अपंगांना 'बाहुबली' बनवणारा देवदूत
१९६९ साली जैसलमेरचे तत्कालीन जिल्हाधिकारी, देवेंद्र राज मेहता यांचा पोखरणजवळ एक भयानक अपघात झाला. त्यांच्या मांडीचं हाड ४३ जागी तुटलं होतं. डॉक्टरांना शाश्वती नव्हती की ते जिवंत राहतील की नाही. मात्र देवाच्या मनात बहुधा काहीतरी वेगळंच होतं. पाच महिन्यांच्या हॉस्पीटलमधील वास्तव्यानंतर त्यांची प्रकृती सुधारायला लागली. मात्र या दरम्यान त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणा-या डॉक्टरांना त्यांचा पाय कापावा लागला. त्यांना पुढच्या इलाजासाठी अमेरिकेला जाण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी त्यांच्या मनात विचार आला की , "ज्यांना अमेरिकेला जाणं शक्य नाही त्यांचं काय ?" आणि इथेच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या अपंगांना अपंगत्वावर मदत करण्यासाठी एक संस्था स्थापन करण्याच्या विचाराचा जन्म झाला, आणि भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती (BMVSS) उदयास आली
भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीचे जनक पद्म भूषण विजेते डी. आर. मेहता यांची समाजाच्या भल्यासाठी सुरू केलेली ही चळवळ १९७५ साली सुरू झाली. "आम्हाला अपगांचं शारीरीक पुनर्वसन तर करायचंच होतं, मात्र त्याशिवाय त्यांना समाजामध्ये आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा परत मिळवून देण्याचंही काम करायचं होतं," असं मेहता यांनी सांगितलं. “आम्हाला त्यांना पुन्हा चालतं-फिरतं करायचंच होतं मात्र त्याचबरोबर अपंगांना आत्मविश्वास पुन्हा मिळवून देण्यासाठी आणि अर्थार्जनाचा मार्ग दाखवण्याचंही काम करायचं होतं.” त्यामुळेच या संस्थेनं ध्येय ठरवलं की देशातील किंवा परदेशातील शक्य तितक्या जास्त अपंगांना फुकटात कृत्रिम अवयव, कॅलिपर्स किंवा अन्य प्रकारची शारिरीक मदत करायची. नोबेल पुरस्कार विजेते अल्बर्ट श्वाईट्झर यांच्या विचारांचा डी. आर. मेहता यांच्यावर प्रभाव होता. श्वाईट्झर यांच्या “Let us join the fraternity of those who bear the mark of pain.” या वाक्यानं मेहता प्रभावित झाले होते.
क्रांतीकारी जयपूर फूट
मेहता म्हणाले की, "मला अपंगांसाठी काहीतरी करायचं होतं". भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती अस्तित्वात यायच्या आधी सात वर्ष जयपूरच्या सवाई मानसिंग हॉस्पीटलमध्ये जयपूर फूटचा जन्म झाला होता. ज्यांचा पाय गुढघ्याच्याखाली कापला गेलाय अशा लोकांसाठी रबरापासून बनवलेला तो कृत्रिम पाय होता. जयपूरमध्ये निर्माण झालेला हा कृत्रिम पाय अगदी मोफत बसवण्याचं काम भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती करते.
"जयपूर फूट, कृत्रिम अवयवय बसवल्यानंतर ज्या धारणा मनात येतात त्या सगळ्या धारणांना खोटं ठरवतो," असं देवेंद्र यांनी सांगितलं. देवेंद्र म्हणाले की जयपूर फूटमुळे अशक्य वाटणा-या विविध हालचाली अगदी सहजपणे करता येऊ शकतात. जयपूर फूटमुळे त्या व्यक्तीला चालता येऊ शकतं, धावता येऊ शकतं, बैठका मारता येऊ शकतात, चढता येऊ शकतं, पायावर पाय टाकून बसता येऊ शकतं, आणि ते ही अगदी सहजतेनं. जयपूर फूटची कामगिरी इतकी अफलातून होती की त्यानं प्रादेशिक सीमा तर ओलांडल्याच शिवाय भौगोलिक सीमाही ओलांडत संपूर्ण जगात ख्याती मिळवली.
मानवसेवेचं व्रत
परोपकारी भावनेतून भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती दारीद्रय रेषेखाली जगणा-या रूग्णांना शारिरीक मदत मिळवून देते. आणि हे करत असताना त्यांच्या कामाच्या आड कोणतीही जात, धर्म, वर्ण येत नाही. कोणताही भेदभाव न करता रूग्णाला संवेदनशीलपणे मदत मिळवून देणं हेच या संस्थेचं प्रमुख काम आहे. या संस्थेनं काही निवडक तरूण अपंगांना रोजगार मिळावा यासाठी व्यावसायाभिमुख शिक्षण द्यायलाही सुरूवात केली आहे. स्वत:च्या पायावर उभं राहून या अपंगांना पुन्हा सन्मानानं जगता यावं यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या संस्थेचे अपंगांचं पुनर्वसन आणि इतर अन्य उपक्रम देशाच्या अनेक भागांमध्ये सुरू आहे. दुर्गम भागामध्येही ही संस्था आपली सेवा देत असते. या संस्थेचं मुख्य केंद्र हे जयपूर आहे. संस्थेची देशभरात २२ केंद्र आहेत जी श्रीनगरपासून चेन्नईपर्यंत आणि गुवाहाटीपासून अहमदाबादपर्यंत पसरलेली आहेत. दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरूसारख्या शहरांमध्येही कृत्रिम अवयव बसवण्यासाठीची केंद्र आहेत.
मदतीसोबतच संशोधनावरही भर
भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती कृत्रिम अवयव निर्मिती क्षेत्रात संशोधन आणि विकास करण्याचा प्रयत्न करत आहे. भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीनं यासाठी देशातील तसंच परदेशातील नामांकीत संस्थांशी हातमिळवणी केली आहे. या उपक्रमामागचा उद्देश एकच आहे आणि तो म्हणजे कृत्रिम अवयवांची गुणवत्ता सुधारावी आणि ते कमी किंमतीत उपलब्ध व्हावेत. यासाठीच्या संशोधन आणि विकास क्षेत्रामध्ये स्वत: भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीही प्रयत्नशील आहे. भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीनं ज्या नामांकीत संस्थांशी हातमिळवणी केली आहे त्यामध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी - कॅलिफोर्निया, मॅसेच्युसेटस इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी केंब्रिज, व्हर्जिनिया टेक युनिव्हर्सिटी, डाऊ इंडीया, आय.आय.टी., इस्त्रो यांचाही समावेश आहे.
संघर्ष , आव्हाने आणि यशोगाथा
"सध्या आमचा संघर्ष हा निधीसाठीचा आहे . सरकारकडून मिळणारा निधी हा तुटपुंजा आहे, त्यामुळे आमची प्रगती ही परोपकारी आणि दानशूर व्यक्ती तसंच श्रीमंत रूग्णांकडून मिळणा-या निधीवर अवलंबून आहे." असं देवेंद्र यांनी सांगितलं. जेव्हा आम्ही देवेंद्र यांना विचारलं की यशोगाथा काय आहे त्यावर त्यांनी उत्तर दिलं की शारिरीक अवघडलेपणाचं समूळ उच्चाटन, अपंग व्यक्तीचा आत्मविश्वास जागृत करणं आणि त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं "याच ख-या यशोगाथा आहेत" असं देवेंद्र यांनी नमूद केलं.
अभिनेत्री सुधा चंद्रन हीनं एका अपघातामध्ये पाय गमावला, तिलाही जयपूर फूट बसवण्यात आला ज्यामुळे अपघातानंतरही तिची अभिनेत्री आणि नृत्यांगणा म्हणून कारकीर्द सुरू राहीली हे याचं उत्तम उदाहरण आहे.
सन्मान आणि सत्कार
या संस्थेचा आणि संस्थेच्या संस्थापकांचा अनेक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय. देवेंद्र मेहता यांना २००८ साली पद्म भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. १९९८ साली भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीला अपंगांच्या पुनर्वसनासाठी काम करणा-या सर्वोत्कृष्ट संस्थांसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९८२ साली भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीला अपंगांसाठी काम करणारी सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
मदतीचा वटवृक्ष
१९७५ साली स्थापन झालेली भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती अपंगासाठी काम करणारी सध्याच्या घडीला जगातली सर्वात मोठी संस्था बनली आहे. या संस्थेच्या संपर्कात आत्तापर्यंत देशातले तसंच विदेशातले मिळून १.४५ दशलक्ष अपंग आणि पोलिओचे रूग्ण आलेले आहे.
या जनतेला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता असं विचारल्यावर डी. आर. मेहता म्हणाले “ दुखा:त, वेदनेत असलेल्यांना ‘आपलं‘ म्हणून मदत करा. मदत केल्यानंतर तुम्हाला जो आनंद मिळेल तो अविस्मरणीय आणि सहसा कधीही न मिळणारा असा असेल.”