मला माहित नाही... आणि मला त्या गोष्टीचा पश्चातापही नाही
काही दिवसांपूर्वी मी सीएक्सओकरिता बंगळूरू येथील शांग्रीला हॉटेलमध्ये आयोजित एका सेमीकंडक्टर बैठकीत सहभागी झाले होते. जेव्हा मी सभागृहात प्रवेश केला, जे एका लहान आणि नेटक्या खोलीप्रमाणे होते, तेव्हा ते संपूर्ण भरलेले होते. सुदैवाने कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांनी माझ्या बैठकीची व्यवस्था केली, जी व्यासपीठाजवळच होती. सहसा, जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी उशीरा पोहोचता, तेव्हा तुम्हाला शेवटच्या ओळीत बसण्यासाठी जागा मिळते. असो, मी त्या मान्यवरांची चर्चा ऐकण्यासाठी पहिल्या ओळीत स्थानापन्न झाले. ती चर्चा अगोदरच सुरू झाली होती. सेमीकंडक्टर उद्योगातील नवे कल आणि कशाप्रकारे भारत त्यात भरारी घेऊ शकेल, या विषयावरील ते चर्चासत्र होते. मी स्मितहास्य केले आणि तज्ज्ञांच्या सुरू असलेल्या चर्चेतून अधिकाधिक ज्ञान आत्मसात करुन घेण्यासाठी तयार झाले. तज्ज्ञांमध्ये आयआयटी प्रोफेसर, काही एनआरआय उद्योजक आणि व्यावसायिक गुंतवणूकदार सहभागी झाले होते.
सेमीकंडक्टर क्षेत्रात होत असलेल्या संशोधनाबद्दल अधिकाधिक माहिती समजून घेण्यासाठी मी लक्ष केंद्रीत करायचा प्रयत्न करत होते. मात्र मी काही माहिती आकलन करुन घेऊ शकत नव्हते. वक्ते कशासंदर्भात बोलत आहेत, याची मला कल्पनाही नव्हती. साध्यासोप्या भाषेत सांगायचे तर ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने बाहेर जात होते. माझ्या आसपास असलेला प्रत्येकजण त्या चर्चासत्रात सहभागी झाला होता, ते प्रश्न विचारत होते, हसत होते, मान डोलवत होते वैगरे वैगरे. त्यामुळे इतरांकडे बघत राहण्यापेक्षा व्यासपीठावरील तज्ज्ञांकडे बघणे, हे कधीही सोयीचे असल्याने मी त्यांच्याकडे पाहू लागले. मात्र मी व्यासपीठाजवळच बसलेली असल्याने माझ्याकडे त्या चर्चेकडे लक्ष केंद्रीत करण्याशिवाय काही पर्याय नव्हता. ते सर्वकाही माझ्या डोक्यावरुन जात होते. काही तज्ज्ञ जेव्हा कोणताही मुद्दा उपस्थित करत होते, तेव्हा थेट माझ्या डोळ्यात पाहत होते. मला त्याचे महत्व माहित आहे. कारण मी जेव्हा व्यासपीठावर असते, तेव्हा मी देखील हेच करते. त्यामुळे उपस्थितांपैकी एक जागरुक सदस्य म्हणून मीदेखील त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य केले आणि मान डोलावली. त्यानंतर मला मुर्खपणासारखे वाटू लागले. व्यासपीठावरील अधिकाधिक तज्ज्ञ माझ्याकडे पाहत होते, मी त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य करत होते आणि तेवढा वेळ मला ते मुर्खपणासारखे वाटत होते. देवा, ही चर्चा आकलन करू शकेन, एवढी हुशार मी का नाही. ते बोलत असलेल्यापैकी थोडेफार तरी मला समजायला हवे होते. मी या चर्चासत्राला फक्त सेमीकंडक्टरबद्दल थोडेफार जाणून घेण्यासाठी आली आहे का? ते माझ्याकडे पाहून हा विचार तर करत नसतील ना की, माझ्यासारखे लोकदेखील या कार्यक्रमात उपस्थित आहेत? तिला काही समजत आहे का? हे आणि यासारखे अनेक प्रश्न माझ्या मनात येत होते. पण तुम्हाला माहित आहे का, असे विचार तुमच्या मनात का येतात, जेव्हा तुम्हाला वाटते की, तुम्ही त्या सभागृहात उपस्थित असलेल्यांच्या तुलनेत योग्य नाही आणि अशा लोकांमध्ये बसण्याचे तुमचे स्थान नाही.
अखेरीस, ते चर्चासत्र संपले. लोकांनी त्यांचे सामान गुंडाळण्यास सुरुवात केली. मीदेखील काहीशा संकोचाने सामान गोळा करण्यास सुरुवात केली. अनेक कार्य़क्रमांमध्ये तुम्ही मला चर्चा करताना पाहिले असेल. पण इथे चित्र वेगळे होते. मी एका कोपऱ्यात होते आणि पुढे काय करायचे, याचा विचार करत होते. अचानक माझ्या ओळखीतील दोन व्यक्ती माझ्याकडे आल्या आणि सभागृहातील उद्योजकांशी माझी ओळख करुन देऊ लागल्या. हे काम मी अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकत होते. मी त्या उद्योजकांशी चर्चा केली. मला सेमीकंडक्टरबद्दल काहीच समजले नाही मात्र मला तेथे अनेक उद्योजक भेटले. आणि जसजशी मी सेमीकंडक्टर व्यवसायातील उद्योजकांना भेटू लागले तसतसा माझा आत्मविश्वासदेखील वाढू लागला. त्या उद्योजकांना त्यांच्या कथा सांगायच्या होत्या. त्यांना त्या ऐकून घेणे अपेक्षित होते आणि माझी कथा का नाही? हे जाणून घ्यायचे होते. का तुम्ही लोक फक्त बी२सी/ई-कॉमर्स गोष्टींमध्ये रस दाखवता. मी त्या चर्चेमधुन बाहेर पडले. मात्र आता मी पुन्हा श्रोत्याच्या भूमिकेत आले होते. लोकांनी माझ्या आसपास गोळा होण्यास सुरुवात केली आणि मला खात्री वाटली. मी हे काम व्यवस्थित करू शकते. मी लोकांच्या कथा ऐकू शकते. मी त्या कार्यक्रमातून बाहेर पडले तेव्हा माझ्या मनात त्या कार्य़क्रमाबद्दलचे विचार घोळत होते आणि अशाच एका प्रसंगाचे विचार माझ्या मनात येत होते, ज्याला मी महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्य़क्रमादरम्यान सामोरी गेले होते. त्यानंतर असे अनेक प्रसंग मला आठवू लागले.
यावर्षी दिल्ली येथे आम्ही आयोजित केलेल्या महिला दिनानिमित्तच्या चर्चासत्रात प्रभावी आणि सर्वोत्कृष्ट महिला उद्योजक सहभागी झाल्या होत्या. तसेच व्यवसायातील बारकावे शिकण्यासाठी उद्योजक होण्यास इच्छुक असलेले सहभागी झाले होते. अधिकाधिक तज्ज्ञ वक्ते व्यासपीठावर येऊन निधी, व्यवसायाचा आराखडा, आर्थिक नियोजन या विषयावर बोलत होते. लक्षात ठेवा ही कदाचित त्यांच्याकरिता एक सामान्य जागा असेल, मात्र श्रोत्यांपैकी अनेकांना त्याचा अर्थ समजत नव्हता. उपस्थितांपैकी अनेकजण हात वर करुन प्रश्न विचारत होते. ते असे होते, मी अर्थव्यवस्था या विषयातील तज्ज्ञ नाही, मी व्यवसाय करू शकतो का? मी तंत्रज्ञानातील तज्ज्ञ नाही, मी तंत्रज्ञान संदर्भातील व्यवसाय उभारू शकतो का? मला मूल्यनिर्धारण आणि निधीवृद्धीबद्दल काही कल्पना नाही, मी निधीत वाढ करू शकतो का आणि ती देखील योग्य मूल्यनिर्धारण करुन?
त्यांच्याकरिता माझे उत्तर असे असेल, मी निधी विषयावर लिहिले आहे, निधी वृद्धी करणाऱ्या अनेक कथा ऐकल्या आहेत आणि गेल्या ऑगस्ट महिन्यात मी माझ्या निधीमध्ये पहिल्यांदा वाढ केली आहे. निधी वृद्धी म्हणजे काय, हे मला नेमके माहित नाही. मी कथांच्या विश्वात जगते आणि मी त्याच्या प्रत्येक पैलूवर बौद्धिक तर्क लावू शकते. मी एक उत्कृष्ट काम केले आहे. टर्म-शीट, क्लॉजेस, एसएचए आणि सर्वकाही मी प्रत्यक्षात समोर आल्यावर शिकले आहे. जेव्हा या गोष्टी घडल्या आहेत, तेव्हा मी त्या शिकले आहे. जेव्हा या गोष्टी तुमच्यासोबत घडत जातात तेव्हा तुम्ही काम करत असतानाच त्या गोष्टी शिकत जाता. त्या शिकून घेण्याशिवाय तुमच्याकडे काहीही पर्याय नसतो. जे समजून घेणे गरजेचे आहे, ते समजून घ्या आणि उर्वरित गोष्टी वकिल आणि लेखापालावर सोपवा. जे गरजेचे आहे, ते मी समजून घेतले, ज्यासोबत मला व्यवहार करायचा आहे. उर्वरित गोष्टी मी वकिल आणि इतरांवर सोपवल्या.
मला सर्वकाही माहित आहे का? अजिबात नाही. ज्या लोकांना मी कामावर ठेवले आहे, ज्यात ते सर्वोत्कृष्ट आहेत, त्यांच्यावर मी अवलंबून आहे का? हो, हो आणि हो. यामुळे माहित असणे आणि नसणे हा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित होतो. या जगात, जेथे आपण तज्ज्ञ आणि सर्वज्ञानी लोकांनी घेरलेले आहोत, तेथे आपल्याला यशस्वी उद्योजक किंवा व्यावसायिक होण्याकरिताच्या सर्वगोष्टी माहित असणे, गरजेचे आहे का? मला असे नाही वाटत. माहित असणे किंवा नसणे, ही काही मोठी गोष्ट असेल असे मला वाटत नाही. अनेकदा आपण अनेक गोष्टी करायला जातो आणि प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला जातो. त्यापेक्षा 'मला माहित नाही, तूच का मला सांगत नाहीस?', हे सांगणे अधिक सोयीचे आहे. करुन बघा. ही एक अभिनव गोष्ट असेल जी तुम्ही कराल. शेवटी, आपल्या आसपास असे लोक आहेत का, ज्यांना ते सर्व माहित आहे? 'मला माहित नाही', हे सांगितल्यावर कदाचित आपण ते एकमेव असू, जे कबूल करत आहेत की आम्हाला हे माहित नाही.
सुरुवातीला, मी ज्यांना सर्वकाही माहित आहे, असे तज्ज्ञ नियुक्त करेन आणि त्यांना त्यांचे काम करायला देईन. या वर्षी हे मी माझ्या कंपनीमध्ये करत आहे. मी सर्वोत्कृष्ट टीम लीडर्स नियुक्त केले आहेत. आता मी मागे बसून फक्त आराम करणार आहे आणि माझी तज्ज्ञ मंडळी जी त्यांचे सर्वोत्कृष्ट काम करणार आहेत, मी त्याचा अनुभव घेणार आहे.
तज्ज्ञांबद्दल बोलायचे झाल्यास, माझ्या पूर्वीच्या नोकरीच्या ठिकाणी सीएनबीसीमध्ये, माझे बॉस हे एक लक्ष वेधून घेणारे व्यक्ती होते. कोणत्याही बैठकीला जाण्यापूर्वी, जेथे ते आणि मी एकत्र जाणार असू, तेव्हा ते मला त्या बैठकीकरिताची सर्व तयारी करायला सांगायचे. आणि जेव्हा आम्ही त्या बैठकीला पोहोचायचो तेव्हा ते मला नेहमी विचारायचे, तू जे काही केले आहेस, ते मला सांगू शकतेस का? जोपर्य़ंत त्यांना कंपनीची काम करण्याची पद्धत व्यवस्थित समजत नाही, तोपर्यंत ते प्रश्न विचारत राहायचे. मला अनेकदा वाटायचे, ते मुर्खासारखे प्रश्न विचारत आहेत. तर अनेकदा मी निराश व्हायचे. मला वाटायचे की, मी त्यांना कंपनीत दिलेल्या सर्व माहितीवर ते विश्वास ठेवत नाहीत का? विद्यार्थ्यांप्रमाणे ते प्रश्न का विचारत राहतात? कालांतराने मला समजले की, ते कंपनीने काम किती सहजरित्या पार पाडले आहे, हे समजून घेत असतं. खुल्या मनाने व्यवसाय करणाऱ्या एका उद्योजक तरुणाकडून ते ही पद्धत शिकले होते. ते कधीच कोणत्याही बैठकीला व्यवस्थापकिय संचालक पदाचा टॅग लावून जात नसत. तसेच निपक्षःपातपणे व्यवहार करण्यासाठी ते जात. काहीच माहित नसून सर्वकाही योग्य पद्धतीने माहित करण्याच्या हेतूने ते तेथे जात असत. याबद्दल विचार करा, आपण कित्येकदा एकमेकांच्या संपर्कात येतो, आपापली मते तयार करतो, एखाद्या व्यक्तिबद्दल, कंपनीबद्दल, व्यवसायाबद्दल किंवा कोणत्याही बाबतीत आपण मते तयार करतो तीही सोप्या पद्धतीशिवाय.
प्रत्येक दिवशी प्रसारमाध्यमे, तज्ज्ञ, गुंतवणूकदार, कर्मचारी किंवा लोक तुमच्याबद्दल मते तयार करतात. प्रत्येक दिवशी लोकांना तुमच्याबद्दल अधिकाधिक माहिती मिळत असते. चला आपण एकमेकांवर उपकार करुया, प्रत्येक व्यक्तिला संधी दिल्याशिवाय आपण तिच्याबद्दल मत तयार करणार नाही. हे मुक्त करणारे आहे, जादुई आहे. मला एक गोष्ट खात्रीशीर माहित आहे की, जर तुम्ही या गोष्टीचा सराव केलात तर तुम्ही खूप चांगले आणि उत्कृष्ट नातेसंबंध तयार कराल, अनेक मोठमोठे व्यवहार सहज जिंकू शकाल आणि प्रत्येक क्षेत्राकडून तुम्हाला मिळणारे सहकार्यदेखील उत्कृष्ट असेल. त्यांनी सांगितलेली गोष्ट जी मला आवडली, कधीकधी हरल्याने तुम्ही जिंकता. त्याचप्रमाणे माहित नसणे यात एक संधी आहे ती अशी की, तुम्ही सर्वकाही माहित करुन घेऊ शकता.
लेखिका – श्रद्धा शर्मा, मुख्य संपादिका- युअर स्टोरी
अनुवाद – रंजिता परब