जीवनाच्या रसास्वादासाठी पाककला शिका सांगणारा सेलिब्रिटी शेफ पराग कान्हेरे!

जीवनाच्या रसास्वादासाठी पाककला शिका सांगणारा सेलिब्रिटी शेफ पराग कान्हेरे!

Monday December 21, 2015,

5 min Read

एकत्र स्वयंपाक करण्यामुळे जोडप्यांमध्ये होणारे विवाहविच्छेद कमी होऊ शकतात, असे म्हणणे आहे खुद्द सेलिब्रीटी शेफ पराग कान्हेरे यांचे. आजच्या युगात ब-याच आधुनिक वधुंसाठी स्वयंपाक करणे प्राधान्याचे नसते, तसेच भारतीय पुरुषासाठी स्वयपाकघरात तिला मदत करणे हे त्याच्या तत्वात बरेचदा बसत नाही… आणि इतक्या क्षुल्लक कारणावरून घटस्फोटापर्यंत जाणारे हे नाते वाचविण्यासाठी पाककला हे एक उत्तम माध्यम आहे, असे या स्टायलीश शेफचे म्हणणे आहे.

image


स्वयंपाक करता करता तुम्ही एकमेकांशी मोकळा संवाद साधू शकता, आणि त्यातून एकमेकांना जाणू शकता. "एकत्र स्वयंपाक करणे ही एक अतिशय प्रणयरम्य गोष्ट आहे," असे मला वाटते. परागला असेही वाटते की बुरसटलेली विचारसरणी बाजूला सारून, घरातील पुरुषांनी आता स्वयंपाकात हातभार लावणे देखील महत्वाचे आहे.

सध्या साम टीवी वर फूड लिमिटेड या कार्यक्रमाचा यजमान असणा-या परागचा इथपर्यंतचा प्रवास खूपच रोमांचक आहे. पराग हा एक पक्का पुणेकर आहे. वडील, भारत कान्हेरे आणि त्याची आई स्वाती, दोघेही व्यावसायिक छायाचित्रकार ….लहानपणी पराग दूरदर्शनवर येणारा एकमेव कुकरी शो 'यान केन कूक' ह्या कार्यक्रमाचा मोठा चाहता. ह्या आणि डीडी वर येणाऱ्या कूक शोजने परागच्या कल्पकतेत बरीच भर घातली. मग काय… आईने बनवलेल्या साध्या भाजी पोळीचे अनेक प्रकार पराग करू लागला.."आई कामाला गेली की माझे प्रयोग चालू.... साध्या भाजी पोळीचे विविध प्रकार मी बनवायचो आणि माझी लहान बहीणही ते आवडीने खायची," तो हसत सांगतो.

परागचे शालेय शिक्षण विमलाबाई गरवारे प्रशालेत झाले.. दहावीनंतर जसे त्याकाळी इतर मुले विज्ञानशाखेत प्रवेश घेत असत, तसेच परागनेही केले. पण, गणित आणि विज्ञान या दोनही विषयांचा अभ्यास न झेपल्याने, बारावीत तो चक्क नापास झाला. पुन्हा परीक्षेचा अभ्यास करता करता परागला एक भन्नाट कल्पना सुचली... 'संडे ब्रेकफास्ट' ची. आपल्या सोसायटीतील ८-१० कुटुंबांकडून तो दर रविवारी नाश्त्याची ऑर्डर घेऊ लागला. हळू हळू परागची पाककलेची आवड वाढतच चालली होती. १९९४ मध्ये परागने पुण्यातील वेगवेगळ्या बेक-यांना समोसे आणि बटाटेवडे पुरवायचा व्यवसाय चालू केल. दररोज ५०० सामोसे आणि २०० बटाटेवडे तो पुरवू लागला… रोज सकाळी चार वाजता उठून कामाला सुरुवात…ह्यात त्याच्या आई बाबांची खूप मदत त्याला मिळाली...सामोसे आणि बटाटेवडे बनवले की मग ते बेक-यांना पुरवण्यासाठी एका स्कूटरवर तो त्याच्या एखाद्या मित्राला घेऊन गावभर फ़िरायचा… कमी वयात गेमिंगकडे वळलेल्या पिढीकडे जेव्हा तो बघतो तेव्हा त्याला प्रखरपणे हे वाटत की कमी वयात का होईना पण पालकांनी आपल्या मुलांना कुठल्या न कुठल्या छोट्या मोठ्या व्यवसायात गुंतवायला पहिजे…जेणेकरून पैश्याची किंमतच नव्हे तर व्यवहारज्ञान मुलांना मिळू शकेल…दिवसेंदिवस पालकांबद्दल कमी होणारा आदर आणि सततच्या त्यांकडून असलेल्या अपेक्षा याबद्दल जाणीव करून देणे फार गरजेचे झाले आहे आणि प्रत्यक्ष कष्ट जेव्हा ही मुले करतील तेव्हाच त्यांना आपल्या पालकांची किंमत कळेल असे त्याला वाटते.


image


त्याबरोबर बारावीचा अभ्यासही तो करत होतो... पण परागचं मन त्या अभ्यासात रमतच नव्हतं...तशातच नापास विद्यार्थ्याला जे टोमणे हाणले जायचे ते सगळे नातेवाईकांकडून परागलाही सहन करावे लागले. बारावी पास होण्याचं गणित काही सुटेना... शेवटी एक दिवस त्याचे गणिताचे शिक्षक पु ग वैद्य त्याला म्हणाले "माझ्याकडून गणित शिकून नापास होणारे फार कमी विद्यार्थी आहेत … त्यातील तू एक. तू असे का नाही करत कसेबसे बारावीचे विषय पूर्ण कर आणि तुझ्या कुकिंगच्या छंदाशी निगडीत विषयाचा अभ्यास कर," पराग आठवून सांगतो.

कदाचित वैद्य सरांच्या याच सल्ल्यामुळे की काय, परागने अभ्यास करून विज्ञान शाखेतून आपली सुटका कशीबशी केली. बारावी झाल्यानंतर, पुण्यातीलच फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूटमध्ये दोन वर्षाच्या बेकरी आणि कन्फेक्शनरी अभ्यासक्रमाला १९९५ मध्ये प्रवेश घेतला. ह्याच दरम्यान महाविद्यालयीन अभ्यास करून संध्याकाळच्या वेळेत परागने पुण्यातील दोन- तीन हॉटेलात अर्धवेळ नोकरीही केली.

कोर्स पूर्ण झाल्यावर परागने क्रूझ जाॅइन करायचे ठरवले. २०० इंटरव्यू दिल्यानंतर, १९९८ मध्ये त्याला ' नॉर्वेजियन क्रुजलाईन्स ' कडून सहायक कूक ह्या पदासाठी बोलावण्यात आले. या संधीनंतर त्याने २००२ पर्यंत अनेक यूरोप मधल्या क्रुजलाईनवर नोकरी केल्या. पाक कलेतील आंतरराष्ट्रीय स्टैंडर्ड्स, क्वांटिटी कुकिंग, अनेक देशांचे पदार्थ, त्यांची खाद्यसंस्कृती ह्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण त्याने ह्या क्रूजलाइनवर असतांना मिळवले.

पण अजून काहीतरी नवीन शिकण्याच्या हेतूने परागने क्रुज लाईनची आपली नोकरी सोडून, २००२-२००४ मध्ये आंतरराष्ट्रीय ख्याती असणाऱ्या सेलीब्रेटी शेफ पाॅल रैनकिन, डेमियन ब्रूम, सायमन हे, यांच्याबरोबर इंग्लंडमध्ये मिशेलिन स्टॅण्डर्ड असणा-या हॉटेल्समध्ये कामे केली. "पाककला हे एक अफाट क्षेत्र आहे. तसाच तुम्हाला जर विविधांगी व्हायचे असेल तर तुम्हाला तुमचे मेंटोर्स(मार्गदर्शक) सतत बदलावे लागतात," पराग सांगतो.

एक उत्तम शेफ तर पराग आहेच, पण दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन किंवा सादरीकरण करण्यासाठी त्याने स्वतःमध्ये बरेच बदल घडवून आणले. त्याला त्याचा सर्वात पहिला शो सेलेब्रिटी शेफ विष्णू मनोहारांमुळे मिळाला, असे तो सांगतो. ईटिव्हीवर मेजवानी रंगतदार ह्या शोमध्ये तो सर्वात पहिले प्रेक्षकांसमोर आला. साहजिकच टीव्हीवर पहिला अनुभव असल्यामुळे त्याच्या पहिल्या काही चित्रीकरणांत त्याला अवघडल्यासारखे व्हायचे... "पण, जसे जसे शो वाढत गेले, मला हे जाणवले की मला एक चांगला सादरकर्ताही बनायला आवडेल आणि याकरिता मला संवादफेक, आवाजाचे नियंत्रण ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष देणे आवश्यक होते," तो सांगतो.

यासाठी मला कविता मेढेकर, प्रशांत दामले अश्या अनेक नावजलेल्या कलाकार-होस्टकडून मार्गदर्शन मिळालं, असं तो सांगतो. आता याच संवाद-संभाषण कलेचा त्याला उपयोग करून घ्यायचा आहे, त्याला अगदी मनापासून वाटत की त्याने अभिनयही करावा. "सध्या मी खलनायकाची भूमिका मिळविण्याच्या मागे आहे," तो सांगतो. चांगल्या खलनायकांची गरजही आहे..आणि अश्या भूमिकेसाठी माझ्यात पुणेरी आगाऊपणा तर आहेच," तो मिश्किलपणे म्हणतो.

सतत नवीन गोष्टी करत राहणं परागला आवडते. "I love to create " तो सांगतो, म्हणूनच की काय त्याच्या नावावर तीन जागतिक विक्रम आहेत. दोन लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् तर ह्याच वर्षी त्याने नोंदविलेला एक आशिया बुक ऑफ रेकॉर्ड. ह्या वर्षी त्याने तब्बल ९० मिनिट डोळ्यावर पट्टीलावून स्वयंपाक केला. आता त्याचा विचार आहे त्याच्या पाककृतींचे ५००० व्हिडिओ बनविणे. "पण मी पाककृतींचे पुस्तक कधीच लिहिणार नाही हे नक्की ," तो हसत सांगतो.

एकंदरीत उपहारगृहांच्या व्यावसायिक संधींबद्दल विचारल्यावर तो ठामपणे म्हणतो की हॉटेल व्यवस्थापन जरी लोकप्रिय होत आहे, तरीही ह्या शाखेतून बाहेर पडणा-या विद्यार्थ्यांना मिळणारे पगार अगदीच केविलवाणी असतात. त्यामुळे जर बाहेरच्या देशांमध्ये नोकरीची चांगली संधी त्यांना मिळत असेल तर त्यांनी ती नक्की घ्यावी."ह्या इंडस्ट्रीमधल्या लेटेस्ट ट्रेंड्सचे प्रशिक्षण त्यांना असेच मिळू शकेल."

सा-या जगाला चमचमीत पदार्थ खाऊ घालणाऱ्या परागला स्वतःला काय खायाले आवडते? तो मांसाहारी पदार्थांचा चाहता आहे. लाल मास खाणे जरी तो टाळत असला तरी त्याला मासे, चिकन खूप आवडते. नाॅनव्हेज बिर्याणी आणि बनाना मिल्कशेक त्याला असणा-या प्रिय गोष्टी. "मला रात्री तीन वाजता उठून जरी हे पदार्थ खाऊ घातले तरीही मी ते खाईन. बाकी घरचा वरण भात, भाजी पोळी हे माझे नेहेमीच फेवरेट राहतील," असेही तो सांगतो.