Brands
Discover
Events
Newsletter
More

Follow Us

twitterfacebookinstagramyoutube
ADVERTISEMENT
Advertise with us

विवेकानंदांची विवेकवाणी...

विवेकानंदांची विवेकवाणी...

Saturday November 14, 2015 , 5 min Read

भारत पारतंत्र्यात होता आणि १२ जानेवारी १८६३ ही तारीख उजाडली. कोलकात्यातील दत्त दांपत्याच्या आनंदाला पारावार नव्हता. एक सुंदर तेजस्वी बाळ त्यांच्या पाळण्यात झुलत होते. पारतंत्र्याने झुरत असलेल्या भारतमातेला स्वातंत्र्याचे व नवोन्मेषाचे घुमारे फुटावेत म्हणूनच या दिवसाचे तांबडे फुटलेले होते. आणि भारतीय दिग्विजयाचे पूर्वसंकेतही या तारखेनेच दिलेले होते. हे बाळ म्हणजे भारताचे उज्ज्वल, दैदिप्यमान भवितव्यच होते… स्वामी विवेकानंद! विवेकानंदांचे वास्तविक नाव नरेंद्र होते. वडिल दुर्गाचरण दत्त कोलकाता हायकोर्टातील नामांकित वकील होते. आई भुवनेश्वरी देवी धार्मिक होत्या. भुवनेश्वरीदेवींचा अर्धा दिवस महादेवाच्या आराधनेत जात असे. ‘ओम नम: शिवाय’ या नामजपात त्या तासन्तास तल्लिन असत. छोटा नरेंद्र बुद्धीने कमालीचा तल्लख होता, पण तेवढाच खोडकरही. ‘दत्तांच्या पोटी दैत्य’, असे बोलणे त्याला वरचेवर आईकडून खावे लागत असे. भुवनेश्वरी देवी बरेचदा नरेंद्रवर संतापत. संतापाच्या भरात ‘महादेवाला मी एक पुत्र मागितला होता आणि त्याने हा राक्षस माझ्या पोटी टाकला’ असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल जात असे. तर असा हा खोडकर नरेंद्र पुढे उभ्या जगासाठी प्रेरणेचा झरा बनला, भारतासाठी तर अखंड शक्तीचा स्त्रोत बनला! त्यांची जयंती ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून साजरी केली जाते.

‘द कम्प्लिट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद’ या ग्रंथातील खंड १ मधील नवव्या अध्यायात स्वामीजींनी सांगितलेल्या काही अशा गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला जीवनातील पुढल्या वाटचालीसाठी उपयुक्त ठरू शकतात. प्रेरणा देऊ शकतात. मार्गदर्शन करू शकतात. निम्नलिखित गोष्टींचे काळजीपूर्वक अध्ययन करा… नक्की फायदा होईल. स्वामीजी म्हणतात...

image


‘कर्म’ या शब्दाची उत्पत्ती संस्कृतातील ‘कृ’ अक्षराने झालेली आहे. ‘कृ’ म्हणजे जे काही केले जाते ते सगळे कर्म होय. तांत्रिकदृष्ट्या याचा अर्थ आहे कार्याचा परिणाम, तत्वमिमांसेच्या दृष्टीने याचा अर्थ आहे गतकार्यांचा परिणाम, परंतु कर्मयोगात याचा सरळसरळ अर्थ आहे ‘कर्म’. स्वामीजी म्हणतात, ‘‘ज्ञान हे मानवजातीचे खरे उद्दिष्ट आहे. आनंद हा मानवजातीचे खरे उद्दिष्ट नाही. कारण आनंदाला अखेर अंत आहे. ज्ञानाला मात्र अंत नाही. मनुष्य चुकून आनंदालाच आपले उद्दिष्ट समजून बसतो. पण हे चुक आहे. हा शुद्ध मुर्खपणा आहे. ज्ञान हेच सर्वोच्च आहे, हे जाणून घेण्यात मनुष्य बराच वेळ दवडून बसतो. खरंतर आनंद आणि दु:ख हे दोन्ही माणसाचे महान शिक्षक आहेत. जसजसे आनंद आणि दु:ख माणसाच्या आत्म्याला स्पर्श करून डोक्यात शिरतात. तिथे आपले ठसे उमटवतात, मग ते चांगले असोत अगर वाईट, त्यातूनच माणसाचे व्यक्तिमत्व साकारत जाते. तुम्ही कुठल्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व तपासा, त्याच्या जडणघडणीत आनंद आणि दु:ख बरोबरीने कारणीभूत ठरल्याचे तुम्हाला आढळून येईल. चांगुलपणा आणि दुर्गूण माणसांमध्ये बरोबरीने नांदताना दिसतात. दुसरीकडे काही प्रकरणांतून तुम्ही बारकाईने निरीक्षण केल्यास तुम्हाला दिसेल, की आनंदाच्या तुलनेत दु:ख हेच खूप काही शिकवून जाते. स्वामी विवेकानंदांच्या मते तुलनेत संपत्तीपेक्षा गरिबी ही खुप काही शिकवून जाणारी असते.

ज्ञान कोठून मिळते? सामान्यपणे लोक असे समजतात, की ज्ञान हे बाह्यजगतातील वस्तूंतून प्राप्त होते, पण ज्ञान हे खरंतर सर्वच माणसांच्या आत दडलेले असते. खरंतर माणुस काहीही शिकत नसतो, काहीही शोधत नसतो. तो स्वत:च अनंत ज्ञानाची एक खाण आहे. जेव्हा तो आत्म्यावर पडलेले पडदे बाजूला सारत जातो तेव्हा ज्ञानाचाच प्रकाश त्याच्या दृष्टीला पडतो. जगभरात पसरलेले ज्ञान माणसाला आपल्या मनातूनच प्राप्त होते. ब्रह्मांडाचे अनंत ग्रंथालय आपल्या मनात आहे. बाह्यजगत म्हणजे ज्ञानापर्यंत पोहोचण्याची तुम्हाला उपलब्ध झालेली केवळ एक संधी आहे. ही संधी केवळ खुणा करते. सूचना देते. एका सफरचंदाचे जमिनीवर पडणे ही न्युटनसाठी केवळ एक सूचना होती. मग त्याने आपल्या मनात शोधून बघितले आणि घडलेल्या संपूर्ण घटनेवर पुन्हा एक दृष्टिक्षेप टाकला… मग एक नवी साखळी, नवा सिद्धांत शोधून काढला, त्याला आपण सगळे गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणतो. म्हणून सर्व प्रकारचे ज्ञान हे माणसात सामावलेले आहे.

सर्व ज्ञान हे आध्यात्मिक आहे. आधी आत मी कोण, ते मला शोधायचे आहे, मग सगळी उत्तरे मला मिळत जातील. ज्ञान स्वत:च येऊन माझ्यासमोर उभे राहील.

दगडाच्या तुकड्यात जशी एक ठिणगी दडलेली असते. तसेच ज्ञानही मनात दडलेले असते. सूचना म्हणजे जणू घर्षण आहे. जी त्या ज्ञानाला बाहेर पडण्यात सहाय्यभूत ठरते. आमच्या सगळ्या भावनांना, कृतींना उदाहरणार्थ आमचे अश्रू, आमचे हास्य, आमचे सुख, आमचे दु:ख, आमचे रडणे, आमचे हसणे, आमचा शाप, आमचा आशीर्वाद, आमची स्तुती, आमचे दोष… हे सगळे जर आम्ही आमच्या अंतर्मनात शोधले तर ज्ञान स्वत:च स्वत:हून बाहेर पडेल… आमच्या लक्षात येईल, की आमच्या याच सर्व भावनांचे मिश्रण म्हणजे कर्म होय. आमच्या आत्म्याला स्पर्श करणारी आमची प्रत्येक मानसिक आणि शारीरिक कृती म्हणजे कर्म होय. कर्म या शब्दाच्या वापरात कितीतरी अर्थ सामावलेले आहेत. या वेळीही आमचे काही ना काही कर्म सुरू आहे. उदाहरणार्थ मी बोलतो आहे, हे कर्म आहे. तुम्ही ऐकत आहात, हे कर्म आहे. आम्ही श्वास घेतो आहोत, हे कर्म आहे. आम्ही चालत आहोत, हेही कर्म आहे. दररोज आम्ही शारीरिक आणि मानसिक स्तरावर खुप काही करत असतो. ते सगळे कर्मच आहे आणि त्याचीच छाप आमच्या आयुष्यावर उमटत असते.

image


याउपरही काही कामे अशी असतात, जी दिसतात काही और आणि असतात काही और… उदाहरणार्थ लहानसहान कार्यांची मिळून एक मोठी गोळाबेरिज… जसे, की समजा आम्ही समुद्रकाठी उभे आहोत आणि समोरून एक मोठी लाट येतो… अगदी गर्जत गर्जत… आता ही मोठी लाट वास्तविक पाहाता अनेक लहान-सहान लाटांची मिळून बनलेली असते. प्रत्येक लहान लाटेचा आपला एक स्वतंत्र आवाज असतो, पण आम्ही त्याला नेमकेपणाने पकडू शकत नाही, ऐकू शकत नाही. परिणामी आम्हाला एका मोठ्या लाटेचा एकच एक मोठा गोंगाट ऐकायला येतो. असेच कार्य हृदयाच्या ठोक्यांचेही आहे. थोडक्यात एकाचवेळी लहान-सहान कार्यांची मिळून एक मोठी संख्या साकारते आणि ती आपल्याला उमगत नाही… म्हणून जर तुम्हाला खरोखर एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व तपासायचे असेल तर त्याच्या कामाकडे तपशिलवार बघा. त्याच्या कामातील बारकावे तपासा. तुम्ही असे केले तर त्याचे खरे व्यक्तिमत्व तुमच्या लक्षात येईल. अन्यथा एखादा मुर्खही नायक ठरू शकतो.

आज आम्ही जे काही आहोत, त्याची जडणघडण आमच्या विचारांनी केलेली असते. म्हणून विचार करतानाही सजग रहा. शब्द हे माध्यम मात्र आहेत. विचार हेच वास्तव आहे. तुम्ही स्वत:ला दुबळे समजाल तर दुबळे व्हाल. तुम्ही स्वत:ला शक्तीशाली समजाल तर शक्तीशाली व्हाल. स्वत:ला अशुद्ध मानाल तर अशुद्ध व्हाल. स्वत:ला शुद्ध मानाल तर शुद्ध व्हाल.

यश तुमच्या पायाशी लोळण घेतल्याशिवाय राहणार नाही. अट एकच की तुमचा संकल्प दृढ असला पाहिजे. इच्छाशक्ती जबर्दस्त असली पाहिजे. म्हणा, की ‘मी समुद्रप्राशन करेन’, विचार करा, की ‘पर्वत उखाडून फेकून देईन.’ स्वत:मध्ये अशाप्रकारच्या उर्जेचे सृजन करा. इच्छाशक्ती आणि परिश्रमाच्या बळावर वाटचाल करत रहा. उद्दिष्टप्राप्ती होणारच.

लोक जे काय बोलताहेत ते बोलू द्या. आपल्या इराद्यांवर अढळ रहा. मग बघा जग तुमच्या पायाशी असेल. लोक असं म्हणतात, या व्यक्तीवर विश्वास ठेवा, त्या व्यक्तीवर विश्वास ठेवा… मी असं म्हणतो, की आधी स्वत:वर विश्वास ठेवा…

तुम्ही जर खरे आहात. सक्षम आहात.. तर एकटेच या जगाचा सामना करण्यासाठी पुरेसे आहात.