सिग्नलवर व्यवहाराचे धडे गिरवणाऱ्या चिमुरड्यांसाठी सुरू झालीय सिग्नल शाळा...! समर्थ भारत व्यासपीठ संस्थेचा स्तुत्य उपक्रम !

सिग्नलवर व्यवहाराचे धडे गिरवणाऱ्या चिमुरड्यांसाठी सुरू झालीय सिग्नल शाळा...!
समर्थ भारत व्यासपीठ संस्थेचा स्तुत्य उपक्रम !

Wednesday July 13, 2016,

8 min Read

सिग्नल वर दररोज आपल्याला अनेक मूलं दिसतात. कधी ती भीक मागत असतात तर कधी ती काहीबाही विकत असतात. सिग्नल लागला की सुरू होतो यांचा व्यवसाय. बदलत्या ऋतूनुसार आणि आवडीनुसार ही मुलं वेगवेगळी उत्पादनं विकत असतात. यांचं बालपण या सिग्नलच्या दिव्यांमध्ये कधी संपून जात याची नोंद कुणाकडेच नसते. किशोरवयात जाईपर्यंत अनेक मुलं व्यसनाधीन झालेली असतात, तर काही परागंदा झालेली असतात. यांचं बालपण सिग्नलच्या त्या दिव्यांमध्येच संपून जातं. अनेकदा या मुलांचे पालक सुद्धा सिग्नलच्या या व्यवहारावरच आपली गुजराण करतात, आणि मुलांचा वापर हा पैसे कमावण्यासाठी म्हणून केला जातो. देशातील विविध भागातून काही ना काही कारणास्तव ही कुटुंब विस्थापित होऊन शहरांकडे वळतात आणि पोटाची खळगी भरण्यासाठी काही ना काही काम करत राहतात. जिथे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत तिथे मुलांच्या शिक्षणाचा कोण विचार करणार? मात्र समर्थ भारत व्यासपीठ या सामाजिक संस्थेच्या ठाणे शाखेनं नेमका हाच विचार अंमलात आणायचा ठरवला आणि सुरू झाली या रस्त्यावरच्या चिमुरड्यांसाठी सिग्नल शाळा! " रोज शहरातून फिरताना ही मूलं सिग्नलवर दिसायची. त्यावेळी विचार आला की या मुलांना शिक्षण कसं देता येईल ? त्याचवेळी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जैयस्वाल आणि सहायक आयुक्त मनीष जोशी महापालिका शाळांमधील शिक्षण पद्धतीत कसे बदल करता येतील याबाबत योजना आखत होते. त्यावेळी त्यांच्याशी आमची भेट झाली आम्ही आमचा प्रकल्प समोर ठेवला आणि योगायोगाने ते सुद्धा असाच तोडगा शोधत होते. त्यामुळे या शाळेचं स्वप्न जुळून आलं." भटू सावंत, समर्थ भारत व्यासपीठ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सांगत होते.

यापूर्वी संस्थेनं महापालिका शाळांमध्ये मधल्या सुट्टीत जाऊन सर्वेक्षणसुद्धा केलं होत, या दरम्यान महापालिका शाळांमध्ये या मधल्या सुट्टीचा वापर त्यांनी संस्कार वर्ग म्हणून केला आणि तिथल्या शिक्षण पद्धतीवर अभ्यास सुद्धा केला. मात्र सिग्नलवरच घर असणाऱ्या या मुलांना महापालिकेच्या या शाळांमध्ये त्याचे पालक पाठवतील याची खात्रीच नव्हती म्हणून मग त्यांच्या दारातच शाळा उभारण्याचा संकल्प संस्थेनं केला. जूनपासून सुरू झालेल्या या शाळेत आज २० विद्यार्थी आहेत. महापालिकेनं त्यांना एक कंटेनर दिला ज्यामध्ये ही अनोखी शाळा सुरू झाली आहे. वय वर्ष अडीच ते १४ पर्यंत मुलं या शाळेत आहेत. 

" सुरुवातीला शाळेत यायला कचरणारी ही मुलं आता रांग लावून वर्गात यायला उभी राहतात. शाळेच्या सुरक्षित वातावरणातून त्यांना बाहेर जायची इच्छा नसते. सुरुवातीला काही मुलं सतत रडायची आज तीच शांत बसून अभ्यासात आणि विविध कार्यांत लक्ष देत आहेत."

शाळेत दाखल होण्यापूर्वी या मुलांचं सर्वेक्षण केलं गेलं. ज्यामध्ये त्यांना वैयक्तिक स्वच्छता शिकवण्यात आली. यामध्ये सर्व मुलांना आंघोळ, दात घासणे, नखे कापणे, केस कापणे अशा सर्व गोष्टी आचरणात आणवल्या गेल्या." सुरुवातीला आम्ही त्यांना टूथब्रश आणि पेस्ट दिला त्यादिवशी दिवसभर या मुलांनी दात घासले आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला माझे दात किती स्वच्छ हे दाखवत होते ." भटू या आठवणी सांगताना हसत होते. यानंतर या मुलांना शाळेत दाखल करण्यात आलं आणि सुरू झाला त्यांच्या शिक्षणाचा प्रवास ! शिक्षण सुरू झालं मात्र काही मुलं सतत रडत असत म्हणून मग वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. ज्या काही समस्या होत्या त्यासाठी या डॉक्टरांनी औषधोपचार देऊन मुलांना बरं केलं. " एका छोटीला पायावर खरूज झाली होती. बसल्यावर फ्रॉक तिच्या पायाला लागत असे आणि ती रडायची. तर दुसरी मुलं होती त्यांना सतत पडसं असायचं म्हणून ती रडायची, या सर्वांवर औषधोपचार झाले आणि काहींना आरोग्यवर्धक औषधं सुद्धा देण्यात आली" भटू सांगत होते. 

image


इथल्या शिक्षण पद्धतीचं वैशिष्ट्य म्हणजे दृकश्राव्य माध्यमाचा वापर! या माध्यमामुळे मुलांना आकलन करणं अधिक सोपं जातं. विविध वयोगटातील मुलांना वेगवेगळा अभ्यासक्रम आहे आणि अन्य मुलांप्रमाणेच त्यांना अक्षर ओळख त्याचबरोबर हस्तकौशल्य ,खेळ असे अनके प्रकार शिकवले जातात. मुख्य म्हणजे हे विद्यार्थी ठाणे महापालिका शाळेच्या पटलावर आहेत. ज्यामुळे त्यांचा अभ्यासक्रम अधिप्रमाणित होतो.

या शाळेत चार शिक्षिका आहेत. आरती नेमाणे, आरती परब , पल्लवी जाधव आणि योगिता सावंत. यापैकी आरती नेमाणे यांचा बाल्यावस्थेतील मुले या विषयावर अभ्यास आहे. आरती परब या बी .एड असून त्यांचा मराठी विनानुदानित शाळांवर विशेष अभ्यास आहे. तर योगिता सावंत या हस्तकौशल्य शिकवतात. आपापल्या विषयात या शिक्षिका तज्ज्ञ आहेतच पण समाजसेवेची आवड असल्याने त्या या शाळेत शिकवायला आल्या. त्यांच्याच प्रमाणे अनेक विविध विषयात तज्ञ् असणारी मंडळी सुद्धा इथे वेळ काढून आवर्जून शिकवायला येतात . तर अनेकजण विविध पद्धतीने या कार्यात सहभागी झाले आहेत. काही जण मध्यान्ह भोजनासाठी पुढाकार घेत आहेत तर काही शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी येतात. " अनेकांना परत पाठवावं लागतं, कारण आम्हाला मुलांना निव्वळ सोयी सुविधा देऊन श्रीमंत नाही करायचं तर अनुभव संपन्न पिढी घडवण्यावर आमचा भर आहे." भटू सांगतात. 

image


ठाण्यातील तीन हात नाका या ठिकाणी ही पहिली सिग्नल शाळा सुरू झाली आहे. तीन वर्ष ही शाळा सुरू ठेवण्याचा संस्थेचा मानस आहे, पण मग त्यानंतर काय ? या प्रश्नाचं उत्तर देताना भटू म्हणतात ," आमचं उद्दिष्ट्य तीन वर्षांचं आहे. ज्यावेळी या शाळा बंद होतील तेंव्हा आमचं कार्य संपलेलं असेल. याचा अर्थ असा की येत्या तीन वर्षात या विद्यार्थ्यांना पूर्णवेळ शाळेत प्रवेश घ्यावा, त्यांच्या कुटुंबाना आर्थिक स्थैर्य मिळवून देणं हे संस्थेचं उद्दिष्ट्य आहे." या उद्दीष्ट्याबद्दल सांगताना त्यांनी विनोबा भावे यांचं उदाहरण दिलं. ते असं की बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी प्रकल्प उभा केला आणि आचार्य विनोबा भावे यांना उदघाटनाला बोलावलं होतं, त्यावर विनोबाजींचं उत्तर होतं ,"समारोपाला येईन"' याचा अर्थ ज्यावेळी समाजातून ही विषमता दूर होईल आणि कुष्ठरोग्यांना सुद्धा सर्वसामान्य जीवन जगता येईल, त्यावेळी त्यांना गावकुसाबाहेर राहण्याची गरज भासणार नाही, या अर्थाने ते समारोपाला येईन असं म्हणाले होते. नेमकं हेच उद्दिष्ट्य संस्थेनं ठेवलं आहे. ज्यावेळी या मुलांना मुख्य प्रवाहात स्थान मिळेल त्यावेळी संस्थेचं कार्य त्या भागापुरतं संपलेलं असेल. 

image


तीन हात नाकाच्या या सिग्नलखाली ८ कुटुंब राहतात, ही त्यांचीच मुलं. महाराष्ट्राच्या विविध भागातून ही कुटुंब इथे आसऱ्याला आली आहेत. यापैकी प्रत्येकाच्या घरी वेगळी कहाणी आणि वेगळी दशा. आता मात्र त्यांना शाळेचं महत्त्व पटू लागलं आहे आणि आपल्या पाल्याला ते स्वतःहून शाळेत सोडतात. अनेकदा ही मंडळी दुसऱ्या सिग्नल वर धंदा करण्यासाठी जातात. पण शाळेच्या वेळेत पालक आपल्या पाल्याला घेऊन हजर असतात. शाळेत येणाऱ्या मुलांकडून भीक मागवायची नाही ही अट शाळेनं ठेवलेली आहे आणि पालक ती पाळतात." या मुलांसाठी आम्ही मध्यान्ह भोजन सुद्धा सुरू केलं. सुरुवातीला ही मूलं भीक मागितल्यासारखी हात पुढे करून खायची, पण आता शाळेत शिस्तीत हात धुवून जेवणापूर्वी प्रार्थना म्हणतात आणि मगच जेवायला बसतात. हा बदल शाळेतल्या संस्कारांमुळे झाला आहे आणि या मुलांनी बाहेर जाऊन तो अंमलात आणला तर आम्ही जिंकलो." असं भटू सांगत होते.

पेशानं पत्रकार असलेले भटू सावंत, सामाजिक कार्यात अगदी महाविद्यालयीन काळापासून आहेत. शहरातील अनेक प्रश्नांना आपल्या वृत्तपत्रातून मांडणाऱ्या भटू यांनी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कोणत्याही समाजसेवा शाळेत जाऊन शिक्षण घेतलं नाही तर एका आंतरिक उर्मींनं ते मुकुंदराव गोरे यांचं समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेशी जोडले गेले. २००५ सालापासून ते या संस्थेशी जोडले गेले आहेत ते आजतागायत ! ठाण्याच्या या शाखेनं अनेक समाजोपयोगी प्रकल्प राबवले आहेत. सिग्नल शाळा हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे जो येणारी पिढी घडवण्यासाठी कार्यरत आहे. 

image


सुरुवातीला शाळेतच येऊ न इच्छीणाऱ्या या मुलांच्या डोळ्यात आता नव्या स्वप्नांनी घर केलय. सिग्नलवर वस्तू विकताना एखाद्या आलिशान गाडीला हळूच हात लावून अनिमिष नजरेनं त्याकडे बघणाऱ्या या मुलांना आता शिक्षणाने आपल्या आयुष्याची दिशा सुद्धा बदलणार आहे याची हळूहळू खात्री पटू लागली आहे. " सुरुवातीला भिरभिरत्या नजरेनं शाळेतल्या फळ्याकडे, वर्गातल्या साहित्यांकडे बघणारी ही मुलं आता शिस्तीत सर्व वस्तू आपापल्या जागी ठेवतात. गोष्टी ऐकतात, गाणी, पाढे म्हणतात. आता त्यांना लवकरात लवकर मोठं व्हायचंय ते मोठमोठाली पुस्तकं वाचण्यासाठी ! अक्षर ओळख झाल्याने त्यांना पुस्तकांची गोडी लागली आहे. " त्यांच्या शिक्षिका आरती नेमाणे सांगत होत्या. तर हस्तकला शिकवणाऱ्या योगिता सावंत म्हणाल्या," नवनवीन वस्तू विकताना त्या हव्याहव्याश्या वाटणं स्वाभाविक आहे. आज ही मुलं जेंव्हा स्वतः अनेक वस्तू बनवतात तेव्हा त्यांचा आनंद काही औरच असतो. नवनिर्मिती आपल्या हातून घडलीय याचाही त्यांना खूप अभिमान वाटतो आणि मग ते आपल्या पालकांना या वस्तू दाखवायला घेऊन जातात."

सिग्नल शाळेतल्या ७ वर्षांच्या नंदिनीला शिक्षिका व्हायचंय. ती म्हणते ," शाळेत ए बी सी डी शिकवतात ,अंक शिकवले. मी चिमणी बनवायला शिकले. शाळेत खेळ घेतात, मला शाळा खूप आवडते." तर ७ वर्षांच्या राहुलला खूप मोठं होऊन डॉक्टर व्हायचंय. तो म्हणतो ," इथे मला अंक काढायला शिकवतात, गाणी शिकवतात आणि इथलं जेवण पण छान आहे." तर ६ वर्षांची चुणचुणीत निकिता तर पोलिस होणारेय." शाळेत एक दोन तीन चार शिकवतात. शाळेत मला बुक दिले आणि पाटी दिली. शाळेतले खेळ मला खूप आवडतात." १२ वर्षांच्या कल्पनाला तर एक दिवस सुद्धा शाळा चुकवायला आवडत नाही. दोन दिवस तिला कामासाठी बाहेर राहावं लागलं त्यावर तिचं म्हणणं होत, " मला बाहेर पण शाळेची खूप आठवण येत होती. इथे अभ्यास, अंक, चित्रकला, हस्तकला इतके सगळे विषय शिकवतात, मला तर शाळेला कधीच सुटटी असू नये असं वाटत." कल्पनाला सुद्धा पोलीस दलातच सेवा करायची आहे.  

image


सध्या एका सिग्नलवर सुरू झालेल्या या शाळेत शहरातील वंचित मुलांना संधी मिळावी यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. नुसतच शिक्षण नाही तर मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने संस्था या ठिकाणी लवकरच खेळाची साधनं बसवणार आहे. तर सुरक्षितता म्हणून या ठिकाणी २४ तास सुरक्षा रक्षकही नेमला जाणार आहे.

कुतूहल म्हणून पाहायला येणाऱ्या अनेकजणांना शाळेत फक्त शनिवारीच प्रवेश आहे. यामागचं कारण सांगताना भटू म्हणतात ," आम्हाला मुलांचं वेळापत्रक बिघडू द्यायचं नाहीये, त्यामुळे आम्ही फक्त शनिवारी या मुलांना बाहेरच्या लोकांना भेटू देतो."

शाळा याच वर्षी सुरू झाली आहे पण या शाळेतील विद्यार्थ्यांचं आणि या शाळेबद्दल अनेकांना कुतूहल आहे. बेघर आणि बेरोजगार म्हणून शहरात आलेल्या या कुटुंबाना रोजगार आणि त्यांच्या मुलांना हक्काचं शिक्षण मिळावं यासाठी संस्था कष्ट करीत आहे आणि सामाजिक विषमता दूर करण्यामागच्या संस्थेचा हा खारीचा वाटा निश्चितच कौतुकास्पद आहे.

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

आता अंध व्यक्तीसुद्धा करू शकतील ‘फोटोग्राफी’ 

अंधाने उघडली गरिबांसाठी शिक्षणाचे कवाडे

अंध मुलांच्या ‘प्रगती’साठी लढणार्‍या सुहासिनीताई मांजरेकर

    Share on
    close