‘मिशन फिनलँड’ची यशोगाथा

हिप्पोकॅम्पसचे संस्थापक उमेश मल्होत्रा यांचा प्रवास सोपा नव्हता, या प्रवासामध्ये त्यांना असंख्य अडचणींना सामोरं जावं लागलं. आणि याबद्दल उमेश मल्होत्रा मोठ्या उत्साहानं सांगतात, "हिप्पोकॅम्पस शिक्षण संस्थेचं उद्दीष्ट २०२० पर्यंत फिनलँडच्या लोकसंख्येइतक्याच आपल्या इथे बालवाडीमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं आहे."

‘मिशन फिनलँड’ची यशोगाथा

Saturday August 22, 2015,

6 min Read

सरकारी शाळांबद्दल आपल्याकडे प्रचंड औदासीन्य बघायला मिळतं. या शाळांकडे दुर्लक्षही मोठ्या प्रमाणावर झाल्याचे बघायला मिळत आहे आणि यातूनच हिप्पोकॅम्पस शिक्षण संस्था उदयाला आली. आज हिप्पोकॅम्पस शिक्षण संस्थेमध्ये एकूण ५२०० विद्यार्थी शिक्षण घेतायत, त्यांना शिकवण्यासाठी ३५० शिक्षक आहेत तर संस्थेची १५० पेक्षा जास्त केंद्रं आहेत. मात्र हिप्पोकॅम्पसचे संस्थापक उमेश मल्होत्रा यांचा प्रवास सोपा नव्हता. या प्रवासामध्ये त्यांना असंख्य अडचणींना सामोरं जावं लागलं. आणि याबद्दल उमेश मल्होत्रा मोठ्या उत्साहानं सांगतात. हिप्पोकॅम्पस शिक्षण संस्थेचं उद्दीष्ट २०२० पर्यंत फिनलँडच्या लोकसंख्येइतक्याच आपल्या इथे बालवाडीमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं आहे, आणि ते ही यासाठी लागणा-या किमतीच्या फक्त एक टक्का रकमेमध्ये. आणि म्हणूनच या संकल्पनेला ‘मिशन फिनलँड’ असं नाव देण्यात आलेलं आहे.

उमेश मल्होत्रा यांची हिप्पोकॅम्पस लायब्ररीमध्ये रोहिणी निलेकणी यांच्याबरोबर भेट झाली, या भेटीदरम्यान दोघांमध्ये झालेल्या संभाषणातून उमेश यांना ‘अक्षरा फाउंडेशन’बाबत माहिती मिळाली. उमेश हे रोहिणी यांच्यासोबत एका खेड्यामध्ये सुरू असलेली सरकारी शाळा पाहण्यासाठी गेले होते. ती शाळा पाहून त्यांना जबरदस्त धक्का बसला. "ज्या पद्धतीने या शाळा चालवल्या जात होत्या आणि ज्या पद्धतीनं आपल्या खेडेगावांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं ते बघून मला प्रचंड धक्का बसला, ”असं उमेश यांनी सांगितलं.

उमेश त्यानंतर झोपडपट्टीमध्ये चालणा-या एका शाळेमध्ये गेले. तिथली परिस्थिती बघूनही त्यांना नखशिखांत हादरा बसला कारण, “माझं आयुष्य आत्तापर्यंत आरामदायक आणि उच्च मध्यम वर्गात गेलं होतं; मला सगळ्यात भावलेली गोष्ट होती ती म्हणजे शाळेची अवस्था इतकी दयनीय असूनही पालक त्यांच्या विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये शिकायला पाठवत होते. ”

हिप्पोकॅम्पसचे संस्थापक उमेश मल्होत्रा हिप्पोकॅम्पसच्या  विद्यार्थ्यांसोबत

हिप्पोकॅम्पसचे संस्थापक उमेश मल्होत्रा हिप्पोकॅम्पसच्या विद्यार्थ्यांसोबत


"शाळेच्या वर्गामध्ये अत्यंत अंधुक प्रकाश, वर्गाबाहेर वाहणारी गटारे, शिकवण्यात अजिबात रस नसलेले शिक्षक, आणि प्रचंड गोंधळ हे या झोपडपट्टीतील शाळेचं चित्र उमेश यांच्या मनात खोलवर परिणाम करून गेलं. " विचार करा की आरटीओ कार्यालयात जाणं हे किती वेदनादायक असतं, तुम्ही एका सरकारी शाळेत आपल्या मुलाला शिकण्यासाठी घातलं तर या वेदना तुम्हाला कळू शकतील," असं उमेश म्हणाले.

सरकारी शाळांची ह्रदय पिळवटून टाकणारी परिस्थिती, या शाळांबाबत असलेली मतमतांतरे, या शाळांबाबत तसंच शाळांमध्ये असलेले कमालीचे नैराश्य आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये रोज शाळांमध्ये येणारे पालक आणि विद्यार्थी ही परिस्थिती उमेश यांना नवीन अनुभव देत होती. "या परिस्थितीने मला शिकवलं मनुष्य प्राणी आशेवर जिवंत राहतो; कारण असं नसतं तर या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या ९७ टक्के कधीच बघायला मिळाली नसती," असं उमेश यांचं स्पष्ट म्हणणं आहे.

ही परिस्थिती आपण बदलू शकतो या विश्वासानंच उमेश यांनी या क्षेत्रात उतरण्याचे ठरवले. मात्र, उमेश यांच्यापुढचं सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे शिक्षण क्षेत्रात असलेल्या लोकांची मानसिकता बदलणे. "आयटी क्षेत्रामध्ये तुम्ही काहीतरी छान काम करू शकता, ज्याच्या बदल्यात तुम्हाला भरभक्कम मोबदला मिळू शकतो पण त्यामुळे समाजामध्ये खरोखर काही बदल घडू शकतो का याबाबत काहीही कल्पना नसते. मी येत्या काही वर्षात परिस्थिती बदलू शकतो असा विचार करत या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला, मात्र मी त्यात सपशेल अपयशी ठरलो”,असं उमेश यांनी प्रांजळपणे सांगितलं.

उमेश यांचा हिप्पो कॅम्पस लायब्ररीचा प्रयोग यशस्वी झाला होता, मग हाच प्रयोग आपण सरकारी शाळांसाठी आणि खेडेगावातील शाळांमध्येही का आजमावून बघू नये असा विचार उमेश यांच्या मनात आला. "आपल्याला या शाळांबाबतचा कितीही वाईट अनुभव आला असला तरी आपण या मुलांना पुस्तकांच्या सान्निध्यात आठवड्यातला किमान एक तास जरी आणलं तरी मोठा बदल घडू शकतो,"असं वाटल्याचं उमेश म्हणाले.

मात्र असं असलं तरी ही गोष्ट सहजसाध्य नव्हती, विद्यार्थ्यांना पुस्तक वाचता येत नव्हतं, शिक्षकांना काहीही कदर नव्हती, बाजारात पुरेशी पुस्तकं उपलब्ध नव्हती, मुख्याध्यापकांना वाटत होतं की लायब्ररी म्हणजे निरर्थक गोष्ट आहे; त्यांना पालकांकडूनही फारशी मदत मिळत नव्हती. "या सर्व आव्हानांमुळे, उद्दीष्ट गाठणं कठीण झालं होतं, लोकांना आम्हाला अगदी मूलभूत गोष्टीही समजावून शिकवाव्या लागत होत्या; या तीन वर्षात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. चांगली गोष्ट एकच होती ती म्हणजे पालकांचा दुर्दम्य आशावाद ज्यामुळे आम्हाला पुढे जाण्यास शक्ती मिळत राहीली."

शिक्षण आनंददायी करण्याचा हिप्पोकॅम्पसचा प्रयत्न

शिक्षण आनंददायी करण्याचा हिप्पोकॅम्पसचा प्रयत्न


२००७ साली 'वाचनासोबत वाढा' हा अगदी सोपा लायब्ररी कार्यक्रम सुरू करण्यात आला, ज्यामुळे काही अडचणींवर मात करणं शक्य झालं. वाचन क्षमतेनुसार पुस्तकांचं वर्गीकरण करण्यात आले; वर्गीकरणामध्ये सहा स्तर करण्यात आले. प्रत्येक स्तराला हिरवा, लाल, नारंगी, पांढरा, निळा तसचं पिवळा हे रंग देण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला वाचन स्तर ठरवून रंग देण्यात आला. "तीन वर्षांच्या अपयशानंतर ही गोष्ट आम्हाला साध्य झाली होती. लायब्ररीतील सगळी पुस्तकं रंगांनुसार वेगवेगळी करण्यात आली होती, विद्यार्थ्यांच्या सदस्यत्वाच्या कार्डसनाही तसेच रंग देण्यात आले होते त्यामुळे कुठलाही विद्यार्थी त्याच्यासाठीच्या स्तराची पुस्तकं जाऊन वाचू शकत होता,"असं उमेश यांनी सांगितलं.

वाचनाच्या सवयीला प्रोत्साहन मिळावं यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले. रंगकाम म्हणजेच कलरींगमुळे अधिकाधिक विद्यार्थी वाचनाकडे वळले. "विद्यार्थी जेव्हा यायचे तेव्हा आम्ही त्यांना सांगायचो की रंगकाम म्हणजेच कलरिंगच्या आधी तुम्हाला दोन पुस्तकं वाचायची आहेत, त्यांना ही गोष्ट प्रचंड आवडायची आणि ते पुस्तकं वाचायचे. २००९ पर्यंत आमच्या या कार्यक्रमामध्ये जवळपास ५०००० विद्यार्थी सहभागी झाले होते. ही सगळी मुले कन्नड, इंग्रजी आणि तमिळशिवाय उर्दू आणि हिंदी पुस्तकं वाचायला लागली होती," असं उमेश यांनी सांगितलं.

या कार्यक्रमानंतर हिप्पोकॅम्पसशी ‘ रूम टू रिड ' नावाच्या स्वंयंसेवी संस्थेने संपर्क साधला, त्यानंतर हा कार्यक्रम ९ राज्यांमध्ये सुरू करण्यात आला आणि सध्या हा कार्यक्रम १० देशांमध्ये राबवला जातोय. २००८ साली उमेश यांना ‘अशोका फेलो’ प्रदान करण्यात आला. त्यानंतर उमेश यांना देशातील काही सामाजिक नवउद्योजकांना भेटण्याची संधी मिळाली. आणि यादरम्यानच हिप्पोकॅम्पस बालवाडी कार्यक्रमाचा जन्म झाला. उमेश यांनी सांगितलं की “ मी चित्रदुर्ग जिल्ह्यातील गावात होतो तेव्हा बघितलं, मुलं थेट पहिल्या इयत्तेत दाखल होतात आणि त्यानंतर राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम शिकायला लागतात. हीच परिस्थिती इथल्या सगळ्या गावांची आणि शहरांची होती. मात्र मोठ्या शहरांमध्ये मुलांना बालवाडीत इंग्रजी आणि गणिताचे धडे घेण्याची संधी मिळते. ज्यामुळे या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशी जुळवून घेणं सोपं जाते. ग्रामीण भागातली मुलं असं करू शकत नाही, त्यामुळे इथल्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण खूप मोठं आहे. याचाच अर्थ हा होतो की अभ्यासक्रम समान असूनही या विद्यार्थ्यांना शिक्षणात समान संधी मिळत नाही. ”

'कलरींग'मुळे विद्यार्थ्यांची पुस्तक वाचनाची गोडी वाढायला मदत झाली

'कलरींग'मुळे विद्यार्थ्यांची पुस्तक वाचनाची गोडी वाढायला मदत झाली


ग्रामीण भागातील शिक्षणावर लक्ष केंद्रीत केल्यानं तसंच उपक्रमावर आधारीत शिक्षणपद्धतीमुळे हिप्पोकॅम्पसच्या कार्यक्रमामध्ये आशियाई विकास बँकेनं गुंतवणूक करायचं ठरवलं. "आमचं उद्दीष्ट हे देशातील गरीब मुलांना चांगलं शिक्षण मिळावं तसंच शिक्षणाचा स्तर उंचावत जावा हे आहे. याचा फायदा कमीत कमी ५ अब्ज विद्यार्थ्यांना व्हावा हे आमचं लक्ष्य असल्याचं," उमेश यांनी सांगितलं. हिप्पोकॅम्पस बालवाडीसाठी प्रत्येक वर्षासाठी ३५०० रूपये इतकी फी आकारली जाते. काही पालक ही फी एकदम भरतात तर काही पालक दर महिन्याला हप्ता-हप्त्यानं ही फी भरतात. "आम्ही रेशनच्या दुकानाच्या संकल्पनेवर काम करतो. आम्ही नाममात्र किंमतीत शिक्षण देतो," असं उमेश यांनी सांगितलं.

उमेश यांच्यापुढे अजूनही अनेक आव्हानं आहेत ज्यामध्ये काही ठराविक व्यक्तींकडून दिला जाणारा त्रास किंवा अंगणवाडी शाळांमध्ये निर्माण झालेलं असुरक्षिततेचं वातावरण, सरकारी अधिका-यांकडून होणारी घुसमट याचा समावेश आहे. मात्र तरीही पालकांच्या आशावादाच्या भांडवलावर हिप्पोकॅम्पसची टीम त्यांचं काम जोमानं पुढे नेत आहे.

"आमच्या शाळेतील शिक्षकांनाही शिकवणं हे आनंददायी वाटायला लागलंय कारण विद्यार्थ्यांची ग्रहणक्षमता वाढली आहे. आमच्या शाळेतील शिक्षकांची लेखी परीक्षा घेऊन त्यांची निवड केली जाते. संदर्भासहीत शिक्षण, वर्गातील तणावाची परिस्थिती शिक्षक शांतपणे हाताळू शकतात की नाही हे बघितलं जातं. आम्ही काल्पनिक परिस्थिती निर्माण करून शिक्षक ती कशी हाताळतात हे बघतो. व्यवस्थापनाबरोबर त्यांची मुलाखत होते, भरतीसाठीचे शिक्षणही दिले जाते. शिक्षकांना गृहपाठ दिला जातो. ती व्यक्ती स्वतंत्रपणे एक वर्ग सांभाळण्यास सक्षम आहे का हे आम्हाला बघायचं असतं. आम्ही शिक्षकांना इंग्रजीही शिकवतो कारण शिक्षकांना इंग्रजी लिहता येते मात्र बोलायची कशी हे माहिती नसते, त्यामुळे आम्ही त्यांना योग्य शब्दफेक आणि योग्य उच्चारासकट इंग्रजी शिकवतो,” असं उमेश यांनी सांगितलं

“जेव्हा मी शाळांमध्ये जातो आणि विद्यार्थ्यांना शब्दांची जुळवाजुळव करताना बघतो, आनंदाने शिक्षण घेताना आणि शिकताना बघतो आणि मृदू स्वभावाच्या आणि शिकवण्याबद्दल तळमळ, प्रेम असलेले शिक्षक बघतो तेव्हा आपण आणखी काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण होतो.” असं उमेश मल्होत्रा यांनी या अनुभवाबाबत बोलताना सांगितलं.