अद्ययावत तंत्रज्ञानातून गतीमंदांना सन्मानाचे स्थान देणारा ' प्रयास' !
शालिनी गुप्ता यांची १३ वर्षांची गायत्री, सर्वसाधारण मुलांसारखीच, फरक मात्र इतकाच की गायत्री 'डाउन सिंड्रोम'ची रुग्ण आहे. शालिनी आणि तिचे कुटुंबीय गायत्रीसाठी दिल्लीहून बेंगळूरूला राहायला आलेत. इथे गायत्री शिकतेय 'प्रयास' या संस्थेन खास ऑटीस्टीक मुलांसाठी तयार केलेला संगणकीय अभ्यासक्रम.
पण दिल्लीहून बेंगळूरूला का ? या प्रश्नाचं उत्तर देताना शालिनी म्हणतात " गायत्रीच्या वडीलांचं आणि माझंही मत आहे की , गायत्रीनं आपल करियर निवडताना डिजिटल माध्यमाचा वापर करावा. म्हणजे समजा तिला योगाभ्यासात आपलं करियर करायचं आहे, ती स्वताची वेबसाईट बनवू शकेल, चॅट रूम्स बनवू शकेल, आसनांची प्रात्यक्षिक दाखवू शकेल किंवा मग तिला फोटोग्राफी शिकायची असेल, तरी ते एडीट करण्यासाठी तिला संगणकाचा वापर करावाच लागणार. अगदी संगणकीय प्रोग्रामिंगसारखा कठीण विषय जरी नाही निवडला तरी जे काही निवडेल, त्यासाठी तिला संगणकाचा वापर नक्कीच होणार”.
दुसरीकडे राधा चारी यांची ही कहाणी अशीच, त्यांचा मुलगा अनिरुध्द या ऑक्टोबरमध्ये २३ वर्षांचा होईल. अनिरुध्दने प्रयासमध्ये दुसऱ्यांदा प्रवेश घेतला आहे. राधा यांनी पुन्हा अनिरुद्धला प्रयासमध्ये पाठवण्याचा निर्णय का घेतला ? यावर त्याचं उत्तर आहे ,"ऑटीस्टीक मुलांसाठी असणारा हा एकमेव कार्यक्रम आहे. त्याला संगणकात रुची आहे आणि त्याचे प्रयासमधील प्रशिक्षक, त्याच्या क्षमतेनुसार त्याला शिकवतात. पहिल्यांदा तो जे शिकला त्याहून वेगळं तो यंदा शिकत आहे. " राधा यांनी अनिरुद्धमध्ये होणारे बदल ही अचूक टिपलेत, त्या म्हणतात " त्याने वर्ड आणि एक्सेल शिट आत्मसात केल पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याची एकाग्रता वाढलीय. त्यांची जी प्रयोगशील अभ्यासपद्धती आहे आणि त्यात पालकांचाही सहभाग करून घेतल्याने मुलांना त्याचा खूप फायदा होतोय. "
शालिनी यांनी या अभ्यासक्रमाच वेगळेपण आपल्या शब्दात मांडलं . त्या म्हणतात," मी अशा पालकांपैकी एक आहे, जे आपल्या पाल्यांसाठी बाहेरून शिक्षक आणण्यापेक्षा स्वत:हून शिक्षण देणं अधिक पसंत करतात . मी स्वत: प्रशिक्षण घेते आणि मग गायत्रीला शिकवते . प्रयासनं या माझ्या प्रयत्नात मोलाची साथ दिली आहे. याहून उत्तम पर्याय मला मिळूच शकला नसता अस मला वाटतं. अशा प्रकारे कुशल विद्यार्थी घडविण्यासाठी एकास एक अशाच शिक्षकाची गरज असते. प्रत्येक प्रशिक्षकाला अशाप्रकारे एकास एक शिकवण्याइतका संयम असेलच असं नाही . त्याचबरोबर असे प्रशिक्षक इथे असले तरी, मला सुद्धा घरी जाऊन गायत्रीसाठी अभ्यासक्रम आखता येतो आणि ती घरी असताना तिच्याकडून तो करवून घेता येतो. म्हणजे जर फक्त तिच्याबद्दल, ती क्लासमधून काय करतेय याचा एक अहवाल आला असता तर तो फायदेशीर ठरला नसता, पालकांचा सहभाग हे या अभ्यासक्रमाच एक मोठ वैशिष्ठ आहे अस मला वाटत."
‘प्रयास’च्या मागची प्रेरणा :
ऑटीसम सोसायटी ऑफ इंडियाच्या (ए.एस.आय) संस्थापक मंडळापैकी एक असणाऱ्या कविता शर्मा यांच्या कल्पनेतून प्रयास साकारलं . ए.एस.आय. या २००६ साली स्थापन झालेल्या नोंदणीकृत संस्थेचा आज वटवृक्ष झाला आहे. सुरुवातीला पालकांनी आधार गट म्हणून सुरु केलेली ही संस्था आज नावारुपास आली आहे . कविता म्हणतात २०१० मध्ये , आय पॅड भारतात आला आणि ऑटीस्टीक मुल यावर किती सहजतेन शिकताहेत याबद्दलच्या कहाण्या ऐकायला येऊ लागल्या. दृकश्राव्य माध्यमाचा हा सहज उपयोग आमच्या लक्षात आला." त्या पुढे म्हणतात, “आम्हाला तोवर कल्पना आली होती कि अन्य मेंदूविकार असणाऱ्या मुलांपेक्षा ऑटीस्टीक मुलांना शिकवण्यासाठी वेगळी पद्धती शोधावी लागते. म्हणुनच या अत्याधुनिक सहाय्य उपकरणाचा आम्ही अत्यंत बारकाईने विचार करू लागलो.”
त्या पुढे म्हणतात की, ए.एस.आय.मध्ये अनेक पालकांचं असं निरीक्षण होतं की या मुलांना 'समाजापुढचं आव्हान’ असं मानण्यात येतं. म्हणून ग्रुपमध्ये शिकण्यापेक्षा एकास एक या पद्धतीने ती चांगली शिकतात. “दोन ऑटीस्टीक मुलांची आई म्हणून माझाही हाच अनुभव आहे." असं मत कविता यांनी पुढे व्यक्त केल.
प्रयास प्रकल्प : उदय
बेंगळूरूमधल्या ‘सॅपलॅब’च्या मदतीने प्रयासने आकार घेतला. एएसआयमध्ये सॅपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या आय पॅड कार्यशाळेत पालक, तज्ञ आणि विद्यार्थीही हजर होते. त्यावेळी सॅपचे तेंव्हाचे व्यवस्थापकीय संचालक व्ही.आर. फिरोज यांनी एएसआयला काही आय पॅडस आणि संगणक दान करण्याची घोषणा केली. हे वर्ष होत २०११ आणि महिना मार्च. त्यानंतर १४ जुन २०११ पर्यंत प्रयासची ही सुरुवात झाली .
एएसआयमधून प्रयास प्रकल्पासाठी कविता यांची निवड होण्यामागचं कारण म्हणजे, विशेष मुलांसाठीचं प्रशिक्षण घेतलेल्या त्या एकमेव पालक होत्या आणि तंत्रज्ञानाची ओळख त्यांना होती. त्या म्हणतात, हे कठीण आव्हान होत , त्यावेळी देशात असा कोणताही अभ्यास उपलब्ध नव्हता. ऑटीसम स्पेक्ट्रमचा विकार असणाऱ्या मुलांसाठी आयपॅड आणि संगणकाच्या मदतीने त्यांच्यातील क्षमता ओळखणं हे ध्येय त्यांनी ठरवलं. हे साध्य करण्यासाठी कविता यांनी विविध बाबी एकत्रित केल्या. विशेष प्रशिक्षणाची तत्व, संगणक आणि आयपॅडची मदत आणि पालकांचा सहभाग. महत्त्वाचं म्हणजे प्रशिक्षणासाठी एकत्रित पोषक वातावरण तयार करण ज्यामुळे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण देणं सोपं गेलं .
प्रयासचा प्रवास :
कविताजींनी प्रयासचे सुरुवातीचे दिवस सांगायला सुरुवात केली, त्या म्हणाल्या, " रोज पाहते ४ वाजता उठून मी ३ ते ४ धडे तयार करीत असे. ते माझ्या टीम मेम्बर्सना पाठवीत असे. ज्यात दोन तज्ञ प्रशिक्षक आणि पालक यांचा सहभाग होता. सर्व एकत्र आल्यावर आम्ही या धड्यांवर काम करीत असू . पुढील पाच महिने सतत आम्ही हे एकत्रितरित्या केल. या धड्यामध्ये सामान्य ज्ञान, आकृती वर्गीकरण, कारणं आणि परिणाम, कल्पनाविष्कार आणि संगणकीय ज्ञान यांचा समावेश होता. दर दिवशी मुलांना आम्ही वेगवेगळे धडे शिकवत असू. पाचव्या महिन्यात मी मुलांनी काय साध्य केलय यासंदर्भात मुल्यांकन केलं. त्यानंतर आम्ही धड्यांचं वर्गीकरण केलं आणि त्यानुसार श्रेणी ठरवल्या .
प्रयासच्या प्रत्येक बॅचमध्ये ५ महिन्यासाठी १२ ते १५ मुलं प्रशिक्षण घेतात. जानेवारी २०१३ मध्ये एएसआयने सॅपच्या स्वयसेवकांसोबत www.learn4autism.com या वेबसाईटची सुरुवात केली. याचा मुख्य उद्देश होता सहज उपलब्ध असणारं तंत्रज्ञान इथं शिकणाऱ्या सर्वाना गुणवत्तापूर्ण मिळावं आणि सर्वाना त्याचं आकलन व्हावं. तंत्रज्ञानावर आधारित माध्यम म्हणून हे ऑनलाइन शैक्षणिक साधन उपयुक्त ठरतं. ६ ते १४ वर्षे वयोगटातील विकास वाढीच्या समस्या असणाऱ्या सर्वच मुलांना याचा निश्चित फायदा होईल.
कविता पुढे म्हणतात , ''या वेबसाईटमध्ये , अनेकांच्या अनुभवातून मिळवलेलं सार आहे आणि जगभरातील उत्तम मार्गदर्शन इथे उपलब्ध होत. १०० मुलांसोबत काम केल्यावर हा अभ्यासक्रम बनवण्यात आला आहे. तो दाखल्यांवर आधारित आहे. कार्यकुशलता वाढवण्यावर आणि आकलन वाढवण्यावर भर देणारा हा अभ्यासक्रम आहे''.
परिणाम :
पुढे त्या म्हणतात की, ''प्रयासचा परिणाम भारतच नव्हे भारताबाहेरही जाणवू लागला आहे, ऑटीजम असणाऱ्या अनेकांमध्ये अनेक गुण उपजत असतात, ते म्हणजे असामान्य निरीक्षणशक्ती, उत्तम स्मरणशक्ती , बारकाईने लक्ष देणे, विशेष आकारांप्रती आकर्षण आणि अत्यंत केंद्रित होऊन काम करणे. या त्यांच्या गुणांचा वापर करून त्यांना समाजात स्वत:च्या पायावर उभं करण हे महत्त्वाच उद्दिष्ट्य आमच्यासमोर असल्याच कविता सांगतात.
जगभरातून त्यांच्या ऑनलाइन अभ्यासक्रमात १२०० जणांनी नोंदणी केली आहे. यामध्ये त्यांना १००० तास शिकण्यासाठी मिळतात. भारतातल्या १५ शहरांमध्ये आणि बांगलादेशातही प्रयासचा हा प्रवास गेला आहे, तो म्हणजे ‘ट्रेन द ट्रेनर’ या कार्यक्रमांतर्गत. प्रयास टीमने 'बोल' आणि ‘आयकथा’ हे दोन अप्लिकेशन सुरु केलं. ज्यातला बोल हा अण्ड्रोइडवर ही उपलब्ध आहे.
प्रयास प्रकल्पातर्फे कविता याचं स्वप्न आहे की, समाजाचा दृष्टीकोन बदलावा, विकलांगतेवर मात करून ही मुलं समाजात उत्तम नागरिक म्हणून वावरावीत, यासाठी त्यांनाही समान संधी मिळवून देण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्या म्हणतात तंत्रज्ञानाने हे सहज शक्य आहे. "