भारतीय कलासंस्कृतीचा प्रसार परदेशात करण्याचा वसा घेतलेल्या कल्पना नारकर, गल्लीतून सुरु झालेला प्रवास पोचला सातासमुद्रापार

भारतीय कलासंस्कृतीचा प्रसार परदेशात करण्याचा वसा घेतलेल्या कल्पना नारकर, गल्लीतून सुरु झालेला प्रवास पोचला सातासमुद्रापार

Wednesday May 18, 2016,

8 min Read

भारतीय लग्नसमारंभ किंवा सण असोत हातावर मेहंदी काढणे सर्वच महिलांना आवडतं. प्रत्येकीला मेहंदी काढता येतेच असं नाही. त्यासाठी कोणावर तरी अवलंबून रहावंच लागतं. हल्ली तर मेहंदी समारंभ हाच एक मोठा कार्यक्रम झाला आहे. संपूर्ण एक दिवस या मेहंदीच्या कार्यक्रमासाठी खास ठेवला जातो. वधूच्या हातावरील मेहंदी तर भाव खाऊन जातेच पण अन्य महिला सुद्धा कोणाची मेहंदी जास्त रंगली याकडे लक्ष ठेवून असतात. पूर्वीच्या काळी शुभ शकुन म्हणून मेहंदीचे ठिपके हातावर काढले जात, आता मात्र सर्वांनाच संपूर्ण हात भरून मेहंदी हवी असते. मेहंदी हा शृंगाराचा एक भाग मानला गेला आहे. त्यामुळे ती सुंदरच असावी याकडे सर्वांचा कल असतो. मग अशावेळी हमखास पाचारण करण्यात येतं, मेहंदी डिजायनर्सना !

कल्पना नारकर या अशाच एक नावाजलेल्या मेहंदी कलाकार आहेत. संपूर्ण भारतातून त्यांना मेहंदीसाठी पाचारण करण्यात येतं. नवनवीन प्रकार शोधून आपल्या मेहंदी डिजाइन्स मध्ये वापरणं, यामुळे मराठी चित्रसृष्टीतही त्यांची मागणी वाढू लागली आहे. मुळात कोणतंही व्यावसायिक प्रशिक्षण नसताना त्या एखाद्या निष्णात कलाकाराप्रमाणे आपली कला साकार करतात.

image



" शाळेत मी कधीच चित्रकलेच्या स्पर्धा परीक्षा दिल्या नाहीत किंवा कोणत्याही स्पर्धेत उतरले नाही. मला चित्र काढायला आवडायचं पण त्यात करियर करावं असं कधीच मनात आलं नाही." मेहंदी डिजायनर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कल्पना नारकर आपल्या बालपणीच्या आठवणी सांगत होत्या. 

पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यांनतर साधी सरळ नोकरी बघावी आणि आयुष्य सुरळीत करावं, या मध्यमवर्गीय विचारसरणीच्या घरातून त्या आलेल्या. व्यवसाय ही आपली मक्तेदारी नाही किंबहुना ठेचाच लागतात या मानसिकतेमुळे अनेक खाजगी संस्थांमध्ये त्यांनी नोकरी केली. पण एके दिवशी मेहंदीचे कोन बनवण्याच्या कार्यशाळेत त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. मैत्रिणींसाठी, त्यांच्या मैत्रिणींसाठी सणासमारंभांना, लग्नप्रसंगात मेहंदीसाठी त्यांना मागणी येऊ लागली. काहीजणांना कलेचं उपजत वरदान मिळतं. कल्पना या त्यातल्याच एक ! कोणतंही व्यावसायिक प्रशिक्षण न घेताही त्यांच्या कलाकृती या अस्सल आणि अत्यंत मनमोहक असतात. निव्वळ मेहंदीच नव्हे तर कलमकारी, डूडलिंग आर्ट, मधुबनी चित्रकला या कलाप्रकारातही त्यांनी प्राविण्य मिळवलं आहे आणि याचा वापर त्या आपल्या अनेक डिजाइनमध्ये करतात.


"मी कोणतंही व्यावसायिक प्रशिक्षण घेतलं नाही, पण मला कागदावर डिजाईन बनवायला आवडायचं. किंबहुना त्यात मी अधिक रमायचे. मेहंदी काढणं ही साधी गोष्ट आहे असंच मला वाटायचं. पण त्यात किती बारकाई आहे आणि अत्यंत संयम लागतो. हे मी स्वत: मेहंदी काढायला लागल्यावर शिकले." कल्पना सांगत होत्या. 
image


" खरंतर थोडी अधिक कमाई या दृष्टीने मी या व्यवसायाकडे वळले. म्हणजे नोकरी करून मला ते परवडणारं होतं. पैसे सुद्धा चांगले मिळत. पण मला सतत काहीतरी राहून जातंय असं वाटायचं " त्या पुढे म्हणाल्या. एखाद्या नोकरीतून काही काळ ब्रेक मिळाला की त्या पुन्हा डिजाईनिंगच्या आपल्या आवडीकडे वळायच्या. मेहंदीसाठी डिजाईन बनवतानाच त्यांना कपड्यांवर डिजाइनची कल्पना सुचली. मुळात चित्रकला चांगली असल्याने त्यांना विविध रचना तयार करणं तितकंसं कठीण गेलं नाही. मेहंदीसोबतच मग सुरु झालं स्कार्फ्स, ओढण्यांवर डिजाइन्स ! तर कधी ड्रेसवर सुद्धा! या त्यांच्या नव्या कल्पनेला सुद्धा खूप उत्तम प्रतिसाद मिळत गेला. मात्र मेहंदीच्या कामामध्ये अधिकाधिक मागणी येत होती. एकटीने काम करण्याऐवजी मुलींना सोबत घेऊन काम करावं या उद्देश्याने त्यांनी एक मेहंदी प्रशिक्षण संस्थाही सुरु केली. आजवर या संस्थेत अनेक मुलींनी आणि महिलांनी प्रशिक्षण घेतलं आहे आणि पुढे जाऊन त्या स्वतंत्रपणे स्वत:चा व्यवसाय करत आहेत.

" अनेक जणींना स्वत:चा व्यवसाय करायचा असतो, मात्र व्यासपीठ मिळत नाही. तेव्हा मी असा विचार करून हे प्रशिक्षण वर्ग आणि शिबीर भरवत गेले. मेहंदी काढणं तितकंस कठीण नाही. तुमच्याकडे कलेची दृष्टी असेल आणि संयमित वृत्तीने तुम्ही एखादी कला जोपासू शकाल तर खरंच तुम्ही उत्तम कलाकार बनू शकाल. " कल्पना या त्यांच्या प्रशिक्षण वर्गाबद्दल सांगत होत्या. 
image


आज १५ वर्ष झाली कल्पना यांनी अनेक नववधूंच्या हातावर मेहंदी रंगवून त्यांच्या आयुष्यातला हा सुखद सोहळा अधिक रंगतदार केला आहे. काळानुसार मेहंदीच्या डिजाइन्ससुद्धा आज बदलल्या आहेत. त्यानुसार विविध पद्धतीचे बदल त्यांनी आपल्या डिजाइन्समध्ये केले आहेत. " आज प्रत्येक वधूला संपूर्ण हातभर मेहंदी हवी असते. पूर्वीच्या काळी जसे लग्न अनेक दिवस चालायचे, तसे दिवस परत आले आहेत. त्यामुळे साखरपुडा, संगीत, बारात, बिदाई, विवाह सोहळा असे अनेक समारंभ धुमधडाक्यात केले जातात. या प्रत्येक समारंभाला निरनिराळ्या मेहंदी सुद्धा काढल्या जातात. " कल्पना आपल्या डिजाईन्सची माहिती देत होत्या. " राधाकृष्ण, बारात , प्रदक्षिणा, दुल्हा-दुल्हन इमेजेस, सजवलेली डोली असे अनेक प्रकार मी मेहंदी मध्ये काढून देते. हल्ली तर वधू वरांचे चेहरे हातावर काढून देण्याची सुद्धा विचारणा होते आणि ते पोट्रेट सुद्धा मी केलं आहे." 

image


"आणखीन नवीन प्रकार म्हणजे ३ डी इफेक्ट ! काही विशेष रेखाटनाद्वारे मी मेहंदीमध्ये हे विशेष इफेक्ट्स घालून देते. हे अगदी मोजक्याच जणांना जमतं. त्यासाठी सरावाची गरज असते."

आताचा नवीन ट्रेंड आहे तो म्हणजे इंडो-अरेबिक या फ्युजनचा. या प्रकारात सुद्धा अनेक जणांना मेहंदी काढायला आवडते. " मात्र आजही सर्वाधिक लोकप्रिय आहे ती भारतीय मेहंदी. नाजूक नक्षी असलेल्या या मेहन्दीला काढायला वेळ तर लागतोच पण अनेकांना ती आवडते. यामध्येच मोगलाई हा सुद्धा प्रकार मोडतो. तर इंडो-अरेबिकमध्ये नाजूक आणि फुलांची मेहंदी याचा संगम आढळतो." कल्पना मेहंदीच्या प्रकारांबद्दल अत्यंत उत्साहात सांगत असतात.

कार्यशाळा आणि प्रशिक्षण वर्गातल्या मुलींना त्यांच्यासोबत मेहंदीच्या ऑर्डर्ससाठी जाण्याची संधी सुद्धा मिळते आणि त्यांना प्रत्यक्ष ग्राहकांकडे जाऊन काम करणं शिकायला मिळतं. यामध्ये तुमची ओळख होते ती तुमच्या कामातून! एखाद्याला तुमचं काम आवडलं की ते अन्य लोकांना तुमचा संदर्भ देतात. मात्र विपणन हे कोणत्याही व्यवसायात महत्त्वाचं. त्यामुळे त्यांनी ऑनलाइन विपणनासाठी स्वत:ची वेबसाईट सुरु केली .www.mehendikalpna.com

यामध्ये त्यांनी स्वत:च्या डिजाइन्स टाकल्या आणि तिथेही यांना खूप उत्तम प्रतिसाद मिळू लागला. कोणत्याही व्यवसायाप्रमाणे इथेही स्पर्धा आलीच. हल्ली तर अनेक नाक्यांवर, मॉलमध्ये किंवा स्टेशन परिसरात मेहंदी काढणारे बहुतांश युवक दिसतात, त्यांच्याकडे पटकन मेहंदी काढून मिळते, त्यातून पैसेही कमी लागतात . मात्र अशा मेहंदीने त्वचेला अपाय झाल्याच्या अनेक तक्रारी त्यांच्याकडे आल्याचं कल्पना सांगतात. " आम्ही ग्राहकांसाठी वापरतो ती मेहंदी आम्ही घरी तयार करतो. मेहंदीचे कोन, शुद्ध मेहंदीचं मिश्रण यावर माझा भर असतो, कोणतंही रसायन आम्ही त्यात वापरत नाही. त्यामुळे अशा रसायनयुक्त मेहंदी काढून घेतल्यानंतर ग्राहकांना आमच्या घरगुती अस्सल मेहंदीची खात्री पटते आणि अनेक ग्राहक आम्हाला परत येउन मेहंदीसाठी पाचारण करतात. " कल्पना मेहंदीच्या शुद्धतेविषयी सांगत होत्या." मेहंदी ही थंड असते. त्याने हातापायाची जळजळ कमी होते, डोक्याला वापरलीत तर केस चमकदार होतात त्यामुळे शरीराला त्याने अपाय होणार नाही यावर आम्ही भर देतो. आणि म्हणूनच शुद्धता जपणे हे मी कटाक्षाने पाळते." त्या पुढे म्हणाल्या. 

image


मेहंदीनं हात सजवतानाच त्यांनी अनेक ड्रेस आणि ओढण्यासुद्धा सजवल्या आहेत. त्यावर कलमकारी आणि मधुबनी चित्रकला केल्याने त्या कपड्याची रंगत अधिक खुलते. ही कला सुद्धा त्यांनी स्वत:च आत्मसात केली आहे आणि त्याच्या कार्यशाळा सुद्धा त्या भरवतात. त्यांनी जर्मनीमधील अनेक महिलांना मधुबनी आणि मेहंदी कलेचं प्रशिक्षण दिलं आहे. म्युनिक मधल्या या महिलांनी भारतात त्यांना संपर्क साधला होता आणि मुंबईत त्यांनी कल्पना यांच्या प्रशिक्षण वर्गात भाग घेतला. दर चार वर्षांनी हा ग्रुप नवनवीन मुलीं आणि महिलांसकट येतो आणि भारतातल्या या अप्रतिम कलांचं प्रशिक्षण घेऊन जात आहे. या प्रशिक्षण वर्गाचं विस्तारित रूप आता म्युनिकमध्ये सुद्धा पहायला मिळतं. इथून प्रशिक्षण घेऊन गेल्यावर या महिलांनी तिथे या कलांचे प्रशिक्षण वर्ग सुरु केले आहेत. कल्पना सांगतात,” मेहंदी ही फक्त कला नसून ती आपली सांस्कृतिक ओळख आहे. आता सातासमुद्रापार ती पोचवण्यात मी एक कारण बनतेय याचं मला बरं वाटतं. जर्मनीतल्या म्युनिकमधून जो प्रतिसाद मिळाला त्यानं मला आत्मविश्वास मिळालाय़. ते इथं येतात, आपुलकीनं ही कला शिकतात. त्यानंतर जर्मनीत जाऊन ते या कलेचा प्रसार करतात. मार्गदर्शनासाठी अनेकदा फोन करतात, अनेकदा स्काईप आणि इतर ऑनलाईन माध्यमनातूनही मी त्यांच्याशी बोलते. ही आपली संस्कृती पुढे घेऊन जाण्यासाठी, तिच्या विस्तारासाठी माझा प्रयत्न आहे.”  

image


 कल्पना यांना काही दिवसांनी डूडलिंग आर्टनी मोहिनी घातली. ही कला अमेरिकेत झेंण्ट्यानगल (zentyangle) म्हणून प्रसिद्ध आहे. मुख्यत्वे करून ताण घालवण्यासाठी ही कला साकारली जाते. पायलट पेनने जे तुम्ही रेखाटू शकता ते म्हणजे डुडलिंग आर्ट ! आणि मग ती एखाद्या कलाकाराला सुचली असेल तर ती बेलाशक उत्तमच असणार. या आर्टचा वापर करत त्यांनी अनेक वस्तूंवर रेखाटनं सुरु केली. घरगुती वापरातल्या शोभेच्या अनेक वस्तूंवर त्यांनी ही रेखाटनं साकारून त्या वस्तू शोभिवंत केल्यात. या छोट्या छोट्या प्रयत्नांना सुद्धा त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. " लवकरच मी याची रेंज बाजारात आणणार आहे. या डुडलींग कलेतून साकारलेल्या या वस्तू दिसायला अतिशय उत्तम दिसतात आणि भेट म्हणून द्यायला तुम्हाला एक वेगळा आकर्षक पर्याय मिळतो." कल्पना आपल्या पुढील प्रवासाची दिशा सांगत होत्या. त्याचबरोबर डुडलिंग कला वापरून भिंती सजवण्याचा सुद्धा एक नवा प्रयत्न त्या साकारणार आहेत. परदेशात जशा ग्राफिटी वाॅल्स जागोजागी आढळतात, तश्याच भिंती आपल्या घरात करवून घेणं अनेकांना आवडतं आणि त्यासाठी आता त्यांना मागणी येऊ लागली आहे.

या व्यतिरिक्त त्यांनी मोडी भाषेचं आणि कॅलीग्राफीचं सुद्धा प्रशिक्षण घेतलं. याचा वापर त्यांनी ड्रेसवर, स्कार्फ आणि ओढ्ण्यांवर डिजाईन म्हणून केला आहे. या त्यांच्या खास कपड्यांना खूप चांगली मागणी येते. त्या एकट्याच हे काम करत असल्याने प्रत्येक डिजाईन पूर्ण व्हायला संपूर्ण दिवस जातोच." या सर्व कामामध्ये बारकाई आहे, मेहनत आहे, पण शेवटी मिळणारी कौतुकाची थाप ही माझ्यासाठी प्रेरणा स्त्रोत ठरते." कल्पना आपल्या व्यवसायचं गमक उलगडत होत्या.

"ग्राहकांना ज्या पद्धतीची रचना हवी आहे, तशी मी काढून देते, त्यामुळे माझ्या कामाचे तास वाढतात, पण शेवटी ज्यांच्यासाठी ती वस्तू बनली आहे त्यांना ती खूप आवडली कि माझ्या मेहनतीचं चीज होतं." त्या पुढे म्हणाल्या. 

मेहंदीच्या ऑर्डर्ससाठी गेल्यावर अनेकदा त्यांना रात्री उशीर होतो, कित्येकदा ग्राहक त्यांना घरापर्यंत सोडतात, कधीकधी वडील किंवा भाऊ रात्री उशिरा देखील त्यांना आणायला जातात. त्यामुळे घरच्यांच्या पाठींब्याचा त्यांना खूप आधार मिळतो.

कल्पना यांचा भाऊ नितीन देखील त्यांच्याप्रमाणेच उपजत कलाकार ! कोणतंही व्यावसायिक प्रशिक्षण नसताना त्याला चित्रकलेचं आकर्षण ! त्यामुळे बँकेत नोकरीला असतानाही फावला वेळ मात्र त्याचा चित्रात जातो. भिंती वेगवेगळ्या पद्धतीने सजवणे ही त्याची खासियत! महाविद्यालयात शिकत असताना त्याने आपल्या घरातील एक खोली कल्पना यांच्या मदतीने सजवली होती. त्याच भिंतीवर आबला वर्क म्हणजेच छोटे आरसे चिकटवून त्याने एक वाॅल पीस तयार केला होता. त्या एका कामामुळे त्याला अशा भिंती सजवण्यासाठी अनेक जणांकडून मागणी आली. त्यांच्या बँकेत सुद्धा त्याची कला प्रसिद्ध आहे. अनेक स्पर्धांमध्ये त्याला त्याच्या फ्रेम्ससाठी बक्षीसं मिळाली आहेत आणि तो या अशा फ्रेम्स चित्रित करून भिंती सजवण्यासाठी देतो.

आपल्या या प्रतिभावान भावासोबत अनेक मित्र मैत्रिणींच्या एका खोलीला त्यांनी पालटवून टाकलं आहे." या व्यवसायाचा आता विस्तार हळूहळू करणार आहोत. नितीनच्या वेळेनुसार आम्ही ही एक खोलीची संकल्पना राबवायचा निर्णय घेतला आहे." कल्पना शेवटी जाताजाता नव्यानं व्यवसाय सुरु करणाऱ्या मुलींना सल्ला देतात, तो म्हणजे " प्रामाणिकपणा आणि तुमच्या कलेचा सच्चेपणा तुम्हाला खूप उंचावर घेऊन जाईल, त्यावर विश्वास ठेवा. आपल्यातील प्रतिभा ओळखून त्यावर अंमल करा आणि त्यादृष्टीने व्यवसायाचं गणित मांडा." 

आणखी काही महिला उद्यमींच्या कहाण्या वाचण्यासाठी YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

देशी किंमतीत विदेशी फॅशनचा तडका 'फॅब ऐली'

अभियांत्रिकीचे शिक्षण नसूनही वीजवितरणाच्या डिपी तयार करणा-या कोट्यावधीच्या उद्योगाच्या कर्त्याधर्त्या ‘नेहा म्हैसपूरकर’!

आपल्या यशाची वाट धुंडाळणाऱ्या सहा उद्योगसम्राटांच्या राजकन्या