विवेकी विचारांची पेरणी करुन भावी पिढी घडविण्यासाठी प्रयत्नशील असलेले ‘अक्षरमित्र’

विवेकी विचारांची पेरणी करुन भावी पिढी घडविण्यासाठी प्रयत्नशील असलेले ‘अक्षरमित्र’

Saturday February 06, 2016,

7 min Read

आजकालच्या स्पर्धात्मक युगात शिक्षणाचे महत्त्व हे चांगली नोकरी मिळविण्यापुरते मर्यादित झाले आहे. खरं तर शिक्षणातून माणसाला स्वतःची ओळख होणं, त्याला जगण्याची योग्य दिशा समजणं अपेक्षित असतं. शिक्षणातून माणूस सुशिक्षित बनण्याबरोबरच सुसंस्कृत आणि विवेकवादी बनणं गरजेचं असतं. यासाठी आवश्यक विवेकी विचार मुलांच्या मनामध्ये लहानपणापासून रुजवावे लागतात. अशी संस्कारक्षम भावी पिढी घडवण्यामध्ये पालक, शिक्षक, शिक्षणपद्धती आणि पुस्तकांचा खूप मोठा वाटा असतो. मात्र वाढत्या स्पर्धात्मक वातावरणामुळे पालक, शिक्षक आणि शिक्षणपद्धती या तिनही पातळ्यांवर मुलांना स्पर्धेत टिकण्याच्या दृष्टीने तयार केले जाण्यावर जास्त भर दिला जात आहे. अशा परिस्थितीत मुलांना घडविण्यासाठी आणि एकूणच समाजात होत जाणारा नीतिमूल्यांचा ऱ्हास रोखण्यासाठी विवेकी विचारांच्या साहित्याचे अवांतर वाचन हाच एकमेव आधार ठरु शकतो हे १९ वर्षांच्या आमीर शेखने हेरले आणि समाजसेवी वृत्तीच्या आमीरने मे २०१३ मध्ये आपल्या काही आप्तस्वकीय आणि मित्रांच्या सहाय्याने अहमदनगरमध्ये ‘अक्षरमित्र’ ही संकल्पना राबवायला सुरुवात केली.

image


बाजारात सहजासहजी उपलब्ध न होणारी चांगली विवेकवादी पुस्तके आणि मासिके समाजातील तळागाळातल्या लोकांपर्यंत नेऊन विकण्याचे काम ‘अक्षरमित्र’ करते. “’अक्षरमित्र’ म्हणजे केवळ पुस्तक विक्रीचा व्यवसाय किंवा घरपोच ग्रंथालय नाही. ही एका उद्देशाने राबविली गेलेली वाचन चळवळ आहे,”असं आमीर सांगतो.

तो पुढे सांगतो, “एखादं ग्रंथालय सुरु करुन लोक आपल्याकडे येतात का याची वाट न पाहता आपल्या उद्देशपूर्तीसाठी दर्जेदार साहित्य घेऊन आपण लोकांपर्यंत जायचं हे आम्ही सुरुवातीपासूनच निश्चित केलं होतं. आपल्याकडे शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. अशा संस्थांमार्फत विद्यार्थ्यांसाठी खूप दर्जेदार साहित्य निर्माण केलं जातं. विशेष म्हणजे अशा संस्थांपैकी अनेक संस्था शासकीय असल्यामुळे त्यांच्या पुस्तकांची किंमत खूप कमी असते. मात्र त्याचमुळे मार्जिन कमी मिळत असल्याने ही पुस्तकं बुक डेपोमध्ये उपलब्ध होत नाहीत. अशी पुस्तकं तळागाळातल्या मुलांपर्यंत पोहचवायचं आम्ही ठरवलं.”

image


“या चळवळीमध्ये सुरुवातीपासून माझे काही मित्र आणि माझा छोटा भाऊ शाहरुख यांनी मला मोलाची साथ दिली. आम्ही आठ जण ‘अक्षरमित्र’साठी प्रत्यक्ष फिल्डमध्ये उतरुन काम करतो. आम्ही पहिल्यापासून विविध सामाजिक चळवळींसाठी कार्यरत असल्यामुळे चांगल्या चांगल्या माणसांशी आमची ओळख होती. आमच्या कामाचा उद्देश पाहून त्यांच्यातील काही सल्लागार आणि तज्ज्ञ म्हणून आमच्याशी जोडले गेले आहेत. एखादा नवीन उपक्रम सुरु करताना येणारी पैशाची अडचण सुरुवातीला आम्हालाही जाणवली. माझा मित्र आणि माझे एक शिक्षक यांनी आम्हाला वेळोवेळी आर्थिक सहाय्य केलं. आजही अक्षरमित्र आर्थिक सहाय्यासाठी अशा एँजल फायनान्सरवरच अवलंबून आहे. सुरुवातीला आम्हाला कमी पैशात विविध कल्पना राबविण्याचे आव्हान होते,” आमीर सांगतो.

“या दरम्यान आणखी एक बाब आमच्या लक्षात आली की लोकांना वाचनाची आवड जरी असली तरी नेमकं काय वाचलं पाहिजे हे माहिती असणारी लोकं समाजात फार कमी आहेत आणि तुम्हाला काय वाचायचं हे माहित नसेल तर दुकानातून किंवा ग्रंथालयातून पुस्तक आणताना किंवा ऍमेझॉन, फ्लिपकार्टवरुन पुस्तक मागवताना पुस्तकाची निवड करणं कठीण जातं. म्हणून आम्ही विवेकी विचार रुजविणारे दर्जेदार साहित्य आणि सर्वच वयोगटातील वाचक यांच्यामधला दुवा बनायचं ठरवलं,” असं आमीर सांगतो.

‘अक्षरमित्र’ दर्जेदार विवेकवादी पुस्तकांसाठी फलटणची प्रगत शिक्षण संस्था, दिल्लीची झुब्बान, एकलव्य, होशिंगबाद विज्ञान शिक्षण कार्यक्रम, पुण्याची इकोलॉजिक्स, अक्षरनंदन, पाबळ विज्ञान आश्रम या संस्थांशी जोडले गेले आहे. तर अरविंद गुप्ता, डॉ. अनिल सदगोपालन, नामदेव माळी, प्रतिभा भराडे, डॉ रमेश पानसे, डॉ मंजिरी निंबकर, डॉ वेंकट कृष्णन ही तज्ज्ञ मंडळी अक्षरमित्रबरोबर दर्जेदार पुस्तकांच्या निवडीसाठी कार्यरत आहेत.

image


“आम्ही चेन सिस्टीमने काम करतो. सुरुवातीला आम्ही आमच्या ओळखीच्या वाचनप्रिय लोकांना भेटायला सुरुवात केली. प्रत्येकाला आम्ही त्यांच्या ओळखीच्या चार-पाच जणांची नावं सुचवायला सांगायचो. मग त्यांना जाऊन भेटायचो. पुन्हा त्यांच्या ओळखीचे चार-पाच लोक, असं करत करत आमची वाचक संख्या वाढत गेली. त्याचबरोबर २० शाळांबरोबर टाय-अप केलं. एखाद्या ठिकाणचे ३००-४०० वाचक झाले की आम्ही त्यांचा रीडर्स क्लब बनवतो. त्याचप्रमाणे शाळांमध्येही मुलांचा आणि पालकांचा असे वेगवेगळे रीडर्स क्लब बनवले आहेत. दर महिन्याला ‘अक्षरमित्र’चा कार्यकर्ता रिडर्स क्लबमधल्या प्रत्येक सभासदाला त्याच्या घरी जाऊन भेटतो. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याला एक-दोन पुस्तकं आम्ही ठरवलेली असतात. ती त्यांना सुचवली जातात. या पुस्तकावर आधारित एक कार्यक्रमही दर महिन्याला आयोजित केला जातो. या सभासदांचे संमेलनही भरविले जाते. तसेच फोन कॉलच्या माध्यमातूनही वाचकांबरोबर संपर्क ठेवला जातो. त्याचप्रमाणे ई-मेल आणि वॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातूनही पुस्तकांवर चर्चा केली जाते. आम्ही सुचविलेल्या पुस्तकांव्यतिरिक्त एखाद्या पुस्तकाची मागणी वाचकांकडून झाली तर ते पुस्तकही त्यांना उपलब्ध करुन देण्यात येतं. पुस्तकांबरोबरच चांगली मासिकंही आम्ही वाचकांना उपलब्ध करुन देतो,” असं आमीर सांगतो.

तो पुढे सांगतो, “पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करुन मिळविलेली पुस्तकं शाळांच्या ग्रंथालयांना पुरविली जातात. मात्र केवळ ग्रंथालयांना पुस्तकं पुरविली म्हणजे आमचा उद्देश पूर्ण होत नाही. ती पुस्तकं वाचली जाणं किंवा शिक्षण प्रक्रियेत त्यांचा वापर होणं गरजेचं आहे. म्हणूनच आम्ही २० शाळांपैकी प्रत्येक शाळेतील दोन-तीन शिक्षकांसाठी एक कार्यशाळा आयोजित करतो. ज्यामध्ये या पुस्तकांचा शिक्षणप्रक्रियेत कशा पद्धतीने चांगला वापर करुन घेता येऊ शकतो याबाबत शिक्षकांना तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येते.”

image


‘अक्षरमित्र’च्या उपक्रमाला दिवसेंदिवस वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच सुरुवातीला अहमदनगरपुरती मर्यादित असलेल्या या चळवळीचा विस्तार २०१५ मध्ये लातूर आणि पुण्यामध्ये करण्यात आला आणि येत्या दोन-तीन महिन्यात ‘अक्षरमित्र’ ठाणे आणि अमरावती येथेही काम सुरु करणार आहे. “ही चळवळ महाराष्ट्राबाहेरही राबविण्याची आमची इच्छा आहे. मात्र सध्या महाराष्ट्रावरच आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. कारण पुस्तकांची निवड करण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणची भाषा, संस्कृती इत्यादी अनेक गोष्टींचा विचार करुन संशोधन करावं लागतं. महाराष्ट्राबाहेर काम करण्यासाठी आम्हाला त्या त्या भाषेतील तज्ज्ञांची मदत लागेल. त्याचबरोबर आम्ही हे काम करण्यासाठी स्वतः वाचकांपर्यंत जात असल्याने त्याचा खर्चही मोठा येईल. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्याची गरज पडेल. त्यासाठी फायनान्सर्स आणि बँकांकडून आर्थिक सहाय्य मिळविण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या पुस्तक आणि मॅगझीनच्या विक्रीतून मिळणारा पैसा आम्ही पुन्हा ‘अक्षरमित्र’च्या कामात गुंतवत आहोत. यामध्ये पुस्तकांपेक्षाही मासिकांच्या विक्रीमध्ये आम्हाला मार्जिन जास्त मिळतं. सध्या तोच आमच्या या चळवळीचा आर्थिक कणा आहे,” असं आमीर सांगतो.

“’अक्षरमित्र’ आपल्या व्यवसायात दरवर्षी ३०० टक्के वाढ साध्य करत आहे. ‘अक्षरमित्र’ची २०१४-१५ या वर्षातील वार्षिक उलाढाल ३० लाखांची होती. नफा शून्य होता. २०१६-१७ मध्ये ती दीड ते दोन कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. आजवर लहान मुलं, मोठी माणसं असे मिळून एकूण दीड ते दोन हजार वाचक आमच्याशी जोडले गेले आहेत. यामध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे,” असं आमीर सांगतो. सध्या तज्ज्ञांमार्फत विविध विषय आणि प्रकारानुसार दर्जेदार पुस्तके आणि मासिके यांची यादी बनविण्याचे काम ‘अक्षरमित्र’ करित आहे. सध्याच्या ऑनलाईन ट्रेण्डचा विचार करुन डिसेंबर २०१६ पर्यंत ‘अक्षरमित्र’ ऑनलाईन येणार असून त्यासाठी ‘अक्षरमित्र’च्या वेबसाईटचे काम सध्या सुरु आहे. त्याचबरोबर ‘अक्षरमित्र’ने ऍमेझॉन आणि फ्लीपकार्ट यांच्याबरोबरही हातमिळवणी केली आहे. “’अक्षरमित्र’कडून ऑनलाईन पुस्तकं मागवतानाही वाचकांना पुस्तकाची निवड करणं सोपं जावं याची पुरेपुर काळजी घेतली जाणार आहे. त्याचबरोबर ‘अक्षरमित्र’चं मोबाईल ऍपही आम्ही लवकरच बाजारात आणत आहोत,” असं आमीर सांगतो.

image


येत्या काळात दर्जेदार पुस्तके उपलब्ध असणारे लर्निंग सेंटर सुरु करण्याचा अक्षरमित्रचा विचार आहे. त्याचबरोबर किशोरावस्थेतील मुलांना वेळीच योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून लैंगिक शिक्षणासाठीही काम करणार असल्याचे आमीर सांगतो.

या प्रवासातील एक आनंददायी आठवण आमीर सांगतो, “बारावीनंतर काय करायचं हे माझं ठरत नव्हतं. घरच्यांनी लहानपणापासून डॉक्टर व्हायचं हे मनावर बिंबवल्यामुळे मी वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करायला बारावीनंतर ब्रेक घेतला. पण थोडेच दिवसात माझ्या लक्षात आलं की मला ते करायचं नाही. मात्र काय करायचं हे ठरत नव्हतं. म्हणून मग इन्जिनिअरिंगला गेलो. मात्र त्याच दरम्यान माझ्या मनात ‘अक्षरमित्र’च्या संकल्पनेने जन्म घेतला आणि मी त्याने झपाटला गेलो आणि मी इन्जिनिअरिंगही सोडलं. त्यामुळे सुरुवातीला माझ्या वडिलांचा माझ्या या कामाला जराही पाठिंबा नव्हता. मात्र हळूहळू माझा उद्देश आणि माझी मेहनत पाहून माझे वडिलच ‘अक्षरमित्र’चे पहिले ग्राहक बनले. त्यांनी माझ्याकडून दोनशे पुस्तकं मागवली आणि स्व-खर्चातून विविध शाळांच्या ग्रंथालयांना भेट म्हणून दिली.” आज आमीर ‘अक्षरमित्र’चे काम सांभाळत असतानाच पुण्यातील ‘फर्ग्युसन महाविद्यालयात’ आंतरराष्ट्रीय संबंध आणि अर्थशास्त्र या विषयाचा पदवी अभ्यासक्रम शिकत आहे.

आज समाजातील नीतिमूल्य दिवसेंदिवस ढासळत चालली आहेत. समाजाचे रुप दिवसेंदिवस विद्रुप होत चालले आहे. मात्र या स्पर्धात्मक जगात या समस्येवर उपाय शोधणारे लोक सापडणे कठीण. इथे आपले हित साधून बाजूला होणारेच अधिक आहेत. प्रत्येकजण आपल्यापुरते जगत असताना समाजातील वाईट गोष्टींकडे कानाडोळा करताना दिसतो किंवा खूप तर खूप नावं ठेऊन आपली वाट चालू लागतो. ही परिस्थिती सुधारावी म्हणून सक्रियपणे काम करणारा क्वचितच कुणी सापडेल आणि म्हणूनच विवेकी विचारांची पेरणी करुन भावी पिढी घडविण्यासाठी मेहनत घेणारे हे ‘अक्षरमित्र’ कौतुकास पात्र आहेत.

अशा अजून प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी आमच्या पेज Facebook ला लाईक करा

आता वाचा अशाच काही प्रेरणादायी आणि सामाजिक हित साधणाऱ्या कहाण्या :


देहदानाविषयी जनजागृतीसाठी सक्रीय ‘दधीचि देहदान मंडळ’

वृक्षसंपदा आणि जैवविविधतेने सजलेला रंगीबेरंगी फुलपाखरांचा आवास ‘ओवळेकरवाडी बटरफ्लाय गार्डन’

'एम-इंडिकेटर'द्वारे मुंबईकरांच्या घरोघरी पोहोचलेले सचिन टेके