मराठी माणसांतला ‘स्वयं’ शोधणारा प्रेरणादायी उपक्रम
यशस्वी ठरलेले लोक खरे तर सामान्यच असतात. परंतु ते असामान्य गोष्टी करण्याचा सतत प्रयत्न करत असतात. एखाद्या कार्याला त्यांनी पूर्णपणे वाहून घेतलेले असते व सतत नवीन गोष्टी शिकण्याचा ते प्रयत्न करत असतात. स्वत:मध्ये परिस्थितीनुसार बदल करत ते निश्चयाने आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतात. अशा विविध क्षेत्रांतील अनेक व्यक्तींमधला 'स्वयं' शोधण्याचा प्रयत्न करीत त्यांचा अनोखा आणि दिलखेचक प्रवास उलगडण्याचा उपक्रम तसा प्रेरणादायीच...चाकोरी नाकारून...स्वतःची वेगळी वाट तयार करणारी माणसं..त्यांचे अनुभव...इतरांच्याही जगण्यालाही नवी दिशा देणारे ठरतील...अशा जगावेगळ्या माणसांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणणारा...त्यांना व्यक्त होण्यासाठी एक हक्काचा व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा प्रेरणादायी उपक्रम तो म्हणजेच ‘स्वयं टॉक्स’....
समाजात वावरणाऱ्या सगळ्यांनाच यशस्वी व्हायचे असते. प्रत्येकजण आपआपल्या क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी धडपडत असतो. या साऱ्या धावपळीत धावणाऱ्यांचे लक्ष मात्र त्याच्या माहितीतील अनेक यशस्वी व्यक्तिमत्वांच्या वाटचालीकडे असते. मेहनत तर सारेच करतात. पण ही `यशस्वी माणसं’ यशस्वी झाली कशी, यश मिळवण्यासाठी ते नेमकं काय करीत असावेत, असे अनेक प्रश्न मनात घोंघावत असतात. त्या प्रश्नांची उत्तरं शोधून प्रत्येक यशस्वी व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी, त्याचा प्रवास उलगडण्याची संधी मिळावी या हेतुने परदेशात अनेक शो आयोजित केले जातात. मग आपल्या भारत देशात असे शो ते सुद्धा मराठी भाषिकांसाठी का नाही होऊ शकत? असा प्रश्न अनिल काळे व नविन काळे या पिता-पुत्र द्वयींच्या मनी निर्माण झाला आणि त्यातूनच जन्माला आला ‘स्वयं टॉक्स’ हा नवा उपक्रम... आज आपल्या चहुबाजूला अनेक नकारार्थी घटनांनी थैमान घातला आहे. ‘काही खरं नाही या देशाचं!’ असा एक अतीव निराशेचा सूर आपल्या सर्वांच्याच गळ्यातून निघताना दिसून येतो. अशा परिस्थितीत अनिल काळे व नविन काळे या पिता-पुत्रांनी ‘अमृतयात्रा’ या संस्थेच्या माध्यमातून शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या मराठी व्यक्तींचा यशस्वी प्रवास उलगडता यावा यासाठी भारत देशात पहिल्यांदाच राबविण्यात येणारा ‘स्वयं टॉक्स’ या उपक्रमाची सुरवात २००८ साली केली. अंबानी, बिर्ला, मित्तल, गोयंका यांच्यासारख्या उद्योजकांच्या यशोगाथा नेहमीच प्रकाशझोतात आल्या असून त्यांच्या बद्दल संपूर्ण जगाला माहीती आहे. परंतु महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यात अशा हजारो व्यक्ती आहेत ज्यांनी अनेक समस्यांना तोंड देत यशाचे शिखर गाठले असून केवळ राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळवीर देखील शाबासकीची थाप मिळवली आहे. अशाच विविध क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणून पर्यटक व कार्यक्रम यांच्या माध्यमातून त्यांना समाजापुढे सादर करण्याचे काम ‘स्वयं टॉक्स’चे सदस्य संयोजक नविन काळे व अनिल काळे यांच्यासोबतच स्नेहल काळे, आशय महाजन, रोहन आजगावकर, निवेदिता, शिल्पा आणि भाग्यश्री हे तरूण-तरूणी करीत आहेत. ‘स्वयं टॉक्स’ या प्रेरणादायी व्यासपीठावर एक विशिष्ट व्यक्तीच बोलत नाही, तर त्याला यशाचे शिखर गाठेपर्यंत कराव्या लागणाऱ्या संघर्षाचा गोड-कडू अनुभव येथे बोलत असतो. यातील विचार ऐकून व वक्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून एक ज्ञानी व उद्यमशील समाज तयार व्हावा, हे 'स्वयं टॉक्स' कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्राला व्याख्यानाची परंपरा काही नवीन नाही. ‘स्वयं टॉक्स' हा निव्वळ भाषणांचा कार्यक्रम नाही. 'स्वयं टॉक्स' चे वेगळेपण त्याच्या अनोख्या सादरीकरणात आहे. केवळ २० मिनिटांत प्रत्येक वक्ता आपला विषय मल्टीमीडियाच्या सहाय्याने मांडत असतो. सादरीकरण झाल्यावर उपस्थित असलेले तज्ञ व वक्ता यांच्यात प्रश्नोत्तरे हॊतात. उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, पर्यावरण, क्रीडा, समाज, संस्कृती, राजकारण अशा विविध विषयांवरील प्रेरणादायी व कृतीशील विचार अधिक प्रभावी पद्धतीने मांडणे हे ‘स्वयं टॉक्स' ' चे वैशिष्ट्य आहे. तसेच या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य् म्हणजे येथे येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांना कमी वेळेत जास्तीत जास्त चांगलं काय ऐकायला मिळेल याचा विचार करून प्रत्येक वक्त्याबरोबर दीर्घ काळ चर्चा करून, मुख्य म्हणजे, त्याच्या सादरीकरणाच्या रंगीततालमी घेऊन प्रस्तुत विषय नेटकेपणे व प्रभावीपणे पोहोचविण्याचा सराव घेतला जातो. या व्यासपीठावर बोलणारा कोणी इंजिनीयर पुल कसा बांधावा हे शिकवित नाही, किंवा यश कसे प्राप्त करावे हे शिकवित नाही. परंतू आपल्याला आलेल्या अनुभवावरून इतर श्रोत्यांना भविष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी वेळेआधीच बळ मात्र येथील प्रत्येक वक्ते देत असतात. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल स्पर्धात्मक गुणवत्ता व दृष्टीकोन नेमका कसाअसावा, याचे मार्गदर्शन करणारी ही एक ज्ञानयात्रा ठरली आहे. स्वतःचा शोध घेणारा ‘स्वयं टॉक्स' हा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रातील ज्ञानयात्रींना एकत्र आणून एका विशिष्ट साचेबद्ध प्रणालीत सादर करणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. दिवसेंदिवस ‘स्वयं टॉक्स' चे महत्व उमगलेले हजारो लोक या यात्रेत सदैव सामील होत आहेत. यापूर्वी या व्यासपीठावर भारतातील नऊ राज्याची माहिती गोळा करून 'डेटा बँक' तयार करणारे प्रदीप लोखंडे, अभिनेत्री व उत्तम निवेदिका समिरा गुजर-जोशी, माडिया मुलांसाठी व्दयभाषिक शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या समिक्षा गोडसे-आमटे, समुद्र कसवान्सोबतच गिधाडे, सागरी गरुड, भारतीय पाकोळी आणि वनसंवर्धनासाठी कार्यरत असणारे रामाशिष जोशी यासारख्या अनेक मान्यवरांनी आपला प्रवास उलगडला आहे. या उपक्रमामध्ये वरिष्ठ संपादक डॉ. उदय निरगुडकर, संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले, स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे संस्थापक संदीप वासलेकर या मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे.
'स्वयं' मधील विषय हे नेहमीच ताजे व भविष्याचा वेध घेणारे असतात. म्हणूनच सुरवातीला २०१४ साली या शोसाठी येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या १५० वरून आता हाऊसफुल्ल शो होत आहेत. या कार्यक्रमास जाणकार बुद्धीवादी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळ्त आहे. यात अनेक विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसून येतात. स्वयं' मधील सर्व भाषणे Swayam Talks या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. त्यामुळे या विचारांचा प्रसार खूप दूरवर होण्यास मदत होणार आहे. शेवटी कुणीतरी म्हटलेल्या छानशा ओळी सुचतात..., ‘इस दुनिया में ‘स्वयं’ से, अतिरिक्त दूसरा कुछ पाया नहीं जा सकता!’
स्वयं टॉकसमधील प्रत्येक प्रवास व अनुभव म्हणजे त्याचं बीज मनात पडल्यापासून ते रुजण्यापर्यंत नि रुजून अंकुरण्यापर्यंतचा प्रवास.. प्रवासाच्या या जन्मवेणा म्हणजे स्वत:चं पुन:पुन्हा घडणं, मोडणं, उभं राहणं असतं. त्यांच्या भावना-वेदना, व्यथा, सुखांना मूर्त रूप द्यायचं, म्हणजे परकायाप्रवेशच करायचा. स्वत:ला परजत ठेवायचं. स्वयं टॉक्स या अनोख्या उपक्रमाची मुहूर्तमेढ पुण्यात झाली होती. परंतू आता स्वयं टॉक्समधून ज्ञानाची भूक पूर्ण होऊन मिळत असलेल्या श्रोत्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे आता या उपक्रमाचा विस्तार वाढविण्याचा मानस आहे. भविष्यात डोंबिवली, पुणे, नाशिक, कोल्हापूर, ठाणे अशा विविध शहरांमध्ये स्वयं टॉक्सचा उपक्रम राबविणार आहोत.
– नविन काळे, संयोजक.
आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा :