Brands
Discover
Events
Newsletter
More

Follow Us

twitterfacebookinstagramyoutube
ADVERTISEMENT
Advertise with us

सर्वसामान्यांपर्यंत कला पोहचवण्याकरता कलाकार, क्युरेटर आणि उद्योजिका सुरभी मोदींचे अथक प्रयत्न

सर्वसामान्यांपर्यंत कला पोहचवण्याकरता कलाकार, क्युरेटर आणि उद्योजिका सुरभी मोदींचे अथक प्रयत्न

Friday February 26, 2016 , 6 min Read


दिल्लीतल्या छत्रपूर इथल्या सुरभी मोदी यांच्या घरी आपण प्रवेश केल्यावर लगेचच एम एफ हुसैन यांनी चित्तारलेल्या सुंदर चित्रावरून आपली नजर हटतच नाही. मात्र सुरभींना भारावून टाकलय ते तीन शिल्पांनी. पहिलं आहे अरुण पंडीत यांचं ‘माँ परेशान क्यूं होती है’. पुढे गेल्यावर त्या आणखी एक अद्भूत कलाकारी दाखवतात. त्यांनी खरेदी केलेलं हे पहिलं चित्र आहे. ब्रिटीश चित्रकार जासपेर जोफ यांनी चिनी अभिनेत्री झँग झीयी यांचं काढलेलं हे चित्र. आपल्या या छंद आणि व्यवसायाविषयी बोलताना सुरभी म्हणतात, “माझ्याकरता चित्र खूप सुंदर चित्तारलेलं असणं महत्त्वाचं नाहीये. ते चित्र आपल्याशी संवाद काय साधतं. त्यातून काय प्रतिक्रिया उमटतायत. समाजातली आव्हानं यातून व्यक्त होत आहेत का? या गोष्टी माझ्याकरता फार महत्त्वाच्या आहेत”. सुरभी भारतातल्या प्रसिद्ध क्युरेटर अर्थात संग्रहालयाध्यक्ष आहेत. त्यांचा पब्लिका आर्ट फेस्टिवल देशाभरातल्या कलारसिकांच्या पसंतीस उतरलाय. पब्लिका सुरू करण्याचा उद्देशच काहीतरी अद्भूत, वेगळेपणा आणि विचारांना चालना देणारं लोकांसमोर आणणं हा आहे. त्यामुळेच तो एवढा यशस्वी झालाय. 

image



दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या इंडिया आर्ट फेअरमध्ये पब्लिकाची दुसरी आवृत्ती सादर करण्यात आली. या आवृत्तीत गिगी स्कारिआ, अनंत मिश्रा, ओवसिस हुसैन, दीपज्योती कलिता, कृष्णा मुरारी, तुषार जोग, जासोन बिलबाओ, भूवल प्रसाद आणि रक्तीम पराशर या कलाकारांच्या चित्रांचा समावेश होता. त्यांनी केवळ सांस्कृतिक केंद्रांपर्यंत आपलं प्रदर्शन मर्यादीत ठेवलं नाही. मेट्रो स्टेशन्स, पार्क आणि शॉपींग मॉल्स अशा वेगवेगळ्या २० जागी त्यांनी आपलं हे प्रदर्शन सादर केलं.

सर्वसामान्यांपर्यंत कला

सुरभी सांगतात, “एका विशिष्ट वर्तुळापर्यंत सीमित असलेली कला मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत न्यायची आहे. संग्रहालय आणि आर्ट गॅलरीतचं प्रदर्शन असल्यावर फार कमी प्रेक्षक भेट देतात. मला प्रदर्शन समाजातल्या सर्व थरातल्या लोकांपर्यंत पोहचवायचं आहे. कलेला प्रोत्साहन द्यायचं आहे. त्यामुळे मी जास्तीत जास्त लोकांना ही कला पाहता येईल अशा ठिकाणी प्रदर्शन भरवते”. ही दुसरी आवृत्ती त्यांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, शांती पथ, नेहरु पार्क, चिल्ड्रन पार्क, साकेत मधला सिटी वॉक, वसंतकुंज मधील डीएलएफ एम्पोरिओ, निझामुद्दीन बस्ती, इंदिरा हॅबिटट सेंटर आणि गुडगाव सायबर हब या ठिकाणी सादर केली आहे. २९ फेब्रूवारीपर्यंत हे प्रदर्शन प्रेक्षकांकरता खुलं आहे.

अरुण कुमार एच जी – ट्रेसेस

अरुण कुमार एच जी – ट्रेसेस


सुरभी आपल्याकडचं वास्तव सांगतात, “भारतातला कला बाजार हा कोणत्याही नव्या गोष्टी करण्याच्या फंदात पडत नव्हता. कलादालनात जायचं लोक अजूनही टाळतातच. दिल्लीतली प्रसिद्ध कलादालन आणि संग्रहालय सुद्धा दुर्लक्षित राहिल्याने, पैशांची कमतरता जाणवते. सिनेमा पाहणं किंवा हल्ली मॉलमध्ये जाणं हेच आपल्याकडे अजूनही मनोरंजनाचं साधन समजलं जातं”. या मुख्य प्रवाहातल्या लोकांपर्यंत कला पोहचवण्याच्या उद्देशानेच ३२ वर्षीय सुरभींनी फ्लडलाईट फाउंडेशनची स्थापना केली.

तीन वर्षांपूर्वी ना नफा तत्वावर कलाकारांना प्रशिक्षण देणं आणि व्यवस्थापन करणं या ध्येयाने सुरभींनी फ्लडलाईटची स्थापना केली. या अंतर्गतच पब्लिका सुरू करण्यात आलं आहे. दोन पातळ्यांवर त्यांचं काम चालतं. उद्योजिका आणि कलाकार म्हणून त्या या प्रदर्शनांचं आयोजन करतात. त्यासोबतच तरुण कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देऊन त्यांच्यातल्या कलागुणांना वाव देतात. फ्लडलाईटस् कलाकारांना काम करण्यासाठी जागा उपलब्ध करून देते. सुरभी अधिक विस्तारानं सांगतात, “आम्ही कलाकारांना त्यांचा पोर्टफोलिओ बनवायला मदत करतो. त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही काम करतो. कलादालन आणि कलाकेंद्रांशी संपर्क साधणे, कलाकारांना त्यांच्या कारीगिरीचा उत्तम मेहनताना मिळवून देणे, याकरता आम्ही प्रयत्न करतो. येत्या काही दिवसांत या कलाकारांची कारीगिरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याकरता फ्लडलाईट ऑनलाईन गॅलरी तयार करत आहे”. नवीन कलाकारांना आपली कला सादर करण्याचं व्यासपीठ फ्लडलाईटने उपलब्ध करून दिलं आहे. कलेबाबत जागृती, कलासंग्रहकांकडून आणखी प्रोत्साहन आणि सेंसरशीपला थोडी काट देण्याकरता फ्लडलाईट प्रयत्न करत आहे.

 दिल्लीचं फुप्फुस, शिल्पकार - लुकास मुनोझ

 दिल्लीचं फुप्फुस, शिल्पकार - लुकास मुनोझ


कलेकडे ओढा

सुरभी सांगतात, शाळेत त्या सर्वच बाबतीत अव्वल असायच्या. सर्व चित्रकला स्पर्धेमध्ये त्यांनी बक्षिस मिळवली आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे कलेकडे ओढा असूनही त्यांनी कॉमर्सची पदवी घेतली. दिल्लीतल्या कॉन्वेंट ऑफ जीजस अँड मेरीतून पदवी मिळवल्यावर त्यांनी आयएमआयमधून एमबीए केलं. आपल्या वडिलांसोबत काम करत असताना त्यांच्यातला कलाकार स्वस्थ बसत नव्हता. त्या सांगतात, “स्टीक पेन्स लिमिटेडमध्ये मी उत्पादनांची योग्य मांडणी करून व्यापारवाढीचं काम करायचे. मी व्यवहारात एकदम चोख होती. अवघ्या २३ व्या वर्षीच मी स्टिक पेन्सना बिग बझार आणि वॉल्मार्ट या बड्या दुकानांच्या रॅक्सवर नेलं”. मार्केटींग त्यांचं प्रोफेशन असलं तरी त्यांच्यातला कलाकार नेहमीच उफाळून यायचा. त्यांनी त्रिवेणी कला संगममधून शिल्पकलेचं रितसर प्रशिक्षण घेतलं आहे. फावल्या वेळात तैलचित्र काढणं त्यांना खूप आवडायचं. त्यांचे पती उच्च शिक्षणाकरता लंडन बिझनेस स्कूलमध्ये असताना त्या तिथेही स्वस्थ बसल्या नाहीत.

image


लंडनच्या सोथबेज संस्थेतून २०१२ मध्ये त्यांनी कलेचा इतिहास विषयात मास्टर्स पदवी मिळवली. सोथबेजमध्ये प्रवेश घेताना आपल्या या मास्टर्स पदवीचा उद्देश सांगावा लागतो. त्यांनी सोथबेजमध्ये सांगितलं होतं की, “मला शिल्पकार म्हणून स्वतःची शिल्प घडवायची आहेत, कलाशिक्षणावर काम करायचं आहे आणि तरुण कलाकारांना प्रोत्साहन, मदत देणारी संस्था उभारायची आहे”. ऑगस्ट २०१२ मध्ये लंडनहून परतल्यावर त्यांनी आपल्या उद्देशांच्या दिशेने पावलं उचलली.

आंतरराष्ट्रीय ललित कला अकादमी (आयआयएफए) च्या सल्लागार समितीत त्या सदस्या आहेत. कलाजगत आणि विद्यापीठांमधला संवाद वाढवून चांगले संबंध प्रस्थापित करण्याकरता त्यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

कधीकधी सुरभी त्यांनी बनवलेली शिल्प सुचमो, (सुरभी चर्ला मोदी) या त्यांच्याच नावाच्या आद्याक्षरांपासून बनवलेल्या टोपणनावानं सादर करतात. जेणेकरून त्यांच्या शिल्पांना त्यांच्या नावाच्या कोणत्याही ठशाशिवाय वेगळी ओळख मिळेल. त्यांच्या घरी कला विषयांच्या पुस्तकावर मानवी मस्तक आराम करत असल्याचं एक सिलिकॉननं बनवलेलं शिल्प आहे. त्याचं नाव आहे, स्लोथ. बिब्लिकल प्रवाहानुसार मानवाच्या उदास आणि आळशीपणामुळे त्याला भोगावी लागणारी सात पाप हा या शिल्पाचा आशय आहे. २०१३ आणि २०१४ अशी दोन वर्ष त्यांनी लंडनमध्ये आपलं प्रदर्शन भरवलं आहे. पुन्हा तिथे कलारसिकांच्या भेटीला चित्र आणि शिल्प घेऊन जायच्या विचारात आहेत. पब्लिकामध्ये आपलं स्वतःचही काम त्या लवकरच सादर करणार आहेत. सध्या त्या त्यांच्या नऊ महिन्यांच्या तान्हुल्याची आई आणि उद्योजिका अशी दुहेरी भूमिका करत आहेत.

इंग्लंडमधल्या एका स्वयंसेवी संस्थेनी २०११ मध्ये आयोजित केलेल्या ऑलिम्पिया आर्ट फेअरमध्ये त्यांना शो क्युरेट करण्याची संधी मिळाली. भारतातल्या कला क्षेत्राबाबत जागृती निर्माण करण्याकरता या अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. पब्लिकाची पहिली आवृत्ती २०१३ मध्ये सादर करण्यात आली होती. एप्रिल २०१४ मध्ये त्यांनी नवी दिल्लीतल्या अलायन्स फ्रंचाईझ इथं भरवण्यात आलेल्या ब्युटी अँड द बीस्ट या प्रदर्शनाकरता क्युरेटर म्हणून काम केलं. भारतातल्या उदयोन्मुख चित्रकारांची चित्र, शिल्प आणि फ्रान्सिस बकोन यांच्या केआॅस विषयांतर्गत चित्र या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. 

प्रतिभेचा शोध

उदयोन्मुख कलाकारांमधली प्रतिभा हेरण्यात फ्लडलाईटला चांगलचं यश मिळतयं. भूवल प्रसाद हा याच प्रयत्नातून समोर आलेला कलाकार. त्याने आपला पहिलावहिला वैयक्तिक शो फ्लडलाईटसोबत केला आणि लगेचच २०१५ च्या बियानेलमध्ये भाग घ्यायला बिजींगला रवाना झाला. अनंत मिश्रा, राम डोग्रे, राजेश श्रीवास्तवा, सिंताशु मौर्या आणि अभिजीत पाठक हे आणखी कलाकार फ्लडलाईट सोबत काम करत आहेत.

सुरभी नवीन कला निर्मितीच्या कामातही मोलाचा वाटा उचलत आहेत. आर्टरिच नावाची संस्था रस्त्यावरील मुलांकरता कला प्रकल्प चालवते. या आणि अशा प्रकारच्या बऱ्याच प्रकल्पांमध्ये पब्लिका काम करत आहे. भूवल प्रसाद त्यांच्या घरीच अशा मुलांकरता कलेचे वर्ग घेतात. त्यातही पब्लिकाची महत्त्वाची भूमिका आहे.

लोकांनी पब्लिकाच्या चित्र आणि शिल्पांना मत द्यावी असं आवाहन त्या करतात. बहुमत मिळणारी कलाकृती पब्लिका एका वर्षाकरता सार्वजनिक ठिकाणी मांडतील. यामुळे तळागाळातल्या लोकांपर्यंत कला पोहचून जास्तीत जास्त लोक कलेच्या जवळ येतील.

पब्लिकाच्या प्रकल्पांना, कलाकृतींना कायम स्वरुपी जागा मिळावी असं सुरभींना वाटतं. त्या म्हणतात, “सध्या, आम्ही एक-एक महिन्याची प्रदर्शन आयोजित करतो. पण आमच्या कलाकृतींना विमानतळं, मॉल, हॉटेल्समध्ये कायमस्वरुपी स्थान मिळावं अशी माझी महत्त्वकांक्षा आहे”. पब्लिकाला दुसऱ्या आवृत्तीत मिळालेलं हे यश पाहता. त्यांची महत्त्वकांक्षा लवकरचं पूर्ण होईल अशी आशा आहे.

आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

कला जोपासण्यासाठी शिस्तबद्धता महत्वाची : आयना गुंजन

माती घडवणारे हात: शालन डेरे

‘ब्ल्यू पॉटरी’ – नामशेष होऊ घातलेल्या पिढीजात कलेचं पुनरूज्जीवन

लेखिका – पूनम गोयल

अनुवाद – साधना तिप्पनाकजे