Brands
Discover
Events
Newsletter
More

Follow Us

twitterfacebookinstagramyoutube
ADVERTISEMENT
Advertise with us

…अन् रिक्षावाल्याचं लेकरू झालं ‘आयएएस’

…अन् रिक्षावाल्याचं लेकरू झालं ‘आयएएस’

Saturday November 14, 2015 , 5 min Read

वाराणशीतली ही घटना. एक लहानसा मुलगा आपल्या मित्रासोबत खेळत-खेळतच त्याच्या घरात शिरला. मित्राचे वडिल या मुलावर खेकसले. ‘‘तू आमच्या घरात आलाच कसा? तुझी हिंमत कशी झाली? कोणकुठला. तुझी लायकी आहे का? आम्ही कोण, तू कोण? तुला कळतं का?’’ मित्राच्या वडिलांचे हे असे वागणे बघून मुलगा दचकला. पण त्याला हे कळेना की त्याने असे काय केलेय, की हा बाबा एवढा खवळतोय. ‘लायकी’ ‘आम्ही कोण- तू कोण’ हे शब्द मुलाने लक्षात ठेवले.

एका ओळखीच्या शिकल्या-सवरलेल्या व्यक्तीकडे हा मुलगा गेला आणि आपला हा अनुभव सांगितला. ‘लायकी’ म्हणजे काय असते तेही विचारले. शिकलेली-सवरलेली ही व्यक्ती कुठल्याशा मोठ्या परीक्षेच्या तयारीत होती, पण तिने या मुलाला सगळे काही समजावून सांगितले. हेही सांगितले, की तुझे वडिल रिक्षा चालवतात. तू गरिब आहेस म्हणून त्या श्रीमंताच्या दृष्टीने तुझी काहीही लायकी नाही. मुलाने विचारले मग लायकीसाठी मला काय करावे लागेल? शिकलेल्या-सवरलेल्याने सांगितले, ‘तुला तर बाबा त्यासाठी आयएएस व्हावे लागेल.’

बहुदा गमतीत किंवा मग त्यावेळी मुलाचे मन राखण्यासाठी वगैरे हे उत्तर समोरून आलेले असणार, पण मुलाने ते फार गांभिर्याने घेतले. मुलगा तेव्हा सहावीला होता. आणि ‘मी आयएएस अधिकारी होणार म्हणजे होणार’, असे त्याने ठरवून घेतलेले होते.

तो अभ्यासाला लागला. अडचणी, विपरित परिस्थिती, अभाव अशा सर्वांवर मात करत चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर अखेर आयएएस अधिकारी बनलाच! आणि ही जी घटना इथं सांगितली गेलीय, ती अतिशयोक्ती नाही. गोष्टीत रंजकता आणण्यासाठी तर ती मुळीच नाही, ती एक खरीखुरी गोष्ट आहे. आज आयएएस अधिकारी असलेल्या गोविंद जायसवाल यांच्या आयुष्यातला तो एक घडलेला प्रसंग आहे…

अपमान झालेला असला तरी जायसवाल त्या प्रसंगाबद्दल परमेश्वराला आज धन्यवाद देतात… कारण या प्रसंगानेच त्यांच्यात जिद्द जन्माला घातलेली होती! गोविंद जायसवाल आपल्या पहिल्याच प्रयत्नात आयएएस परीक्षा पास झालेले होते. आज ते एक यशस्वी आणि नामवंत अधिकारी आहेत.

image


गोविंद यांनी ज्या विपरित परिस्थितीचा सामना करत शिक्षण घेतले, ती परिस्थिती कुणाचीही हिंमत खचवू शकेल, अशीच होती. पण अभाव, आव्हाने या सगळ्यांना गोविंद पुरे पडले, किंबहुना पुरून उरले. गोविंद यांनी यशापर्यंत मारलेली मजल म्हणूनच सर्वांसाठी प्रेरणादायक आहे.

वडिल नारायण वाराणशीत रिक्षा चालवयाचे. रिक्षा हेच एकमेव उत्पन्नाचे साधन होते. कुटुंबात पाच जण होते. वडील, तीन बहिणी आणि गोविंद असे. घर म्हणून एक खोली होती. कपडेही निट नसत. गोविंद यांची आई ते लहान असतानाच जग सोडून गेलेली होती. वडील दिवसभर रिक्षा चालवत. तरी हाती फारसे काही लागत नसे. कसेबसे घर चालायचे बस. चारही लेकरांच्या शिक्षणासाठी वडिलांनी जीव तोडून मेहनत केली. कडाक्याची थंडी असो वा मी म्हणणारे ऊन नारायण यांनी पर्वा केली नाही. रिक्षा आणि घर चालवतच राहिले. एकदातर नारायण तापाने फणफणलेले होते, तरीही ते रिक्षा घेऊन निघाले. गोविंद हे दृश्य पाहून कळवळला. आयएएस होण्याचा त्याचा संकल्प या प्रसंगाने अधिकच मजबूत केला.

तो जोमाने अभ्यासाला लागला. परीक्षेत सतत अग्रक्रम कायम ठेवला. परीक्षेचा निकाल लागला, गोविंदचे प्रगतिपुस्तक आले, की ते बघताना नारायण यांचा थकवा कुठल्याकुठे पळून जाई. बहिणीही आनंदाने उड्या मारत. इतर मुलांसारख्या सोयीसुविधा नसतानाही गोविंद अभ्यासात सर्वांच्या पुढे आहे, ही बाब अवघ्या जायसवाल कुटुंबाला आनंदाने जगायला पुरेशी ठरत गेली. पुढे तर गोविंदच्या यशाने या आनंदाला पारावार उरला नाही.

गोविंदच्या खोलीच्या आजूबाजूला कारखानेच कारखाने होते. यंत्रांचा सतत खडखडाट चाले. जनरेटरच्या आवाजाने तर कानाचे पडदे फाटायला करत. गोविंद कानात बोळे टाकून अभ्यास करायचा. एकीकडे मशिनी त्रास द्यायच्या तर दुसरीकडे माणसांचाही ताप होताच. ‘कितीही अभ्यास कर तू चालवायची शेवटी रिक्षाच आहे,’ असे टोमणे अनेक शेजारी गोविंदला मारत असत. कानात बोळे घालून गोविंद जसा मशिनींचा आवाज गप्प करायचा, तसेच शेजाऱ्यांचे हे टोमणे एका कानाने ऐकायचा आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा.

वडिलांच्या पायात सेप्टिक झाले तेव्हा परिस्थिती अधिक बिकट झाली. आता रिक्षा कशी चालवणार, हा प्रश्न होता. दुखणे वाढत गेले आणि रिक्षा चालवणे अशक्यप्राय बनले वडिलांनी मग रिक्षा भाड्याने देऊन टाकली. दोघा बहिणींचे लग्न एव्हाना आटोपलेले होते. हे सगळे सुरू असतानाच गोविंदचे पदवीपर्यंतचे शिक्षण आटोपलेले होते आणि आता त्याला आयएएसची परीक्षा खुणावत होती. परीक्षेकरिता प्रशिक्षणासाठी त्याने दिल्ली गाठली. कोचिंगचे शुल्क कोण देणार? मग त्याने इथे मुलांच्या शिकवण्या घेणे सुरू केले. अनेकदा एकवेळ जेवणावर तो आपला दिवस भागवत असे. दररोज १२-१३ तास अभ्यास करत असे. कमी जेवण आणि जास्त जागरण यामुळे त्याची तब्येत बिघडली. जागरण जर आता थांबवले नाही तर तब्येत आणखी बिघडेल, असे डॉक्टरनेही सुनावले. गोविंदने बिघडलेल्या तब्येतीचे काही ऐकले नाही, की डॉक्टरचे. तो अभ्यासाला भिडलेलाच राहिला. भिडणे फळफळले. गोविंद पहिल्याच प्रयत्नात आयएएस पास झालेला होता. रँकमध्ये तो ४८ वा आलेला होता. हिंदी माध्यमातून प्रथम ठरण्याचा मानही त्याने पटकावलेला होता. अभ्यास, शिक्षण, करिअर यासंदर्भात गोविंद स्वत:च स्वत:चा मार्गदर्शक होता. कुटुंबाकडून त्याला याबाबत काही मार्गदर्शन मिळण्याचा प्रश्नच नव्हता. अडचणींच्या या सगळ्या काळात त्याच्या बहिणी त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. आईसारखाच जीव या बहिणींनी लावला. काही मित्र आणि शिक्षक उपयोगी आले. आयएएसच्या तयारीसाठी दिल्लीतील ‘पातंजली इन्स्टिट्यूट’कडून मदत मिळाली. धर्मेंद्रकुमार नावाच्या एका व्यक्तीने गोविंदला सगळ्यात जास्त मदत केली.

image


गोविंद यांनी ‘शॉर्ट कट’ मार्ग यशासाठी निवडला नाही. आपली दिशा ठरवली. योजनाबद्ध पद्धतीने वाटचाल केली. खुप मेहनत केली. हे नाही, ते नाही, अशी कारणे सांगितली नाहीत. अभावावर मात केली. आयएएससाठी मुख्य विषय निवडण्याची गोष्टही मोठी रंजक आहे. गोविंद यांच्या एका मित्राकडे इतिहास या विषयावर उदंड पुस्तके उपलब्ध होती म्हणून त्यांनी इतिहास हा विषय निवडला. दुसरा विषय म्हणून तत्वज्ञान घेतले. तत्वज्ञानाचा अभ्यासक्रम छोटा होता… आणि विज्ञान या विषयावर गोविंद यांची पकड होतीच.

गोविंद जायसवाल यांची ही गोष्ट खरोखर खुप काही शिकवून जाणारी अशीच आहे. गोविंद सांगतात, ‘‘तुमची जिद्द मजबूत असली पाहिजे. कष्ट उपसले पाहिजेत. संघर्ष केला पाहिजे. अभावांवर मात करायची तर संघर्ष आणि कष्टाशिवाय दुसरे मार्ग नाहीत. स्वप्ने साकार करायचीत तर परिस्थिती आणि अडचणींना भिऊन चालायचे कसे? ताकदीनिशी त्यांना भिडायचे, हाच एक मार्ग आहे.’’

गोविंद यांचे म्हणणे शंभर टक्के खरे आहे. ‘अभाव’ हेच त्यांच्या या यशाच्या मुळाशी असलेले खरे कारण आहे. ‘अभावा’च्या प्रभावातूनच त्यांना आयएएस करण्याची प्रेरणा मिळाली. कठोर परिश्रम आणि सतत संघर्षातून ही प्रेरणा अखेर फळाला आली. दृढ संकल्प आणि संघर्षाच्या बळावर कमकुवत पार्श्वभूमीवरही मात करता येते, हेसुद्धा गोविंद यांच्या या यशाने सिद्ध केलेले आहे.