Marathi

ई-ग्राहकांसाठी ‘शिपवे’ची ‘ट्रॅकिंग सिस्टिम’ म्हणजे वरदान

Team YS Marathi
7th Dec 2015
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

‘ई- कॉमर्स’च्या माध्यमातून व्यापार जसजसा वाढतो आहे, ई- कॉमर्स कंपन्या आणि ग्राहक दोघांच्याही दृष्टीने माल पोहोचण्याच्या संदर्भात अनेक तापदायक गोष्टी घडताहेत. आपण नोंदवलेल्या ऑर्डरची आता या क्षणी नेमकी काय स्थिती आहे, हे ग्राहकाला कळू शकेल, अशी कुठलीही व्यवस्था नसते. बहुतांश ई- कॉमर्स कंपन्या आपल्या ग्राहकांना स्वयंचलित सूचना पाठवू शकत नाहीत. कारण माल पोहचवण्याचे काम करणाऱ्या कुरिअर कंपन्या या ई- कॉमर्स कंपन्यांना ट्रॅकिंग APIs उपलब्ध करून देत नाहीत. ज्या काही कुरिअर कंपन्या ही सोय उपलब्ध करून देतात, त्यांच्यासंदर्भातही ई- कॉमर्स कंपन्यांना त्यांच्या (कुरिअर कंपन्यांच्या) सिस्टिमशी जुळवून घेण्याबाबत अडचणी येतात. ई- कॉमर्समधील नव्या भागीदाराबाबत सिस्टिमचे मिळते-जुळते होण्याच्या याच अडचणीची पुनरावृत्ती होते. ग्राहकाच्या समाधानासाठी होणाऱ्या खर्चात तर यामुळे वाढ होतेच वरून ग्राहकही समाधानी होत नाही.

चालू वर्षातील एप्रिलमध्ये गौरव गुप्ता आणि विकास गर्ग यांनी शिपवे ही कंपनी सुरू केली. कंपनीचे कार्य म्हणजे उपरोक्त अडचणींवरील उपाययोजना. गुडगावात कंपनीचे मुख्यालय. शिपवे म्हणजे ‘मल्टी कुरिअर ट्रॅुकिंग सिस्टिम!’ ई-कॉमर्स कंपन्यांच्या समस्या सोडवणे आणि ई-कॉमर्स ग्राहकांच्या चेहऱ्यावरील तणाव कमी करणे हे शिपवेचे उद्दिष्ट. ई- कॉमर्स कंपनीकडून कुरिअरच्या माध्यमातून ग्राहकासाठी पाठवला जात असलेला माल नेमका कुठे आणि कुठल्या स्थितीत आहे, ते ग्राहकाला कळवण्याचे काम शिपवे करते. एसएमएस/ई-मेलच्या माध्यमातून तशा सूचना ग्राहकाला पाठवल्या जातात. जर माल पोहोचण्यासंदर्भात काही समस्या उद्भवलेली असेल तर तसा ॲअलर्ट संबंधितांना देण्याचे कामही या माध्यमातून होते. ग्राहकांना आपल्या ऑर्डरसंदर्भातली माहिती शिपवे या ई-व्यासपीठावरून मिळते. ‘नोटिफाय मी’चा उपयोग करून मालासंदर्भातील अपडेटस् एसएमएस, ई-मेलच्या माध्यमातून ग्राहकाला मिळवता येतात.

शिपवे संस्थापक गौरव गुप्ता सांगतात, ‘‘ही कंपनी सुरू करून आम्ही ग्राहकांच्या समस्या बऱ्यापैकी कमी केलेल्या आहेत. ‘शिपवे’चा वापर करणाऱ्या युजर्सना समाधान दिलेले आहे. खरेदी-विक्री हा एक असा व्यवहार आहे, ज्याचा पहिला टप्पा ही दुकानदाराची, तर दुसरा टप्पा ही ग्राहकाची डोकेदुखी ठरतो. आम्ही मध्ये एक टप्पा टाकून दोघांना समाधान देण्याचे काम केलेले आहे. दोघांची डोकेदुखी दूर केलेली आहे.’’

image


आताशा कंपनीची वाटचाल उत्तम सुरू झालेली आहे. गौरव नमूद करतात, ‘‘आमची सगळी गुंतवणूक ही तंत्रज्ञानात आणि स्त्रोतांवरच आहे. मार्केटिंगवरला आमचा खर्च जवळपास शून्य आहे. आमचे ‘रिव्हेन्यू मॉडेल’ हे ‘सब्स्क्रिप्शन बेस्ड’ आहे. म्हणजे जे कुणी आमचे सभासद होतात, त्यांना ठराविक वर्गणी द्यावयाची असते. लघू ई-व्यावसायिक आणि मध्यम ई-व्यावसायिक आमची सेवा घेणे आवर्जून पसंत करतात. मालनिहाय सूचना पाठवण्याचे ठराविक शुल्क आम्ही आकारतो. कंपनी सुरू झाल्यापासून आजअखेर १ हजारावर ई-कॉमर्स कंपन्यांनी तसेच ३० हजारांवर ग्राहकांनी आमच्या सेवेचा लाभ घेतलेला आहे.’’ कंपनीला आपला महसूल अर्थातच वाढवायचा आहे. स्त्रोत उभारणे, वाढवणे यासह तंत्रज्ञानाची मदत त्यासाठी घेतली जात आहे.

बाजार आणि स्पर्धा

ई-कॉमर्स एकुणातच दिवसेंदिवस वाढत चाललेला बाजार आहे. ऑनलाइन रिटेल इंडस्ट्रीमध्येही देशभरात तशीच वाढ होते आहे. २०१८ पर्यंत ऑनलाइन किरकोळ विक्री (रिटेल) बाजार जवळपास १८ बिलियन डॉलरला जाऊन भिडेल, असा अर्थतज्ज्ञांचा होरा आहे. देशात २०१९ पर्यंत ई-कॉमर्स मालपुरवठा व्यवसायही २ बिलियन डॉलरचा व्यवसाय बनलेला असेल, असेही त्यांचे म्हणणे आहे.

‘सिंघी अॅडव्हायजर्स’च्या अहवालानुसार पुरवठा उद्योग गेल्या पाच वर्षांत निर्देशांकाच्या तुलनेत १६ टक्के अधिक वाढलेला आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रात संघटित व्यावसायिकांचे प्रमाण केवळ ६ टक्के एवढेच आहे. चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत जागतिक पातळीवर हा व्यवसाय ४ ट्रिलियन डॉलरपर्यंत भिडलेला असेल, असा एक अंदाज आहे. ही रक्कम म्हणजे थोडीथोडकी नाही. जागतिक ‘जीडीपी’च्या दहा टक्क्यांएवढी आहे.

हीच सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या इतर कंपन्यांही आहेत. गौरव यांच्या मते या सगळ्याच कंपन्या केवळ आपापल्याच वेबसाइटच्या ‘ट्रॅकिंग’वर भर देताहेत. ‘वेंडर्स’च्या (कुरिअरच्या) वेबसाइटवर त्यांचा अजिबात भर नाही. वेंडर्स वेबसाइटवरील सर्वच महत्त्वाच्या ई-कॉमर्स कुरिअर्सच्या ट्रॅकिंगवरही शिपवेचा भर असतो. उदाहरणार्थ ब्लूडार्ट, डीटीडीसी, फेडेक्स इंडिया, ॲरेमेक्, डेल्हिवरी, गोजावास, ईकॉम एक्सप्रेस, डीएचएल इंडिया, फर्स्ट फ्लाइट, इंडिया पोस्ट इ.

गौरव सांगतात, ‘‘आफ्टरशिप डॉट कॉम’ हे या क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. जगभरातल्या ग्राहकांसाठी उपयुक्त अशी ‘ऑफ्टरशिप’ची एकुणातील रचना आहे. आमचा फोकस भारतीय ग्राहकांवर आहे. म्हणूनच आम्ही आमची रचना ई-कॉमर्स कंपन्या आणि इथले ग्राहक या दोघांना डोळ्यासमोर ठेवून साकारलेली आहे.’’

सेवेच्या संदर्भात ते सांगतात, की मालवाहतूकदारांपर्यंत कंपनी आणि ग्राहकांच्या सूचना अधिक प्रभावीपणे पोहोचवणे हे उद्दिष्ट आहेच. शिवाय ५० कुरिअर कंपन्यांची मिळून एकच एक एकात्मिक अशी ट्रॅकिंग यंत्रणा विकसित करण्याचाही मानस आहे. इतर देशांतूनही काम सुरू करायचेय.

कंपनीच्या प्रगतीबाबत गौरव समाधानी आहेत. ते म्हणतात, ‘‘आम्ही अजून केवळ एक हजार ग्राहक (विक्रेते सभासद) मिळवलेले आहेत. लाखो विक्रेते आम्हाला आमचे सभासद म्हणून अजून मिळवायचे आहेत. देशभरातल्या हजारो बाजारपेठांमध्ये लक्षावधी विक्रेते आहेत. अनेकांचे स्वत:चे स्टोअर्स आहेत आणि हे सारे आमची वाट बघताहेत…आणि आम्हीही त्यांची वाट बघतो आहोत.’’

लेखक : तौसिफ आलम

अनुवाद : चंद्रकांत यादव

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags