गरजूंच्या उपयोगी पडणारा मुंबईचा ' 'सेवेकरी टॅक्सीवाला' विजय ठाकूर !
ही घटना आहे १९८४ ची. विजय ठाकूर यांना आपल्या गरोदर पत्नीला घेऊन रुग्णालयात जायचं होतं. रात्री दोन वाजता त्यांच्या पत्नीचा गर्भपात झाला होता. आता इतक्या रात्री तिला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी ना कुणी रिक्षावाला तयार होता ना कुणी टॅक्सीवाला. अशा अवस्थेत ते भर रस्त्यात उभे राहून रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांना विनवणी करत होते. पण कुणीच थांबायला तयार नव्हते. शेवटी तासाभरानंतर एक रिक्षावाला तयार झाला. त्यांच्या पत्नीचे प्राण वाचले खरे. पण या घटनेचा जबरदस्त धक्का विजय ठाकूर यांना बसला होता. खिशात पैसे असताना कुणी रिक्षावाला किंवा टॅक्सीवाला तयार होत नाही ही किती अमानवीय गोष्ट आहे? मग ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांची अवस्था काय असेल? त्यांना कुठल्या प्रसंगातून जावं लागत असेल? या सर्व गोष्टींचा विचार करुन त्यांनी एक निर्धार केला. ते एका प्रतिष्ठित कंपनीत इंजिनियर होते. नोकरी सोडल्यानंतर काय करायचं? हे त्यांनी पक्कं केलं होतं. काही वर्ष त्यांनी नोकरी केली. घरातल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. दोन मुलांचं शिक्षण केलं. त्यांचे संसार मार्गी लावले. आता आपण नोकरी सोडायला तयार आहोत, असं जेव्हा वाटलं तेव्हा स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यातून आलेल्या पैशातून त्यांनी एक टॅक्सी खरेदी केली. आता ते टॅक्सी चालवू लागले. पैसे कमवण्यासाठी नाही तर अडल्या नडलेल्यांना मदत करण्यासाठी. गेली तेहतीस वर्ष ही सेवा अविरतपणे सुरु आहे.
विजय ठाकूर यांचा दिनक्रम अगदी ठरलेला आहे. ते दुपारी उशीरा टॅक्सी काढतात. त्यानंतर रात्रभर त्यांना काम करायचं असतं. गाडीत प्रवासी असो किंवा नसो ते संपूर्ण मुंबईत फेरफटका मारतात. वाटेत कुणी प्रवासी भेटला तर भाडे घेतात. त्याला सोडल्यानंतर पुन्हा मुंबईचे रस्ते आणि ते. “रात्री असे अनेक प्रसंग घडतात. अनेकांना गरज असते. अशावेळी टॅक्सी किंवा तत्सम वाहन मिळणं गरजेचं असतं. मी अशाच लोकांच्या शोधात असतो. ज्यांना खरंच गरज आहे. ही माझ्यादृष्टीनं मानव सेवा आहे. कुणाच्या गरजेला उपयोगी पडणं खूप महत्त्वाचं. गरजेला धावतो तो खरा मित्रं. मला असंच लोकांचं मित्रं व्हायला आवडतंय.” विजय ठाकूर सांगतात.
आत्तापर्यंत विजय यांनी अनेकांना रात्री मदत केलीय. अडचणीत असलेल्या असंख्य लोकांना त्यांच्या ठिकाणी पोचवण्याचं काम विनामुल्य केलंय. सेवेकरी टॅक्सीवाले म्हणून ते प्रसिध्द आहेत. या सेवेत विजय यांना अनेक अनुभव आले. काही अनुभव अंगावर शहारा आणणारे आहेत. ते सांगतात “ काही वर्षांपुर्वी ३१ डिसेंबरच्या रात्री मी नेहमीसारखा टॅक्सी घेऊन बाहेर पडलो होतो. लोक नवंवर्षाचं स्वागत करण्यात दंग होते. रात्री अचानक मला एक अपघात दिसला. मारुती ८०० गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खांबावर आदळली होती. मी पाहिलं आत एक महिला होती. तिच्या हातात लहान मुल होतं. अपघातात महिलेचं डोकं फुटलं होतं. तिची शुध्द हरपत चालली होती. सुदैवानं हातातलं बाळाला कोणतीच दुखापत झाली नव्हती. ड्रायव्हर सीटवरचा नवरा कधीच बेशुध्द पडला होता. या सर्वांना घेऊन मी कुपर रुग्णालयात गेलो तिथं त्यांच्यावर उपचार झाले. दोघेही बचावले. मला खूप बरं वाटलं. असे कित्येक प्रसंग आहेत” रुग्णालयात जाणाऱ्यांंना मोफत सेवा असं त्यांनी आपल्या टॅक्सीवर लिहून ठेवलंय. आपला मोबाईल नंबरही दिलाय. जेणेकरुन लोक कधी गरज लागली तर कधीही फोन करु शकतील.
विजय ठाकूर यांचं वय ७४ आहे. शेवटच्या श्वासापर्यंत टॅक्सी चालवून गरजू लोकांना मदत करण्याचं व्रत सुरु ठेवणार असल्याचं विजय सांगतात. वाढत्या वयामुळं मुलं त्यांना घरी बसण्याचा सल्ला देतात. पण ते ऐकत नाहीत. रोज संध्याकाळी टॅक्सी घेऊन ते मुंबईतल्या रस्त्यावर निघतात. ते म्हणतात “ माहित नाही कुणाला कधी गरज भासेल. मी तिथं असणं गरजेचं आहे. या शहरात माणुसकी शिल्लक आहे. हे लोकांना समजायला हवं.”