योग तुम्हाला अधिक खंबीर आणि सकारात्मक बनवितो – योग गुरु रिंकु सुरी
‘योग’ – भारतीयांनी जगाला दिलेली एक उत्कृष्ठ भेट... केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठी योगाचे महत्व आता जगभरात सिद्ध झाले आहे. एवढेच नव्हे तर पाश्चात्य देशांनीही या योगाला आपले म्हणून त्याला एक वेगळे रुपही दिले आहे. आज योगाचे अनेक प्रकार त्यातूनच निर्माण झाले आहेत. हा योगच श्वास आणि ध्यास असलेल्या योग गुरु म्हणजे रिंकु सुरी... स्वतः योगाचा अनुभव घेतल्यानंतर जगालाही त्याचे फायदे पटवून देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि परिणामी ‘योगा १०१’ या संस्थेची स्थापना झाली. मुंबईत विविध प्रकारचे योगप्रकार शिकविणारी ही संस्था अनेकांसाठी निश्चितच एक वरदान आहे. रिंकु यांचा योगमार्गावरील हा प्रवास जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
मुंबईच्या एका शांत आणि निसर्गरम्य कोपऱ्यात वसले आहे ‘योगा १०१’... संस्थापिका आहेत रिंकु सुरी...
रिंकु यांचा जन्म मुंबईचा.... एका अतिशय सुरक्षित कुंटुंबात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांना नेहमीच शिक्षिका व्हायचे होते. पण त्यांच्या आईला मात्र त्यांनी शिक्षिका बनू नये, असे वाटत होते. त्यामुळे कला शाखेला जाण्याचा आपला निर्णय बदलून त्यांनी वाणिज्य शाखा निवडली आणि महाविद्यालयीन शिक्षणानंतर विपणन क्षेत्रात काम सुरु केले. सीएनबीसीमध्ये त्यांनी सुमारे बारा वर्षे काम केले. सीएनबीसीमधील अनुभवांबद्दल त्यांना नेहमीच कृतज्ञता वाटते. या नोकरीच्या निमित्ताने त्यांचे दोन छंद जोपण्यासाची त्यांना चांगली संधी मिळाली. एक म्हणजे प्रवास आणि दुसरे म्हणजे छायाचित्रण... मात्र पुढील काळात त्यांच्या आयुष्यात आलेल्या एका गोष्टीने त्यांचे आयुष्यच बदलून टाकले...ही गोष्ट होती ‘योग’... खास करुन योगाचे जादूई फायदे लक्षात आल्यावर तर योग हेच त्यांचे आयुष्य बनला आणि त्यातूनच पुढे त्यांचे शिक्षिका होण्याचे स्वप्नही साकार झाले. आज वेगवेगळ्या वयोगटातील आणि क्षेत्रातील लोक त्यांचे विद्यार्थी आहेत.
योगाशी त्यांची पहिली भेट झाली ती आठ वर्षांपूर्वी... आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी योग करण्याचा सल्ला त्यांना मिळाला होता. योग सुरु केल्यानंतर काही वर्षांमध्ये त्यांना आलेले अनुभव आणि योग या विषयाशी साधता आलेला संवाद यामुळे त्यांना एक वेगळेच परिवर्तन अनुभवायला मिळाले. “त्यानंतर मात्र योग हा माझ्यासाठी केवळ व्यायाम आणि तंदुरुस्तीचा विषय म्हणून सिमित कधीच राहिला नाही तर अधिक अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचे तो एक साधन बनला,” योगाविषयी आपल्या भावना व्यक्त करताना रिंकु सांगतात. पुढे ऑगस्ट २०१२ ला त्या कंबोडीया येथे सुटीसाठी गेल्या असताना त्यांना एक वेगळा अनुभव आला, तो म्हणजे सुटटीवर असतानाही, योगाचा सराव करण्यापासून त्या स्वतःला दूर ठेवू शकत नव्हत्या. अशातच कंबोडीयामध्येच त्यांना एका अतिशय सुंदर, निसर्गरम्य परिसरात एक योगा कॅफे सापडला आणि या कॅफेचा शोध ‘योगा १०१’ च्या स्थापनेमागची प्रेरणा ठरला.
आज एक यशस्वी योग गुरु असलेल्या रिंकु यांनी योगाच का बरे निवडला असेल? या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणतात, ““नियमित योग करणारी म्हणून आणि एक योग गुरु म्हणूनही मी तुम्हाला योगाचे अनेक फायदे सांगू शकते आणि हे केवळ शारीरिकच नाहीत, तर मानसिकही आहेत. सध्याची आपली जीवनशैली पहाता, आपण सगळेच प्रामुख्याने बैठी कामे करत असतो आणि या जीवनशैलीमुळे येणाऱ्या सुस्तपणावर मात करण्यासाठी योग हा एक उत्तम उपाय आहे. हा जगातील एकमेव असा व्यायामप्रकार आहे, ज्याद्वारे संपूर्ण शरीराची काळजी घेतली जाते - शरीरातील सर्व अवयव, मन आणि आंतरआत्म्याचीही... एका अर्थाने योगा तुम्हाला अधिक तरुण बनवितो आणि तेदेखील आंतरबाह्य स्वरुपात,” त्या सांगतात. योगाची महती सांगताना त्या पुढे म्हणतात, “ एखाद्या व्यसनापासून सुटका हवी असेल किंवा अतिरागावर ताबा मिळवायचा असेल किंवा साधे वजन कमी करायचे असेल, यापैकी कुठलीही समस्या असली, तरी योगामध्ये त्यावर औषध सापडते. एकूणच काय तर योग म्हणजे औषध एक उपचार अनेक, असेच म्हणावे लागेल.”
त्याचबरोबर रिंकु यांच्या मते योग तुम्हाला खंबीर आणि सकारात्मक बनवितो... योगामुळे तुम्ही तुमच्या सर्व शंका आणि संकोच दूर होऊ शकतात. तसेच योग करणाऱ्या व्यक्तींचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन इतरांपेक्षा जास्त सकारात्मक असतो. सहाजिकच योगाने रिंकु यांचे जीवन बदलले नसते तरच नवल... मात्र रिंकु यांचे वेगळेपण म्हणाल तर ते हे की त्या केवळ स्वतः योग करत राहिल्या नाहीत, तर इतरांनाही हा मार्ग दाखविण्याचे त्यांनी सांगितले आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे कंबोडीयाच्या अनुभवाची यासाठी पार्श्वभूमी होती.
कंबोडीयाहून परत आल्यानंतर त्यांनी मुंबईतील एका मोठ्या योग स्टुडीओची शाखा मिळविण्याच्या हेतूने त्यांच्याशी संपर्क साधला. पण जेंव्हा त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही तेंव्हा त्यांनी स्वतःच स्वतःचा स्टुडीओ सुरु करण्याचा निर्णय घेतला. यापुढील काळात घडलेल्या घटनांनी त्यांचा मार्ग आणखी सुकर केला. त्यांचे कुटुंबीय ज्या बंगल्यात रहात होते, तो सोडून दुसरीकडे जाण्याचा कुटुंबीयांनी विचार केला होता आणि हा रहाता बंगला भाड्याने देण्याचे त्यांनी ठरविले होते. मात्र हा बंगला भाड्याने देण्यापेक्षा स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याच्याच कामी वापरावा, असे रिंकु यांनी ठरविले. या स्टुडीओच्या कामाला त्यांनी डिसेंबर २०१२ मध्ये सुरुवात केली.तर जुलै २०१३ ला ‘योगा १०१’ चे प्रत्यक्ष कामकाज सुरु झाले. या स्टुडीओची रचना करण्याच्या कामी रिंकु यांचा सक्रिय सहभाग होता. या स्टुडीओची वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्यात आली आहे. तेथे लोकांना एकत्र बसण्यासाठी किंवा ग्रंथालयातून पुस्तके मिळवून वाचत बसण्यासाठी मोकळ्या जागेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच लोकांनी देणगी म्हणून दिलेल्या पुस्तकांचा संग्रह उपलब्ध असून त्यातील पुस्तके लोक वाचू शकतात. त्याशिवाय स्टुडीओमध्ये एक खास विभाग असा आहे, ज्या ठिकाणी आरोग्यवर्धनासाठी किंवा योगासाठी आवश्यक अशी उत्पादने उपलब्ध असतात, उदाहरणार्थ, धूप, विविध प्रकारची तेलं, योगासाठी लागणारे मॅटस् आणि पुस्तके त्याचप्रमाणे योगासाठी सुयोग्य असे स्वतः रिंकु यांनीच डिझाईन केलेल्या कपड्यांचा संग्रहही येथे उपलब्ध आहे.
हे झाले सोयीसुविधांविषयी....मात्र ‘योगा १०१’ हे खऱ्या अर्थानी अद्वितीय आहे ते तेथील मैत्रीपूर्ण वातावरण आणि अतिषय उत्कृष्ट अशा योग गुरुंमुळे... येथे योगाचे शिक्षण देणारे सर्व शिक्षक हे जगभरातून निवडण्यात आले असून त्यांच्याकडून योगाचे नानाविध प्रकार एकाच छताखाली शिकण्याची संधी येथे लोकांना मिळते. “ लोकांची योग शिकण्यामागची कारणे वेगवेगळी असतात, मात्र उत्तरोत्तर त्यांना या नात्यामध्ये एक वेगळेच परिवर्तन अनुभवायला मिळते. केवळ व्यायामाच्या निमित्ताने सुरु झालेला हा प्रवास हळूहळू मानसिक आरोग्याबाबतचा देखील बनतो आणि तुम्हाला एका वेगळ्या सुंदर अशा अध्यात्मिक वाटेवर घेऊन जातो. एका अर्थाने योग हा एक जीवनमार्गच बनतो. ही केवळ माझीच गोष्ट नाही, तर सगळ्यांच्याच बाबतीत हे घडते,” रिंकु सांगतात.
इच्छा तेथे मार्ग, हे रिंकु यांना पूर्णपणे मान्य आहे. आजकाल लोकांकडे फारसा वेळ जरी नसला, तरीही ते थोडासा का होईना व्यायाम करतातच. त्यातूनच त्यांच्यामध्ये याबाबत असलेली जागरुकता दिसून येते. खरे म्हणजे, योग हा नेहमीच भारतीय कुटुंबाचा एक भाग राहिला आहे, पण आता फरक म्हणाल तर तुम्ही स्टुडीओमध्ये जाता आणि अशा गुरुला बघता, ज्यांच्यासारखे बनण्याची तुम्हाला प्रेरणा मिळू शकते. “ संभाव्य ग्राहकांना खेचून घेणे हे माझ्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे (असे लोक जे त्यांच्या घरी किंवा सोयीच्या ठिकाणी योगसाधना करत असतात). तसेच या लोकांना स्टुडीओमध्ये येऊन योग करण्यासाठी प्रेरीत करणे हे देखील तेवढेच आव्हानात्मक... मी नेहमीच सगळ्यांना सांगत असते की एकट्याने योगसाधना करण्यापेक्षा गटामध्ये योगसाधना करणे अगदीच वेगळे आहे. त्यावेळी एक वेगळीच उर्जा असते आणि त्यातूनच शंभर टक्के प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला एक सूक्ष्म असा रेटाही मिळू शकतो,” एकत्र योग करण्यामागचे कारण स्पष्ट करताना रिंकु सांगतात.
रिंकु यांच्या स्टुडीओमध्ये लोकांना योगाचे विविध प्रकार अनुभवायला मिळतात, तेच त्यांना हवे असते. वृद्ध लोकांसाठी योग हा एक चांगला व्यायामप्रकार मानला जातो तसेच काही दुखण्यांवर उपचार म्हणूनही योग करण्याचा सल्ला दिला जातो. “ अनेकांना योग हा खूपच रटाळ किंवा संथ वाटतो. पण आता योगामधील वाढते वैविध्य पहाता, तो अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. आज मी मोठ्या संख्येने लोकांना योगमार्ग निवडताना पहाते आहे,”
पाश्चिमात्य देशांमध्ये पसरत असलेल्या योगाविषयीही रिंकु मोकळेपणाने बोलतात. “पाश्चिमात्यांनी योग मुळीच सौम्य केलेला नाही. त्यांनी केवळ त्यामध्ये काही फेरफार करुन त्याला एक वेगळा आकार दिलेला आहे. योगाच्या मूळ तत्वज्ञानाला कोणताही धक्का न लावता त्यांनी तो अधिक रंजक केला आहे. तुम्हाला कुठून तरी सुरुवात करावीच लागते आणि विनायासा सारख्या चैतन्यदायी आणि संगीताची साथ असलेल्या प्रकारापासून सुरुवात करणे खूपच आनंददायी असते,” त्या सांगतात.
योग हा रिंकु यांचा श्वास आहे. त्या खऱ्या अर्थाने तो जगतात. एखादी वेळ अशी येते, जेंव्हा त्यांना स्वतःला काही प्रश्न पडतात, मात्र ‘योगा १०१’ मध्ये त्या करत असलेल्या कामाकडे पहातात, तेंव्हा या सर्व शंकाकुशंका दूर होतात.
यापुढे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. देशभरातील त्यांच्या मित्रमैत्रिणींकडून त्यांना मदतीसाठी फोन्स, मेसेजेस आणि मेल्स येत असतात. कोणत्याही प्रकारचा त्रास असलेले लोक योगाच्या माध्यमातून त्यावर उपाय शोधण्यासाठी मदत मागतात... तर योग प्रसाराचे काम करणारे लोकही त्यांच्या स्टुडीओ उभारणीच्या दृष्टीने आवश्यक अशी मदत मागतात. “हा त्यांचा प्रवास आहे आणि मी त्यामध्ये त्यांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देऊ शकते, या गोष्टीचा मला मनापासून आनंद आहे,” त्या सांगतात.