‘बोलत्या पोस्ट’ चा ऑनलाईन वाचन कट्टा !
व्हॉट्सअॅपवर आलेला एखादा लांबलचक माहितीपर संदेश, लेख, कविता किंवा अन्य कोणतीही माहिती वाचायची? “अरे यारर…. वेळच मिळत नाही”, “एकाच ठिकाणी बसून खूप कंटाळा येतो राव..”, अशी आणि अश्या प्रकारची अनेक कारणे आपण त्या संदेशांच्या वाचना बाबतीत बऱ्याचदा देत असतो. जर शब्दमर्यादेने डोंगर गाठलेले हेच विविध संदेश, लेख दिवसाच्या २४ तासापैकी जवळपास १८-१९ तास आपल्याजवळ असणाऱ्या Mobile वर लिखित स्वरूपात नसून ती ऑडीओ स्वरूपात मिळाली तर....चकित झालात ना? हो नक्की मिळतील. तुमच्या आवडीची सगळीच माहती, लेख सध्यातरी उपलब्ध नाहीत. पण अशी काही प्रमाणात आहे की जी तुम्हाला नक्की आवडतील.
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्यासारख्या "खाऊन-पिऊन सुखी" माणसाला सर्वात जास्त चणचण जर कुठल्या गोष्टीची भासत असेल तर ती म्हणजे फावला वेळ. वेळेअभावी आपण अशा अनेक महत्वाच्या गोष्टींना मुकतो ज्यांची मजा एकेकाळी आपण खूप लुटली. अनेकांकडे व्हॉट्सअपवर येत असलेल्या विविध पोस्ट्स, विविध लेख, कविता, रोजचं वर्तमानपत्र वाचायला वेळच नसतो तर व्हॉट्सअपवरच्या त्या भल्यामोठ्या पोस्ट कसं वाचणार? पण ज्या नव्या युगाने हा प्रश्न निर्माण केला त्यानंच त्याचं उत्तरही दिलं, ते आहे अर्थातच "ऑनलाईन वाचन कट्टा"!
आता तुम्हाला पुस्तकाची, लेखांची किंवा कवितांची मजा लुटायला एका जागी बसायची गरज नाही. रस्त्याने चालताना, बसमध्ये बसल्याबसल्या, स्वयंपाक करताना, किंवा रात्री झोपी जाताना तुम्ही ही लेख आणि व्हॉट्सअॅपवरील विविध पोस्ट ऐकू शकता. 'चिंता करतो विश्वाची' असा धीर गंभीर चेहरा करत, व्हॉट्सअॅपवरच्या पोस्टने व्यापलेल्या त्या मोबाईच्या स्क्रीनवर एकटक बघत मध्येच नाकावरचा चष्मा तर्जनीने सरळ करत, डुगूडुगू हलणाऱ्या आणि वारा कमी आणि आवाज जास्त करणाऱ्या टेबल फॅनचा वारा खात, एक हात 'इतिहास जमा' झालेल्या खुर्चीत स्वत:ला सावरत, चेहऱ्याचा अर्धा भाग जवळपास त्या पोस्टने 'खाऊन' टाकलेला आहे, अशा 'प्रेक्षणीय' स्थितीत व्हॉट्सअॅपवरील विविध लेखांचे व कवितांच्या पोस्ट वाचण्य़ाचा काळ आता मागे पडला आहे. हल्लीच्या पिढीचे ऑलनाईन वाचन आता स्टाईलीश वाचन झाले आहे. हे लक्षात घेता लोकांना याच पोस्ट ऐकायल्या मिळाल्या तर त्यांचा वेळही वाचेल आणि ज्ञानात भरही पडेल, अशी कल्पना हैदराबाद येथे राहणाऱ्या सुचिकांत वनारसे यांना सुचली. त्यानुसार सुरवातीला जानेवारी २०१६ च्या पहिल्या आठवड्यात त्यांनी मराठी भाषिक प्रेमींचा व्हॉट्सअॅप ग्रूप तयार केला. त्यात प्रत्येकी ५-६ जणांचे एक ग्रूप बनूवन प्रत्येक रविवारी त्या-त्या ग्रूपने आपल्याला आवडलेल्या एखाद्या लेखाचे किंवा पोस्टचे रेकॉर्डींग करून ती ग्रूपवर पोस्ट करण्यास सुरवात केली. सुरवातीला ८-१० सदस्यांवर सुरू झालेली ही चळवळ आता तब्बल १४ व्हॉट्सअॅप ग्रूपच्या माध्यमातून पुढे सरकत आहे. हळुहळु चर्चा, सल्ला-मसलत, विचार-विनिमय, मते-मतातंरे, वेगळ्या पैलूंचा अभ्यास दररोज इथं होऊ लागला आहे.
इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राजकारण, धर्म, कृषि,कला, साहित्य, चित्रपट, कविता, मनोरंजन अशा वेगवेगळ्या प्रकारची स्वतंत्र पोस्ट आपल्या विषयाला अनुसरुन सखोल माहिती आपल्या रेकॉर्डींग क्लिपच्या माध्यमातून देत असतात. ज्यात फक्त माहिती आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होते. सोशल मिडीयाचा खऱ्या अर्थाने इंन्फोटेंन्मेंट म्हणून वापर सुरु करून बातम्या, लेख, माहिती, ताज्या घटनांचा धाडोंळा घेण्यासाठी केला जात आहे. दररोज जीएम म्हणण्यापेक्षा एखादी चांगली कविता रेकॉर्ड करून सदस्यांची सकाळ प्रसन्न करुन जाते. चांगले सुविचार जगण्याची उर्मी देतात, एखादा सकारात्मक विचार समाजातील स्थान वाढविते. या अभियाना दरम्यान रेकॉर्डींग्स केलेल्या सर्व क्लिप्स संग्रहीत करून त्या ब्लॉग्स व फेसबूक पेजवर शेअर करून मराठी साहित्याची चळवळ आणखी वृद्धींगत करण्याचे प्रयत्न या ग्रूपच्या माध्यमातून केले जात आहे. विशेष म्हणजे या ग्रूपमध्ये नोकरदार आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. तळहातावरील त्या इवल्याशा मशीनमध्ये लाखो शब्द, हजारो लेखक, हजारो लेख एकाच ठिकाणी सुखनैव नांदत असतात. यात धार्मिक लेखांपासून ते अभिजात दर्जेदार साहित्यापर्यंत सर्व विषयांचा समावेश आहे.
सुचिकांत वनारसे हे या बोलत्या पोस्ट या उपक्रमाचे प्रणेते. वाचा आणि लिहा ह्याबरोबर ऐका आणि समजा हा एक वेगळा संदेश दिला आहे, आजच्या तरुणाईला वाचायला नको. पण ऐकायला आवडते. मग घ्या ही बोलती पोस्ट अगदी डोळे मिटून मिटून एेका तुमचे डोळे उघडतील. यातल्या प्रत्येक रेकॉर्डींग्सची निवड मराठी साहित्याचा व्यासंग किती दांडगा आहे याची ओळख देते. अचूकअभ्यास, पारख आणि जन माणसावरची पकड याशिवाय हा प्रयोग सफळ होणे शक्य नाही. ऑनलाईन वाचन कट्ट्याचे काम फार मोठे आहे. बहु आयामी व्यासंग हे बहुश्रुत ज्ञानार्जानाने साध्य होते..
ज्यांना मराठी वाचणे नीट जमत नाही अशांसाठी, दृष्टी अधू असणार्यांसाठी, वृद्धांसाठी, संगणकावर किंवा इतर कामे करताकरता विविध विषयांवरील लेखन वाचण्याच्या सोयीच्या दृष्टीने (विशेषतः रेडियो ऐकत अभ्यास किंवा काम करण्याची सवय असणारे विद्यार्थी, गृहिणी व इतर रसिकांना फायदेशीर होईल अशा प्रकारे) स्वतःच बोलणारी पोस्ट सुचिकांत वनारसे यांनी आपल्या ऑनलाईन वाचन कट्ट्याच्या माध्यमातून सादर केली आहेत. ऑडियो पोस्टचे जणू एक श्राव्य वाचनालयच (ऑडियो लायब्ररीच) वनारसे स्थापन करीत आहेत. तसं म्हटलं तर वनारसे यांच्या उपक्रमाची तशी ही सुरुवातच आहे. पण मराठी वाचनप्रेमींचा (श्रवणप्रेमींचा?) चांगला प्रतिसाद लाभल्यास वनारसेंना प्रोत्साहन मिळेल व ते अधिकाधिक प्रकारची ऑडीओ क्लिप्स ते सादर करतील. भरघोस प्रतिसाद मिळाल्यास अशा प्रकारच्या व्हॉट्सअॅप ग्रूपची संख्या अधिकाधिक वाढेल. आपल्यापैकी काही हौशी मराठीप्रेमी अशा प्रकारच्या उपक्रमास स्वयंसेवी पद्धतीने हातभारही लावू शकतील, असा विश्वास मराठीप्रेमी प्रसन्न कुलकर्णी यांना दाखविला आहे. इथे उपल्ब्ध असलेली ऑडियो क्लिप ऐकण्यासाठी ऑनलाईन वाचन कट्टा या त्यांच्या फेसबूक पेजवरून तुम्हाला मुक्तपणे डाउनलोड करुन घेता येतील.
आम्ही पुढचा पिढीला काय देऊ ? काहीही नाही कारण अनेकांकडे बोलायला वेळ नाही आणि त्यांच्याकडे वाचायला वेळ नाही मग यावर तोडगा काय? म्हणूनच मी ऑनलाईन वाचन कट्टा ग्रूपच्या माध्यमातून "स्वतः बोलणारी आणि तुम्हा आम्हाला सर्वांना विचार करायला लावणारी, बोलती पोस्ट उपलब्ध करून दिली आहे. आजकाल व्हॉट्सऍपच्या ग्रूपवर विविध जोक्स शेअर करून मनोरंजन केले जाते. पण आमच्या बोलत्या पोस्टमुळे अनेकांच्या ज्ञानात भर घालून महाराष्ट्राची वाचन संस्कृती जोपासायचा हा एक लहानसा प्रयत्न आहे. आमच्या ऑडीओ क्लिप्स ऐकण्यासाठी http://majhishala-majhibhasha.blogspot.in/2015/12/blog-post.html या ब्लॉगवर नक्की भेट द्या. -सुचिकांत वनारसे, ऑनलाईन वाचन कट्ट्याचे प्रणेते.
आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा संबंधित कहाण्या :