Brands
Discover
Events
Newsletter
More

Follow Us

twitterfacebookinstagramyoutube
ADVERTISEMENT
Advertise with us

बाबर अली! जगातला सर्वांत लहान शिक्षक!

बाबर अली! जगातला सर्वांत लहान शिक्षक!

Saturday November 14, 2015 , 6 min Read

पश्चिम बंगालच्या एका मागास भागात एका मुलाने एक असा प्रयोग सुरू केला, की त्याचे जगभरात नाव झाले. अर्थात आता तो मुलगा लहान राहिलेला नाही. चांगलाच मोठा झालेला आहे. पण त्याच्या प्रयोगाची चर्चा थांबलेली नाही. अत्यंत अवघड किंबहुना क्रांतीकारक म्हटल्यास वावगे ठरू नये, अशा या प्रयोगाची सुरवात त्याने बालपणीच केलेली होती. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोठमोठे विद्वान, अर्थशास्त्रज्ञ, धोरणी-धुंरदर, शिक्षण तज्ज्ञ अशी मंडळीही त्याच्या प्रशंसकांमध्ये समाविष्ट झाली. अनेक लोक आयुष्यभर खपूनही करू शकत नाहीत, ते काम त्याने बालपणीच करून दाखवले होते. त्याच्या प्रयत्नांनी आणि त्याच्या यशाने जगाला एक नवा मार्ग दाखवला. ज्याच्याविषयी आम्ही इतके बोलतो आहोत, त्याचं नाव बाबर अली. पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातला राहणारा. आता तो चांगला २२ वर्षांचा धडधाकट तरुण आहे आणि त्याचे शिक्षणही सुरू आहे. पण ९ वर्षांचा असतानाच स्वामी विवेकानंदांच्या मार्गदर्शनाबरहुकूम एकाच विचाराला त्याने आपल्या जगण्याचे उद्दिष्ट बनवले आणि तोही जगभर प्रसिद्ध झालेला होता.

image


दहा किलोमीटरवर शाळा

बाबरच्या प्रयोगाची कथा २००२ मध्ये सुरू झाली. नऊ वर्षांच्या बाबरला शाळेत जाण्यासाठी १० किलोमीटर अंतर कापावे लागे. भाब्ता उत्तर पारा हे त्याचे गाव. इथं शाळा नव्हती. बाबरला शिकून मोठे व्हायचे होते. नाव कमवायचे होते. वडिल मोहम्मद नसिरुद्दिन यांनीही मुलाला निराश होऊ दिले नाही. नसिरुद्दिन धान्य-भाजीपाल्याचे किरकोळ व्यापारी होते. बाबरला अभ्यासासाठी जे हवे असे, ते नसिरुद्दिन आणून देत. बाबर मन लावून अभ्यास करायचा. गावातली इतर मुले शाळेत येत नाहीत. गरिबीमुळे त्यांचे आई-वडिल त्यांना दुसऱ्या गावात पाठवू शकत नाहीत. ही मुले दिवसभर खेळत-हुंदडत किंवा काहीतरी काम करत.

पेरूच्या झाडाखाली वर्ग

बाबर हे दृश्य बघून कळवळत असे. इतरांचे काय पण त्याची स्वत:ची लहान बहिणही याच कारणाने शाळेला मुकलेली होती. बाबरच्या मनात विचार आला, की जी मुले शाळेत जाऊ शकत नाहीयेत त्यांना आपणच शिकवूयात का? बाबरने ठरवून टाकले, की आपण शाळेत जे काही शिकतो, ते गावात आल्यावर मुलांना शिकवायचे. बाबर अशाप्रकारे गावातील मुलांचा शिक्षक बनला. आपल्या घरात परसदारी एका पेरूच्या झाडाखाली बाबरने आपली ही शाळा सुरू केली. बाबरची स्वत:ची बहिण आणि अन्य काही मुले त्याचे विद्यार्थी बनले.

फळा, खडू, वह्या-पुस्तके

शाळेत बाबर जे काही शिकून यायचा ते इथं तो मुलांना शिकवायचा. मुलांना शिकण्यात मजा येऊ लागली आणि लहानग्या बाबरलाही मास्तरकीत आनंद येऊ लागला. मास्टर बाबरच्या शाळेची गोष्ट गावभर पसरली. इतर मुलेही बाबरच्या शाळेत येऊ लागली. वर्गातील मुलांच्या गरजा पूर्ण करण्यात बाबरला खुप कष्ट सोसावे लागले. फळा त्याने कसाबसा उपलब्ध करून घेतला. बाबर आपल्या शहरातील वर्गातून उरलेले, पडलेले खडूचे तुकडे गोळा करून आणायचा आणि त्यावर आपले काम धकवायचा. वर्तमानपत्रांतील कात्रणांचा वापर त्याने केला. काम अवघड होते, पण बाबरने संपूर्ण जोर लावलेला होता. मुलांकडून लिहून घेण्याची गरज भासे तेव्हा बाबर रद्दीवाल्याकडे जायचा, वह्यांतील कोरी कागदं फाडून आणायचा आणि त्यावर काम धकवायचा.

आता बाबरच्या वर्गात सगळं काही होतं. फळा होता. वाचायला जुनी वर्तमानपत्रे, रद्दीतून आणलेली पुस्तके आणि लिहायला कागदंही. मुलंही मन लावून शिकू लागली. बाबर असं काही शिकवायचा, की मुलं तो कधी शाळेतून परततो आणि आपला वर्ग कधी भरतो म्हणून चातकासारखी वाट बघत. शाळा अशी चाललेली होती, पण बाबर शिकण्याकडे कमी आणि शिकवण्याकडे जास्त लक्ष घालत आहे, असे त्याच्या वडिलांच्या लक्षात आले आणि त्यांनी बाबरला वर्ग बंद कर म्हणून सांगितले. बाबरने ऐकले नाही. मी शिकवतो, त्याचा माझ्या अभ्यासावर कुठलाही परिणाम होत नाही, असे बाबरने वडिलांना आश्वस्त केले. वडिलांनीही समजून घेतले.

छोट्या मास्तरचे नाव मोठे

बाबरच्या मास्तरकीची चर्चा आता लगतच्या गावांतूनही होऊ लागली. बाबरच्या शिक्षकांना जेव्हा त्याच्या वर्गाबद्दल माहिती मिळाली, तेव्हा त्यांनीही बाबरची पाठ थोपटली. गावकरीही मोठ्या संख्येने मुलांना बाबरच्या शाळेत पाठवू लागले. वर्षागणिक बाबरच्या शाळेची पटसंख्या वाढू लागली. बाबरने वर्ग चालवण्यासाठी मुलांच्या पालकांकडून तांदुळ घ्यायला सुरवात केली. तांदुळ विकून मुलांसाठी वह्या-पुस्तकांची खरेदी सुरू झाली. गावातले शेतकरी पैसे द्यायला काकू करत. म्हणून तांदुळ घेण्याची शक्कल बाबरने लढवली. शक्कल कामी आलेली होती. फार थोड्या कालावधीत बाबर मास्तरांची ही शाळा नावारूपाला आली.

पेरूच्या झाडाखाली भरणाऱ्या वर्गाला आता छोटेखानी का असे ना पण एका आदर्श शाळेचे रूप आलेले होते. बाबरने रात्रकालिन शाळेला औपचारिक सुरवात केली. वडिलांनीही मदत केली. बाबर तेव्हा सहावीत होता. गावच्या सरपंचांनीही बाबरच्या शाळेसाठी पुस्तके द्यावीत म्हणून गटविकास अधिकाऱ्यांकडे शिफारस केली. अन्य मंडळीही मदतीला पुढे आली. तुलूमावशी म्हणून ओळखली जाणारी एक बापडीही पुढे सरसावली. शाळा भरण्या-सुटण्यासाठी घंटा वाजवण्याची जबाबदारी तुलूमावशीने स्वत:हून स्वीकारली.

अमर्त्य सेन यांचे आमंत्रण

नसिरुद्दिन यांनी लेकाला शाळेच्या उद्घाटनासाठी सहाशे रुपये दिले. माइक भाड्याने आणला गेला. शाळा सजवली गेली. आईची साडीही या सजावटीत उपयोगी आली. फित कापून बाकायदा उद्घाटन झाले. सांस्कृतिक कार्यक्रम झाले. नृत्य आणि गाणीही सादर करण्यात आली. ‘आनंद शिक्षा निकेतन’ असे शाळेचे नामकरण झाले. आता मास्टर बाबर केवळ शिक्षक नव्हता तर संस्थापक मुख्याध्यापकही बनलेला होता. बाबरच्या शाळेची बातमी जेव्हा वर्तमानपत्रात छापून आली, तेव्हा ती वाचून नोबेल पुरस्कारप्राप्त अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी बाबरला ‘शांतीनिकेतन’मध्ये बोलावून घेतले. पश्चिम बंगालचे माजी अर्थमंत्री, तसेच नावाजलेल्या अर्थशास्त्रज्ञांसह अन्य विद्वतजनांसमोर तासभर भाषण दिले व आपले शिक्षणविषयक विचार मांडले. प्रत्येकावर बाबरच्या विचारांचा ठसा उमटला. बाबर तेव्हा आठवीत होता.

बाबर आणि त्याच्या शाळेची चर्चा आता राज्याच्या राजधानीत कोलकात्यातही होऊ लागलेली होती. लहानगा बाबर कोलकात्याला यायचा आणि आयएएस तसेच आयपीएस अधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांच्या भेटी घ्यायचा. शाळेसाठी अनुदान मागायचा.

२००८ मध्ये बाबर दहावीला होता. सकाळी लवकर उठायचा. अभ्यासाला लागायचा. शाळेत जायचा आणि आला, की सायंकाळी आपल्या शाळेत मुलांना शिकवायचा. दहावीत तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला.

‘बीबीसी’ या जगप्रसिद्ध वृत्तसंस्थेने बाबरला जगातला सर्वांत लहान मुख्याध्यापक म्हणून जाहीर केले. बाबरची गोष्ट जगभर गेली. भारतातील इंग्रजी न्यूज चॅनेल ‘सीएनएन-आयबीएन’ने त्याला ‘रिअल हिरो’ हा खिताब बहाल केला. अन्य अनेक संस्थांकडून बाबरला गौरवण्यात आले.

बाबरला जसा गौरव मिळाला तशीच मानहानीही वाट्याला आली.

बाबर म्हणतो, ‘‘माझ्या कष्टावर पाणी फिरवण्याचा उद्योगही अनेकांनी केला. अनेक लोक माझ्यावर जळत होते. त्यांना माझे नाव होते आहे, ही गोष्टच पचत नव्हती. अनेकांनी माझ्याविरुद्ध अफवा पसरवल्या. काहींनी ठार मारण्याची धमकीही दिली. मला कुणाचेही नाव घ्यायचे नाही. मी कुणाला घाबरतही नाही. मला चांगली कामे करायची आहेत आणि मी ती करत राहणार आहे.’’

‘‘स्वामी विवेकानंदांच्या विचारांतून मला प्रेरणा मिळाली. जेव्हा कुठले संकट येते. समोर एखादे आव्हान उभे राहते. स्वामी विवेकानंदांचे विचार आणि त्यांच्या मार्गदर्शनाचे मी स्मरण करतो. मला लढण्याची शक्ती मिळते.’’

बाबर सांगतो, ‘‘ध्येयाने झपाटलेल्यांसाठी स्वामी विवेकानंदांची एक शिकवण आहे, ती म्हणजे… एका विचाराचा अंगिकार करा. तो विचार म्हणजेच आपले जीवन असा संकल्प सोडा. त्याचेच ध्यान धरा, त्याचीच स्वप्ने पहा. तो विचार जगा. मस्तिष्क, मांसपेशी, रक्तवाहिन्या शरीराचे रंध्ररंध्र त्या विचारात बुडवून घ्या. बाकी सगळे विचार बाजूला ठेवून द्या. यशस्वी होण्याचा हाच मंत्र आहे, स्वामीजींची ही शिकवण पदोपदी माझ्यासोबत असते.’

महत्त्वाचे म्हणजे बाबरची नुसतीच शाळा चाललेली नाही तर शिक्षणही चाललेले आहे. त्याला आयएएस अधिकारी व्हायचेय. देशाची सेवा करायचीय. गोरगरिबांची सेवा करायचीय. बाबरची शाळा तर केव्हाच मोठी झालेली आहे. ५०० वर मुले त्याच्या शाळेत शिकताहेत.

बाबरचे सांगणे आहे… ‘‘देशातल्या इतर गावांतूनही शिकलेल्या लोकांनी विशेषत: मुलांनी न शिकलेल्या, न शिकणाऱ्या मुलांना शिकवण्याचा उद्योग करावा. देश शंभर टक्के साक्षर करून सोडावा. साक्षरता प्रगतीचा आधार आहे, हे लक्षात ठेवावे.’’