शाळेच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ‘यलो बॅग'चा 'थ्री इन वन' पर्याय
रोज सकाळी शाळेत जातांना मुलांच्या चेहऱ्यावर दप्तराच्या ओझ्याचा ताण स्पष्ट जाणवायचा. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी अनेकांनी कल्पना मांडल्या, सरकारने पण अनेक धोरणे राबवले पण त्याचा काही अपेक्षित परिणाम झाला नाही. या व्यतिरिक्त एका व्यक्तीने समस्येला गंभीरतेने घेऊन एक असे शाळेचे दप्तर बनवले ज्याचे वजन फक्त २०० ग्रॅम आहे. या दप्तरावर पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही आणि विशेष गोष्ट म्हणजे जमिनीवर बसल्यावर मुलं याचा टेबलाच्या रुपात वापर करू शकतात तसेच यामध्ये वापरलेली सोलर लाईट याची अजून एक विशेषता आहे, म्हणजे ज्या भागात विजेची समस्या असेल तिथे मुलं याच्या उजेडात आपला अभ्यास करू शकतील. देशात शिक्षण घेणे हा प्रत्येक मुलाचा मुख्य अधिकार आहे सरकार सुद्धा प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोहचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. सरकारी योजनेतंर्गत बऱ्याच शाळेत मुलांना मोफत गणवेश व पुस्तके वाटप तसेच दुपारचे जेवण उपलब्ध करवले जाते, ज्यामुळे गरीबातील गरीब मुलाला शिक्षणाची संधी उपलब्ध होईल. या शिवाय मुलांसमोर सगळ्यात मोठी अडचण म्हणजे शाळेतून मिळालेली पुस्तके कशात ठेवायची कारण या मुलांकडे कोणतेही चांगले शाळेचे दप्तर नसतात. मुलांची हीच अडचण ओळखून तिला निवारण्याचा प्रयत्न केला आहे राज्यस्थान स्थित उदयपुर निवासी मनीष माथुर यांनी.
मनीष यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर उदयपूरच्या एका कॉलेजमधून बीबीए चा अभ्यासक्रमपूर्ण केला. यानंतर त्यांनी २००९ मध्ये गुडगावच्या स्काय लाइन बिजनेस स्कूल मधून मानव संसाधन हा विषय घेऊन एमबीए केले त्यानंतर वर्षभर उदयपुर येथील ताज लेक पॅलेस मध्ये एचआर व्यवस्थापकाच्या रुपात नोकरी केली त्यानंतर २ वर्ष पायरोटेक वर्क्स स्पेस मध्ये व्यवस्थापक म्हणून काम केले. नोकरीच्या दरम्यान मनीष विचार करू लागले की दुसऱ्यांपेक्षा काही तरी वेगळे केले पाहिजे ज्याचा समाजासाठी उपयोग होईल, हेच एक कारण होते की त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन वर्ष वेगवेळ्या ठिकाणी कामाचा अनुभव घेतला.
मनीष यांनी युवर स्टोरीला सांगितले की,’’ मी उदयपूरच्या सरकारी शाळेत शिकलो जिथे जवळपास अनेक जनजातीचे लोक रहातात ज्यांची मुलं तेथील सरकारी शाळेत शिकतात. इथे शाळेतून मुलांना एप्रिल–मे मध्ये जी पुस्तकं मिळायची ती पावसात भिजून ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंत फाटून जायची आणि फेब्रुवारीमध्ये परीक्षेच्या दरम्यान त्या पुस्तकांचा काही उपयोग होत नव्हता.” मनीष यांचे ठाम मत आहे की आपण कितीही विकासाच्या गोष्टी केल्या तरी गावाकडे आज पण १ ते ५ वीच्या मुलांना जमिनीवर बसून व घरी वीज नसल्यावर कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करावा लागतो. या दोन समस्यांमुळे त्यांच्या पाठीच्या मणक्याला त्रास होतो व कमी उजेडात वाचन केल्यामुळे डोळ्यांवर पण परिणाम होतो.
मनीष यांनी २०१४ मध्ये आपली नोकरी सोडून आपल्या विचारांना सत्यात परिवर्तीत करण्याचा निश्चय केला. त्यांनी निर्णय घेतला की ते अशी बॅग बनवतील जी भविष्यात मुलांसाठी फायदेशीर असेल आणि त्यांचे पुस्तके पण सुरक्षित रहातील. या प्रकारे ६ महिने त्यांनी व त्यांच्या मित्रांनी कठीण परिश्रमानंतर ऑक्टोबर २०१४ मध्ये एक अशी बॅग तयार करून आपल्या स्वप्नाची पूर्ती केली.
मनीष यांनी या बॅगचे नामकरण केले ‘यलो’. या बॅगचे वैशिष्ट म्हणजे शाळेत जाता येता ती दप्तराचे काम करते तसेच पॉलीप्रॉपलीन या रसायनाच्या वापरामुळे पाण्याचा या बॅगवर कोणताही परिणाम होत नाही. तसेच अभ्यासादरम्यान ३५ डिग्रीच्या कोनात हे टेबलाचे काम करते. या बॅग मध्ये एक सोलर एलईडी बल्ब लावला आहे ज्यामुळे मुले रात्रीसुद्धा याच्या उजेडात आरामात अभ्यास करू शकतील.
मनीष सांगतात की कोणत्याही उद्यमाला सुरवात करतांना अडचणी येतात जर तो व्यवसाय समाजाशी निगडीत असेल तर कुणीही सहयोग करत नाही कारण मिळकतीची शाश्वती खूप उशिरा असते. मनीष यांनी सुरवात आपल्या बचतीच्या पैश्यापासून केली तसेच गरज पडल्यावर त्यांचे मित्र व नातेवाईक यांच्याकडून उधार घेतले. या कामात त्यांना कुटुंबाकडून तसेच मित्रांकडून पूर्ण सहयोग मिळाला.
मनीष यांनी ‘यलो बॅग’ ची निर्मिती गरीब मुलांना डोळ्यासमोर ठेवून केली आहे म्हणून पॉलीप्रॉपलीनने तयार केलेली एक मजबूत व पाण्याचा प्रभाव न होणारे हे एक प्लॅस्टिकचे दप्तर आहे. या दप्तराला कोणताही जोड नाही पूर्णपणे एका साच्यात तयार केले आहे त्यामुळे शिलाई उसवण्याची भीती नाही तसेच या दप्तराचे वजन फक्त २ ग्रॅम आहे. मनीष सांगतात की कोणत्याही अडचणी शिवाय हे दप्तर एक वर्ष आरामात चालू शकेल. मनीष यांनी कमीत कमी खर्चात ‘यलो बॅग’ची निर्मिती केली आहे. बाजारात हे उत्पादन आणतांना मनीष यांनी विचार केला की मी, ‘’ज्या गरीब मुलांना विचारत घेऊन ही बॅग बनवली आहे ते ५० रुपया पर्यंतची कोणतीही वस्तू विकत घेऊ शकत नाही परंतु या बॅग ची किमंत तर ७९९ रुपये आहे तर त्यांना हा खर्च कसा परवडणार?” म्हणून मनीष यांनी या बॅगला एनजीओ, कॉर्पोरेट व सरकारी विभागातर्फे या बॅग चे गरीब मुलांना मोफत वाटप करण्याचा विचार केला. त्यांनी बघितले की अनेक कॉर्पोरेट सीएसआर योजनेच्या अंतर्गत शिक्षण क्षेत्रात आपले मोलाचे योगदान देत आहेत. मनीष यांनी औद्योगिक व व्यावसायिक कंपन्यांचे प्रमुख महिंद्र अंड महिंद्रा, एलएनटी, टाटा, एचडीएफसी यांच्या मार्फत जवळजवळ ५ हजार बॅग चे आतापर्यंत गरीब मुलांमध्ये वाटप केले आहे. या बॅगचे त्यांनी चैन्नई, कोयंबतूर मुंबई, कल्याण, छत्तीसगढ व राज्यस्थानमध्ये वाटप केले आहे. सरकारी स्तरावर मानव संसाधन विकास मंत्रालयात त्यांच्या शोधाची चर्चा सुरु आहे या शिवाय ते अनेक स्वयंसेवी संस्थेशी याच्या करारबद्दल चर्चा करीत आहेत.
आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा संबंधित कहाण्या :
बालमजुरांना ‘गुडविव’कडून शिक्षणाचा ‘गालिचा’
‘विज्ञानवाहिनी’ निवृत्त लोकांनी मुलांच्या विकासासाठी सुरु केलेली एक मोहीम
गरीब मुलांना सर्वोत्तम संधी देण्याचा प्रयत्न करणारी 'परिक्रमा'
लेखक – हरीश बिश्त
अनुवाद – किरण ठाकरे