फक्त ६० दिवस! अर्चना झा यांनी मुहूर्तमेढ रोवली आणि व्यवसाय यशस्वीही...
कपडे खरेदीच्या पद्धतीत बरेच बदल होत आहेत. पूर्वी खरेदी म्हटलं की जवळच्या बाजारात जाऊन १० दुकानं पालथी घालणं असायचं. मग सुरू झाली, मॉलमधल्या चकाचक दुकानांमधली शोधाशोध आणि सध्या फॅशनेबल कपड्यांसाठी झटपट ऑनलाईन शॉपिंगची चलती आहे. ऑनलाईन पोर्टल्समधून आपल्याला फॅशनेबल कपड्यांचे नानाविध प्रकार पाहता येतात. पण यात कोणीही महिलांकरता विशेषतः केवळ लेगिन्ससारखे प्रकार ठेवत नाहीत. याच संधीच सोनं करायचं ४२ वर्षीय अर्चना झा यांनी ठरवलं. त्यांनी वायडब्ल्यूसीएमधून फॅशन डिझायनिंग केलयं. एक उत्कृष्ट गृहिणी आणि जबाबदार आई म्हणून आपल्या मुलांना शाळेतून ने-आण करायला रोज किमान ४० किमीचा प्रवास त्या करायच्या. अशा होममेकर अर्चना यांनी लेगस्टाईली (Legstylee) ची स्थापना केली. लेगस्टाईल पोर्टलमध्ये केवळ महिलांकरता लोअर विअर्स म्हणजेच लेगिन्स, डेनिम पँटस्, पालझू पँटस्, हॅरम पँटस्, शॉर्टस्, स्कर्टस्, केप्रीज यासारख्या अनेक गोष्टी आपल्याला मिळतात. अर्चना आपल्या व्यवसायाबद्दल सांगतात, “मी ज्यांच्या ज्यांच्याशी या कल्पनेबद्दल बोलले त्यासर्वांनी ही कल्पना उचलून धरली. ही कल्पना आधी कोणाला कशी नाही सुचली याचं माझ्या बँकरला पण आश्चर्य वाटलं आणि याच गोष्टीने माझ्या कामावरचा विश्वास वाढवला”.
कुटुंबाची फॅशनगुरू
कधीही कोणीही येऊ देत, एके काळी अर्चना कुटुंबातल्या सर्वांसाठी फॅशनमंत्र सांगणारी गुरू होत्या. विशेषतः घरात काही समारंभ असेल तर विचारायलाच नको. त्या खूप उत्साहाने सांगतात, “मी कुटुंबासाठी जणू काही एक फॅशन गाईड होती. त्यांची शरीरयष्टी, उंची, आरामदायकपणा आणि इतर आवडीप्रमाणे त्यांना मी काय छान असेल ते सांगायचे. कुठल्या प्रकारचं कापड त्यांना उठून दिसेल ते सांगायचे. कसं नेसलं किंवा कुठल्या पद्धतीने शिवलं, त्यासोबतची रंगसंगती, प्रिंट आणि ते छान होण्याकरता अनेक गोष्टी मी त्यांना सुचवायची”. अर्चना कौटुंबिक कामांमध्ये पूर्णपणे गुंतल्यावरही त्यांची कापड, रंगसंगती आणि स्टाईल यासर्वांची आवड बाजूला नाही पडली. त्या नेहमीच लेटेस्ट स्टाईल्स आणि प्रकाराबाबत माहिती करून घेत असत. एकदा त्या स्वतःकरता लेगिन्सचं ऑनलाईन शॉपींग करत होत्या. बराच प्रयत्न केल्यावर हवं ते हाती लागलं नाही आणि त्यावेळी केवळ लेगिन्सकरता कुठलचं ऑनलाईन पोर्टल नसल्याचं त्यांना जाणवलं. अर्चना सांगतात, “मला यात संधी दिसली. मी माझी व्यवसाय कल्पना आणि ई-कॉमर्स व्यवसाय यावर जास्त संशोधन करायला लागले. माझे पती खंबीरपणे माझ्या सोबत उभे राहिले आणि माझ्या बचतीत काही भर घालून भांडवल उभारायलाही त्यांनी मदत केली”.
अर्चनाने पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही मार्गांचा वापर करत सप्टेंबरमध्ये त्यांच्या ऑनलाईन पोर्टलची सुरूवात केली. अवघ्या दोन महिन्यातचं आपलं बस्तान बसवण्यात त्या यशस्वी झाल्या. त्या सांगतात, “माझी उत्पादनं एका जागी मिळवण्याकरता मी इंडियामार्टडॉटकॉम (Indiamart.com) वर नोंदणी केली आणि लेगिन्सची पुरवठादार या शीर्षकाखाली कनेक्ट केलं. पुरवठादारांना त्यांच्या उत्पादनांचे फोटोज मी व्हॉटस्एपवर मला पाठवायला सांगायचे आणि मला आवडले की लगेच त्या उत्पादनाची मागणी नोंदवायचे. बाजारात काय गोष्टी उपलब्ध आहेत, कशाची चलती आहे आणि कोणत्या गोष्टींचा खप जास्त आहे, हे जाणून घ्यायला मी गुजराथ, राजस्थान आणि लुधियानाच्या बाजारांमध्येही फेरफटका मारला. स्थानिक डिझाईन्ससोबतच माझ्या पोर्टलला आंतरराष्ट्रीय चेहरा देण्याकरता, मी चीन आणि हाँगकाँगवरुन येणाऱ्या उत्पादनांवरही लक्ष्य केंद्रीत केलं”.
कडूगोड आठवणी
एकदा का पुरवठादाराकडून खातरजमा झाली की, पेयू मनी (PayU money) आणि शीपरॉकेट (ShipRocket) या माध्यमातून देयक आणि मालाची पोहोच होऊन त्यांचा व्यवहार पूर्ण होतो. त्या सांगतात, “माझ्या बहुतांश मागण्या या कॅश ऑन डिलिव्हरी असतात. आम्हांला अजून तरी पैसे पोहचते करण्यात किंवा माल पोहोचायला उशीर झाला या अडचणी आलेल्या नाहीत”. ग्राहकांना पोर्टलपर्यंत पोहचवणं ही पुढची पायरी होती. अर्चना यांनी फेसबुक आणि गुगल या ऑनलाईन माध्यमांचा प्रसिद्धीसाठी वापर करण्यावर पैसे खर्च केले. त्यांनी वृत्तपत्रात छोट्या जाहिरातीही दिल्या. त्या म्हणतात, “मी एक पायरी वर चढत एमेझॉन या ऑनलाईन पोर्टल सोबत संधान बांधलं. यामुळे माझ्या ब्रँडला जास्त लोकांना दिसला”. त्यांनी कामाला सुरूवात करून जास्त दिवस झाले नसले तरी त्यांचं पोर्टल चालवताना कडूगोड आठवणी त्यांना आल्याचं त्या सांगतात, “एकदा महाराष्टातल्या एका महिलेला त्यांनी ऑर्डर केलेली लेगिन्स आवडली नाही त्यामुळे त्यांना ती परत करायची होती. मी त्यांच्याशी सविस्तर बोलले मग त्यांनी आणखी दोन गोष्टी खरेदी केल्या. पण त्यांनी त्यांना नापसंत असलेली लेगिन्स परत केलीच”.
चाणाक्ष उद्योजिका
मुरलेल्या उद्योजकाप्रमाणेच ‘व्यावसायिकता’ अर्चना यांच्या अंगात भिनली आहे. त्यांनी लगेचच काम सांभाळायला आणि उत्पादनांच्या जाहिरातीकरता दोन व्यक्तींची नेमणूक केली. त्यांचे कान बाजाराचा अंदाज घेत, तर पाय जमीनीला खिळून आहेत. त्या म्हणतात, “मी कधीच तरुणी आणि महिलांशी बोलायची संधी सोडत नाही. त्यांचा फॅशन दृष्टीकोन आणि आवश्यकता जाणून घेते. तरुण मुली लेगिंग्जचे ट्रेण्डस् आणि शॉर्टस् तर महिला पलाझू पँटस् बद्दल बोलतात. यामुळे मला माझ्या ब्रँडबद्दल माहिती द्यायला आणि ते विकण्याची संधी मिळते”. मोकळ्या वेळात अर्चना त्यांच्याकडच्या उत्पादनांची उपलब्धता, पर्याय वाढवण्याकडे आणि ऑनलाईन स्टोअरच्या कार्यक्षमता वाढीकडे लक्ष देतात. त्यांच्या कल्पनेला खूप लवकर चांगला प्रतिसाद मिळून विक्री होत आहे. पण तरीही अर्चना यांना त्यांच्या पुढच्या उद्दीष्टांकडे सावकाश जायचयं. त्यांना त्यांच्या पोर्टलवर एक्सेसरिज (accessories) आणि चपला घेऊन यायचयं. त्यांना त्यांच्या उत्पादनांचं दुकानही सुरू करायचं आहे. ज्यामुळे ग्राहकांना उत्पादन घेण्याआधी एकदा घालून पाहता येईल. सगळ्या गोष्टींचा अंदाज घेत अर्चना ‘लेगस्टाईली’ला घेऊन आकाशात उंच भरारी घ्यायला तयार आहेत.
लेखक – इंद्रोजित डी. चौधरी
अनुवाद – साधना तिप्पनाकजे