दुष्काळग्रस्त औसा तालुक्यातील महिला बचत गटाची कामगिरी : सॅनिटरी नॅपकिनची अमेरिकेला निर्यात

दुष्काळग्रस्त औसा तालुक्यातील महिला बचत गटाची कामगिरी : सॅनिटरी नॅपकिनची अमेरिकेला निर्यात

Tuesday May 17, 2016,

4 min Read

लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात इथं एक धक्कादायक बाब समोर आली. इथल्या १० टक्क्यांहून अधिक महिलांना मासिक पाळीत आरोग्याची काळजी योग्य पध्दतीनं न घेतल्यानं गर्भाशयाच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. यातल्या अधिकांश महिलांनी वयाची पस्तीशीही ओलांडलेली नाही. आरोग्य विभागाने या भागाचं सर्वेक्षण केलं. यावेळी या गर्भाशयाच्या आजाराची कारणं स्पष्ट झाली. दुष्काळामुळे पाणी नसल्याने मासिक पाळीच्या वेळी योग्य शारीरीक स्वच्छता ठेवता येणं शक्य होत नाही. यामुळळे बहुतांश महिलांमध्ये संसर्ग होतो. शिवाय उघड्यावर शौचासला गेल्यानेही संसर्गाचं प्रमाण जास्त आहे. बरं मुळात आपल्याकडे मासिकपाळीबद्दल बोलायला संकोच. त्य़ामुळे संसर्गाबद्दल बोलण्यास महिला धजावत नाहीत. अनेक दिवस आजार लपवून ठेवतात. यामुळे मोठी समस्या उभी राहते. आजार बळावतो आणि गर्भाशय काढून टाकण्यापर्यंत वेळ य़ेते. अशा गर्भाशय काढलेल्या महिलांची संख्या औसा तालुक्यात २० टक्क्याहून अधिक आहे. यामुळे इथं सामाजिक समस्यांनाही सामोरं जावं लागत आहे. 

image


बिल गेटस फाऊंडेशनसाठी काम करणाऱ्या छाया काकडे यांनी या समस्येचा जवळून अभ्यास केला होता. सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या छाया यांनी विचारधारा महिला बचत गट स्थापन केला होता. या बचत गटाद्वारे त्या तालुक्यातल्या महिलांच्या संपर्कात होत्या. त्यांच्याशी बोलताना वाढत्या गर्भाशयासंदर्भातल्या ऑपरेशन संदर्भातली बाब त्यांना समजली. याच मुळ हे मासिक पाळीदरम्यानच्या स्वच्छतेशी असल्याचं स्पष्ट होतं. संपर्कात आलेल्या महिलांनीही तेच सांगितलं. त्यावर तोडगा काय असू शकतो तर मासिक पाळीच्या वेळी स्वच्छतेसंदर्भात महिलांमध्ये जागृती निर्माण करणे. छायाताईंच्या हेही लक्षात आलं की ग्रामीण भागातल्या महिला आजही मासिक पाळीच्यावेळी कपडा वापरतात. या कपड्यामुळंच संसर्गाचा जास्त प्रादुर्भाव होतो. शिवाय हा कपडा पुन्हा-पुन्हा वापरला जात असल्यानं संसर्ग होणं सहाजिकच आहे. अश्यावेळी या महिलांना सॅनिटरी नॅपकिन वापरण्यासाठी तयार करणं गरजेचं होतं. पण बाजारात मिळणारे सॅनिटरी नॅपकिन या ग्रामिण भागातल्या महिलांना परवडणारे नव्हते. १० सॅनिटरी नॅपकिनच्या पॅकसाठी ६०-७० रुपये मोजावे लागत होते. ते सहाजिकच या महिलांच्या आवाक्याबाहेरचे होते. 

image


विचारधारा महिला बचत गटातर्फे सॅनिटरी नॅपकिनचं प्रोडक्शन करण्याचा प्लांट सुरु करायचं छाया काकडे यांनी मनावर घेतलं. त्यासाठी त्यांनी स्वत: प्रशिक्षण घेतलं. शिवाय आपल्यासोबत इतर १० महिलांनाही त्यांनी प्रशिक्षण दिलं. छाया काकडे सांगतात “ सॅनिटरी नॅपकीन बनवण्याच्या प्लांटसाठी प्रशिक्षण हे गावातल्या महिलांसाठी थोडसं न पटणारं होतं. या कामाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन तेवढा साफ नव्हता. त्यामुळे जेव्हा गावातल्या महिलांना मी प्रशिक्षणासाठी बोलवत होते तेव्हा पहिल्यांना नकारच मिळायचा. मासिक पाळीसंदर्भात असलेले अनेक गैरसमज आणि त्यातून तयार झालेला ‘टॅबू’ असं सर्वकाही असल्यानं महिला तयार होत नसत. अनेक महिलांच्या घरी जाऊन त्यांच्या नवऱ्याशी बोलून आणि त्यांना इथं आणून आम्ही काय करणार आहोत. याची माहिती दिल्यानंतर १० महिला तयार झाल्या. पुढे दोन महिन्यांनतर ही संख्या माझ्यासहित १५ वर गेली. पण अशक्य असं काहीच नाही असं मी मानते.” 

image


प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आता खरा खुरा प्लांट तयार करावा लागणार होता. त्यासाठी लाखोंच्या अर्थसहाय्याची गरज लागणार होती. यासाठी छायाताईंनी मदत घेतली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची. विद्यापीठाच्या उपकेंद्राचे संचालक डॉ. डी एन मिश्रा यांनी यासाठी पुढाकार घेतला. प्रशिक्षण आणि यंत्रसामुग्री आल्यावर पारधेवाडीत हा सॅनिटरी नॅपकिनचा प्रकल्प सुरु झाला. त्या सॅनिटरी नॅपकिनला नाव देण्यात आले रिफ्रेश. आरोग्य तिथे संपदा अशी या प्रॉडक्टची टॅगलाईन ठरली. “ प्लांट सुरु झाला पण खरी कसरत सुरु झाली ती त्यानंतर, इथं काम करायला महिलाच मिळत नव्हत्या. त्यामुळे दूरच्या गावातून मी स्वत:च्या गाडीतून महिलांना घेऊन यायची आणि पुन्हा शिफ्ट संपल्यानंतर सोडून यायची. असं हे सुरु होतं. लोक टोमणे मारत. हे काय काम करताय असं हिनवणे सुरु होते. इथं काम करायला येणाऱ्या महिलांना आपण कुठे काम करतो हे लोकांना सांगावसं वाटायचं नाही. त्यामुळं त्या आपला चेहरा पदरानं लपवून इथं येत. पण मला विश्वास होता की आम्हाला महिलांच्या आरोग्यासाठी सुरु केलेल्या या प्रकल्पासाठी सुरुवातीला जरी विरोध आणि दुर्लक्ष होत असलं तरी पुढे जाऊन त्याचा समाजासाठीच फायदा होईल.”

image


सध्या इथं काम तीन शिफ्टमध्ये काम चालतं. विचारधारा महिला बचत गटाचं सॅनिटॅरी नॅपकिनच्या प्रकल्पासंदर्भात तीन टप्प्यांमध्ये काम चालतं. पहिलं इथं प्रकल्पात काम करणं. या प्रकल्पात कमालीची स्वच्छता ठेवली जाते. शिवाय दुसऱ्या टप्प्यात महिला कार्यकर्त्या गावागावात जाऊन तिथल्या तरुण मुली आणि महिलांना सॅनिटरी नॅपकिन वापरण्याचं महत्त्व आणि आरोग्यासाठी ते किती आवश्यक आहे. हे समजावून देणं. त्या अनुशंगानं तिथल्या शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन सॅनिटरी नॅपकिनचं मोफत वाटप केलं जातं. त्यामुळे जास्तीत जास्त महिला या कापडा ऐवजी नॅपकिन वापरु लागतील. जेणे करुन संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही. तिसऱ्या टप्प्यात महिला कार्यकर्ता नॅपकिनचं मार्केटींग करतात. पंचक्रोशीतल्या सर्वच मेडीकल स्टोरमध्ये ते उपलब्ध होतील, शिवाय किराणामालाच्या दुकानातही ते ठेवण्यात यावेत यासाठी प्रयत्नशील आहेत. 

image


आठ महिन्यात आता इथल्या महिलांना सॅनिटरी नॅपकीन वापरण्यासंदर्भात बऱ्यापैकी प्रबोधन करण्यात यश आलंय. बाजारात मिळणाऱ्या इतर सॅनिटरी नॅपकिनपेक्षा रिफ्रेश स्वस्त आहे. दिवसाला सुमारे १००० नॅपकिनचं उत्पादन केलं जातं. इथं आंतरराष्ट्रीय स्टॅन्डर्डचं प्रोडक्शन होत असल्यानं बिल गेट फाऊंडेशमध्ये काम करताना झालेल्या ओळखीतून रिफ्रेश सॅनिटरी नॅपकिन आता अमेरिकेत पोचलंय. महिन्याला १००० हून अधिक पॅकेट अमेरिकेला पाठवण्यात येतायत. त्याची मागणी वाढत आहे हे विशेष. गावातल्या महिलांनी आरोग्यासाठी सुरु केलेल्या या प्लांटच्या प्रोडक्टला अमेरिकेतून वाढत चालेली ही मागणी विचारधारा महिला बचत गटाचं यश म्हणावं लागेल.

आता पुढचा टप्पा म्हणून गावागावात जाऊन नॅपकिन विकण्यासाठी ६० महिला कार्यकर्त्या काम करत आहेत. शिवाय शाळा कॉलेजेस आणि सरकारी कार्यालयांच्या आवारात सॅनिटरी नॅपकिन वेंडीग मशिन विचारधारा महिला बचत गटातर्फे लावण्यात येणार आहे. यासाठी आता प्रयत्न सुरु झालेत. “ आमच्याकडे शिवणी तांडा नावाचं गाव आहे. या गावात अजून एसटी पोचलेली नाही. तिथं आमचं नॅपकिन पोचलंय. “ छाया काकडे अभिमानाने सांगतात. हा व्यवसाय नसून ही आरोग्य चळवळ आहे असं त्याचं म्हणणं आहे. महिलांनी महिलांसाठी सुरु केलेली आरोग्य चळवळ!!!