प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ऑटोरिक्षाचालकाच्या मुलाची युपीएससीच्या परीक्षेत गगनभरारी,जालन्याच्या अन्सार शेखची यशोगाथा

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ऑटोरिक्षाचालकाच्या  मुलाची  युपीएससीच्या परीक्षेत गगनभरारी,जालन्याच्या अन्सार शेखची यशोगाथा

Friday May 27, 2016,

4 min Read

 गेल्या १५-२० दिवसांत अन्सार शेख या नावाला सेलिब्रेटी स्टेटस प्राप्त झालंय. सर्व महाराष्ट्रात ते परीचयाचं झालंय. २२ वर्षांच्या अन्सारनं पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परिक्षा उत्तीर्ण केली. यूपीएससी परिक्षेत त्यानं ३६१ रँक मिळवला. दोन आठवड्यापूर्वी युपीएससीचा निकाल घोषित झाला तेव्हापासून अन्सारवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गेल्या तीन वर्षापासून घेतलेल्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं आहे. अन्सारचा इथंपर्यंतचा प्रवास फार खडतर आणि प्रेरणादायी आहे. अत्यंत सर्वसाधारण घरात वाढलेल्या या मुलानं निव्वळ जिद्द आणि खडतर परीश्रमानं आपलं स्वप्न साध्य केलं आहे. आई शेतमजूर आणि वडील रिक्षाचालक असलेल्या अन्सारने अनेक अडचणींवर मात करत आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या या ध्येयवेड्या तरुणानं अभ्यासाची कास सोडली नाही. तो सतत प्रयत्न करत राहिला. दिवसरात्र अभ्यास करत राहिला आणि आज त्याला अपेक्षित असलेलं य़श मिळालंच. आज तमाम महाराष्ट्रातली जनतेला अन्सारचा अभिमान वाटत आहे. 

image


जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातलं शेलगाव... तिथं शेख कुटुंबात अन्सारचा जन्म झाला. घरात सुरुवातीपासूनच प्रतिकुल परिस्थिती. वडील रिक्षा चालवायचे. आता एका रिक्षाचालकाचं उत्पन्न ते किती असणार. कमावणारा एक आणि खाणारे तोंड चार अशी परिस्थिती. या अशा परिस्थितीत अन्सार लहानाचा मोठा झाला. दहावीपर्यंतचं शिक्षण त्याने जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतले. त्यानंतरचे महाविद्यालयीन १२ पर्यंतचं शिक्षण बद्रिनारायण बारवाले या महाविद्यालयात कला शाखेतून मराठी माध्यमात पूर्ण केले. अन्सारनं दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं आपली घरची परिस्थिती सांगितली. “ माझे बाबा जे रिक्षाचालक आहेत त्यांनी तीन लग्न केली. माझी आई त्यांची दुसरी बायको. घरातली परिस्थिती बेताचीच. आजूबाजूला सर्व घरांमध्ये असंच चित्रं दिसायचं. मी गरिबी पाहिलेय. मी ज्या भागात रहायचो त्या भागात कौंटुंबिक भांडणं नेहमीचीच होती. माझ्या दोन्ही बहिणींची लग्न लहान वयात झाली. परिस्थितीमुळे माझ्या भावाला शिक्षण सोडावं लागलं.”  

image


१२ वी झाल्यानंतर अन्सार आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न घेऊन पुण्यात आला. इथं त्यानं फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश मिळवला, पण पुण्यात राहणं तेवढं सोप्प नव्हतं. घरची हालाखीची परिस्थिती त्यामुळे घरातून खूप कमी पैसे मिळत होते. त्यामुळे त्यानं कमवा आणि शिकाचा मार्ग अवलंबला. लक्ष्य निश्चित होतं. पुणे शहरात आलोय ते आपलं स्वप्न पूर्ण करायला, हे अन्सारचं ठरलेलं होतं. अन्सारनं सांगितलं, " मला दहावी आणि बारावीला चांगले मार्क्स होते. मी कला शाखेत प्रवेश घेतला. मी आधीपासूनच ठरवलं होतं. की आयएएस अधिकारी व्हायचं. देशाची सेवा करायची. त्यामुळे पुण्याला आल्यानंतर मी माझ्या अभ्यासाला सुरुवात केली. मी १० ते १२ तास अभ्यास करायचो. अभ्यास हा एकमेव ध्यास होता. तोच मला पुढे घेऊन जाणार होता, याचा मला विश्वास होता.”

आर्थिक परिस्थिती बेताची होतीच, त्यातून तो मार्ग काढत होता पण पुण्यात आल्यावर त्याला वेगळ्याच परिस्थितीचा सामना करावा लागला. तो म्हणजे राहण्याचा. सुरुवातीच्या काळात त्याला रहायला जागा मिळाली नाही, कारण होतं त्याचा धर्म. तो मुस्लिम असल्यानं त्याला भाड्यानं रहायलाही घर मिळत नव्हतं. पण त्यानं त्यातूनही मार्ग काढला. त्यानं आपलं नाव सांगितलं शुभम भाटकर. ते त्याच्या मित्राचं नाव होतं. नाव बदलल्यावर त्याला रहायला जागा मिळाली. या सर्व प्रकाराबद्दल अन्सारनं एका मुलाखतीत सांगितलं,” मुस्लिम असल्यानं मला अगदी लहानपणापासून अशी दुजाभावाची वागणूक मिळत गेली. मला त्याबद्दल वाईट वाटलं नाही. मी माझा मित्र शुभमचं नाव सांगितलं आणि मला रहायला जागा मिळाली. मी या गोष्टीला आता जास्त महत्व देत नाही. मला शिकायचं होतं, ते माझं ध्येय होत,. मला आयएएस व्हायचं होतं, हा एकच ध्यास होता. त्यामुळे या सर्व बाबींकडे मी गांभीर्यानं पाहत नव्हतो. मी त्या परिस्थितीही अभ्यास केला. मी मराठवाड्यातल्या मागासलेल्या भागातून आलेलो आहे. मी मुस्लिम कुटुंबात आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात वाढलो. मेहनतीने तुमचे दिवस बदलतात. यावर माझा विश्वास आहे.” 

image


युपीएससी परिक्षेची तयारी करत असताना अन्सारनं खूप मेहनत घेतली. प्रसंगी दोन दिवस उपाशी राहून तो मेहनत घेत होता. “पूर्व परीक्षेची तयारी करताना इंटरनेटचा खूप उपयोग झाला. त्याने भरपूर सराव केला. स्वत:च्या नोट्स तयार केल्या. १० ते १२ तास अभ्यास करायचा हे ठरवलेलं होतं. मला मुलाखतीसाठी विशेष अशी तयारी करावी लागली नाही. कारण मुलाखतीमध्ये चांगले मार्क्स मिळतील असा विश्वास मला आधीपासूनच होता.“ अन्सार सांगत होता.

अन्सार सांगतो त्याला प्रशासकीय अधिकारी झाल्यावर पहिलं काम करायचं आहे ते सामाजिक सलोख्यासाठी. “हिंदू-मुस्लिम समाजातली तेढ कमी करण्यासाठी मला प्राधान्यानं काम करायचं आहे. या दोन्ही समाजात एकमेकांबद्दल अढी आहेत, त्या आपण दूर केल्या पाहिजेत. तर आपण समाज म्हणून प्रगत होऊ. मला ग्रामीण भागासाठी काम करायचं आहे. मराठवाडयासारख्या दुष्काळी आणि मागास भागातून आल्यामुळे मला ग्रामीण भागातली परिस्थिती माहितेय. ही परिस्थिती सुधारण्यासाठी मला काम करायचे आहे. ”

अन्सारचं प्रशासनात जायचं स्वप्न पूर्ण झालं असलं तरी त्याची आणखी काही स्वप्न अजून पूर्ण व्हायची आहे. त्याला आईवडिलांसाठी गावाकडे एक घर बांधून द्यायचं आहे. परिस्थितीमुळे ज्या भावाला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं त्याला एखादा व्यवसाय सुरु करुन द्यायचा आहे.

अन्सार शेखच्या पुढील वाटचालीसाठी युवर स्टोरीच्या शुभेच्छा

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

जळगावच्या मराठमोळ्या अनिमा पाटील-साबळे ठरणार तिस-या भारतीय 'अंतराळ वीरांगना'

"मी तुमच्यातलीच एक आहे" इति भारतातली आठवी श्रीमंत महिला अनू आगा

जातीवंत ‘सैराट’ कलाविष्कार साकारणा-या नागराज यांच्या कामगिरीची 'फोर्ब्स'नेही घेतली दखल

    Share on
    close