स्वयंसेवकांना प्रशिक्षण देणारी स्वयंसेवी संस्था 'SOSVA'
स्वयंसेवी संस्थांची ताकद अधिक वाढवण्यासाठी सोसवा (SOSVA) गेल्या ३० वर्षांपासून अविरत कार्य करत आहे. SOSVAचा 'VOLACT' नामक एक प्रकल्प असून, त्याद्वारे ते स्वयंसेवक बनण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देतात. ज्यामुळे ते समाजाचा विकास करू शकतात तसेच वेळ, कल्पना याद्वारे अनेक स्वयंसेवक आपापल्या परीने त्यांच्या या कार्य़ात आपले योगदान देऊ शकतात. 'सोसवा'ची स्थापना १९८४ साली करण्यात आली. 'सोसवा'च्या संस्थापकांमध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल ते म्हणजे मॅगासेसे आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते कै. डॉ. बानू सयाजी, डॉ. रजनीकांत अरोळे तसेच निवृत्त प्रशासकिय अधिकारी श्रीनिवासन यांचा. यांच्या व्यतिरिक्त देखील अनेकांनी 'सोसवा'च्या स्थापनेत हातभार लावला आहे.
'सोसवा'चा एक अभिनव प्रकल्प म्हणजे 'VOLACT', ज्याची स्थापना १९९७ साली मुंबई येथे करण्यात आली. जे स्वयंसेवक वेळ आणि आपल्या कौशल्याच्या माध्यमातून गरजू लोकांची मदत करू इच्छितात, मात्र त्यांना ती कशी करावी, याबाबत कोणतीही कल्पना नाही, अशा लोकांना एका प्रशिक्षण केंद्राची गरज असल्याचे ओळखून 'सोसवा'ने 'VOLACT'ची स्थापना केली. गेल्या १७ वर्षांपासून 'VOLACT'ने अनेक स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन आरोग्य, शिक्षण, पर्य़ावरण, समाज विकास यांसारख्या अनेक क्षेत्रातील जवळपास २१५ स्वयंसेवी संस्थामध्ये त्यांना सक्रिय केले आहे. जवळपास सहा हजार स्वयंसेवकांना त्यांनी प्रशिक्षित करुन समाजात आपले योगदान देण्यासाठी सिद्ध केले आहे. सोसवाचे स्वयंसेवक सर्वच स्तरातून येतात. ते विद्यार्थी असू शकतात, त्या गृहिणी असतील किंवा सेवानिवृत्त नागरिक, व्यावसायिक, कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरदार, सरकारी कर्मचारी, परदेशी नागरिक कोणीही असू शकतील, फक्त त्यांच्यात समाजाकरिता काहीतरी योगदान देण्याची वृत्ती हवी. 'VOLACT'चे काम स्थानिक स्वयंसेवकांच्या समन्वयकाच्या टीमद्वारे तळागाळातील स्तरावर पाहण्यात येते. स्वयंसेवक समन्वयक हे स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्थांमधील एका दुव्याप्रमाणे काम पाहतात. स्वयंसेवकांचे काम, एखाद्या कार्यक्षेत्रात त्यांना असलेला रस, याचा अभ्यास या समन्वयकाद्वारे करण्यात येते. त्यानंतर ते त्या कलागुणांची गरज कोणत्या स्वयंसेवी संस्थांना आहे, याचा विचार करुन त्यांना त्या स्वयंसेवी संस्थेत सक्रिय करतात. स्वयंसेवकांना त्यांच्या आवडीनुसार आणि कौशल्यानुसार एक काम नेमून दिले जाते. त्यावेळेस त्या स्वयंसेवकाला जास्त प्रवास तर करावा लागणार नाही, ज्यामुळे त्याच्या कार्यात खंड पडेल, याचा विचार केला जातो.
'VOLACT' मध्ये अनेक निस्वार्थी स्वयंसेवक असून, त्यांनी इतरांसमोर आदर्श घालून दिला आहे. अनेक विषयांवर ते काम करत असतात. त्यात विशेष मुलांना पोहण्यास शिकवणे, पपेट बनविण्याच्या कार्यशाळा घेणे, अनाथ मुलांना इंग्रजी शिकवणे, योगा, कला आणि हस्तकला यांचे प्रशिक्षण वर्ग घेणे यांसारख्या बऱ्याच उपक्रमांचा समावेश करता येऊ शकतो. याशिवाय स्वयंसेवक वृद्धाश्रम, अनाथालय, विशेष मुलांकरितांची केंद्र, झोपडपट्टीत आणि रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांकरितांचे केंद्र याकरिता कामे करतात. भारतातील गरजू लोकांच्या मदतीकरिता तसेच मार्गदर्शनाकरिता स्वयंसेवकांची भक्कम फळी उभारण्याचे सोसवाचे ध्येय आहे.
गेल्या ३० वर्षांपासून सोसवाने दिलेले सामाजिक योगदान पुढीलप्रमाणे –
सोसवा यांनी सर्वप्रथम 'मदर एनजीओ'ची स्थापना केली, ज्याद्वारे निधी देणाऱ्या अनेक संस्था आणि भारत सरकार विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना निधी देतात. त्यात प्रामुख्याने प्रजनन आणि बाल आरोग्य, मायक्रो क्रेडीट, महिला सबलीकरण यांसारख्या स्वयंसेवी संस्थांचा उल्लेख करावा लागेल. एकट्या महाराष्ट्रातच यामुळे ५०० हून अधिक स्वयंसेवी संस्थांना मदतीचा हात मिळाला आहे. 'मदर एनजीओ' योजना ही सध्या राष्ट्रीय पंचवार्षिक योजनांप्रमाणे भारतातील विविध राज्यात राबवली जाते.
सोसवा ही पहिली भारतीय स्वयंसेवी संस्था अशी आहे, जी स्वयंसेवक घडविण्यासाठी कार्य करते. त्यासाठी VOLACT (Volunteer Action) नावाचा उपक्रम राबवते. स्वयंसेवकांची मानसिक तयारी करणे, यासोबतच त्यांना त्यांच्या स्वयंसेवी संस्थांमध्ये सक्रिय करणे, अशी कामे ते करतात. स्वयंसेवकांना समाजोपयोगी कामे करण्यासाठी ते प्रोत्साहित करतात. आजवर त्यांनी मुंबईतील ५९९३ स्वयंसेवक विविध क्षेत्रात काम करणाऱ्या २१५ स्वयंसेवी संस्थांमध्ये सक्रिय केले आहेत.
याशिवाय ते विविध कॉर्पोरेट हाऊससोबत काम करत असून, त्यात टाटा केमिकल्स, सोसायटी जनरल बॅंक, बॅंक ऑफ बरोदा, ग्रुप एम यांसारख्या अनेक कंपन्यांचा उल्लेख करावा लागेल. वृद्धाश्रमे अद्ययावत करण्याच्या सोसवा यांच्या उपक्रमात कोडॅक हे सहभागी आहेत. सोसवा यांच्या उपक्रमांमध्ये अनेक बड्या कॉर्पोरेट कंपन्या सहभागी झाल्या आहेत. तसेच तेथे काम करणारे अनेक कर्मचारीदेखील त्यांच्यासोबत अनेक उपक्रमांमध्ये आपले योगदान देतात. याशिवाय गरीब मुलांना शिकवणे, अंध मुलांकरिता वाचन, परिक्षेमध्ये लिखाण, संशोधन करणे, योगा प्रशिक्षण, कला आणि हस्तकला कार्यशाळा, वाढदिवस, सण साजरे करणे, आरोग्यसंबंधी कार्यशाळा अशी कार्ये ते करतात.
'सोसवा'ने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात एड्स/एचआयव्हीबाबत देखील काम केले आहे. याशिवाय तृतीयपंथीयांच्या लोकसंख्येबाबतदेखील सोसवाने एक उपक्रम राबविला आहे. मुंबईवर करण्यात आलेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सोसवाने प्राधान्याने अनेक उपक्रम हाती घेतले. त्यातील महत्वाचा उपक्रम म्हणजे आपत्कालीन व्यवस्थापन (Disaster Management). २६/११ सारखा दहशतवादी हल्ला आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत (हल्लीच चेंबूर येथे एका झोपडपट्टीला आग लागल्याने ३०० झोपड्या जळून खाक झाल्या होत्या.) आपले पितळ उघडे पडले होते. आपत्कालीन परिस्थितीकरता आपण तयार नसून, आपत्कालीन व्यवस्थापनाबद्दल शासनात तसेच लोकांमध्येदेखील जागृती नाही. या सर्वांना योग्य ते प्रशिक्षण देऊन या परिस्थितीकरता तयार करणे आवश्यक आहे. या गोष्टीकडे विशेष भर देताना सोसवा यांनी आपत्कालीन व्यवस्थापन सहकार्य़ गटांची स्थापना केली. त्यात अनेक कंपन्यांनी सहकार्य़ केले. आपत्कालीन परिस्थितीकरिता नागरिकांना प्रशिक्षण देण्याच्या सोसवा यांच्या उपक्रमात अनेक कंपन्यांनी सहकार्य़ केले.
याशिवाय दक्षिण मुंबईतील धारावी या परिसरात सोसवा यांनी शिक्षण आणि आरोग्य संबंधी उपक्रम राबविले. तसेच वेश्याव्यवसायात असलेल्या स्त्रियांच्या मुलांकरितादेखील त्यांनी उपक्रम राबविले.
आदिवासी मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी तसेच त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सोसवाने डहाणू तालुक्यात प्रय़त्न केले. तसेच शिक्षणाकरिता घरापासून दूर येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी वसतीगृहाची सुविधा उपलब्ध करुन दिली.
पाणी संकटाबाबतदेखील सोसवाने पाऊले उचलली असून, मुंबई शहरातील ३० शाळांमधील जवळपास २५०० विद्यार्थ्यांना त्यांनी याबाबत जागरुक केले. याशिवाय धारावी येथील इंग्रजी आणि उर्दू माध्यमातील मुलांची वाचन कला अधिक विकसित करण्यासाठी त्यांनी एक उपक्रम हाती घेतला. सोसवाचे स्वयंसेवक मार्च २०१२पासून हा उपक्रम यशस्वीरित्या राबवत आहेत. तसेच ठाण्यातील अनेक शाळांमध्ये त्यांनी गणिताचे प्रशिक्षण वर्गदेखील घेतले आहेत.
आरे कॉलनी, चीता कॅम्प, राओली कॅम्प या तीन वस्त्यांमध्ये त्यांनी सोलार प्रकल्पदेखील प्रस्थापित केले आहेत.