आता शेतीमालही ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध, postall.in वर करा कृषी उत्पादनांची खरेदी विक्री
मेक इन इंडियाचं वारं सध्या देशात जोराने वाहत आहे. अनेक परदेशी उद्योगांबरोबर सामंज्यस्य करारही झाले आहेत. यानिमित्ताने करोडोची परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणि देशात होणार आहे. मोठे उद्योग या निमित्ताने देशात येणार आहेत. मेक इन इंडियाच्या ह्या उपक्रमात विदर्भ मराठवाड्याच्या मागास भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वस्त्रोद्योग क्षेत्रात देखील लक्षणीय गुंतवणूक येऊ घातली आहे.
असाच एक प्रयत्न शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केला आहे पुण्याच्या निरंजन माने यांनी. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळावा आणि त्यांची कंत्राटदार आणि व्यापारी यांच्याकडून होणारी पिळवणूक थांबावी या उद्देश्याने या अभियंत्याने कृषी उत्पादनांसाठी खास postall.in हे संकेतस्थळ विकसित केलं आहे.
महाराष्ट्रात अनेक शेतकरी सेंद्रिय उत्पादनं घेतात, किंवा इतर अनेक विविध जातींची उत्पादनं घेतात. फळं पिकवणारे शेतकरी फळं काढणीला येण्याआधी त्यांची बाग कंत्राटदाराला विकतात, कंत्राटदार ती फळं व्यापाऱ्याला विकतात आणि मग व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना विकतात. हेच इतर कृषी उत्पन्नांच्या बाबतीतही होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळायला हवा तो मोबदला मिळतच नाही. भारतीय शेती हायटेक झाली पण शेती माल विकण्याची पद्धत अजूनही पारंपरिक आहे. त्यामुळे शेतकरी अजूनही वंचितच राहिला. शेतकरी ते ग्राहक अशी शेतीमालाची थेट विक्री करता यावी, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांचा योग्य मोबदला मिळावा आणि ग्राहकांनाही चांगल्या दर्जाची कृषी उत्पादनं रास्त दरात मिळवीत या उद्देश्याने निरंजन माने यांनी postall.in हे संकेतस्थळ सुरु केलं.
इंन्टरनेट च्या आजच्या युगात सगळ्याच गोष्टी ऑनलाईन उपलब्ध झाल्या आहेत. आपल्याला लागणारी प्रत्येक वस्तू आज आपण ऑनलाईन खरेदी करू शकतो आणि ती विकू पण शकतो. मग कृषी उत्पादनं का नाहीत असा विचार निरंजन यांच्या मनात आला आणि त्यांनी postall.in हे संकेतस्थळ सुरु केलं.
या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील शेतकरी आपल्या उत्पादनाची जाहिरात मोफत करू शकतो. ही जाहिरात पाहून ग्राहक त्यांना पाहिजे असलेल्या गोष्टी ऑनलाईन मागवू शकतात.
साधारण दोन महिन्यांपूर्वी माने यांनी हे संकेतस्थळ सुरु केलं. आता पर्यंत सुमारे ४०० शेतकऱ्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या जाहिराती postall.in वर केल्या आहेत. याचा फायदा झाला तो उस्मानाबादच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला.
उस्मानाबादचे श्याम जाधव हे सेंद्रिय द्राक्षांचं उत्पादन घेतात. त्यांनी त्यांच्या द्राक्षांची जाहिरात postall.in वर केली. जाधव यांची जाहिरात पुण्यातील ग्राहकांनी बघितली आणि द्राक्षं मागवली. जाधव यांनी पुण्यात येऊन त्यांच्या शेतातील सुमारे २ हजार किलो द्राक्षं पुण्यात येउन विकली. जाधव सांगतात," द्राक्ष व्यापाऱ्यांना विकण्यापेक्षा postall.in वर विकल्यास १५ ते २० टक्के अधिक नफा होतो. फक्त पूर्वी आम्ही द्राक्ष खोक्यात विकायचो नाही, अशीच व्यापाऱ्याला द्यायचो. आता मात्र आम्हाला खोक्यामध्ये बंद करून ती विकावी लागतात. शिवाय यामुळे आमचं आणि आमच्या उत्पादनांचं नावंही होतं."
ग्राहकांप्रमाणे व्यापारीही या संकेतस्थळावरून माल खरेदी करू शकतात. postall.in वर कांदा व्यापाऱ्यांनी कांदे पाहिजे असल्याची जाहिरात दिली आणि त्या जाहिरातीला कांदे उत्पादक शेतकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असं निरंजन माने सांगतात. तसंच गावरान कोंबड्या शहरात सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. या गावरान कोंबड्यांची जाहिरात या संकेतस्थळावरून केली जाते आणि त्याला प्रतिसाद मिळतो असं माने यांनी सांगितलं. द्राक्ष आणि कांद्याबरोबर जरबेरा फुलांचं पिक घेणारे शेतकरीही त्यांच्या फुलांची जाहिरात यावर करतात.
निरंजन माने हे मुळचे लातूरचे. पण त्याचं शिक्षण पुण्यात झालं. ते इलेक्ट्रोनिक इंजिनियर असून पुण्यातील एका सोफ्टवेअर कंपनीत काम करतात. माने यांची लातूरला शेती आहे. त्यामुळे शेती उत्पादनाला समाधनकारक भाव मिळत नाही हे त्यांना माहित आहे. त्यामुळेच त्यांनी postall.in सुरु केलं. सध्या यामध्ये त्यांनी स्वतः गुंतवणूक केली असून, याचा फायदा फक्त शेतकऱ्यांना व्हावा हा त्यांचा विचार आहे. कोणतीही जाहिरात न करता या संकेतस्थळाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यापुढे तो प्रतिसाद वाढेल असा त्यांचा विश्वास आहे.
शेतीतील सेंद्रिय उत्पादनं किंवा द्राक्षं, अांबा, केळी यासारखी फळं, गावरान कोंबडी किंवा दुधाची उत्पादनं किंवा समुद्रातले ताजे मासे या गोष्टी आता शहरातही उपलब्ध झाल्या आहेत. तेही एका क्लिक वर. postall.in या संकेत स्थळाच्या माध्यमातून तुम्हाला हवी असलेली कृषी दर्जेदार उत्पादनं तुम्हाला घरपोच मिळणार आहेत.
शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांची स्वतंत्र जाहिरात करायची झाल्यास त्याचा खर्च खूप येतो. पण निरंजन माने यांनी postall.in हे माध्यम मोफत जाहिरात करण्यासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्याने कृषी क्षेत्रातील मेक इन इंडियाला हातभार लागला असं म्हणायला हरकत नाही.
आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या.
आता वाचा संबंधित कथा :