मनोरंजनक्षेत्रात अभिनयासोबत प्रयोगशील रहाण्याचा माझा ध्यास-अभिनेत्री मृण्मयी देशपांडे
कुंकू, अग्निहोत्र, मोकळा श्वास, मामाच्या गावाला जाऊया, कट्यार काळजात घुसली, नटसम्राट अशा एक ना अनेक कलाकृतींमधून आपला अभिनयाचे खणखणीत वाजवणारी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. एकापेक्षा एक सरस भूमिका करणारी ही अभिनेत्री आता निर्माती आणि प्रस्तुतकर्ती बनली आहे. या निमित्ताने मृण्मयी देशपांडे क्रिएशन्सन हे बॅनरही तिने लॉन्च केलेआहे. नवीन कलाकृतीची निर्मिती करतानाही तिने मराठी सोबतची आपली नाळ तोडलेली नाही हे महत्वाचे.
मृण्मयी सांगते, “अनुराग हा एक वेगळा प्रयोग असेल, कारण संपूर्ण सिनेमात तुम्हाला दोनच व्यक्तिरेखा दिसतात, शिवाय हा सिनेमा लेह लडाख परिसरामध्ये चित्रित करण्यात आलाय अशाप्रकारे चित्रित झालेला हा पहिला मराठी सिनेमा. सुरुवातीला मी हा सिनेमा एक अभिनेत्री म्हणूनच स्वीकारला होता, पण नंतर नंतर या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यानच मी या सिनेमाची प्रस्तुती करण्याचा निर्णय घेतला अर्थात हा काही एका रात्रीत घेतलेला निर्णय नव्हता.”
“एकतर आमचे दिग्दर्शक डॉ. अंबरिश दारक यांचा हा पहिलाच सिनेमा, यातच त्याच्या निर्मितीमुल्यांमध्येही प्रयोग केले जाणार होते. पण आज जेव्हा मी सिनेमा पाहिला, मला आनंद आहे की या कलाकृतीमध्ये माझेही योगदान आहे. एकतर समुद्रसपाटीपासून १८,५०० फूट उंचावर लेह लडाख परिसरात निसर्गाची खूप मनमोहक रुपं आम्हाला पहायला आणि चित्रित करायला मिळालीत. मराठीत अशा पद्धतीनं निसर्गसौंदर्य दाखवारा आमचा पहिलाच सिनेमा आहे.
नुकतेच लंडनमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्याचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सिनेमा प्रेक्षकांना आवडतोय अर्थात या सिनेमाचा विषय आणि त्याची मांडणी पहाता मी हा सिनेमा लहान मुलांना आवडेल अशी अपेक्षा कधीच करणार नाही. पण तुम्हा आम्हांसारख्या तरुणांना, विवाहित जोडप्यांना हा सिनेमा नक्कीच अपील करेल.”
अनुराग ही एका लग्न झालेल्या जोडप्याची कथा आहे, लग्नाच्या काही वर्षानंतर नात्यात आलेलं साचलेपण आणि त्यावरची प्रश्न उत्तरं या सिनेमात पहायला मिळतात. मृण्मयी सांगते, “अनुराग सिनेमाची मी प्रस्तुती केली आहे, पण माझा पुढचा नवा मराठी सिनेमा अठरावा उंट याचे मी दिग्दर्शन आणि निर्मितीही करणार आहे. हा सिनेमाही नवरा बायकोच्या संबंधांवर भाष्य करतो, इतकंच नाही तर अठरावा उंटनंतर मी आणखी एका सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे, पण त्याबद्दल मात्र मी काहीही सांगू शकत नाही.”
अभिनेत्री म्हणून आत्तापर्यंत नाण्याची एक बाजू मृण्मयीने पाहिली पण अनुराग असो किंवा अठरावा उंट सारख्या सिनेमातनं मृण्मयी नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा अनुभव घेतेय. “मी आत्तापर्यंत ऐकत आले होते की निर्मिती आणि प्रस्तुती हा अत्यंत कठिण जॉब आहे, मी त्याचा अनुभवही घेते आहे. पण मला खूप शिकायलाही मिळतंय. आता मराठी सिनेमाला चांगले दिवस आलेत, थिएटर्स आणि मल्टीप्लेक्समध्ये मराठीला मान मिळू लागला आहे.
अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे सिनेमाची निर्मिती, प्रस्तुती करताना आपण एक माणूस म्हणूनही प्रगल्भ होत जातो. मृण्मयी देशपांडे क्रिएशन्स ही आता एक जबाबदारी बनली आहे, या बॅनरखाली उत्तमोत्तम कलाकृती बनवणं, प्रेक्षकांपर्यंत ती पोचवणं हे आमचे ध्येय असेल”
एक अभिनेत्री, प्रस्तुतकर्ती, दिग्दर्शन आणि निर्मिती असे करिअरमधले वेगवेगळे टप्पे मृण्मयी अनुभवते आहे. तिच्याशी बोलताना तिच्यातला हा प्रगल्भपणा, आत्मविश्वास जाणवतो. “अनुराग हा सिनेमा जेव्हा प्रेक्षक पहातील आणि पसंत करतील तेव्हाच या नव्या प्रवासामधील पहिला टप्पा मी पूर्ण करेन. आतापर्यंत अभिनेत्री म्हणून मी फक्त स्वतःची भूमिका, त्या भूमिकेसाठीचा लूक, मेकअप, पोशाख इतक्याच गोष्टींच्या तयारीचा विचार करत नाही तर माझे सहकलाकार, तंत्रज्ञ, सिनेमाचे बजेट, निर्मितीव्यवस्था या गोष्टींकडेही मला लक्ष द्यायचे असते.” दरम्यान, मृण्मयीला आता वेध लागलेय ते २१ जानेवारीला अनुराग सिनेमा प्रदर्शित होण्याचे.