महिलांच्या विकासातील मोठा अडथळा म्हणजे स्वतः महिलाच – अनिषा सिंह, संस्थापिका, मायदल

महिलांच्या विकासातील मोठा अडथळा  म्हणजे  स्वतः महिलाच – अनिषा सिंह, संस्थापिका, मायदल

Tuesday November 17, 2015,

7 min Read

सुयोग्य ग्राहकांपर्यंत पोहचणे, हे कुठल्याही व्यवसायासाठी अतिशय महत्वाचा भाग असतो. यादृष्टीने योग्य ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी व्यावसायिकांना, खास करुन सेवा पुरवठादारांना, उपयुक्त ठरेल अशा एका नव्या कंपनीची दिल्लीत २००९ ला स्थापना झाली. ‘मायदल’ या नावाने या कंपनीची स्थापना केली ती अनिषा सिंह यांनी... अनिषा यांची ही दुसरी कंपनी असून भारतातील मात्र त्यांची ही पहिलीच कंपनी आहे. अनिषा यांच्याकडून त्यांच्याविषयी, एक व्यावसायिक म्हणून त्यांच्यापुढील आव्हानांविषयी आणि मुख्य म्हणजे स्त्रियांना मागे खेचणाऱ्या गोष्टींविषयी जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

अनिषा स्वतःला पक्की सरदारनी म्हणवून घेतात. दिल्लीतील एका मोठ्या एकत्र कुटुंबात जन्मलेल्या अनिषा यांचे वडील माजी सैन्याधिकारी होते आणि त्यांचा स्वतंत्र व्यवसाय होता तर आई दंतचिकित्सक होती. खूप साऱ्या चुलत भावंडांमध्ये वाढल्याने अनिषा यांचे लहानपण एखाद्या वसतीगृहात असल्यासारखेच गेले.

पुढे त्यांनी त्यांचे पदवीशिक्षण आणि एमबीए अमेरिकेत पूर्ण केले. त्यादरम्यान बारा वर्षे त्या इस्ट कोस्टला – त्यातही प्रामुख्याने वॉशिंग्टन डीसी, बॉस्टन आणि न्यूयॉर्कमध्ये राहिल्या. त्यांनी क्लिंटन प्रशासनामध्ये काम सुरु केले. त्यावेळी महिला व्यावसायिकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण व्यवसायांसाठी भांडवल उभारणीमध्ये मदत करण्याचे काम त्या करत होत्या. त्या काळात अमेरिकेत डिजिटल स्पेस वाढत होती आणि त्यातूनच अमेरिकन कंपन्यांना डिजिटल कंटेट पुरविणारी कंपनी त्यांनी सुरु केली. “जेंव्हा या कंपनीला माझी पूर्ण वेळ गरज राहिली नाही, तेंव्हा एखाद्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित काही तरी सुरु करण्याचा विचार मी सुरु केला आणि त्यातूनच २००९ साली ‘मायदल’ चा जन्म झाला. हा संपूर्ण प्रवास माझ्यासाठी खूपच छान राहिलाआहे,” अनिषा सांगतात.

image


शैक्षणिक आयुष्यात खरे तर अनिषा फारशा महत्वाकांक्षी नव्हत्या. तसेच आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे, याबाबतही त्यांचे नक्की काहीच ठरले नव्हते. मात्र त्यावेळी त्यांच्या प्राध्यापकांची भूमिका लक्षणीय ठरली. “ माझ्या एका प्राध्यापकांना मात्र मी आयुष्यात बरेच काही साध्य करु शकेन, असा विश्वास होता. त्यांनीच माझी व्यावसायिकांशी ओळख करुन दिली आणि एमबीए करण्यासाठी मला प्रोत्साहन दिले. मी व्यावसायिक बनण्यामागे त्यांच्या या प्रोत्साहनाचा आणि विश्वासाचा वाटा खूप मोठा आहे,” त्या कृतज्ञतापुर्वक सांगतात. त्यातूनच पुढे त्यांना डीसीमधील ज्युली होल्ड्रेन चालवित असलेल्या एका खूपच चांगल्या कंपनीत इंटर्नशीप करण्याची संधी मिळाली... एका महिलेच्या नेतृत्वाखालील चारशे लोकांची ही एक स्टार्टअप कंपनी होती. ज्युली या त्यांच्यासाठी आदर्श ठरल्या आणि एक दिवस आपल्याला त्यांच्यासारखेच व्हायला आवडेल, हेदेखील अनिषा यांना समजले.

‘मायदल’ ची स्थापना आणि व्यावसायिक आव्हाने

नविन कंपनी सुरु करण्यासाठी अनिषा या नाविन्यपूर्ण कल्पनांच्या शोधात होत्या. त्या दरम्यान चीनी लोक एकत्र येऊन सवलती मिळवत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. असेच मॉडेल त्यावेळी अमेरिकेतही विकसित होत होते. त्यातूनच त्यांना ही कल्पना सुचली. “ असे मॉडेल भारतात तोपर्यंत राबविले गेले नसल्याने, त्यादृष्टीने प्रयत्न करणे मला योग्य वाटले. जेंव्हा आम्ही ग्रुप बाईंग डिल्सचे (एकत्र खरेदी करुन सवलत मिळविण्यासाठी) संकेतस्थळ सुरु केले, त्यावेळी विपणनासाठी खास व्यासपीठाची बाजारात असलेली गजर आमच्या लक्षात आली नव्हती,” त्या सांगतात.

वेगळ्या कल्पनेवर आधारित अशा या कंपनीसाठी अनिषा यांनी नावही त्याला साजेसे ठेवले. त्याबाबतही विस्ताराने सांगताना त्या म्हणतात, “जराशी वेगळी नावे मला मनापासून आवडतात. माझ्या पहिल्या कंपनीचे नाव होते किनिस... तर मायदलचा उगम झाला आहे तो संस्कृत भाषेतून... संस्कृतमध्ये ‘दल’ म्हणजे गट किंवा समूह आणि मायदलचा शब्दशः अर्थ आहे माझा गट... लोकांच्या एका समूहाला एकत्रपणे सौदा करुन देणे, ही कंपनी स्थापण्यामागची कल्पना होती आणि त्यातूनच मायदल या नावाचा जन्म झाला.”

अनिषा यांची ही दुसरी कंपनी असल्याने, त्यांना प्रत्येक व्यवसायात चढ-उतार असतातच, याची चांगलीच कल्पना होती. तरीही प्रत्येक नवी कंपनी नवनवीन आव्हाने घेऊन येतेच. “ चांगले दिवस असतात तसे वाईट दिवसही असतात. ही वाट सहजसुलभ निश्चितच नसते आणि इतर कुठल्याही पेशापेक्षा एक व्यावसायिक म्हणून तुम्ही कदाचित खूप जास्त काही शिकता. आमच्यापुढे सर्वात मोठे आव्हान होते, ते लोकांना एकत्र करुन त्यांना ही नविन सेवा वापरण्यासाठी खात्री पटवून देण्याचे,” त्या सांगतात.

साधारणपणे महिला उद्योजक बनणे कठीण आहे, असा समज असतो. पण अनिषा यांना मात्र असे काही असल्याचे मान्य नाही. “ जर तुमच्याकडे काही अर्थपूर्ण सांगण्यासारखे असेल, तर लोक तुमचे निश्चित ऐकतात आणि गोष्टी योग्यप्रकारे घडतात. आज व्यावसायिकांना खूप संधी असल्याचे मला दिसत आहे. दिवसेंदिवस व्यावसायिकांना आणि स्टर्टअप्सना आधार देणाऱ्या व्यवस्था प्रगल्भ होताना दिसत आहेत. या नव्या व्यवस्थेमध्ये व्यावसायिकांना अधिक नाविन्यपूर्ण विचार करणे शक्य झाले आहे,” त्या सांगतात.

image


अमेरिकेतील आणि भारतातील महिला उद्योजकांमध्ये काही फरक असले, तरी काही साम्यस्थळेही असल्याचे अनिषा सांगतात. “ साधारणपणे सगळीकडेच महिला स्वतःला दुय्यम समजतात. ही परिस्थिती जगात सगळीकडेच आहे. मला वाटते हा आमच्या स्वभावाचाच भाग आहे,” त्या सांगतात. याबाबत त्या पुढे म्हणतात, “ ग्लास सिलिंगचा प्रकार हा अमेरिकेतही आहेच... कदाचित थोड्या कमी प्रमाणात असेल. पण अमेरिकेतील स्त्रिया या भारतीय स्त्रियांच्या तुलनेत खूपच लवकर स्वतंत्र झालेल्या दिसतात. महिलांवर अधिक प्रकाशझोत येण्याची गरज आहे आणि त्यादृष्टीने ‘युवरस्टोरी’ प्रमाणे आणखी व्यासपीठे असायला हवीत, ज्यांच्याद्वारे भविष्यात महिलांना उद्योजिका होण्यासाठी प्रेरणा मिळू शकेल. तसेच तेथे महिला इतर महिलांना मदत करताना दिसतात आणि प्रगती साधण्यासाठी त्यांचे खूपच चांगले जाळे आहे. आपल्याकडेही हे दिसते पण याचे प्रमाण वाढण्याची आवश्यकता आहे. अधिक महिलांनी पुढे येऊन, इतर महिलांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे,” त्या सांगतात.

“अनेक महत्वाकांक्षी उद्योजिकांशी, माझ्या मैत्रिणींशी बोलल्यानंतर आणि माझ्या स्वतःच्या अनुभवावरुन मला एक गोष्ट जाणवली आहे, ती म्हणजे, महिलांना मागे खेचणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे महिला स्वतःच आहेत. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे आणि हे सगळ्याच स्त्रियांना लागू नाही. पण सामान्यपणे आपण बोलायला घाबरतो, साशंक असतो, आपण अंदाज बांधत रहातो.जर आपण हे सगळे थांबविले तर जगात अनेक व्यावसायिकांच्या कथा पुढे येतील. मला असेही वाटते की ज्या महिला यशस्वी झाल्या आहेत, त्यांनी इतर महिला व्यवसायिकांना प्रोत्साहन आणि आवश्यक ती मदत केली पाहिजे,” अनिषा परखडपणे आपले मत मांडतात.

त्याचबरोबर महिला व्यावसायिक स्वतःचे मजबूत जाळे विणत नसल्याची त्यांना खंत वाटते. त्यांच्या मते महिला हे करत नसताना दुसरीकडे पुरुष व्यावसायिक मात्र स्वतःचे चांगले जाळे बनवितात आणि त्याचा वापर करतात. “ एकतर आपण एकमेकींकडे स्पर्धक म्हणून तरी पहातो किंवा मग संकोच तरी करतो, मला हे विचित्र वाटते. पण मला वाटते जर अधिकाधिक महिला एकत्र आल्या, तर ते त्यांच्यासाठी निश्चितच फायद्याचे ठरेल,” त्या सांगतात.

मोलाचा सल्ला

अनिषा यांच्या मते भारतात अनेक गोष्टी पुरुषांपेक्षा महिलांसाठी अधिक अवघड असतात. पण तुम्ही काय करता, कोण आहात, यापेक्षाही तुम्ही काहीतरी मोठा विचार करता हेच खूप श्रेयस्कर असल्याचे त्यांना वाटते. “ त्यासाठी तुम्ही स्वतःचीच पाठ थोपटून घ्या कारण त्यासाठी तुम्ही निश्चितच पात्र आहात. आपण स्वतःला कधीच पुरेसे श्रेय देत नाही. तसेच महिलांनी त्यांच्या मनातील गोष्टी मोकळेपणाने बोलल्या पाहिजेत. दर वेळी आपण बुद्धिमान वाटू का, याची काळजी करत बसू नका. जर आपण सतत योग्य वेळेची वाट बघत बसलो आणि खूप हुशारीची एखादी गोष्ट आठवेपर्यंत थांबून राहिलो , तर दुसरी एखादी व्यक्ती योग्य वेळी बोलल्याने ती वेळ निघून जाईल. माझ्या ३५० हून जास्त लोकांच्या टीममध्ये काही महिलांनी समोर येऊन आपली ओळख करुन दिली आहे (साधारणपणे पुरुष हे करतात). त्या नक्कीच झळकतील हे मला माहिती आहे आणि तसे होताना पहाण्यासाठी मी उत्सुकही आहे,” त्या सांगतात.

प्रेरणा आणि ताकद

अनिषा यांच्यासाठी त्यांचे कुटुंब हीच त्यांची प्रेरणा आणि ताकद आहे. त्यांच्या मते त्यांच्या दोन मुलींनी त्यांच्या आयुष्याचे सार्थक झाले आहे. “ सुदैवाने माझ्या सगळ्यात चांगल्या मित्राशीच माझे लग्न झाले आहे. तो माझी सर्वात मोठी ताकद आहे आणि त्याच्याबरोबर माझे आईवडील आणि सासरच्या मंडळींनीही मला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे,” अनिषा सांगतात.

भविष्यातील योजना

मायदलच्या माध्यमातून घाऊक व्यापाऱ्यांचा एक अतिशय विस्तारीत असा बेस तयार करण्याचे आपले स्वप्न असल्याचे अनिषा सांगतात. “ज्यामुळे मायदल हे कुपन्स आणि लॉयल्टी प्रोग्रॅम्स पुरविणारे एक वास्तविक पुरवठादार ठरेल. आगामी काळात प्रत्येक भारतीय नागरिक अन्नपदार्थ, प्रवास किंवा इतर कोणत्याही खरेदीसाठी सर्वप्रथम मायदलचा वापर करेल, हे मी तुम्हाला आत्ताच सांगू शकते. आत्ताच आम्ही १९६ शहरांमध्ये उपलब्ध असून १,००,००० जास्त व्यापारी आहेत आणि दुसऱ्या आणि तिसर्या श्रेणीतील शहरांमध्ये आमची कामगिरी अभूतपूर्व आहे,” त्या सांगतात.

अनिषा यांच्या मते, ही वेळ ऑनलाईन कुपन्स आणि डिस्काऊंट मार्केटींग उद्योगासाठी खूपच चांगली आहे. या जागी सध्या असणे खूपच मस्त आहे आणि नाविन्यपूर्ण गोष्टी करुन पहाण्यासही खूप जागा आहे. “ आम्ही सतत नाविन्याच्या शोधात असतो, जेणेकरुन वापरकर्त्यांना अधिक चांगला अनुभव देता येईल. नुकताच आम्ही किराणा क्षेत्रात प्रवेश केला असून खाद्यपदार्थ, वैयक्तिक वापराच्या गोष्टी, गृहोपयोगी सामानाचा यामध्ये समावेश आहे. वापरकर्ते त्यांच्या जवळच्या किराणा दुकानातील किंवा सुपरमार्केटमधील उपलब्ध वस्तुंचा शोध यातून करु शकतात. हे खूपच चांगले चालले आहे आणि यामध्ये आम्ही आणखी वाढ करणार आहोत. नॅसडॅकपर्यंत जाऊन पोहचणे हे माझे आणखी एक स्वप्न आहे,” त्या सांगतात.

    Share on
    close