एका झोपडीतून सुरु झालेला 'अंबिका मसाला' उद्योगाचा प्रवास आता परदेशात जाऊन पोहोचलाय

5th Jun 2016
 • +0
Share on
close
 • +0
Share on
close
Share on
close

कमलताई शंकर परदेशी यांना पाहिलं की त्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही सर्वसाधारण गावातल्या सर्वसाधारण महिलेची आठवण होते. डोक्यावर पदर, कपाळावर हे भला मोठा कुंकवाचा टिळा, सतत हसरा चेहरा. पण जेव्हा कमलताई बोलायला लागतात तेव्हा मात्र समोरचा मंत्रमुग्ध होतो. एखाद्या मॅनेजमेन्ट प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याला मागे टाकून कमलताई व्यवहाराचं गणित अगदी पक्क मांडतात. त्यांच्या या मॅनेजमेन्ट कौशल्यावर आज दौंडच्या अंबिका महिला बचत गटानं अगदी काही हजारोंपासून सुरु केलेला मसाल्याचा कारखाना आता कोटींची उलाढाल करायला सज्ज झालाय.

पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात खुटबाव इथं कमलताई शेतमजूरी करायच्या. पण ही शेतमजूरी आपल्या आयुष्याचं धेय्य असू शकत नाही हे त्यांचं पक्क होतं. कमलताई म्हणतात, "दादा आम्ही अंगठेबाज, शिक्षण नाही त्यामुळं पुढे कसं जायचं याचं ज्ञान नव्हतं. पण फक्त शिक्षणानंच कागदी ज्ञान मिळतं, पण जीवनाची शाळा अजीब आहे. तिथं व्यवहारात पक्क असावं लागतं. माझं व्यवहारज्ञानच पक्क केलं होतं मी लहानपणापासून. दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करुन आपल्याला काहीही मिळणार नाही हे मला माहित होतं. माझ्यासारख्या इतर बायकाही होत्या. जर मन पक्क केलं नसतं तर अजूनही शेतात राबत राहिले असते. जर बोलले नसते तर अजूनही मानखाली घालून कंबर तुटेपर्यंत काम करावं लागलं असतं.”

सुमारे १२ वर्षांपूर्वी म्हणजे २००४ मध्ये त्यांना महिला बचत गटासंदर्भात उडतीउडती माहिती मिळाली होती. त्यातून आपल्यासारख्या अनेक महिलांना सोबत घेऊन व्यवसाय सुरु करता येऊ शकतो हे त्यांना समजलं. म्हणूनच आपल्या सारख्या १० निरक्षर महिलांना एकत्र करुन त्यांनी अंबिका महिला बचत गटाची स्थापना केली. त्यांची नोंदणी झाली. प्रत्येक महिलेनं महिन्याला १०० रुपये जमा करायचे असं ठरलं. खुरपणी आणि शेतमजूरी करुन या महिलांनी फक्त तीन महिन्यात साडेतीन हजार रुपयांचे भांडवल जमवलं. यातून मसाला उद्योग सुरु करायचा पक्क झालं. मग त्यासाठी लागणाऱ्या मिरच्या धने आणि इतर साहित्य आणलं. मसाला करण्याचं प्रशिक्षण खादी व ग्रामोद्योग विभागाकडून देण्यात येतं. पण इथं शिक्षणाची अट नववी ते दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण अशी होती. या नियमात बसत नसल्यानं कमलताईंनी शक्कल लढवली. त्यांनी आधीच हे प्रशिक्षण घेतलेल्या महिलेला आपली गुरु बनवली. तिच्याकडून सर्व गोष्टी शिकून घेतल्या आणि आपल्या इतर सहकाऱ्यांना शिकवल्या. आणि झोपडीवजा घरात त्यांनी आपला हा मसाल्याचा कारखाना सुरु केला.

मसाला तयार तर झाला पण तो विकणं हे जास्त कठीण काम होतं. कुठलीही गोष्ट विकण्याचा अनुभव या दहा जणींपैकी कुणालाही नव्हता. त्यामुळे आपला हा मसाला नक्की कुणाला विकायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. शिवाय विकण्याची कला शिकायची होती. कमलताई सांगतात,” कुठलाही व्यवसाय करताना अनेक गोष्टी असतात त्या अनुभवातून शिकता येतात. आमच्या बाबतीतही तेच झालं. मसाला कुठे विकायचा. त्याचं पॅकिंग कसं असावं. बरं आम्ही जे पॅकिंग केलं होतं ते अजिबात आकर्षक नव्हतं. त्यामुळे आमचा मसाला किती चांगला आहे हे आम्ही ग्राहकांना कसं पटवून देणार आधी तो ग्राहक आमच्यापर्यंत यायला तर हवा. आधी आम्ही पंचायत समिती आणि तहसील कार्यालयासमोर या ५० ग्रॅम मसाल्याच्या पुड्या विकू लागलो. अनेक जण यायचे, पाहायचे आणि निघून जायचे. काहींनी मसाला घेतल्यानंतर काही सूचना केल्या. मसाला त्यांना आवडला होता. पॅकिंग संदर्भात अनेक सूचना त्यांनी केल्या. त्या महत्त्वाच्या ठरल्या. त्याला स्टिकर लावले. आता आमच्या मसाल्याला ओळख मिळाली. त्यातूनच आम्हालाही ओळख मिळाली.” 

जसजशा ओळखी वाढत जातील तसतसा उद्योग वाढला पाहिजे असं कमलताईंना वाटत होतं. त्यांनी खुटबाव, भरतगाव आणि यवत आदी भागातल्या आठ बचत गटातल्या महिलांना एकत्रित आणलं. आता १०८ महिला एकत्रित आल्या. आवाका वाढला. त्यामुळे या सर्व बचत गटांची मिळून अंबिका औद्योगिक सहकारी संस्था निर्माण करण्यात आली. यातून व्यवसाय वाढवायचा होता. त्यासाठी राष्ट्रीय बँकेतून कर्ज घेण्यात आलं. आता अंबिका मसाल्याची व्याप्ती वाढत होती. हळूहळू पुणे शहरापर्यंत पोचलेली ही व्याप्ती मुंबईपर्यंत वाढवण्याची संधी महालक्ष्मी सरस या बचत गटाच्या प्रदर्शनातून मिळाली. मुंबईचं मार्केट काबीज करायचं असं ठरलं आणि कमलताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट दादरच्या गर्दीत उभं राहून मसाला विकला. चांगला प्रतिसाद मिळाला. लोक पुन्हा पुन्हा येऊ लागले. मुंबईच्या बाजारात आपल्या मसाल्याला मागणी आहे. असं लक्षात येताच दर १५ दिवसांनी १५-२० किलो मसाला मुंबईच्या बाजारात आणण्याचं ठरलं. पॅकिंग चांगली झाल्यानं आता फोनवरुनही ऑर्डर येऊ लागल्या. त्यांना कुरीयरनं घरपोच डिलीवरीही देण्यात आली.

हे असं घडत असताना अंबिका मसाला बिग बाजारात पोचला. खासदार सुप्रिया सुळे यांनी बचत गटांचा हा मसाला बिग बाजारातल्या लोकांना चवीसाठी दिला होता. मसाला उत्तमच होता. त्यामुळे थेट अडीच लाखांची ऑर्डर अंबिका मसाल्याला मिळाली. आता दर आठवड्याला ही ऑर्डर मिळते. महिन्याला तीन ते साडे तीन लाखांचा माल मुंबईतल्या अनेक मॉलमध्ये जातो. ही फक्त मुंबईतली मागणी आहे. राज्याच्या इतर शहरांमध्येही अंबिका मसाल्याला चांगली मागणी आलीय. 

आता या अंबिका औद्योगिक सहकारी संस्थेनं कोटीची उड्डाणं केली आहेत. एका झोपडीतून सुरु झालेला हा प्रवास आता परदेशात जाऊन पोचतोय. कमलताई सांगतात,” इथंही अडचणी खूप आहेत. पुरेशी जागा नाही, यंत्रसामुग्रीही मोठ्या ऑडर्ससाठी कमी पडतेय. त्यामुळे आम्हाला यापुढे जायचं आहे. आम्ही आमचं मार्केटिंग चांगलं केलं. मिळालेल्या संधीचा फायदा उचलला. त्यामुळे इथवर पोचू शकलोय. आता इथून पुढे जाणं काय कठीण नाही. ते ही होईलच की.” हे सर्व सांगताना कमलताईंच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. त्यातून त्यांचा आत्मविश्वासही दिसत होता.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

आजपर्यंत ज्या सावकारांकडून कर्ज घेत होत्या, आज त्याच महिला सावकारांना देत आहेत, कर्ज! 

तीन अशिक्षित महिलांना उभारली करोडोंची कंपनी, १८ गावातील ८००० महिलांना बनविले स्वावलंबी

बनारसमध्ये भीक मागणाऱ्या स्त्रियांना आत्मनिर्भर बनवले परदेशातील भगिनींनी 

  

Want to make your startup journey smooth? YS Education brings a comprehensive Funding Course, where you also get a chance to pitch your business plan to top investors. Click here to know more.

  • +0
  Share on
  close
  • +0
  Share on
  close
  Share on
  close

  Our Partner Events

  Hustle across India