डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे डॉ. विजय भटकर व डॉ. स्कॉट हेरियटयांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर !
डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे जागतिक कीर्तीचे संगणक शास्त्रज्ञ, नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ.विजय भटकर आणि महाऋषी युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट, अमेरिकेचे कुलगुरू डॉ.स्कॉट हेरियट यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. कोथरूड स्थित एमआयटी विश्वशांती विद्यापीठ कॅम्पसमधील संत ज्ञानेश्वर सभागृह येथे विजयादशमीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शुक्रवार २९ सप्टेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५.१५ वा. होणार्या पुरस्कार प्रदान सोहळा जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशनचे संचालक डॉ. विवेक सावंत आणि शारदा ज्ञानपीठाम्चे अध्यक्ष पंडीत वसंत गाडगीळ हे या सोहळ्यासाठी सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पद्मभूषण डॉ. विजय भटकर आणि अमेरिकेचे डॉ. स्कॉट हेरियट हे दोन्ही महान शास्त्रज्ञ गणित व संगणक क्षेत्रातील जगप्रसिद्ध असे तज्ञ असून, भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक आहेत. या दोन्ही शास्त्रज्ञांनी वेद, उपनिषदे, ज्ञानेश्वरी, गाथा या पवित्र ग्रंथाचे अध्ययन, मनन व चिंतन करून त्यानुसार आचरण करणारे संतवृत्तीचे शास्त्रज्ञ आणि शांतीदूतच आहेेत. त्यांच्या या ज्ञान-विज्ञानाधिष्ठेत अशा समाजोपयोगी विश्वकल्याणाच्या कार्याबद्दल एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे हा समर्पित जीवन गौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती विश्व शांती विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड आणि कार्याध्यक्ष प्रा. राहुल वि. कराड यांनी दिली.