‘जग दृष्यमान होत आहे आणि कसे, ते माझ्या मुली मला दाखवित आहेत’ – किर्थिगा रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक, फेसबुक इंडिया.
जेंव्हा त्या टीमने केलेल्या कामावर खुष होतात तेंव्हा त्यांना शाबासकी देण्यासाठी शार्क चे प्रतिक (इमोजी) पाठवतात... तुम्ही करुन दाखविलेत असे त्याद्वारे सांगतात.... आजच्या भाषेत म्हणायचे तर ‘कुल ना?’... त्या आहेतच तशा ‘कुल’... बदलांचे स्वागत मोकळ्या मनाने करणाऱ्या आणि रोज नवीन काहीतरी शिकत रहाण्याची इच्छा असलेल्या....त्या आहेत फेसबुक इंडीयाच्या एमडी अर्थात व्यवस्थापकीय संचालक किर्थिगा रेड्डी... . २०११ ला फॉर्च्युन इंडिया या मासिकाच्या भारतातील पन्नास सर्वाधिक शक्तीशाली महिलांच्या यादीत त्यांचाही समावेश होता. जाणून घेऊ या किर्थिगा यांची ही कहाणी...
किर्थिगा यांचा जन्म नागपूरचा... कष्टाला अतिशय महत्व देणारे उत्तम मध्यमवर्गीय संस्कार त्यांच्यावर झाले. वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातील महत्वाची वर्षे दंडेली आणि नांदेडमध्ये गेली.
नांदेड येथील एमजीएम कॉलेज ऑफ इंजिनियरींग मधून त्यांनी संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर त्या कानेटकर ट्युटोरीयल्समध्ये शिकण्यासाठी नागपूरला परतल्या.
पुढे त्यांनी स्टॅंडफोर्ड विद्यापीठातून बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन अर्थात व्यवसाय प्रशासनामध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि सिरॅकस विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अमेरिका स्थित फिनिक्स टेक्नॉलॉजिज मध्ये काम करण्यास सुरुवात केली जेंव्हा त्यांना फेसबुकमधील त्यांच्या ड्रिम जॉबसाठी विचारणा झाली आणि त्यांची कारकिर्द जोमाने सुरु झाली.
अतिशय मोठ्या पदावर काम करणाऱ्या किर्थिगा या मात्र स्वतःला आजही एक विद्यार्थी मानतात आणि अनेक गोष्टी आपण आपल्या मुलींकडूनच शिकलो हेदेखील प्रांजळपणाने सांगतात. त्यामुळेच कदाचित फेसबुकसारख्या आजच्या पिढीच्या माध्यमातही त्या सहजगत्या रुळून गेल्या आहेत. जे काही त्यांच्या मनात आहे ते मोकळेपणाने व्यक्त करताना त्या मुळीच कचरत नाहीत. फेसबुकच्याच परिभाषेत सांगायचे तर ‘ व्हॉटस् ऑन हर माईंड’ अंतर्गत त्या मोकळेपणाने शेअर करतात. जग हे अधिकाधिक दृष्यमान होत चालले आहे, असा किर्तिगा यांचा विश्वास आहे. तसेच आजच्या काळात व्यक्तिगत आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या संवांदांवर प्रतिमा, व्हिडिओ, स्टीकर्स, अगदी ३डी या गोष्टींचा प्रभाव दिसून येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे आणि हे ज्ञान फेसबुकच्या बोर्ड मिटींगमधून नव्हे तर घरीच मिळाल्याचेही त्या आवर्जून सांगतात. “ जग हे दृष्यमान होत चालले आहे आणि ते कसे, हे माझ्या मुलींनी मला दाखविले,” किर्थिगा कौतुकाने सांगतात. त्यांच्या मोठ्या मुलीकडून त्या फिल्ममेकींग शिकल्या आणि त्यांच्या टीमचे काम त्यांनी ००७ स्टाईल व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिले. जेंव्हा त्या त्यांच्या मुलींना केलेल्या मेसेजचा शेवट XOXO असा करतात, तेंव्हा आपल्या आईला याचा अर्थ माहित असल्याचे पाहून त्या मुलीदेखील चकीत होतात.
“ आजच्या घडीला दररोज फेसबुकवर चार अब्ज व्हिडिओ पाहिले जातात आणि त्यापैकी ७५ टक्के मोबाईलवर पाहिले जातात,” त्या सांगतात. त्या पुढे म्हणतात, “ जग कुठे चालले आहे हे माझ्या मुली मला शिकवितात आणि त्याचबरोबर त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी मला मदत करतात आणि काळाबरोबर पुढे जाण्यास शिकवितात. एका अर्थाने त्या मला वेगवेगळ्या प्रकारे पुढे खेचतात.”
युअरस्टोरीशी बोलताना किर्थिगा म्हणतात, “ लोक फेसबुककडे येतात ते जोडले जाण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी... आणि हा संवाद वेगवेगळ्या प्रकारे होतो. जसा की दोन व्यक्तींमध्ये मर्यादीत असलेला, एक व्यक्ती आणि अनेक व्यक्तींमध्ये होणारा किंवा अनेकांमध्ये एकाचवेळी चालणारा संवाद.... अशा वेळी आमच्या ऍपस् यासाठी कामी येतात... आणि यामध्ये केवळ फेसबुकच नाही तर इन्स्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉटस्ऍपचाही समावेश करावा लागेल. यापूर्वीच आम्ही १५२ दशलक्ष लोकांना एकमेकांशी जोडण्यात यशस्वी ठरलो आहोत आणि अजूनही आम्हाला अब्जापेक्षा जास्त लोकांना जोडायचे आहे आणि हे खूपच उत्साहवर्धक आहे.” आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी म्हणून तरुण लोक जो विचार करतात त्याच्या एक पाऊल पुढे रहाण्याच्या दृष्टीने आवश्यक ते शिकण्यासाठी किर्थिगा नेहमीच आपले डोळे आणि कान उघडे ठेवतात.
उच्च शिक्षित असलेल्या किर्थिगा यांच्या मते त्यांचे शिक्षण आजही सुरुच आहे. “ त्या दोघींनी (मुलींनी) पालकत्वाच्या माझ्या व्याख्येचा पार चुराडा केला आहे. ”
इतर अनेक नोकरी करणाऱ्या महिलांप्रमाणेच किर्थिगा यांच्यासाठीही वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य यातील तोल सांभाळणे कठीण होते. मात्र आज या समस्येवर मात करुन त्यांनी एक नवीन उदाहरण घालून दिले आहे आणि मात कशी करता येते ते त्यांनी स्वतःच्या उदाहरणातूनच सिद्ध केले आहे.
इन्कटॉक्सच्या (INKTalks) व्यासपीठावरुन मुंबईत बोलताना त्यांनी याबाबत विस्ताराने सांगितले, “ माझी दुसरी मुलगी, आरीया, हीच्या जन्मानंतर मला नोकरीनिमित्त प्रवास करण्याचा निर्णय घ्यावाच लागला होता. (सहा महिन्यांची बाळंतपणाची रजा संपल्यानंतर) मात्र मुलगी एक वर्षांची होईपर्यंत तिची काळजी घेणे हे देखील माझ्यासाठी अतिशय महत्वाचे होते. ते दिवस माझ्यासाठी अतिशय क्लेशकारक होते. तो माझ्यासाठी कठीण काळ होता आणि मी विचार करत होते की कदाचित हाच तो क्षण नाही ना, ज्याच्याबद्दल सगळे म्हणतात, की व्यावसायिक आणि खासगी उद्देशांपैकी तुम्हाला एक काहीतरी निवडावे लागते.”
पण यामधूनच त्यांना नवीन कल्पना सुचली... “ मी दोन्ही करु शकते, अशी जाणीव मला झाली,” त्या सांगतात. त्यामुळे जेंव्हा त्यांना कामानिमित्त प्रवास करावा लागत असे, तेंव्हा त्या बाळाला बरोबर घेऊन जात असत. त्यांचे सहकारी बाळासाठी चांगले डे केअर शोधत असत आणि मिटींग्जच्या मधल्या काळात त्या मुलीची काळजी घेत. त्यातूनच ‘हे किंवा हे’ यापासून दूर जात ‘हे आणि हे’ हा शोध त्यांना लागू शकला.
आयुष्याच्या इतर गोष्टींमध्येही किर्थिगा हेच तत्वज्ञान वापरतात. त्यांचे व्यस्त वेळापत्रक पहाता त्या सामाजिक कामासाठी वेळ देऊ शकत नाहीत. “ पण शक्य त्या प्रकारे आम्ही योगदान देतो. मी आणि माझ्या मुली किचनमध्ये मदत करतो, दुसरी भाषा म्हणून इंग्रजी शिकवितो, झाडे लावतो आणि बरेच काही करतो,” त्या सांगतात.
यामुळे पालकत्वही अधिक सक्षमपणे निभावण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. “ बहुतेकदा आई लोकांचा व्हॉटस्ऍप ग्रुप असतो. मग पालक लोकांचा व्हॉटस्ऍप ग्रुप का असू नये ? माझे पती, देव, हे कौटुंबिक जबाबदारीमध्ये जास्त पण कमीत कमी पन्नास टक्के भागीदार राहिले आहेत,” त्या सांगतात.
शिकणे, बदलणे आणि पुन्हा शिकण्याच्या किर्तिगा यांच्या या सायकलमधील महत्वाचा भाग आहे तो म्हणजे बदल स्वीकारण्याची तयारी... “ बदलाला विरोध करु नका. बदल चांगला असतो. नवनवीन प्रेरणादायी मार्गांचे मुक्तपणे स्वागत करा, त्यामध्ये काही गोष्टी अपेक्षित असतील तर काही अनपेक्षित,” त्या सांगतात.
ही आयुष्यभर शिकत रहाण्याची संस्कृती आपण वर्गांमध्ये किंवा कंपन्यांमध्ये नेऊ शकतो का? “ फेसबुकमध्ये आमच्याकडे हॅकींगची संस्कृती आहे. आमच्याकडे हॅक सेशन्स आहेत आणि त्यामधून कधीतरी खूप मोठा बदल समोर येतो,” त्या सांगतात. त्याचप्रमाणे त्यांच्यामते वर्गांनी अधिक खुला दृष्टीकोन ठेवला पाहिजे आणि मुलांना प्रश्न विचारण्याची आणि जिज्ञासू होण्याची परवानगी दिली पाहिजे.
त्यांच्यामते त्यांची भावनिक बुद्धिमत्ता आणि प्रभावीपणा त्यांच्या मुलींकडून त्यांना मिळाला आहे आणि त्यांच्याकडूनच त्या यशस्वी आयुष्याचा मार्ग आखण्यास शिकल्या आहेत.