आता लक्ष एकच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अव्वल होण्याचं

आता लक्ष एकच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अव्वल होण्याचं

Tuesday October 27, 2015,

4 min Read

सन २००६...पुण्यातला स्वारगेटजवळचा शिवाजी रोड... १३ वर्षांची आठवीत शिकणारी एक मुलगी... आपल्या ताईचा हात पकडून जिजामाता हायस्कूलमध्ये प्रवेश करत होती. एका नव्या इनिंगची सुरुवात करण्यासाठी.. खरं तर गेल्या ३ वर्षांत तीने जिम्नॅस्टिकचे धडे गिरवले होते. पण तिचं मन तिथं रमत नव्हतं. तिचे वडिल अव्वल दर्जाचे बॉक्सर... त्यामुळे आपल्या लेकीनं लैला मोहम्मद अलीसारखं अव्वल बॉक्सर बनावं हे त्या वडिलांचं भाबडं स्वप्नं... पण नियतीच्या आणि तिच्या मनातही काही वेगळंच होतं. तिची ताई किशोरी शिंदे कबड्डीपटू. ताईचा खेळ ती टक लावून पाहायची... तिचंच बोट धरून कबड्डीतल्या नव्या इनिंगला सुरुवात करत होती...

स्नेहल शिेदे

स्नेहल शिेदे


आणि आज तब्बल ९ वर्षांनंतर ती पुन्हा एकदा नेहमीसारखीच जिजामाता हायस्कूलच्या प्रांगणात प्रवेश करत होती.. पण आता तिचं स्वागत होत होतं ते युद्धातून विजयी होऊन परतलेल्या रणरागिणीसारखं. तिच्या सहकाऱ्यांच्या डोळ्यात दिसत होता अभिमान. कारण त्याच चिमुरडीला आज जाहीर झाला होता महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च आणि मानाचा समजला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार...

पण तरीही ही मात्र निश्चल होती. कौतूकाचा आनंदानं स्वीकार करत असतानाही तिच्या मनात कोणताही गर्व नव्हता. तिची पावलं अजूनही जमिनीवरच होती. उलट जबाबदारी वाढली होती.. त्याच जाणिवेनं तिनं कबड्डीचं किट चढवलं. मैदानाला नमस्कार केला आणि रोजच्यासारखी सरावाला सुरुवात केली.. ही गोष्ट आहे महाराष्ट्राचं कर्णधारपद भुषवलेल्या, अनेक पदकांची, बक्षिसांची कमाई केलेल्या स्नेहल शिंदेची...

image


वयाच्या तेराव्या वर्षी सुरु केलेल्या कबड्डीच्या प्रवासाला पुरस्काराचं कोंदण लाभलं होतं. पण या यशामागे होती... जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि कठोर मेहनत... कबड्डी आणि दुखापत हे घट्ट समीकरणच... अनेक कबड्डीपटूंची कारकिर्द ऐन बहरात संपली किंवा दीर्घकाळ ब्रेक लागला... याची पुरेपूर जाणीव असल्यानंच ती कठोर सरावाला प्राधान्य देते. दररोज सकाळी ३ तास ती जिममध्ये घाम गाळते. एखाद्या पुरुष खेळाडूलाही लाजवेल असा. पण एवढंच नाही तर फिटनेससाठी तिनं जीभेवर ताबा मिळवलाय. जंक फूड, फास्ट फूड, अरबट-चरबट खाणं तिच्या डिक्शनरीत नाही. गेल्या कित्येक वर्षांमध्ये सांभाळलेलं हे पथ्यपाणी. म्हणूनच आजही कबड्डीच्या मैदानात तासन तास अटॅक करण्याची तिची क्षमता आहे.

आक्रमक रेडर ही तिची ओळख. तिचं आक्रमण असतं वाघिणीसारखं. आक्रमकपणे खोलवर चढाई करुन प्रतिस्पर्धी संघ गारद करण्यात पटाईत. पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाकडून खेळताना प्रशिक्षक राजेश ढमढेरेंच्या हाताखाली तिने कबड्डीचे धडे गिरवले. याच बाळकडूतून तयार झालेल्या या वाघिणीनं मग कबड्डीचं मैदान दणाणून सोडलं. अनेक मानाचे पुरस्कार तिनं संघाला पटकावून दिले.. याच कामगिरीमुळे राष्ट्रीय कबड्डी संघात तिला स्थान मिळालं.

मुंबईत २०१२ साली झालेल्या शिवछत्रपती राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिला महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. रेल्वे संघानं फायनलमध्ये पराभव केल्यानं त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. पण तिची घोडदौड सुरुच होती..दोनच वर्षानंतर होत असलेल्या पाटण्यातल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राची धुरा तिच्यावर सोपवण्यात आली. पण दुर्दैव आड आलं. सरावादरम्यानच ती जायबंदी झाली. महाराष्ट्राच्या मुलींनी सेमी फायनलपर्यंत धडक दिली. आता समोर होता हरयाणाचा अंगानं ताकदवान असलेला संघ. मुली कमजोर पडल्या. लढाई हरण्याची चिन्ह दिसत असताना कॅप्टन स्नेहलला मैदानात उतरवण्यात आलं. दुखावलेल्या पायानं ती मैदानावर उतरली खरी. पण लढाई गमवावीच लागली. महाराष्ट्राला अजिंक्यपद पटकावून देण्याचं तिचं स्वप्न भंगलं होतं...

image


पण पहिल्यावहिल्या महाकबड्डी लीगमध्ये तिनं नेतृत्व दाखवून दिलं. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशननं सुरु केलेली खास महिलांसाठीची ही व्यावसायिक स्पर्धा. राजमाता जिजाऊच्या अव्वल स्नेहल शिंदेला बोली मात्र लागली चौथ्या क्रमांकाची. राजमाताच्याच नेहा घाटगेला पहिली, मुंबई उपनगरच्या अभिलाषा म्हात्रेला दुसरी, राजमाताच्याच सायली केरिपाळेला तिसरी बोली लागली. दोघींमध्ये फक्त दोन हजारांचा फरक होता. त्यावर स्नेहलची प्रतिक्रिया होती, 'बरं हाय की, माझ्यावर प्रेसचं आणि लोकांचंही जास्त लक्ष नसेल आणि अपेक्षाही'..

पण ठाणे टायगर्सच्या या वाघिणीनं प्रतिस्पर्धी संघाना लोळवलं. आक्रमणाची धुरा एकटीनं समर्थपणे पेलली. तिला जेरबंद करण्याचे सगळे प्रयत्न फोल गेले. आक्रमक रेडच्या जोरावर तीनं संघाला फायनलचं तिकीट मिळवून दिलं. पण फायनलचं आव्हान आणखी कठीण होतं. कारण प्रतिस्पर्धी बारामती हरिकेन्सच्या प्रत्यक्ष मैदानावर खेळणाऱ्या सातपैकी चार महत्त्वाच्या कबड्डीपटू होत्या राजमाताच्याच.. राजेश ढमढेरे या एकाच कोचकडून कबड्डीचं तंत्र घोटवलेल्या. जीवलग मैत्रिण पण आता प्रतिस्पर्धी संघाची कॅप्टन नेहा घाटगे, बलाढ्य रेडर स्नेहल माणिक शिंदे, ऑल राऊंडर मोनिका शिंदे आणि बचावपटू पायल घेवारे.

अटीतटीच्या युद्धात स्नेहलनं बाजी मारली. तिला रोखण्याचे मनसुबे उधळले गेले. सोनाली इंगळेच्या आणि टीमच्या साथीनं तीनं पहिल्यावहिल्या महाकबड्डी लीगवर ठाणे टायगर्सचं नाव कोरलं... ठाणे टायगर्सची ही वाघीण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरली.

एका सर्वसामान्य कुटुंबातली ही मुलगी. पण आपल्या कामगिरीच्या जोरावर कबड्डीत महाराष्ट्राचं नाव गाजवतेय. पुण्याच्या शाहू कॉलेजमधून एम.कॉम करतेय. अभ्यास, सराव आणि मॅच अशी तारेवरची कसरत करतेय. आंतरराष्ट्रीय पातळीवर तिला देशासाठी सुवर्ण कामगिरी करायचीय. त्यासाठी अनेक गोष्टींचा तिनं त्याग केलाय. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात फेसबूक, व्हॉट्सएपपासून ती दूर आहे. यापेक्षा तिच्या ध्येयाबद्दल अधिक काय बोलावं...