कचरा वेचकमुलांना स्थान मिळवून देणा-या ‘वंचितांचा रंगमंच’च्या रंगकर्मी हर्षदा बोरकर!
कलाक्षेत्रातील एक सशक्त माध्यम म्हणून नाट्यकलेकडे पाहिलं जातं. पांढरपेशी वर्गाशी निगडीत माध्यम असा याकडे पाहणा-यांचा दृष्टीकोन असतो. पण कलेला जात, धर्म नसतो. अशा या संकल्पनेचे ध्येय उराशी बाळगून वंचित असलेल्या लहान मुलांमध्ये नाट्यकलेची जाणीव करुन देणे आणि त्यांच्यातील उपजत गुणांचे संवर्धन करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून ‘वंचितांचा रंगमंच’ करत आहे. ही आगळीवेगळी संकल्पना शहरी भागातील नाटक, अभिनय क्षेत्रातील काही जाणकार मंडळीनी मांडली आणि ती प्रत्यक्षात कलामंचावर आणलीदेखील..... या संकल्पनेचा एक अविभाज्य भाग असलेल्या व या सगळ्या प्रवासात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून या बच्चेकंपनीला एकत्रित आणून त्यांच्या कला गुणांना वाव देण्याची जबाबदारी हर्षदा बोरकर यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आणि एक आव्हानं म्हणून ते स्वीकारत हर्षदा बोरकर यांनी देखील ही जबाबदारी अगदी लिलया सांभाळली आहे.
ठाण्यात राहत असलेल्या हर्षदा बोरकर यांना लहानपणापासून अभिनयाची प्रचंड आवड होती. ही आवड जोपासत त्यांनी यातच करियर केले. अभिनयासोबत हळूहळू त्यांनी दिग्दर्शन, लेखनही सुरु केले. नृत्यातही त्यांचा हातखंडा आहे. दरम्यानच्या काही काळ त्या निवदेनही करत असत. गेली २५वर्षे त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आपला आगळा-वेगळा ठसा उमटवला आहे. आतापर्यंत रंगमंचावर त्यांनी विविध सामाजिक विषयही मांडले आहेत. दरम्यानच्या काळात, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची सुप्रिया मतकरी यांच्याशी भेट झाली. तर इंदिरा नाटकाच्या दरम्यान लेखक, साहित्यकार रत्नाकर मतकरी यांना भेटण्याचा योग आला. नाटकाबाबत हर्षदा बोरकर यांची अभिरुची, प्रगल्भता पाहता रत्नाकर मतकरी यांनी ‘वंचितांचा रंगमंच’ या संकल्पनेबाबत हर्षदा यांच्याशी चर्चा करुन त्यांना या उपक्रमात सहभागी करुन घेतले. एवढेच नव्हे तर या उपक्रमाची अत्यंत महत्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली. हर्षदा या उपक्रमात हिरीरीने सहभागी झाल्या आणि या उपक्रमाच्या त्या समन्वयक झाल्या. वंचित असलेल्या समाजातील मुलांना एकत्रित आणण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले. आसपासच्या घटकांना सामावून घेणे व कलेचे अवकाश धुंडाळणे हे या ‘वंचितांचा रंगमंचा’चा प्रमुख उद्देश आहे.
२०१४साली ‘वंचितांचा रंगमंच’ या नावाने हा उपक्रम सुरु झाला. हर्षदा बोरकर यांनी ठाण्यातील गोकुळनगर, कळवा पाईप लाईन, कोपरी, येऊर, कल्याण डम्पिंग ग्राऊंड येथे कचरा वेचणारी मुले, मुंब्रा झोपडपट्टी, मनोरमा नगर, किसन नगर, नवशेबाई कंपाऊंड आदी ठिकाणातील झोपडपट्टीतील मुलांना शोधण्याचे काम सुरु केले. या वेग-वेगळ्या वस्तीत जावुन येथील मुलांना शोधणे त्यांच्याशी संवाद साधून नाटक, नृत्य याबाबत रुची आहे का? हे जाणून घेणे, त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा करणे, ही मुले याबाबत कशाप्रकरे व्यक्त होतात हे पाहणे, त्यानंतर या मुलांच्या पालकांना याबाबत समजून सांगणे हे सर्व करताना हर्षदा यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. परंतु या अडचणींवर मात करत ऊन-पावसाची पर्वा न करता त्यांनी या कामात स्वत:ला झोकून घेतले होते आणि त्यांच्या मेहनतीला यश आले. त्यांनी ८ ते १८या वयोगटातील मुलांना या उपक्रमाकरीता सज्जही केले. या मुलांमधील उपजत कलागुणांना वाव देत झोपडपट्टीतील मुलांसाठी रंगमंचावर एक दालन उघडून दिले.
सध्या लहान मुलांचे २० ते २२गट त्यांनी तयार केले आहेत. गेल्यावर्षी या मुलांनी रंगमंचावर २२बालनाट्ये सादर केली तर यंदाच्या वर्षी या मुलांनी १८नाटके सादर केली आहेत. या नाटकांना आणि या उपक्रमाला नाट्यक्षेत्रातील दिग्गजांनी भरभरुन प्रतिसाद दिला असल्याचे हर्षदा सांगतात. तर काही दिवसांपूर्वी ठाणे येथे झालेल्या नाट्य संमेलनात ‘वंचितांचा रंगमंचा’च्या बालकलाकरांना आमंत्रित करण्यात आले ही बाब माझ्यासाठी खूप आनंदाची असल्याचे हर्षदा सांगत होत्या. या नाट्यसंमेलनात आम्ही तीन तासाचे नाटक सादर केले शिवाय कलावंत रजनी या कार्यक्रमात १०मिनिटाचे नृत्य सादरही केले. शिवाय दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्या आगामी चित्रपटात देखील या बच्चे कंपनीपैकी एक चुणचुणीत मुलगी चित्रपटात काम करत असल्याचेही हर्षदा म्हणाल्या. आगामी काळात ही पिढी रंगमंचावर स्वत:चा एक ठसा उमटवेल हे मात्र निशि्चत असे मत व्यक्त करत या उपक्रमाचा एक अविभाज्य भाग असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा संबंधित कहाण्या :