फॅशन पोर्टल व्हायसोब्ल्यूः दुःखावर मात करत मायलेकींची नवी भरारी
स्वतः एक यशस्वी व्यावसायिक बनावे, स्वतःची कंपनी स्थापन करावी, ही खरे तर श्वेता शिवकुमारची स्वप्न कधीच नव्हती. मात्र तिच्या वडिलांच्या २०१२ साली झालेल्या अकाली मृत्यूने श्वेताचे आयुष्यच बदलून गेले. त्या कठीण काळात तिची आई तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीली आणि केवळ मुलीला प्रोत्साहन देऊनच थांबली नाही, तर तिच्या व्यवसायात बरोबरीने भागीदारही झाली. आयुष्याच्या त्या कठीण परिक्षेला या मायलेकी खऱ्या उतरल्या... जाणून घेऊ या त्यांची कहाणी...
२०१२ साली वडिलांच्या झालेल्या अकाली मृत्यूने श्वेताच्या आयुष्याला वेगळेच वळण लागले. “ त्यावेळी माझे उच्च शिक्षण सुरु ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता. पण नेमकी तेंव्हाच मला अचानक एक संधी चालून आली. माझ्या आईचे एक दूरचे भाऊ माझ्या वडीलांच्या अंत्यदर्शनाला आले होते. त्यांच्या इमारतीत रहाणारे एक जण आऊटलूक या बिझनेस मासिकाच्या ऍड सेल्स विभागाची जबाबदारी घेणाऱ्या एखाद्या माणसाच्या शोधात होते. आता खरे तर ही गोष्ट एखाद्या बॉलीवूडपटाचीच वाटेल,” व्हायसोब्ल्यू या ऑनलाईन फॅशन पोर्टलची सहसंस्थापिका असलेली २४ वर्षीय श्वेता सांगते.
आऊटलूक च्या आपल्या पहिल्याच नोकरीत तेरा महिने काम केल्यानंतर श्वेताने आणखी एका कंपनीत ६-७ महिन्यांसाठी मिडिया प्लॅनिंगचे काम केले आणि नोकरी आता पुरे झाल्याची जाणीव तिला झाली.
कामामधील फावल्या वेळात फॅशन मॅगझिन्स आणि ब्लॉग वाचण्याची तिला आवड होती. जरी स्वतःचे काहीतरी सुरु करण्यासाठी श्वेताचे मन अजून पूर्ण तयार नसले, तरी फॅशन जगताशी संबंधितच काहीतरी करायला आपल्याला आवडेल, हे तिला तेंव्हाच नक्की माहित होते.
यावेळी ती नोकरीत समाधानी नसल्याचे पाहून तिची आई जया यांनीच तिला नोकरी सोडण्यासाठी प्रोत्साहन दिले. मात्र नोकरीला रामराम ठोकून स्वतःचे काही तरी सुरु करण्याचा विचार श्वेताने शांतपणाने केला आणि मगच हा निर्णय घेतला. “ माझ्या वडिलांचे अकाली निधन झाले नसते, तर स्टार्ट अप सुरु करण्यासाठी मी मुळीच प्रवृत्त होऊ शकले नसते. त्यांच्या यकृताला काही संसर्ग झाला होता आणि लांबलचक उपचारांनंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होताना दिसू लागली असतानाच त्यांचा मृत्यू झाला. जर ते हयात असते, तर स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी मी आणखी बराच वेळ घेतला असता, स्टार्ट अप करण्याचे धैर्यच माझ्यात आले नसते,” श्वेता सांगते. यासाठी तिने आणि तिच्या आईने केलेली खटपट, लोकांच्या घेतलेल्या भेटीगाठी आणि स्टार्ट अपसाठी लागणारे भांडवल उभारण्यासाठी केलेले कष्ट तिच्या कायमच स्मरणात रहातात. मात्र यावेळी या मायलेकींनी एकच विचार केला होता, तो म्हणजे ‘यापेक्षा अधिक वाईट काही होऊच शकणार नाही’.
व्हायसोब्ल्यू ला सुरुवातः
श्वेता आणि तिच्या धाकट्या बहिणीने एका रात्री बराच काथ्याकुट केल्यानंतर अखेर त्यांना हे नाव सापडले... व्हायसोब्ल्यू हे नाव त्यांनी जाणीवपूर्वक निवडले होते. ‘फॅशन’ हा शब्द नावाबाहेर ठेवण्याचा त्यांचा खास प्रयत्न होता. “आमचा ब्रॅंड हा आनंद आणि उत्साहाचे प्रतिक आहे आणि या ब्रॅंडची उत्पादने वापरल्याने वापरकर्त्याचा मूड लगेचच चांगला होईल,”श्वेता सांगते.
श्वेताच्या आईने दिलेल्या खंबीर पाठींब्यानेच श्वेताला हे स्टार्ट अप करता आले. “मी तिला सांगितले की, कुटुंबात केवळ ती एकटीच कमावती आहे या कारणास्तव तिने एखादे काम करत राहू नये, त्यापेक्षा फॅशन जगताशी संबंधित काही तरी करण्याचे आपले स्वप्न साकारावे,” जया सांगतात.
श्वेताचे वडिल आजारी पडल्यापासूनच जया याच कुटुंबाचा आधारस्तंभ राहील्या आहेत आणि त्यांच्या मुलींसाठी नेहमी प्रेरणादायीही ठरल्या आहेत. “एकदा निर्णय घेतल्यानंतर मात्र आम्ही कोणाकडूनही कर्ज न घेता पैशाची उभारणी केली. हळूहळू प्रगती करुन मग गरज वाटल्यास कर्ज काढायचे, असे आम्ही ठरविले होते,” जया सांगतात. निर्णय घेण्याच्या प्रसंगी मात्र दोघींपैकी जया या सहाजिकच अधिक खंबीर आहेत. अजून एखाद्या संधीच्या प्रतीक्षेत स्टार्टअप करण्याचा निर्णय आणखी पुढे ढकलू नये... तर आताच स्टार्टअप करावी हा निर्णयही त्यांचाच...
जया स्वतः शिवणकामात पटाईत आहेत आणि गेली पंचवीस वर्षे त्या हे करत आल्या आहेत. विशेषतः आपल्या मुलींच्या लहानपणापासूनच त्यांचे पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे शिवल्याने, तो अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे.
जेंव्हा व्हायसोब्ल्यूची संकल्पना सुचली, तेंव्हापासून प्रत्येकीच्या भूमिका स्पष्ट होत्या. त्यानुसार कापड मिळविणे, अंतिम डिझाईन्स तयार करणे आणि विपणनाची काळजी घेणे या गोष्टींची जबाबदारी श्वेताकडे आहे तर यासर्वांची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष शिलाईचे काम ही जया यांची जबाबदारी आहे. त्या इन हाऊस अर्थात स्वतःच निर्मात्या असल्यामुळे उत्पादनावर त्यांचे संपूर्ण नियंत्रण तर असतेच पण ग्राहकांच्या इच्छेनुसार आणि मागणीनुसार त्यांच्यासाठी खास उत्पादनेही बनविली जातात. व्हायसोब्ल्यूमध्ये त्या डिझाईन्समध्ये थोडासा बदल करण्यापासून ते संपूर्णपणे नविन डिझाईन्स करण्यापर्यंत प्रत्येक कामात फॅशनेबल गोष्टी अंतर्भूत करण्याचा प्रयत्न करतात. हा ब्रॅंड नुकताच दाखल झाला असून वेगाने प्रगती करत आहे.
“ माझ्या पतीचे निधन झाले, त्यावेळी आमची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. जरी मी तिला नोकरी सोडण्यासाठी प्रोत्साहन दिले असले, तरी माझ्या मनात मला माहित होते, की हा एक मोठा धोका आम्ही पत्करत आहोत. पण ती तिच्या कामात अगदीच नाखुष होती आणि त्यामुळे तेच पुढे चालू ठेवण्यातही काही अर्थ नव्हता. मात्र आपण एकत्रपणे या प्रसंगावर मात करु शकू, असा विचार आम्ही केला,” जया सांगतात. जरी त्या त्यांच्या मुलींसाठी आणि मैत्रिणींसाठी एवढे वर्षे शिवणकाम करत असल्या, तरी या भूमिकेत शिरल्यानंतरच त्यांच्यात खूप आत्मविश्वास वाढला आणि जेंव्हाकेंव्हा त्यांच्या कामाची प्रशंसा होते, त्यांना खूपच आनंद होतो.
त्यांच्याकडे खरे तर व्यावसायिक बनण्याची सहजप्रवृत्ती सुरुवातीपासूनच होती आणि त्यांच्या मुलीने त्यांना उद्योगात आणण्यास प्रवृत्त करण्यापेक्षा त्यांनीच मुलीला व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले, ही गोष्ट नक्कीच फायद्याची ठरली. “ मुलींच्या वाढत्या वयातही मी स्वतःच्याच चुकांमधून शिकत शिकत त्यांच्यासाठी पाश्चिमात्य पोषाख शिवत असे आणि त्यात मी यशस्वीही झाले,” जया सांगतात.
आज त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत, एका नव्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. त्यातही ही मायलेकींची जोडी नक्कीच यशस्वी ठरेल. त्यांना खूप शुभेच्छा...