कोवळ्या बोटांचा ताल आंतरराष्ट्रीय पातळीवर
काही मुलं दैवी देणगीच असतात. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात. तेवढंच नाही तर आईच्या पोटात वाढत असतानाच ती स्पंदनं मातेला काहीवेळा अनुभवता येतात. चक्रव्यूहाचा भेद करण्याचं तंत्र अभिमन्यू मातेच्या उदरात असतानाच शिकला. अशी उदाहरणं क्वचितच पाहायला मिळतात. अंबरनाथ येथील सहा वर्षाचा छोटा उस्ताद अथर्व लोहार हे त्यातले एक उदाहरणं.
सध्या सहा वर्षाच्या अथर्व लोहारचे तबला वादन बघून आपण नक्कीच थक्क व्हाल. घरातील वातावरण, संवाद, संस्कार याचा किती प्रभावीपणे लहान मुलांवर परिणाम होतो हे यातून दिसून येईल. मानवी मेंदूच्या आकलन शक्तीचा विकास विविध व्यक्तींमध्ये किती वेगवेगळ्या पातळीवर आणि वेगवेगळ्या वयामध्ये होत असतो याचं हे उत्तम उदाहरण.
बँकॉकमधील थायलंड येथे झालेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय कल्चरल ऑलिम्पियाड परफॉर्मिंग आर्ट या आंतरराष्ट्रीय तबलवादन स्पर्धेतील अंबरनाथ शहरातील अवघ्या सहा वर्षाच्या अथर्व लोहार याने ८ ते १० या वयोगटात सुवर्णपदक पटकावले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे अंबरनाथ शहराचे नाव आतंरराष्ट्रीय पातळीवर झळकले आहे.
वयाच्या तिसर्या वर्षापासून अथर्वला खर्या अर्थाने तबलवादनाची आवड निर्माण झाली आहे. त्यापूर्वीपासूनच तो घरातील कोणतीही वस्तू घेऊन त्यावर ठेका धरत असे. ही बाब त्याची आई शीतल लोहार यांच्या लक्षात आली. त्यांनाही संगीताची आवड असल्याने त्यांनी अथर्व याच्या कलेला प्रोत्साहन देण्याचे ठरवले. त्याच्या आजोबांनी त्याला पहिल्या वाढदिवसाला तबला भेट दिला. यातून त्याची कला बहरत गेली आणि सुवर्णपदकाला त्याने लहान वयात गवसणी घातली. अथर्व हा सुनिल शेलार यांच्या गुरूकृपा संगीत विद्यालयात तबलवादनाचे धडे गिरवू लागला. लहान वयात त्याच्या बोटांची करामत बघून शेलार यांनी त्याला पुणे येथील अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या राष्ट्रीय तबलावादन स्पर्धेत सहभागी होण्यास भाग पाडले. या स्पर्धेत २२ राज्यांतील सहा हजार स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत अथर्वने लहान गटातून पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. त्यामुळे त्याची पाचव्या आंतरराष्ट्रीय कल्चरल ऑलिम्पीयाड परफॉर्मिंग आर्ट या आंतरराष्ट्रीय तबलावादव स्पर्धेसाठी निवड झाली. ही स्पर्धा थायलंड येथे २५ ते ३० डिसेंबर दरम्यान झाली. परंतू या स्पर्धेत भारतातून त्याच्या वयाचा गट सहभागी झाला नव्हता. त्यामुळे त्याला ८ ते ११ या वयोगटांत सहभागी व्हावे लागले. आश्चर्य म्हणजे त्याने या वयोगटांत सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या कामगिरीमुळे गुरूकृपा संगीत विद्यालयाचे नाव जगाच्या पाठीवर पोहोचले. अथर्वचे वडील रेल्वेच्या सुरक्षा बलामध्ये कार्यरत आहेत. आठवड्यातून दोन दिवस संगीत शिक्षक अथर्वच्या घरी येऊन त्याला तबलावादनाचे धडे देतात. त्याचा मूड आणि शाळा सांभाळून त्याची आई शीतल त्याचा सराव घेतात. तो इयत्ता पहिलीत शिकत असून अभ्यासातही तो हुशारआहे. विविध परीक्षांमध्ये त्याने पहिला क्रमांक सोडलेला नाही. त्याने या क्षेत्रात नाव कमवावे, अशी आमची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
मेंदूच्या विविध भागांचा परिणाम विविध इंद्रियांवर कसा होत असतो यावर सध्या अमेरिकेमध्ये मोठे संशोधन चालू आहे. एकीकडे विज्ञान प्रगत होत असतानाच अध्यात्मिक पातळीवरील संशोधन मात्र म्हणावे तसे होताना दिसून येत नाही. या क्षेत्रात मुलभूत संशोधन करून जगाला अध्यात्मिक पातळीवर ज्ञानदानाचे कार्य करण्यात भारत नक्कीच अग्रेसर होऊ शकेल. उणीव आहे ती भारतीय समाजातील सकारात्मक उर्जा जागृत करण्याची. सोहम सारख्या विभूतीं विविध क्षेत्रात जन्माला येत आहेत. भारताचा उज्वल भविष्यकाळ नक्कीच उदयाला येतोय.
- यापूर्वी अंबरनाथच्या पाध्ये कुंटूबियातील बहीण आणि भावानेही परदेशात तबलावादन करून सुवर्णपदक पटकावले होते. मागील वर्षी उल्हासनगरच्या सिद्धी बोरकर हिने आणि आता अथर्वने सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामूळे गुरूकृपा संगीत विद्यालयाची हॅट्रीक पूर्ण झाली. थायलंडला कडाक्याची थंडी पडली असताना सभागृहातही वातावरण थंडगार होते. याचा अथर्वच्या बोटांवर आणि पर्यायाने तालावर काही परिणाम होईल, अशी भीती वाटत होती. पण सर्व आघाड्यांवर त्याने मात केली आणि घवघवीत यश संपादन करीत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केले.-सुनील शेलार, अथर्वचे संगीत शिक्षक.
अथर्व लोहारचे बहारदार तबलावादन ऐकण्यासाठी खालील लिंक सिलेक्ट करा.-https://www.youtube.com/watch?v=weDuPooPUD8