानतळावर आमचं जंगी स्वागत करण्यात आले. अगदी संसदेमध्येही मी माझे अनुभव सांगितले, अशी आठवण कॅप्टन कोहली सांगतात. एव्हरेस्ट सर करणारी कॅप्टन कोहलींची १९६५ ची तुकडी खासच होती. सोनम गेस्तो ( वय ४२) हे एव्हरेस्ट सर करणारे सर्वात वयोवृद्ध, तर सोनम वेंग्याल ( वय २३ ) हे सर्वात तरुण या तुकडीत होते. शेर्पा गोम्बू यांनी तर दुस-यांदा हे सर्वोच्च शिखर सर करण्याचा मान मिळवला. २५ फेब्रुवारी ते मे महिन्याच्या अखेर पर्यंत चाललेली ही मोहीम अनेक अविस्मरणीय घटनांनी सजलेली होती.
कॅप्टन एम.एस. कोहली, लेफ्टनंट कर्नल एन. कुमार, गुरुदयाल सिंग, कॅप्टन ए.एस. चिमा, सी.पी. व्होरा, डी. नोरबू, एच. बालकृष्णन, लेफ्टनंट बी.एन. राणा, ए. तेनसिंग, फू दोरजी, जनरल थोंडूप, डॉ. डी.व्ही. तेलंग, कॅप्टन ए.के. चक्रवर्ती, एच.पी.एस.अहलूवालीया, सोनम वेंग्याल, सोनम गेस्तो, कॅप्टन जे.सी. जोशी, शेर्पो गोम्बू, ए. कामी, मेजर बी.पी. सिंग, जी.एस भंगू, मेजर एच.व्ही.बहुगूणा आणि एच. सी. एस. रावत यांच्या टीमने इतिहास रचला.
मागे वळून पाहताना....
“ हिमालय पर्वतावरील गिर्यारोहणाचा मी मोठ्या प्रमाणात प्रचार केला. परंतु काही दशकानंतर या उत्साहाला मला आवर घालावा लागला, असे कॅप्टन कोहली सांगतात." हिमालय हा सध्या कच-याचा डोंगर बनलाय. वनक्षेत्र जवळपास निम्याने कमी झाले आहे. हे सर्व पाहताना मला अपराधी वाटतं.” मोठ्या प्रमाणात झालेल्या व्यवसायिकीकरणामुळे हिमालय हा आता केवळ पर्यटनाचे केंद्र उरलाय. “ हिमालयाला वाचवण्यासाठी मी दिवगंत कॅप्टन सर एडमंड हिलरी, जुंको, हेरझॉग या सारख्या अनेकांशी संपर्क साधला होता. त्यातूनच आम्ही हिमालय पर्यावरण ट्रस्टची स्थापना केलीय. या शिखरांचे अधिक नुकसान टाळण्यासाठी ही संस्था काम करत आहे. आमच्या काळात शोध मोहीम अगदी क्वचित हाती घेतली जायची. आता दरवर्षी पावसाळा सुरु होण्यापूर्वी आणि नंतर जवळपास ३० पेक्षा जास्त शोध मोहीम राबवल्या जातात. हा आता सारा पैसा कमवण्याचा उद्योग बनलाय. हिमालय पर्वत सर करण्यासाठी आता लोकं रांगेत उभी असतात ”, असे कॅप्टन कोहली यांनी सांगितले. तुम्ही संपूर्णपणे तंदूरुस्त नसाल तरी २० - २५ लाख रुपये भरा. शेर्पा बरोबर घ्या, साहित्य बरोबर घ्या आणि हिमालय शिखर सर करा, अशी पद्धत आता प्रचलित झाल्याचे कोहली यांनी मोठ्या निराशेने मान्य केले.
माऊंट एव्हरेस्ट पर्वताला विश्रांती द्या असे मी आणि सर एडमंड हिलरी गेल्या अनेक वर्षांपासून सांगतोय, पण कुणीच ऐकत नाही. जास्तीजास्त पैसा कमावण्याच्या या खेळात मुळ समस्या ही अधिकच बिकट होत चाललीय. तुम्ही या परिस्थितीमध्ये काहीच करु शकत नाही.
ज्येष्ठ गिर्यारोहकाचा शेवटचा सल्ला
हिमालय पर्वताची सध्याची कुरुपता कॅप्टन कोहली यांना पाहवत नाही. या पर्वताच्या सानिध्यामध्ये त्यांचे आयुष्य गेले. ही शिखरं सर करत असताना तब्बल १८ वेळेस त्यांनी मृत्यूला चकवा दिला. पण तरीही तेंव्हा कधीच भीती वाटली नाही. उंच पर्वतावर गेल्यानंतर आपले हात आभाळाला टेकल्याचा भास होतो. परमेश्वराच्या जवळ गेल्यासारखे वाटते. या जगापासून आपण लांब आहोत, अशी भावना त्यावेळी असते.
“ १९६२ साली केलेल्या मोहिमेच्या दरम्यान आम्ही शेवटची प्रार्थना तीन वेळेस म्हंटली. हिमालय पर्वताच्या बर्फात गाडले जाण्याची वाट आम्ही पाहत होतो. पण त्यावेळीही कुणालाच भीती वाटली नाही. या सा-या गोष्टी आयुष्याचाच भाग बनल्या होत्या. इतकी उंच शिखरं सर करण्यासाठी तुम्ही जाता त्यावेळी तुम्ही या सा-या भव्य शक्तीचा भाग होता ”, अशी आठवण कॅप्टन कोहली यांनी सांगितली.
कॅप्टन कोहली यांच्या नातवाने त्यांना एव्हरेस्टवर जाताना रोखण्याचा प्रयत्न केला होता. पण याबाबत कॅप्टन कोहली यांची विशिष्ट मते आहेत. “ जर तुम्हाला मोहीमेवर जायचेच असेल तर त्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देणा-या पाच चांगल्या संस्था भारतामध्ये आहेत. त्यापैकी एखाद्या संस्थेचा प्रगत अभ्यासक्रम पूर्ण करा. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एखाद्या मोहीमेत भाग घ्या. ही सर्व तयारी झाल्यानंतर एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी पाऊल उचला ”, असा सल्ला त्यांनी दिलाय.
कॅप्टन कोहलींचा संदेश
साहसाची अत:प्रेरणा असल्याशिवाय कोणत्याच देशाचा जगात दबदबा निर्माण होऊ शकत नाही, असे कॅप्टन कोहली यांचे ठाम मत आहे. जर एखाद्या देशाला काही तरी भव्य, महान कार्य करायचे असेल तर त्यांनी त्यांच्या तरुणाईला धाडस करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. धाडसी लोकांना वेगवेगळ्या भागात जायला आवडते. गिर्यारोहण, वॉटर राफ्टिंग यासारख्या गोष्टी या साहसाचाच भाग आहेत. या गोष्टीची ओढ असणे हे अगदी स्वाभाविक आहे. पण ज्या लोकांना या गोष्टी आवडत नाहीत त्यांना हे सर्व काही पचत नाही. त्यांच्यादृष्टीने ही सारी मंडळी वेडी असतात. त्यामुळे माझा संपूर्ण देशाला सल्ला आहे, तुमच्या शाळकरी मुलांना हिमालयातल्या मोहिमेवर पाठवा. त्यांना धाडसाची ओळख करुन द्या. धाडसाची ओळख झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात बदल होईल.