अंधांना जीवनाचा आनंद मिळवून देणारा ‘नयन फाऊंडेशन’चा डोळस दृष्टीकोन

अंधांना जीवनाचा आनंद मिळवून देणारा ‘नयन फाऊंडेशन’चा डोळस दृष्टीकोन

Thursday January 28, 2016,

4 min Read

आपण डोळसपणे अनेकदा धडपडतो, मग डोळ्यासमोर पसरलेल्या काळ्याकुट्ट अंधारात अंध व्यक्ती आपला मार्ग कसा शोधत असतील याचे सामान्य माणसाला नेहमीच आश्चर्य वाटते. अंध व्यक्ती सामान्य आयुष्य जगू शकत नाही असा त्याचा समज असतो. मात्र हा समज निखालस चुकीचा आहे. सामान्य माणसाचा सर्वच विकलांगांकडे बघण्याचा दृष्टीकोन हा त्याच्या मानसिक कमकुवतपणाची परिणती असतो. कारण सुदृढ माणसाला एखादी कृती करण्यासाठी विशिष्ट अवयवाच्या आधाराची जन्मापासून सवय झालेली असते. तो दृष्टीविना जग अनुभवण्याची किंवा हाता-पायाविना दैनंदिन व्यवहार अचूक करण्याची कल्पनाच करु शकत नाही. त्याचे मन लगेचच कचरते, नकारात्मक विचार करु लागते. विकलांग व्यक्तिंच्या शारिरीक कमतरतेची भरपाई मात्र देवाने मानसिक बळ देऊन केलेली असते. त्यांची जिद्द आणि आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन डोळस माणसालाही लाजवेल असा असतो. इच्छाशक्तीच्या जोरावर ते सुदृढ माणसाच्या बरोबरीचे आयुष्य जगू शकतात. गरज असते ती आपण त्यांच्यावर विश्वास दाखविण्याची, त्यांना प्रोत्साहन देण्याची. अंधांना जीवनातील थरार अनुभवण्याची संधी मिळवून देणाऱ्या ‘नयन फाऊंडेशन’ने नेमके हेच केले आहे.

image


अंशतः अंध असलेला देवेंद्र पोन्नलगर दक्षिण भारतीय असूनही त्याला छत्रपती शिवरायांबद्दल नितांत आदर आणि महाराष्ट्राबद्दल प्रचंड जिव्हाळा आहे. त्याला ट्रेकिंगची खूप आवड. त्याने शिवरायांच्या अनेक किल्ल्यांना भेट दिली आहे. आपल्याप्रमाणेच अंध व्यक्तिंनाही शिवरायांचे किल्ले अनुभवता यावे, त्यांना जीवन अनुभवण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने २०१० साली देवेंद्रने ‘नयन फाऊंडेशन’ ही संस्था स्थापन केली.

संस्थेच्या स्थापनेनंतर सलग तीन वर्ष देवेंद्र अंधांना घेऊन विविध गडांवर ट्रेकिंगसाठी गेला. “पहिल्या वर्षी शिवनेरी गडावरच्या ट्रेकमध्ये १६ अंध मुलं सहभागी झाली होती. शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडावर जाण्याचा अनुभव या मुलांना आयुष्यात खूप काही देऊन गेला होता. त्यानंतर आमच्या ट्रेकला अंधांचा प्रतिसाद वाढत गेला. दुसऱ्या वर्षी रायगडावरच्या ट्रेकमध्ये ६० मुलं सहभागी झाली. तर तिसऱ्या वर्षी लोहगडच्या ट्रेकला सहभागी मुलांचा आकडा ८० वर गेला,” देवेंद्र सांगतो.

या दरम्यान रुईया कॉलेजमधून बीए झालेल्या देवेंद्रची ओळख रुईयामध्येच शिकणाऱ्या आणखी काही शिवप्रेमींशी झाली. शार्दुल भारत म्हाडगुत आणि संकेत पाटील या दोघांनी देवेंद्रला मोलाची साथ दिली आणि २०१४ साली ‘नयन फाऊंडेशन’ने केवळ ट्रेकिंगपुरते मर्यादित न रहाता अंधांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या व्यासपीठाचे रुप घेतले.

image


२०१४ साली ‘नयन फाऊंडेशन’ने महाराष्ट्रातील पहिले अंधांचे गोविंदा पथक तयार केले. “त्यापूर्वी २०१३ मध्येही काही अंधांना घेऊन दहिहंडीच्या दिवशी बोरिवलीमध्ये थर लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सरावाअभावी त्यावेळी केवळ तीन थर लावण्यात यश आलं होतं. म्हणून २०१४ मध्ये आम्ही रितसर गोविंदा पथक सुरु करायचा निर्णय घेतला. आता दरवर्षी दहिहंडी पूर्वी १५ -२० दिवस आम्ही रुईया कॉलेजच्या समोरच्या मैदानावर सराव घेतो आणि पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरतो,” असं नयन फाऊंडेशनचा सचिव शार्दुल म्हाडगुत सांगतो.

२०१४ -१५ या दोन्ही वर्षी ‘नयन फाऊंडेशन’चे गोविंदा पथक इतर गोविंदा पथकांच्या बरोबरीने दहीहंडी उत्सवात सहभागी झाले. या पथकात ४० अंध आणि संस्थेच्या स्वयंसेवकांचा सहभाग होता. दोन्ही वर्षी या गोविंदा पथकाने ३५ ते ४० ठिकाणी चार थर रचले आणि विशेष म्हणजे एकही गोविंदा एकदाही पडला नाही.

image


२६ जानेवारी २०१५ ला ‘नयन फाऊंडेशन’ने आपल्या दृष्टीहीन बांधवांसह सिंहगडावर स्वारी केली. तर यावर्षी प्रजासत्ताक दिनी शिव छत्रपतींचे गुरु समर्थ रामदास स्वामींचे समाधीस्थान असलेला किल्ले सज्जनगड सर केला. या सज्जनगड स्वारीमध्ये ८० अंध सहभागी झाले होते. ‘नयन फाऊंडेशन’चे २० स्वयंसेवक, ‘सह्याद्री ट्रेकिंग संस्थे’चे १० स्वयंसेवक आणि डॉक्टरांचे पथक त्यांच्या सोबतीस होते.

“फक्त ४५ मिनिटात सर्वजण गडावर पोहचलो. तिथे गड फिरलो, समाधीचं दर्शन घेतलं, जेवलो आणि त्यानंतर अनपेक्षितपणे एक चांगली गोष्ट घडली. रामदास स्वामींचे वंशज बाळासाहेब स्वामी यांनी दासबोध ब्रेल लिपीत तयार केलं आहे. आजवर ते सूपूर्द करण्यासाठी योग्य व्यक्ती न मिळाल्याने ते त्यांनी कुणालाच दिलं नव्हतं. आमच्या संस्थेबद्दल समजल्यावर त्यांनी स्वतःहून ते आम्हाला दिलं. त्यामुळे आता आमचे अंध बांधव दासबोध वाचू शकणार आहेत,” देवेंद्र सांगतो.

“सज्जनगडावर अंधांची जिद्द आणि त्यांची इच्छाशक्ती याचं दर्शन आम्हाला घडलं. सज्जनगड पाहून झाल्यानंतर लगेच त्याचदिवशी अजिंक्यतारावर चढून जाण्याचीही त्यांची तयारी होती,” शार्दुल सांगतो.

image


गिर्यारोहण आणि गोविंदा पथकासह अंधाच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रमही ‘नयन फाऊंडेशन’मार्फत राबविला जातो. तसेच मराठी भाषा दिनी अंध कलाकारांचा मराठी गाण्यांचा वाद्यवृंद आयोजित करुन त्यांच्या कलागुणांना वाव देण्यात येतो. तर महाराष्ट्र दिनी संरक्षण प्रशिक्षण शिबीर आयोजित करुन त्याद्वारे अंधांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येतात. तसेच संस्थेशी जोडली गेलेली दृष्टीहीन व्यक्ती रुग्णालयात दाखल असल्यास गरज पडल्यास तिला आर्थिक मदतही पुरविण्यात येते. विविध उपक्रमांच्या माध्यमातून आजवर २५० ते ३०० अंध ‘नयन फाऊंडेशन’शी जोडले गेले आहेत.

अंधांबद्दल केवळ सहानुभूती बाळगण्यापेक्षा त्यांच्या क्षमतांवर विश्वास दाखविल्यास, त्यांना जगण्यापासून परावृत्त करण्यापेक्षा या दुनियेत निर्भयतेने वावरण्यासाठी त्यांना आवश्यक गोष्टींचे ज्ञान दिल्यास दृष्टीहीन व्यक्तीही आत्मविश्वासाने कुठल्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकते हे ‘नयन फाऊंडेशन’ने आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून सिद्ध करुन दाखविले आहे. अंधांना जगण्याचा आनंद देण्यासाठी देवेंद्र आणि त्याच्या सहकाऱ्यांची ही धडपड खरोखरच कौतुकास्पद आहे.

    Share on
    close