१८ वर्षांपेक्षा कमी वयाचा संपादक आणि बडबड्या बातमीदारांची टीम – जाणून घ्या बालकनामा वृत्तपत्राची कथा
2003 मध्ये ‘बढते कदम’ संस्थेने प्रकाशित केले बालकनामा वृत्तपत्र...
‘बढते कदम’ संस्थेसह जोडली गेली आहेत जवळपास 10 हजार मुले...
मुलांच्या विकासासाठी अनेक कार्यक्रम राबविते ‘बढते कदम’...
‘बढते कदम’ मुलांद्वारेच चालविली जाते, ‘चेतना’ स्वयंसेवी संस्था त्यांना आर्थिक मदत करते...
बालकनामा वृत्तपत्र भारताच्या 4 राज्यांमध्ये वितरित होते...
2015 पासून वृत्तपत्र इंग्रजी अनुवाद करुन परदेशातही पाठवले जाऊ लागले...
वृत्तपत्रासाठी दोन प्रकारचे पत्रकार काम करत आहेत. एक बातमी लिहिणारे आणि दुसरे बडबडे पत्रकार...
कुठल्याही देशाच्या प्रगतीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्या देशातील प्रत्येक वर्गातील लोक समान रुपात प्रगती करतील. कुठलाही देश केवळ एका वर्गाच्या पुढे जाण्याने कधीही स्थायी प्रगती प्राप्त करु शकत नाही. जर आपण जगभरातील विकसित देशांकडे पाहिले तर स्पष्टपणे लक्षात येते की तिथे प्रत्येक वर्गाला सोबत घेऊन सरकारने पुढे वाटचाल केली आहे.
भारताविषयी बोलायचे झाले तर इथे खूप विषमता आहे. मात्र सर्वात सकारात्मक बाब ही आहे की भारतात आता लोक जागरुक झाले आहेत. गरीबांना आता शिक्षणाचे महत्त्व समजले आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथले तरुण आणि लहान मुले आता प्रगती करु इच्छितात. ते सर्व विषमतांना मागे टाकून आपले आयुष्य सुधारु इच्छितात आणि देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा बाळगतात.
‘बालकनामा’ वृत्तपत्र एक असाच प्रयत्न आहे, जो प्रत्यक्ष रुपात आपल्याला सांगतो आहे की आता भारताला खूप वेगात पुढे जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. ‘बालकनामा’ गरीब मुलांद्वारे चालविले जाणारे आठ पानांचे वृत्तपत्र आहे, जे लहान मुलांशी संबंधित मुद्द्यांना गांभीर्याने लोकांसमोर मांडते. ‘बालकनामा’चे वैशिष्ट्य हे आहे की याच्याशी संबंधित सर्व मुलांचे वय १४ ते १८ दरम्यान असते. ‘बालकनामा’ वृत्तपत्र ‘बढते कदम’ नावाच्या संस्थेद्वारे चालविले जाते, ज्याच्याशी देशभरातील १० हजारांहून जास्त गरीब मुले जोडली गेली आहेत. याव्यतिरिक्त ‘बढते कदम’ गरीब मुलांच्या विकासासाठी इतर अनेक कार्यक्रम राबविते. ही संस्था पूर्णपणे मुलांद्वारे चालविली जाते.
‘बालकनामा’ वृत्तपत्राची सुरुवात२००३ मध्ये झाली. तेव्हा ‘बढते कदम’ संस्थेमध्ये केवळ ३५ मुले होती आणि ही संस्था फक्त दिल्लीमध्ये काम करत होती. मात्र त्यानंतर संस्थेचा विस्तार झाला आणि नंतर संस्थेशी जोडल्या गेलेल्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. आता मुलांची संख्या १० हजारावर जाऊन पोहचली आहे. ‘बालकनामा’चे नेटवर्क दिल्लीव्यतिरिक्त मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये पसरलेले आहे आणि या वृत्तपत्राच्या पाच हजाराहून जास्त प्रती छापल्या जातात. एवढेच नाही तर बालकनामाचा २०१५ पासून इंग्रजीमध्येही अनुवाद केला गेला आणि आता याला परदेशातही पाठविण्यात येते.
‘बालकनामा’शी बऱ्याच काळापासून जोडल्या गेलेल्या शानूने युअरस्टोरीला सांगितले, “आम्ही बालकनामाच्या माध्यमातून गरीब मुलांशी संबंधित मुद्दे खूप गांभिर्याने उचलतो आणि लोकांसमोर मांडतो. आता माझे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असल्यामुळे मी आता वृत्तपत्रासाठी लिहीत नाही. मात्र सल्लागार म्हणून वृत्तपत्राशी जोडली गेले आहे आणि मुलांची मदत करते आहे. यापूर्वी मी अनेक वर्षांपर्यंत वृत्तपत्राची संपादक राहिले आहे.”
शानू सांगते की तिने तिच्या आयुष्यात खूप काही पाहिले आहे. जेव्हा ती ११ वर्षांची होती तेव्हा घरातील बिकट आर्थिक परिस्थितीमुळे तिला तिचे शिक्षण सोडून कारखान्यात काम करण्यासाठी जावे लागले. मात्र ‘बढते कदम’ आणि नंतर ‘बालकनामा’शी जोडले गेल्यानंतर तिचे आयुष्य बदलले. तिने तिचे शिक्षण पुन्हा सुरु केले आणि आता ती बॅचलर ऑफ सोशल वर्कच्या पहिल्या वर्षाला आहे. शानू व्यतिरिक्त इतर मुलांच्या आयुष्यातही ‘बढते कदम’च्या माध्यमातून बदल घडला आहे.
‘बालकनामा’चे नेटवर्क जबरदस्त आहे. त्यांनी आपले नेटवर्क अशा पद्धतीने तयार केले आहे की प्रत्येक जिल्ह्यात ‘बालकनामा’चे बातमीदार पसरलेले आहेत. यामध्ये मुले आणि मुली दोघांचाही समावेश आहे. सर्व बातमीदारांचे वय १८ वर्षापेक्षा कमी असते. हे बातमीदार आपल्या विभागातील मुलांच्या काय समस्या आहेत याची पहाणी करतात. हे लोक मुलांना जाऊन भेटतात. ‘बालकनामा’मध्ये दोन प्रकारचे रिपोर्टर्स आहेत –
1) बोलणारे/बडबडे रिपोर्टर किंवा शोध पत्रकार – हे बातम्या शोधतात
2) दुसरे रिपोर्टर जे बातम्या तपासतात आणि त्यांना लिहितात
आता बालकनामाच्या कहाणी लिहिणाऱ्या बातमीदारांची संख्या १४ आहे. त्याव्यतिरिक्त वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांचे बातमी काढणारे बातमीदार सक्रिय आहेत जे बातम्या पाठवतात. हे सर्व वेळोवेळी भेटतात. ‘बालकनामा’मध्ये बरीच उलट-सुलट तपासणी करुन आणि सहमतीने बातम्या छापल्या जातात. प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेला एडिटोरिअल मीटिंग असते. जिथे बातम्यांचे विश्लेषण केले जाते आणि पुढच्या महिन्यातील कामाविषयी ठरविले जाते.
शानू सांगते की वृत्तपत्राचे सर्क्युलेशन वाढविण्यासाठी आता ते लोक शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत आणि भविष्यात याच्या विस्ताराच्या अनेक योजना आहेत. जेणेकरुन वृत्तपत्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविता येईल आणि या माध्यमातून गरीब मुलांच्या समस्या सर्वांसमोर आणता येतील.
आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा संबंधित कहाण्या :
स्टार्टअप इंडिया मोहिमेने प्रेरीत बालउद्योजक बंधूंकडून पायाभरणी स्मार्टअप इंडियाची...
१६ वर्षाच्या मुलाने पर्यावरण रक्षणासाठी सुरु केले स्वतःचे स्टार्टअप ‘टायरलेसली’
पुण्यातील सात हजार विद्यार्थ्यांचा पाणी वाचवण्याकरता अनोखा उपक्रम
लेखक – आशितोष खंतवाल
अनुवाद – अनुज्ञा निकम