मोटरसायकलची दुरूस्ती आणि सर्व्हिसिंगसाठी घरपोच सेवा- ‘लेट्स सर्विस’
एखादी चांगली कल्पना खूप विचार केल्यानंतरच सुचते असं नाही तर अचानक तुमच्या डोक्यात एक विचार येतो आणि तुम्ही तो कृतीत आणल्यानंतर तुमच्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळते. असंच काहीसं घडलंय सचिन शिनॉय यांच्याबाबतीत...आपल्या स्टार्टअपची सुरवात करण्यासाठी धावपळ करत असताना एकदिवस त्यांची मोटरसायकल खराब झाली. दुरूस्तीसाठी त्यांना दहा हजार रुपये खर्च आला पण त्याबरोबर त्यांना खूपच मनस्ताप सहन करावा लागला. यातूनच त्यांना अचानक एक कल्पना सुचली आणि त्यांनी गिरीश गंगाधर, सचिन श्रीकांत आणि मनोज पारेकम या तीन मित्रांच्या साथीनं ‘लेट्स सर्व्हिस’ ची स्थापना केली. लेट्स सर्व्हिस ही बंगळुरूमधील ऑन डिमांड मोटरसायकल सर्व्हिसिंग करुन देणारी कंपनी आहे. ग्राहकांनी कंपनीच्या वेबसाईटवर आपल्या बाईकची नोंदणी केली की कंपनीचा मेकॅनिक येऊन गाडीच्या कागदपत्रांची तपासणी करतो आणि मोटकसायकल घेऊन जातो, तसंच दिलेल्या वेळेत गाडी दुरुस्त करुन आणून देतो. या सेवेबरोबरच ग्राहकांना मोबाईल अलर्टवरुन त्यांच्या गाडीच्या दुरूस्तीबाबतची माहिती आणि कधीपर्यंत गाडी मिळेल याचीही माहिती कंपनीतर्फे पुरवली जाते.
ज्या लोकांना वेळेअभावी आपली गाडी सर्व्हिसिंग करता येत नाही त्यांना लेट्स सर्व्हिसच्या सेवेचा फायदा होतो. त्याचबरोबर गाडीत नेमका काय बिघाड झालाय हे सोप्या भाषेत समजावून सांगण्याचं कामही कंपनीचे लोक करतात. त्याचबरोबर गाडीचा विमा, प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्राचं नुतनीकरण यासारख्या सेवाही कंपनीतर्फे दिल्या जातात.
कंपनी स्थापन केल्यानंतर पहिल्या चाळीस दिवसातच त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला. सध्या लेट्स सर्विसचा शहरातील साठ अधिकृत सर्व्हिस सेंटरसोबत करार आहे. दिवसाला किमान २० मोटरसायकल दुरूस्तीचं काम ते करतात. पुढील दोन महिन्यात दरदिवसाला किमान ८० मोटरसायकल दुरूस्तीचं लक्ष्य आहे आणि तेही परवडणाऱ्या मोबदल्यात असं सचिन सांगतात.
जवळपास १२ ते १३ लाख रुपये खर्चून या व्यवसायाची सुरूवात केल्याचं सचिन सांगतात. चांगली टीम आणि चांगल्या यंत्रणेवर त्यांनी सर्वाधिक खर्च केला. कंपनीचा विस्तार करण्यासाठी आता त्यांना आणखी गुंतवणूदारांची आवश्यकता आहे. एका अहवालानुसार एकट्या बंगळुरू शहरात दरमहिन्याला सुमारे साठ हजार मोटरसायकल विकल्या जातात आणि दरमहिन्याला दीड लाख मोटरसायकलची सर्व्हिंसिंग केली जाते. गेल्या काही दिवसात सर्व्हिसिंग करुन देणाऱ्या अनेक कंपन्या सुरू झाल्या आहेत, पण अजूनही या बाजारपेठेत खूप संधी असल्याचं सचिन सांगतात. त्यामुळेच स्पर्धा निर्माण झाल्यानं दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रेरणा मिळते आणि हीच लेट्स सर्व्हिसची खरी शक्ती असल्याचं सचिन सांगतात.