४६ वर्षापासून अविरतपणे निराधारांची मदत करणारे अमरजीत सिंह सूदन
काही लोकांना आपल्या पारिवारिक सुखापेक्षा भोवताली असलेले गरीब, निराधार व त्रस्त लोकांचे दु:ख मोठे वाटते. त्यांच्या सेवेसाठी ते आपले सर्वस्व पणाला लावतात. अनेक संकट आली तरी ते आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडतात. अशीच एक व्यक्ती अमरजीत सिंह सूदन ज्यांनी ४६ वर्षापासून गरिबांच्या सेवेत स्वतःला वाहून घेतले. इंदोर मध्ये फादर टेरेसा या नावाने ओळखले जाणारे अमरजीत सिंह सूदन पापाजी यांना गरिबांचा देवदूत मानले जाते. गरिबांच्या मदतीसाठी सूदन पापाजी २४ तास तत्पर असतात. रस्त्यात कुणी आजारी, विक्षिप्त, विवश असे लोक दृष्टीस पडले आणि मदतीसाठी जर आपण पोलीस कंट्रोल रूमला फोन केला तर आपल्याला तिथून एकच नंबर मिळेल, सूदन पापाजी यांचा. ते गरीबांचा एकमेव आधार आहे. सूदन हे आपल्या हातांनी अशा लोकांना उचलून दवाखान्यात किंवा आश्रमात घेऊन जातात, आंघोळ घालतात,स्वच्छ कपडे देतात व ते पूर्ण बरे होईपर्यंत सेवा करतात. कधी कधी परिस्थिती इतकी भयंकर असते की सरकारी अॅम्बुलेंसवाले पण त्यांना हात लावायला तयार नसतात अशा ठिकाणी सूदन पापाजी उभे रहातात. मागच्या ४६ वर्षापासून सूदन यांचे हे समाजकार्य अविरत सुरु आहे.
६० वर्षांच्या सूदन यांचा समाजकार्याचा प्रवास त्यांच्या वयाच्या १४ व्या वर्षी सुरु झाला. खंडवा येथील लौहरि गावात गुरुद्वारामध्ये जात असताना सूदन यांना रस्त्यात एक ८५ वर्षीय म्हातारी स्त्री दिसली जी मुसळधार पाऊसात भिजत होती, जिच्या पायात किडे पडले होते ती चालू शकत नव्हती, तिच्या शरिराची दुर्गंधी येत होती. सूदन यांनी त्या स्त्रीला पाठीवरून गुरुद्वारामध्ये आणले. गुरुद्वारातील पंडितांकडून परवानगी घेऊन तिची राहण्याची सोय करून तिला लंगरचे जेवण दिले. दुसऱ्या दिवशी टांग्यातून त्या स्त्रीला दवाखान्यात भरती करून तिच्यावर उपचार सुरु केला. पुढच्या तीन महिन्यात ती स्त्री बरी झाली. या घटनेनंतर सूदन यांची समाजकार्याला सुरवात झाली व बालक सूदन हे सूदन पापाजी बनले. सूदन हे रस्त्यावर त्यांचे विजिटिंग कार्ड वाटतात ज्यावर त्यांचा मोबाईल नंबर व नावासहित एक संदेश आहे की,’’रस्त्यावर पडलेल्या विवश लोकांना बघून नाक तोंड बंद नका करू, मला एक कॉल करून मानवतेचा धर्म पाळा’’.
आज सूदन इंदोरच्या सगळ्या सरकारी दवाखान्यात पोलीस विभागात व संस्थानांमध्ये परिचित नाव आहे, जे काम करायला कुणी धजत नाही ते सूदन यांचा मोबाईल नंबर फिरवतात.
सूदन यांचे समाजसेवेचे हजारो किस्से आहेत. पण असे काही किस्से आहेत जिथे सूदन यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. २००५ मध्ये सूदन यांना पोलीस विभागातून फोन आला की इंदोरच्या बिलावली तलावात एका तरुणीचे प्रेत आहे. प्रेताची हालत जास्तच खराब असल्यामुळे कुणीही ते काढायला धजावत नव्हते. सूदन पापाजी मदतीसाठी धावून आले. त्यांनी प्रेत काढले पण ते पूर्णपणे सडले होते. प्रेतावर कपडे पण नव्हते. तमाशा बघणाऱ्या लोकांना पापाजींनी विनंती केली की प्रेत झाकायला कुणी तरी कपडा द्यावा पण कुणीच तयार झाले नाही. पापाजींनी आपली पगडी काढून प्रेत झाकले. पण या घटनेनंतर समाजात वाद वाढला. सिख समाजाने पापाजींविरुद्ध मोर्चा काढला. पण पापाजींनी निर्भीडपणे पंचायती मध्ये स्वतःची बाजू पटवून कशी आपल्या गुरूंनी समाजकार्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली यावर प्रकाश टाकला.
पंचायतीने त्यांना दोषी ठरविण्याचा निश्चय केलाच होता पण परिस्थिती बदलली. पंचायतीने सभा बोलावून पापाजींना सन्मानित केले व समाजासमोर त्यांचे उदाहरण ठेवले. २००८ मध्ये इंदोरच्या आईटी पार्कच्या निर्माण प्रक्रीयेदरम्यान मजुरांवर लिफ्ट पडली ज्यात ८ मजूर त्याच्या खाली दाबले गेले. सूचना मिळताच पोलीस व आगीचा बंब येण्या अगोदर पापाजी तिथे हजर होते. लोकांच्या मदतीने मजुरांना काढून दवाखान्यात पाठविण्याचे काम सुरु केले. शेवटच्या मजुराला आपल्या पाठीवरून अॅम्बुलेंसकडे घेऊन जात असतांना पापाजी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यांना दवाखान्यात ताबडतोब भरती करावे लागले. शहरातील हजारो हाथ त्यांच्या स्वास्थ्यासाठी देवाकडे जोडले गेले. तीन महिन्यांपर्यंत जीवन मरणाच्या लढाईत मरणावर मात करत शेवटी पापाजी परत आपल्या समाजकार्यात रुजू झाले.
इंदोरच्या ज्योती निवास आश्रम मध्ये १० ते ९० वर्षापर्यंत असे अनेक बेवारशी व अनाथ लोक आहेत जे कधी रस्त्यावर निराधार पडले होते. ज्यांना पापाजींनी आश्रमात नेऊन नवजीवन दिले. या मध्ये अनेक अर्धविक्षिप्त आहे जे बोलू शकत नाही, पण त्यांची नजर रोज संध्याकाळी सूदन पापाजींच्या येण्याच्या वाटेवर असते. पापाजी पण त्यांना निराश न करता रोज आवर्जुन भेटायला येतात. त्यांच्या येण्याने या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणीत होतो.
पापाजी फक्त अनाथांचीच मदत करतात असे नाही तर रोज संध्याकाळी आपल्या कार्यालयातून निघाल्यावर चौरस्त्यावर वाहतूक कोंडीच्या नियंत्रणाची धुरा सांभाळतात. रोज संध्याकाळी वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांना सुरळीत बाहेर काढण्यासाठी मदत करतात. पापाजींना आतापर्यंत अनेक सन्मानांनी गौरवांकित करण्यात आले आहे. त्यांची खोली ही मिळालेल्या बक्षिसांनी भरून गेली आहे. पण हे बक्षीस ते लपून ठेवतात. ते सांगतात की,’’हे बक्षीस बघून मला अहंकार नको वाटायला. मी नशीबवान आहे जे मला देवाने पैसे कमवण्याऐवजी लोकांचे आशिर्वाद कमवण्याची संधी दिली. आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हे कार्य असेच सुरु रहाणार आहे’’.
सूदन हे पेशाने एलआईसी एजंट होते. पण आपल्या या कामामुळे त्यांना समाजकार्यासाठी वेळ अपुरा पडत होता, त्यानंतर त्यांनी एलआईसीचे काम बंद केले. सूदन यांना वडिलोपार्जित दोन दुकानं मिळाली ज्याच्या भाड्यानेच पापाजींचा घरखर्च चालतो. जर बचतच्या नावाने काही शिल्लक रहात असेल तर ती रक्कम सुद्धा या कार्याला भेट दिली जाते.
आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या.
आता वाचा संबंधित कथा :
छतीसगढच्या ६५ वर्षीय विश्वनाथ पाणीग्रहींनी गावागावात राबविली स्वच्छता ग्राम अभियान मोहीम
दुष्काळी भागात हरितक्रांती घडवणारा महापुरुष : सिमोन उराव
जीवन-मरणाच्या अनुभवातही रुग्णालयाच्या तळघरात चालतो मानवतेच्या सेवेसाठी ‘संयोग ट्रस्ट’चा ‘सावली विश्रामधाम’ उपक्रम!
लेखक : सचिन शर्मा
अनुवाद : किरण ठाकरे